in

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३

नमस्कार सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!, दिवाळी आनंदमयी, मंगलमयी जावो हिच सदिच्छा!!

नुकताच डिपफेक किंवा प्रचंडखोटं, मोठखोटं किंवा अगदी शब्दशः अर्थ काढायचा झाला तर खोलखोटं या विडियोवरुन खूप वाद झाला. त्यावरुन मला रोवेन अॅटकिंनसनचा (Mr. Bean) चित्रपट Johny English Strikes Again मधला एक प्रसंग आठवला. तो चित्रपट जेम्स बाँड चित्रपटांची पॅरोडी आहे. त्यामुळे अर्थात मुख्य नायकाने मूर्खपणा करणे, सहायक हुषार असणे वगैरे प्रकार त्यात आहेत. त्यात एका प्रसंगात सहायक इंग्लिशला म्हणजे नायकाला व्हॅर्च्युअल रियालिटी समजावून सांगत असतो. त्याला एक चष्मा देतो आणि सांगतो यात जिथे जायचे ती जागा उभी करण्यात आली आहे म्हणजे नेमके त्यावेळेला कसे वागायचे, दरवाजे कसे आहेत या साऱ्या गोष्टीचा अंदाज येईल. जे आपण नेहमीच करीत असतो म्हणजे जसे कुणाला भेटायला जायचे असेल किंवा महत्वाचे प्रेझेंटेशन असेल किंवा भाषण असेल तर आपण मनात एक चित्र आधीच उभे करतो. स्वतःला प्रश्न विचारतो म्हणजे खऱ्या आयु्ष्यात एखाद्या गोष्टीला सामोरे जाण्याआधी आपण त्याचा आभासी जगात विचार करतो. याचा अर्थ आपण कायम आभासी जगतात राहतो का तर नाही तो एक तयारीचा भाग असतो. चित्रपटात दाखवलेला व्हॅर्च्युअल रियालिटी सुद्धा तेच करते फक्त त्यातल्या दृष्यात्मकतेची ताकत फार मोठी असते. त्यामुळे त्याची परिणामकारकता जास्त असते. युनिव्हर्सल स्टुडियोला गेलो की असा अनुभव येतो. एकाच जागी बसून कुठेतरी रोलर कोस्टर राईडमधे बसलोय असा अनुभव येतो. (माझी खऱ्या राइडमधे बसायची हिंमत नाही)खाली बघितले आणि कळले की हे सारं खोटं आहे आपण एकाच जागी बसलो आहोत तर त्यातली गंमत निघून जाते. चित्रपटात सुद्धा नायकाला फक्त एका वर्तुळातच फिरायचे असते परंतु तो नायक चुकीचे बटन दाबतो त्यामुळे तो वर्तुळाच्या बाहेर निघून जातो. मग त्याचे आभासी जग आजूबाजूचे खरे जग यात जो गोंधळ उडतो तो चित्रपटातच बघण्यासारखा आहे. असाच गोंधळ तुम्हा आम्हा सर्वांचा नेहमी होत असतो.

इंग्लिश या नायकासारखे कितीतरी हल्ली त्यांच्या आभासी जगतात वावरत असतात यात बरेच धोके आहे. हि मंडळी त्यांच्या आभासी जगतात इतकी हरवलेली असतात की त्यांना आजूबाजूच्या जगाचे भान राहत नाही. रस्त्याने वेड्यासारखी बडबडणारी खूप मंडळी हल्ली दिसतात. मेट्रो किंवा बसमधे जोरजोरात युट्युब बघत असतात. काही तसेच रस्त्याने चालले असतात. दुसरा धोका हा की तेच खरे वाटायला लागते. आजची पिढी प्रत्येक गोष्ट फक्त ऑनलाईन शोधत असतात. मी आणि मुलगा मुलासाठी राहण्याची जागा शोधत होतो तेंव्हा तो फक्त ऑनलाइन बघून सांगत होता. हे चांगल, हे वाईट मला सांगावे लागले बाबा रे प्रत्यक्ष जाऊन बघू फोटोवर जाऊ नको. त्याला हे अनुभव आलेत. यांनां इंस्टाचे अधिक फिल्टर माहित असतात तरी यांचा त्या फोटोंवर विश्वास असतो. अरे बाबांनो जा प्रत्यक्ष बघा काय आहे ते. आभासी जगतात पुढची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे यापेक्षाही पुढची व्यक्ती कुणी जिवंत व्यक्ती आहे की फक्त एक आयडी अशी समस्या असते. आभासी जगाचा वापर सहायक म्हणून व्हायला हवा पण आभासी जग आणि खरे जग याची अशी सरळमिसळ होऊ नये.

