in

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!

डियर बाओबाबचे मुखपृष्ठ   

आईवडिलांपासून, मायभूमीपासून दुरावलेल्या एका मुलाची आणि एका निहायत देखण्या झाडाची ही गोष्ट..
गुलमोहराला बंगाली, आसामीमध्ये कृष्णचुर म्हटले जाते! कृष्णाच्या मस्तकावरचा मुकुट या अर्थाने हे नाव आहे. तर उडीयामध्ये नयनबाण असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याची पुष्कळ नावे आहेत, त्यातले mayflower नाव सार्थ आहे. तीव्र उन्हाने बाकी सगळी फुले अवघ्या काही दिवसांत तासांत कोमेजून जात असताना ऐन वैशाखात, लालबुंद गुलमोहोर अक्षरशः दहा दिशांनी बहरून येतो!

गुलमोहरावर बंगाली, आसामी भाषेत काही देखण्या कविता केल्या गेल्यात. त्याला राधा आणि कृष्णाचे संदर्भ आहेत.

गुलमोहर आता जरी देशभरात आढळत असला तरी तो आपल्याकडचा खचितच नाही. गुलमोहरापेक्षा लहान, मात्र रंगाने अगदी तसेच साधर्म्य असणाऱ्या याच वंशावळीतले एक झुडूप म्हणजे मोरपंखीचे झाड, मराठीत याला शंकासूर असं विचित्र नाव आहे. हिंदीत मात्र गुलतुर्रा असं सार्थ नाव आहे.

गुलमोहर असो की गुलतुर्रा, यांचे मूळ आफ्रिकेच्या दक्षिण पूर्वेचा देश मादागास्करमध्ये आहे. हे तिथले झाड. तिथून ते जगभर पसरले.

गुलमोहर ही मादागास्करने जगाला दिलेली सुरेख भेट आहे. असे असूनही मादागास्करच्या राष्ट्रीय वृक्षाचे नाव बाओबाब आहे. भल्या मोठ्या कठीण बुंध्याचे हे झाड, ज्याचे फळ विविध गुणकारी आहे. याची साल देखील गुणकारी आहे.
मराठीत या वृक्षाला ला गोरखचिंच म्हणतात. खरे तर हा लाईफ ट्री होय. 2000 ते 3000 वर्षे, याचे आयुष्य.

मध्यंतरी ठाण्यात 300 वर्षे वयाच्या बाओबाब वृक्षाची कत्तल केली जाणार होती, माझी मैत्रीण रुपाली पारखे देशिंगकर हिच्या पुढाकाराने त्या संदर्भात आंदोलन उभं राहिलं नि ते झाड वाचलं! तसेही आपल्याकडे सरकार दरबारी झाडांविषयी आत्मीयता कमीच असते. असो.

याच बाओबाब बद्दल एक अतिशय देखणं चित्रपुस्तक बनवलं गेलंय. ‘डियर बाओबाब’, हे त्याचे नाव.

कॅनडियन लेखिका शेरील फॉगो यांनी लिहिलेले आणि कींन लेंग यांनी चित्र रेखाटन केलेले हे चित्रपुस्तक अप्रतिम 

आफ्रिकन बाओबाब वृक्ष   आशयाने समृद्ध आहे.

सात वर्षांच्या मायको नावाच्या मुलाची ही गोष्ट. मायको आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आफ्रिकेतील टांझानिया येथील आपल्या गावातून कॅनडाला आपल्या काका-काकूंकडे (पीटर आणि अजिया यांच्याकडे) राहायला येतो.

मायको आपलं गाव, देश सोडून मातृभूमीपासून दूर देशांत जातो. तिथे त्याला आईवडिलांच्या जोडीने त्याच्या लाडक्या बाओबाब वृक्षाचीही नित्य आठवण येत राहते. या वृक्षाच्या छायेत तो त्याच्या बालमित्रांसोबत खेळायचा. तिथे त्याच्या दिसण्यावरून, चेहऱ्याच्या ठेवणीवरून कुणी चिडवत नसे.

