आज कधी नव्हे ते चप्पल घालून बाहेर चालल्यामुळे त्याला चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.
एक चा टोल पडला घड्याळात.
“चल रे, आज जेवायचे नाही का ?” तिचा आवाज ऐकून तो एकदम भानावर आला.
“हो, चला. कुठे जायचे आज?” उगीच काहीतरी विचारायचे म्हणून तो उत्तरला.
तसे नेहमीचे ठिकाण ठरलेलं होतं . दोघंही पटकन निघाली. इकडच्या , तिकडच्या गप्पा सुरु असताना, तिचे लक्ष त्याच्या पायांकडे गेले.
“हे काय ? आज चप्पल अचानक ?”
“अगं , कालच्या पावसात शूज चिंब भिजले. म्हणून …. “
“आणि हे काय, पायाची नखं केवढी वाढवलीयस ? हाहाहा ..” ती एकदम हसायला लागली.
“आं .. अं .. ते काय आहे ना, शूज घालतो ना नेहमी, त्यामुळे नखं काढली काय, आणि नाही काय… फरकच पडत नाही… ” त्याने कारण सांगितले .. पण एकदम ओशाळून गेला तो.
त्याला तसे पाहून ती आणखी जोरात हसायला लागली. या क्षणी जमीन दुभंगून सीतेसारखे लपून जावं , असा वाटलं त्याला. तिचा हसण्याचा बहर ओसरला, आणि त्याने काहीतरी विषय बदलला.
उसनं अवसान आणून तो उगीच म्हणाला “हसून घे पाहिजे तेवढं , मला काहीही फरक पडत नाही. असाच आहे मी.”
पण राहिलेला दिवसभर पाय लपवून बसला तो….
—————————————————————————————————————
दुसऱ्या दिवशी सॉक्स चढवले, आणि शूज घेताच हात थबकला त्याचा. आज शूज एकदम क्रिस्प वाळले होते. पण काय वाटले काय ठाऊक, शूज परत तसेच ठेवले, सॉक्स काढून टाकून दिले. उशीर झाला होता. तरीही काहीतरी आठवले आणि बाथरूम कडे पळाला….
“चला महाराज , भूक लागली नाही का ? कि आजच सगळं काम संपवायचंय ?” ती मजेत म्हणाली.
त्याने घड्याळाकडे पाहिले. १ वाजले होते.
“चला !” म्हणत घाईघाईत तो निघाला .
कालच्या सारखंच , इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असताना, तिचं लक्ष परत त्याच्या पायाकडं गेलं .
ती जोरजोरात हसायला लागली. कालच्यापेक्षा कितीतरी जास्त. थांबायलाच तयार नव्हती.
“अरे तू चप्पल घातलीस आज पण. आणि हे काय तू नखं काढलीस पायाची. ? हाहाहा … “
तो जाम ओशाळून गेला होता.
“अगं , त्यात काय एवढं ? काढली अशीच.. आणि प्लिज गैरसमज करून घेऊ नको हां ! .. तू म्हणाली म्हणून वगैरे काही नाही काढली मी … “
तो उगीच सावरासावर करू लागला. तशी ती आणखीच जास्त हसायला लागली. डोळ्यात पाणी येई पर्यंत हसली
ती अगदी. त्याला काय बोलावे तेच कळेना. गप्प बसून राहिला तो…
” हो रे , मला माहितीय .. मी काल म्हणाले म्हणून काही नाही काढली तू नखं . तसाही
तुला काही फरक पडत नाही , तू म्हणालास ना काल ? ” ती उगीच त्याची समजूत काढत मिष्कीलपणाने म्हणाली.
तसा अजून उखडला तो. खरे तर स्वतःवरच जास्त चिडला होता तो …
—————————————————————————————————————
GIPHY App Key not set. Please check settings