डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
हजरत मौलाना रूमी रहमतुल्लाह (अलै.) यांनी मसनवी शरीफमध्ये एक हकीकत लिहिली आहे ती अशी, एक साहेब होते. ते परिस्थितीने अतिशय गरीब होते. परंतू, त्यांना आपण फार मोठे सावकार आहोत हे दाखविण्याची फार हौस होती. एकदा त्यांनी मटन मार्केटमधून थोडीशी चरबी खरेदी करून ठेवली होती. दररोज बाहेर जाताना चरबी पाजळून ते साहेब आपल्या मिशाना लावत आणि रूबाबात फिरून येत. त्यांचा उद्देश हाच होता की लोकांना वाटत्तवे की साहेब खूप श्रीमंत दिसतात. घरातून तुप खाऊन निघालेत वाटतं. काही दिवस हा दिनक्रम सुरू होता. परंतू, एके दिवशी मांजराने ती चरबी खाऊन टाकली. दुसऱ्यांदा चरबी आणायला त्यांच्याजवळ पैसे नव्हते. परिणाम असा झाला की कोरड्या पडलेल्या त्यांच्या मिशा पुन्हा त्यांच्या गरिबीचं गाऱ्हाणं मांडू लागल्या.
या साहेबांच्याप्रमाणे जे लोक लग्न कार्यात व सण समारंभात किंवा दुःखद प्रसंगी आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून वारेमाप खर्च करतात. खर्चासाठी कर्ज काढतात व ते फेडता न आल्याने निराश व शरमिंदे बनतात. अशा वेळी त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा फाटला जातो व गरीबी हे खरे स्वरूप सर्वांसमोर उघड होते.त्यांच्या चेहऱ्यावरचे के विलवाणे भावच दारिद्रयाची करूण कहाणी सांगतात. चार दिवसापूर्वी चरबी लावून मिशांवर ताव मारणारे पाचव्या दिवशी तोंड बारीक करून बसतात. शेजाऱ्याने आपल्या मुलाचा वाढदिवस धुमधडाक्यात केला. तर हे महाशय इर्षेपोटी दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेवून त्याच्यापेक्षा जास्त धुमधडाक्याने साजरा करतात. व क्षणिक आनंदी होतात. शेजाऱ्याने एखादी वस्तू आणली तर हप्त्याने त्यांच्यापेक्षा भारी वस्तू आणतात. पुढे ते हप्ते भरताना मेटाकुटीस येतात. शेवटी सावकार किंवा कंपनी ती वस्तू उचलून नेतात व प्रतिष्ठा पूर्ण ढासळते. म्हणून माणसाने आपली कुवत पाहुनच खर्च करावा. खोट्या प्रतिष्ठेसाठी अवाढव्य खर्च करून देखावा दाखविणे बंद करावे. जे अल्लाहने आपल्याला दिले आहे. ज्या परिस्थितीत ठेवले आहे. त्या परिस्थितीत सुख-समाधानाने रहावे. श्रीमंत होण्यासाठी अल्लाहचे नामस्मरण करत खूप कष्ट करावेत व त्यानंतर अल्लाकडे दुआ मागावी. अल्लाह आपली दुआ कबूल करेल, अशी आशा बाळगावी. अल्लाह देईल जरूर देईल…
GIPHY App Key not set. Please check settings