मी असे म्हणत असतानाच माझी एका अप्लिकेशनशी ओळख झाली VST (Visual See Thru). हा व्हर्च्युअल रियालिटीचाच एक भाग आहे. यात तुमच्या आजूबाजूला जे आहे तेच तुम्हाला दिसत असते. फक्त यात ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी न बघता डोळ्यावर लावलेल्या चष्माच्या सहाय्याने बघत असता. तुम्ही म्हणाल यात काय मोठ त्याचा काय उपयोग. ते तुम्हाला सर्व खरखरं दाखवेल, तुमचा विश्वास बसेल नंतर जर का एखादी गोष्ट त्याने बदलली तर मात्र सत्य आणि असत्य याची तुमच्यासाठी त्या जॉनी इंग्लिशसारखी बेमालूम सरमिसळ होईल. तुम्ही टपरीवर चहा पित आहात. तुम्हाला आजूबाजूला आहे तेच दिसेल फक्त समोरच्या बाकावर विराट कोहली हातात चहाचा कप घेऊन चहा पिताना दिसेल. झाला ना गोंधळ. खरतर डिपफेक आणि VST हे दोन्ही तंत्रज्ञान वेगेवेगळे आहेत एक Artificial Intelligence आहे तर दुसरे Augmented Reality आहे पण दोन्ही मधून साधलेला परिणाम एकच सत्य आणि असत्य याची बेमालूम सरमिसळ.

सत्य आणि असत्य याची सरमिसळ हे काही आताच होत आहे असे नाही. हे पूर्वापार चालत आलेले आहे. अस म्हणतात की यु्द्धात सर्वात जास्त हानी कशाची होत असेल तर ती सत्याची असते. इतिहास जेते लिहितात त्यामुळे त्यांना सोयीस्कर तोच इतिहास लिहिला जातो. इतिहास नेहमी शिलालेख, किंवा पत्रव्यवहार किंवा कागदपत्रांवरून अभ्यासतात. पत्रव्यवहार हा प्रत्येकाचा आपला दृष्टिकोण असतो आणि शिलालेख राजे त्यांच्या सोयीने लिहून घेत असत. बखऱीला बरेच इतिहासकार इतिहास म्हणून मानत नाही. खरा इतिहास कोणता हि समस्या नेहमीच इतिहासकारांना भेडसावत असते. नंतर कादंबऱ्या आल्या लोकांना तोच इतिहास वाटायला लागला. मग चित्रपट आले, टिव्ही मालिका आल्या बऱ्याच मंडळींना तेच खरे वाटू लागले. काहीही म्हटले तरी दृष्यमाध्यमाची ताकत फार मोठी आहे. इतिहासाच्या बाबतीतच होते असे नाही तर प्रतीके वापरुन काही वेगळे सांगायची पद्धत नाटककारांनी खूप मोठ्या प्रमाणात वापरली. नाटकात प्रत्यक्ष खूनहोते परंतु लेखकाला त्याच्या कलाकृतीचा खून होतोय असे सांगायचे असते. कधी उलटही असते नाटकातल्या कथेतून आजच्या परिस्थितीवर भाष्य करायचे असते. तेही त्याला वाटते ते.

सत्य आणि असत्य याची सरमिसळ सातत्याने होत राहिली. आज सामाजिक माध्यमातून तेच होत आहे. आज समाज माध्यमात इतक खोटं मिसळले गेले की समाज माध्यमात जे आहे ते खोटे आहे अशीच धारणा सर्वत्र आहे. सुरवातीलाच लोक टिप जोडतात, हे सारं व्हाटसअॅप ज्ञान आहे बरं मग त्यांना काय सांगायचे ते सांगतात. थोडक्यात काय व्हाटसअॅपवर जे येते ते विश्वास ठेवण्यासारखे नाही हा समज आता दृढ झाला आहे. फोटो फिल्म होती तेंव्हा ते पूर्ण सत्य होते. डिजिटल फोटो आल्यापासून ते मॉर्फ आहेत असे सरसकट म्हणता येतात. इंस्टा इतके फिल्टर देत फोटो आणि सत्य याचा काही संबंध नसतो. हल्ली सारे एकच ट्रेंडिंग फिल्टर वापरतात त्यामुळे सारे सारखेच दिसतात.

