घटना १९६७ सालची आहे. १७ जुलै १९६७,अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्सनविले शहर. एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्याने विजेची समस्या उद्भवली तेंव्हा शहराच्या देखभाल विभागाद्वारे दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली. निरोप मिळताच भर दुपारी त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. वेळेत काम केले नाही तर नागरिकांना त्रास सोसावा लागेल याची त्यांना जाणीव होती त्यामुळे एक क्षणही न दवडता त्यांनी अत्यंत नेटाने कामावर फोकस ठेवला. काही तासांतच त्यांचं काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेव्हढ्यात घात झाला.
रॅन्डल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अनवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला अवघ्या काही क्षणांसाठीच स्पर्श झाला. त्या उच्च दाबाच्या वायरला स्पर्श करताच त्याला जोराचा झटका बसला. खरे तर तत्क्षणीच त्याचा मृत्यू झाला असता. मात्र त्याचं प्राक्तन तसं नव्हतं. झटका बसताच तो काहीसा मागे रेटला गेला नि त्यावेळी तो वायरवरील सपोर्टवर बसून असल्याने जागीच उलटा लटकला गेला. जिथे लाइन फॉल्ट होती तिथे एकूण चार ओव्हरहेड वायर्स होत्या, पैकी मधल्या वायरला त्याचा स्पर्श झाला होता, दरम्यान एकदम वरच्या वायरच्या दुरुस्तीचे कामही त्याच वेळी सुरू होते. त्याच पोलवर त्याचा सहकारी जे. डी. थॉमसनकडे या कामाची जबाबदारी होती. आपला सहकारी रॅन्डल याला उच्च दाबाच्या वायरमधून जोरदार शॉक बसला असल्याचे निमिषार्धात त्याच्या लक्षात आले, पोलवर पाय ओणवे करून उभं राहत त्यानं त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडावाटे श्वास देणं सुरू केलं.
खरे तर थॉमसनने जेव्हा रॅन्डलला आपल्या हाती घेतले होते तेव्हा त्याच्या सर्व हालचाली बंद झाल्या होत्या, त्याचं शरीर थिजलं होतं. तो कसलाही प्रतिसाद नव्हता. मात्र थॉमसनने हार मानली नाही. आपला मित्र जगू शकतो, वाचू शकतो, त्याचे श्वास पुन्हा सुरू होऊ शकतात यावर तो ठाम होता. आपण शेवटच्या घटकेपर्यन्त त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा निश्चयच त्याच्या मनाने केला होता. त्यामुळे तातडीच्या सेवेचं वैद्यकीय पथक येईपर्यंत थॉमसन अविरतपणे त्याला आपल्या तोंडावाटे फुंकर मारत कृत्रिम बाह्य श्वास देत राहिला. बरीच मिनिटे थॉमसन त्याला आपल्या फुफुसातून हवा पुरवत होता. ही सर्व जीवघेणी कसरत जमिनीपासून पन्नास फुट उंचीच्या पोलवर सुरू होती यावरून यातले काठिण्य आणि जटिलता लक्षात यावी. दरम्यान बघ्यांची बरीच गर्दी जमा झाली होती.
थॉमसन हार न मानता रॅन्डलला पुश करत होता. शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते तशी यालाही एक मर्यादा होती. एक वेळ अशी आली की दोघंही काळे निळे पडले. आता काही दुर्दैवी दुःखद घटना घडते की काय याचं सावट जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर जमा झालं होतं. मात्र ऐन क्षणी बाजी पलटली गेली. कारण थोड्याच वेळात वैद्यकीय पथक तिथे दाखल झालं. त्यांच्या पाठोपाठ अग्नीशमन दलाचा ताफाही तिथे आला. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक क्षणही न दवडता या दोघांना खाली उतरवलं नि कमाल झाली! तातडीच्या वैद्यकीय उपचारानंतर रॅन्डलचा श्वास पूर्ववत झाला. रॅन्डल जगला. रॅन्डलला जगवण्याचं श्रेय त्याच्या सहकारी मित्राला थॉमसनला जातं. तिथं त्या क्षणी त्याच्या जागी अन्य कुणी वा एखादा निराशावादी व्यक्ती असता तर त्यानं प्रयत्नच केले नसते, हाय व्होल्टेज वायरचा शॉक म्हणजे माणूस वाचणार नाही, तो गेलाच असणार म्हणून अश्रू ढाळत बसला असता. मात्र थॉमसनचं जगण्यावर प्रेम होतं, त्याला मित्राच्या श्वासाची खात्री होती, त्यानं हार मानली नाही. प्रयत्न जारी ठेवले. त्याचीच फलश्रुती म्हणजे रॅन्डलचं जगणं!
छायाचित्रकार रॉको मोरबिटो अग्नीशमन दलाच्या हरेक मोहिमेत जायचे. त्यांनी हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. १९६८ सालचा पुलित्झर हा जागतिक छायाचित्रणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार या फोटोने जिंकला होता. जॅक्सनविले जर्नलचे संपादक बॉब पॅट यांनी फोटो पब्लिश करताना त्याला नाव दिलं ‘किस ऑफ लाइफ’! खरेच हा संपूर्णतः ‘किस ऑफ लाइफ’ होता! वास्तवात एका अर्थाने थॉमसनने मृत्यूचं चुंबन घेतलं आणि आपल्या सहकारी मित्राला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून जीवन बहाल केलं! जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या एका व्यक्तीने मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या मित्राला प्राण परत मिळवून दिले!
आजकाल लोकांची सारखी कुरकुर सुरू असते की आता जगण्यात मजा राहिली नाही, सगळं उदास वाटतं आता मी जगून काय करू? आता जगायचं तरी कुणासाठी हा सूर त्यात असतो. त्यांनी या घटनेपासून अवश्य प्रेरणा घ्यावी. जो स्वतःपुरता जगू लागतो त्याला असे निराशाजनक विचार अधिक त्रास देतात. त्या उलट एकशे ऐंशी कोनातून विचार केला तर उमगते की, आपल्या आयुष्यात काहीच रंगतदार बहरदार चेतनाशील उरलं नसेल तर आपण इतरांचं आयुष्य रंगीत केलं पाहिजे असं ठरवायचं अवकाश की आपल्याला जगण्याची नवी उर्मी मिळते. आस्थेने प्रेमाने जगण्यासाठीचं प्रयोजन वा निमित्त भवतालात डोकावलं तरी गवसतंग मात्र त्यासाठी आधी आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगात डोकावलं पाहिजे. मग आपणही आशावादी होतो नि आपल्या हातून एखाद्या जीवाचं भलं होऊ शकतं. आपलं जगणं सार्थकी लागण्यासाठी इतकं समाधानही पुरेसं ठरते. त्यासाठी आपल्याला मृत्यूचे चुंबनच घ्यायला हवे असे काही नाही, आपलं जगणं इतरांच्या आनंदासाठी, सुख दुःखासाठी कारणी लागलं तरी अत्यंत आगळं वेगळं समाधान लाभतं आणि हे समाधान, ही तृप्तता जगातला कोणता अब्जाधीशही विकत घेऊ शकत नाही! एका संवेदनशील, विवेकी आणि परोपकारी वृत्तीच्या व्यक्तीस हे सहज शक्य आहे! इतके तर आपण करू शकतो, नव्हे केलेच पाहिजे! अशा व्यक्तींची संख्या वाढत गेली तर समाजातील वाढत्या नैराश्यदायी आत्महत्यांचे प्रमाणही कमी होऊ शकेल. हे देखील एका आव्हानाशी लढा देण्यासारखंच आहे!
GIPHY App Key not set. Please check settings