in

खडीच्या चोळीवर ..

खडीच्या चोळीवर 

जात्यावर दळण दळताना या स्त्रियांच्या मनात जे जे काही चालले असेल त्याला त्या शब्दबद्ध करत असत. कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नव्हता. अगदी बाहेरख्याली संबंध असो वा अन्य कुठले झेंगट असो त्यावरही या स्त्रिया व्यक्त होत असत. मग एकीने जात्याची पाळी नीट करत करत हा विषय छेडला की तिच्या पुढची जी असे ती याला जोडूनच दुसरी ओवी गाई. हा सिलसिला दळण संपेपर्यंत जारी राही. तोवर अनेकींची मने मोकळी होऊन गेलेली असत. कुणा एकीच्या मनात बऱ्याच दिवसापासून साठून असलेले मळभ रिते झालेले असे. या ओव्या अगदी थेट टीका करणाऱ्या नसत, त्यात प्रतिके असत. अशा गोष्टींची थेट वाच्यता होत नसे आणि तशी ती केलीही जात नसे. कारण तो समाज काही मर्यादा बाळगून होता. आतासारख्या सगळ्या गोष्टींचा चोथा केला जात नसे आणि कुणाचीही इज्जत सार्वजनिक रित्या उधळली जात नसे. तरीदेखील हा घाव वर्मी बसेल अशी त्यातली शब्दरचना असे.

संगत करं नारी दुरल्या देशीच्या पक्शा
खडीच्या चोळीवर त्याच्या नावाचा नक्शा.

एखाद्या स्त्रीने गावाबाहेरील वा बिरादरीबाहेरील परपुरुषाशी सूत जुळवले तर ते संबंध लपून राहत नाहीत. त्या ‘दूर देशाच्या पक्षाचं’ नाव गाव तिच्या मनावर कोरलं गेल्याने तिच्या चोळीत देखील त्याचं प्रतिबिंब उमटते. तिचं न्हाण झाल्यावर खडीवर वाळत घातलेल्या तिच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकाशाच पाहायला मिळतो!! किती अफाट उपमा यात वापरल्या आहेत. एखाद्या निष्णात साहित्य अभ्यासकालाही ही रचना आणि अशी उपमा सुचणार नाही, मात्र ज्यांना खेडूत म्हणून हिणवलं जातं आणि ज्या स्त्रियांना पायातली वहाण पायीच बरी ती डोक्यावर घेऊ नये असं म्हटलं जातं त्या अशिक्षित, अल्पशिक्षित स्त्रियांनी ही रचना केली आहे! ही किती नवलाची गोष्ट आहे! एरव्ही एखाद्या जुन्या जाणत्या नि साहित्यक्षेत्रात थोर म्हणून गणल्या गेलेल्या कवीस देखील ही रचना असाध्य अशीच आहे! या ओवीमध्ये त्या संबंधांचा उल्लेख प्रेमाने केलेला आहे, त्याला शृंगाराची जोडही दिली आहे. चोळी हे प्रतीक आहे, ह्रदयात जे नाव कोरलेले असते तेच नाव देहभर दरवळत असते. देहदरवळातून नावाची ही अक्षरे हृदयाला बिलगून असणाऱ्या चोळीमध्येही पाझरत असणार! चोळीमध्ये पाझरलेली ही अक्षरे विरून जात नाहीत, तशीच अबाधित राहतात. मग तिने ती चोळी काढून धुवून वाळत घातली असली तरीही ती अक्षरे प्रेमाच्या नजरेस हमखास पडतातच! खडीची चोळीचा एक अर्थ असाही लावता येईल की आरशाच्या तुकड्यांची खडी त्या चोळीला असेल नि त्या तुकड्यांतही त्याचे नाव झिरपले असेल! अगदी अफलातून रचना आहे ही! अशीच आणखी एक ओवी देता येईल.

गुणाच्या माणसा गुण केलेस माहेरी
धन्याची कोथिंबीर वास मळ्याच्या बाहेरी..

रानात धने पेरले तर त्याची कोथिंबीरच उगवते. रानात उगवलेली कोथिंबीर कितीही झाकून पाकून ठेवली तरी तिचा वास दूरवर जातो आणि माणूस लांबूनच ओळखतो की मळ्यात धनं पेरलंय. त्यासाठी कुणाच्या कानात सांगावं लागत नाही ते कळतंच. तसेच एखाद्या स्त्रीचे / पुरुषाचे लग्नाआधी काही गुण उधळून झाले असले तरी ते उघड होतातच. त्याचा दरवळ कधी ना कधी होतोच. एखाद्या स्त्रीने माहेरी काही गैरवर्तन केले असेल नि ते अकारण झाकून ठेवायचा प्रयत्न केला असेल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही, त्या स्त्रीची ती गोष्ट कधी न कधी उघड होतेच! खेड्यापाड्यांत पीक पाण्याची उपमा किती विविध पद्धतीने वापरली जाते त्याचे हे बोलके उदाहरण ठरावे. त्याचबरोबर नैतिकतेचे नि दांभिकतेचेही खरे रंग उघड करण्याचे काम ही ओवी करते. त्या काळातल्या स्त्रिया अबोल नि मूकदर्शनी असल्या तरीही संधी येताच त्या अगदी टोकदार कटाक्ष टाकत असत नि आपल्याला काय सांगायचे आहे याची नेमकी जाणीव समोरच्या व्यक्तीला करुन देत असत. याचा हा ढळढळीत पुरावा होय!

बाहेरख्याली संबंध म्हणजे परपुरुषाशी असलेले गुप्त प्रेमसंबंध अथवा प्रियकरासोबतचे संबंध याविषयीच्या मराठी लोकसाहित्यातील जात्यावरच्या ओव्यांमध्ये संवेदनशीलतेसह गूढ पैलू आहेत. या ओव्या सासरच्या घरात राहणाऱ्या स्त्रियांच्या मनातील गुप्त भावना, प्रणय, विरह, आणि सामाजिक बंधनांमुळे उद्भवणारी अस्वस्थता व्यक्त करतात. त्या काळातील कठोर सामाजिक नियमांमुळे अशा भावना थेट व्यक्त करणे अवघड होते, त्यामुळे जात्यावरच्या ओव्या हे एक सुरक्षित माध्यम बनले, जिथे स्त्रिया आपल्या मनातील ओढ लयबद्ध आणि रूपकात्मक पद्धतीने व्यक्त करू शकत होत्या.

छुपे प्रेम, प्रियकराची आठवण, त्याच्याशी भेटण्याची आस, किंवा सामाजिक दबावामुळे निर्माण होणारी अस्वस्थता यांच्याभोवती या ओव्या फिरतात. प्रणय आणि विरह यांच्या भावनेने त्या ओतप्रोत असत.


जात्यावर दळते कणीक, मन माझे गेले त्याच्या गट्टीक.
सासरी सासू बारीक पाहे, कसं जाऊ मी त्याच्या गावाक?

या ओवीमधली सून दळण दळताना प्रियकराच्या (बाहेरख्याली) आठवणीत हरवते, पण सासूच्या नजरेमुळे तिला भेटणे शक्य होत नाही, अशी भावना आहे. अर्थातच ही ओवी जेव्हा गायली गेली असेल तेव्हा गाणाऱ्या स्त्रीची सासू तिच्या पुढ्यात नक्कीच नसेल!

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

लेट नाइट मुंबई ..

बाबेलचा दुसरा मनोरा