इथे कॅनडामध्ये मात्र त्याच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून आणि मोठ्या कानांवरून अनेक मुले त्याची छेड काढत असतात. त्याला समजून घेईल असे कुणीच भेटत नाही. मग काकांच्या घराच्या अंगणातील, एका छोट्या स्प्रूस वृक्षाशी (Spruce Tree) तो मैत्री करतो. हे झाड त्याच्याच वयाचे, म्हणजे सात वर्षांचे असते.

मायको रोज या झाडाशी बोलत राहतो. आपल्या गावाकडच्या आठवणी, भावना आणि बाओबाबबद्दलच्या स्मृती त्याच्यासोबत शेअर करतो. नवीन वातावरणात सामावून जाण्यासाठीचा त्याचा संघर्ष स्प्रूस वृक्षस्प्रूससोबतच्या मैत्रीने कमी होतो.

एके दिवशी अघटित घडते. मायकोला कळते की, लवकरच अंगणातला स्प्रूस वृक्ष कापला जाणार आहे. स्प्रूसच्या ठेवणीमुळे, तसेच त्याच्या मुळांपासून घराच्या पायाला धोका असल्याचे निष्पन्न झालेले असते. घरातील सर्वांची घाई असते की लवकरात लवकर झाड कापले जावे, अपवाद असतो मायकोचा!

स्प्रूसचे झाड वाचावे म्हणून मायको शर्थीचे प्रयत्न करतो. वास्तवात, तो झाडाच्या जागी स्वतःला ठेवून तुलना करत असतो. स्प्रूसचे  झाड जसे चुकीच्या जागी लावले गेल्याने काढून टाकणे अनिवार्य ठरते तद्वत तो स्वतःला मादागास्कर सोडून चुकीच्या जागी रुजवले जाण्याच्या वाटेवर समजू लागतो. त्यातून त्याचा विरोध जन्माला येतो.

शेवटी मायकोला कळून चुकते की, जीवनांत काहीवेळा आपण जिथे रुजवले जातो तिथे वाढू शकत नाही परंतु दुसरीकडे नवीन जागा मिळण्याची संधी मिळू शकते, मग त्या नवीन जागेत स्वतःला त्यानुरूप बदलवून घेतलं की आपसूक आपण तिथे रुजून जातो, फुलून उठतो!

मायकोचे स्थलांतर, त्याचं एकाकी असणं आणि नव्या संस्कृतीत सामावून जाण्याचा त्याचा संघर्ष हे स्प्रूसशी निगडित घटनांमधून आपल्या समोर येत राहतात. अखेरीस आपण दिग्मूढ होतो, हे पुस्तक मनापासून वाचणारा कोणताही किशोर, किशोरी झाडांच्या संवर्धनासाठी नेहमीच कटिबद्ध राहील इतकी ताकद यात आहे.

ज्या मुलाला हॉस्टेलला ठेवायचे आहे, वा शिक्षण नोकरी निमित्ताने गावापासून दूर जावे लागणार आहे त्या प्रत्येकासाठी हे वाचनीय आहे. खरेतर हा विषय आणि ही मांडणी इतकी देखणी आहे की याला बालसाहित्य या श्रेणीमधून बाहेर काढून सर्ववयीन वाचकांच्या श्रेणीत ठेवले पाहिजे.

कथेच्या शेवटी स्प्रूस वृक्षाचे काय होते आणि शाळेत रोज टवाळकीला सामोरा जाणारा मायको अखेरीस कसे वागतो, हे इथे लिहिणे अनुचित होय.

स्थलांतरित मुलांच्या भावनिक आव्हानांचे संवेदनशील चित्रण या पुस्तकात येते. एकटेपणा, मायदेशाची ओढ आणि नव्या जागी नवीन संस्कृतीत स्वतःचे स्थान शोधणे यांचे परस्पर संबंध अत्यंत ताकदीने समोर येतात. पोएटिक शैलीतले लेखन आणि अतिशय देखणी चित्रे ही आणखी एक जमेची बाजू.