फिल्टरने फोटो बदलता येतात परंतु Generative AI नी कॅमेरा न वापरता फोटो तयार करता येतो. आधी सारे गाण्यासंबंधात ऑटोट्यून च्या नावाने ओरडायचे, आजही ती ओरड असते. हल्ली गायक गाण्यांच्या कार्यक्रमात सर्रास लिप सिंक करु लागले. कळत नाही कोणत्या गाण्याला लिप सिंक केले कोणते स्वतः म्हणतायेत. स्टेजवर झगमगाट इतका असतो. काही आवाज रेकॉर्डिंग वेगळे करायचे पण पुढे पिच किंवा इतर गोष्टि बदलून एक वेगळा आवाज तयार करण्यात येतो. त्यामुळे गायकांचा आवाज वेगळाच भासायला लागतो. जर का ALM (Audio Learning Model) हे LLM (Language Learning Model) सारखे प्रगत झाले तर आपण जे गाणे ऐकतोय ते गायक गातोय की मशीनने गाणे तयार केले आहे हे कळणार नाही. गायकांच्या पोटावर लाथ. पूर्वी गल्लोगल्ली फोटोग्राफर दिसायचे हल्ली प्रत्येक घरात दोन असतात तसेच पुढे जाऊन घरोघरी गायक तयार होतील. तीन सेकंदाचा तुमचा आवाज मशीनने आवाज पुननिर्माण करण्यास पुरेसा आहे असे म्हणतात. ChatGPT कथा कविता सहज बनवून देते. पुस्तकांचे परिक्षण हल्ली ChatGPT किंवा Google Bard ला सांगून करुन घेत आहेत.मशीन आणि मनुष्य असा नवीन संघर्ष तयार झाला आहे.

कितीही आरडाओरडा केला तरी येणारं तंत्रज्ञान थांबवू शकत नाही किंबहुना तसे करणे हे अधिक धोक्याचे आहे. तंत्रज्ञानाचे फायदे तितकेच असतात. एखाद्या भाषेतील काही शब्द गायकाला उच्चारता येत नसतील तर ते ALM वापरुन तसे रेकॉर्ड करता येईल. AI मुळे जाहिरात जगताचे लोकशाहीकरण होऊ शकते. कोपऱ्यावरचा दुकानदार स्वतःची जााहिरात स्वतःच बनवू शकेल. जर ALM वापरुन गाणे तयार करता येत असेल तर असे काही नक्की निघेल की ज्याने कळेल मशीनचा आवाज आहे की माणसाचा . तीच गोष्ट डिपफेकच्या बाबतीत होईल. काही काळ सामान्य माणूस त्याला फसेलही परंतु हळूहळू तोही शहाणा होईल. बदलत जाणे , शिकणे हा माणसाचा मूळ गुणधर्म आहे.तसे बघितले तर आभासी जगतात जे असते ते सारे खोटेच असते असे नाही. उलट बऱ्याच चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहाचवायचे काम आभासी जगताने केले. समाज माध्यमांमुळे ज्ञानाचे लोकशाहीकरण झाले आहे. काहींनी स्वतःचा एकटेपणा घालविण्यासाठी आभासी जगताचा वापर केला.

कितीही म्हटले तरी खरे जगआभासी जग यात फरक असतो. सत्य आणि सत्याचा आभास वेगळा असतो. मनुष्याला देवाने डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ ही पंचेंद्रिये दिली आहेत ज्याच्या सहाय्याने मनुष्य शिकत असतो. तो जे शिकला त्यावर त्याचा विश्वास प्रबल होत जातो. मनुष्याने एकमेकांना भेटणे गरजेचे आहे म्हणूनच तर सणवार निर्माण करण्यात आले. कंपन्यांनी देखील WFH केंव्हाच बंद केले. आभासी जगतात वावरणारी माणसे जर प्रत्यक्षात आली नाही, लोकांमधे मिसळली नाही तर बाजूचा खांद्यावर हात ठेवून कितीही खोटे सांगत असला तरी तेच खरे वाटेल आभासी जगताततले खोटे वाटेल. मनुष्याची शिकण्याची समजून घेण्याची वृत्ती खुंटली असेल. तेंव्हा या दिवाळीच्या निमित्ताने अशी आशा करतो की हळूहळू मनुष्य वास्तव जग आणि आभासी जग यातला फरक आणि फायदे समजून घेईल. याचा वापर करुन शहाणा होईल. अशा एका मित्राला भेटाल ज्याच्याशी कॉलेज संपल्यापासून फक्त व्हॉटसॅपच्या माध्यमातूनच संपर्कात आहात.

परत एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Mitraho

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२४

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

Post Title