लेखिका शेरील फॉगो या कॅलगरी, कॅनडा येथील एक बहुआयामी लेखिका, पत्रकार, नाटककार, आणि चित्रपट निर्मात्या होत. प्रामुख्याने कॅनडाच्या पश्चिम भागातील कृष्णवंशीय लोकांच्या इतिहासावर केंद्रित लेखन त्यांनी केलेय. छळाला सामोरे जाणाऱ्या स्थलांतरित मुलांची नेमकी मानसिकता लेखिकेने टिपली असल्याने हे पुस्तक जगभरात वाचले गेलेय. युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेत जवळपास सर्व शाळांच्या ग्रंथालयात याला स्थान लाभलेय.

‘डियर बाओबाब’ वाचत असताना आणि कृष्णचुरावरच्या बंगाली गुलमोहर  कविता वाचत असताना लक्षात येते की, जगात अशीही माणसं आहेत जी झाडांना, पाना फुलांना, पक्षांना समजून घेतात त्यांच्याशी संवाद साधतात आणि निसर्गाशी नाते जुळवून राहतात. अशी माणसं म्हणजे डिजिटल काळातली निसर्गापत्येच होय. बाकी जग द्वेष, मत्सर यांच्या अतोनात किटाळाने ग्रासलेले आहेच की!

व्यक्तिश: मला गुलमोहर आवडतो कारण तो प्रेयसी आणि प्रियकर दोघांचेही गुण एकत्रितरित्या आपल्या देहावर वागवतो! तो खऱ्या अर्थाने रोमँटिक आहे! हे पाहिल्यावर लक्षात येते की कृष्णचुर हे त्याला दिलेले नाव अगदी सार्थ आहे!

तसे तर गुलमोहराचा संदर्भ घेत एक छोटीशी कविता मीही लिहिलीय –

मी तुझ्यासोबतच आहे,
माझं असणं अनुभवायचं असेल तर एक कर
चालून थकल्यानंतर पावलांना नीट निरख
माझ्या स्पर्शाचे गुलमोहर
तुझ्या तळव्यात भाजून निघालेले दिसतील!

– समीर गायकवाड

नोंदी –

1) ‘गवाक्ष’ या ललित लेखसंग्रहात गुलमोहर नावाची एक अतिशय नितळ निर्मळ प्रेमकथा आहे. आजही बहुतांश खेड्यातल्या शाळांच्या छोट्या मोठ्या इमारती (!) नजीक गुलमोहराची झाडं दिसून येतात. शालेय वयापासून गुलमोहराच्या झाडाला साक्षीस ठेवून नितांत प्रेम करणाऱ्या एका प्रेमी युगुलाचे पुढे जाऊन लग्न होत नाही. मात्र गावतील त्या तरुणीचे जेव्हाही माहेरी येणे होते तेव्हा ती नजर चुकवून एकदा का होईना पण त्या गुलमोहरापाशी जातेच! तिच्या प्रियकराचेही लग्न झालेले असते. तो देखील संधी मिळेल तेव्हा त्या झाडाजवळ चक्कर टाकत असतो. ती गावात येऊन गेल्याचे त्याला कुणीच सांगत नाही मात्र गुलमोहरापाशी गेलं की तिच्या येण्याची खबर त्याला झाडाकडून मिळते. या कथेचा शेवट मी इथे देत नाही कारण रसभंग होईल! झाडं खूप हळवी नि प्रेमळ असतात, त्यांच्यावर मनापासून प्रेम करता आलं की जगाला फाट्यावर मारले तरी चालते!

2) शांता शेळके यांच्या ‘हे एक झाड आहे’ या कवितेमधील पंक्ति वरील कमेंट्समध्ये दिल्यात. कवितेच्या अखेरीस त्यांनी झाडाकडे जे दान मागितले आहे तेच माझेही पसायदान आहे! विधात्याने ते द्यावे! –

हे एक झाड आहे याचे माझे नाते
वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते

मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे जाणिवओले भास

पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बालगणी याच्या कटीखांदि

मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती
याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती

ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल

कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन

– शांता शेळके

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

दौरा

दिनविशेष :- संकष्टी चतुर्थी