in

किडलेल्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची ‘प्रतीक्षा’!

राज्यात, देशभरात रोज इतक्या घटना घडताहेत की आपण नेमकं कशावर व्यक्त व्हावं नि कोणकोणत्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा हेच अनेकांना सुचेनासे झालेय. सारा भवताल जितका गोंधळलेला झालाय तितकाच विषाक्त आणि कोलाहलग्रस्त झालाय. अशा पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या घटना घडूनही त्यावर नेमकं लक्ष जात नाही अथवा समाजाचं ध्यान खेचण्यात त्या अयशस्वी ठरताहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडलीय. भविष्यात उत्तम स्त्रीरोगतज्ज्ञ् व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहित डॉक्टर तरुणीने आत्महत्या केलीय. तसं तर आपला समाज आत्महत्या आणि बलात्कार या शब्दांना इतका सरावलाय की आपल्याला त्याचं काहीच वाटेनासं झालंय. घडलेली आत्महत्या वा बलात्कार जर अत्यंत क्रूर, नृशंस, भयंकर अमानवी पार्श्वभूमीवरचा असेल तरच त्याला कव्हरेज मिळतं आणि समाजमाध्यमांसह मीडियाचंही त्याकडे लक्ष वेधलं जातं. बाकीच्या घटनांना वर्तमानपत्राच्या आतील पानांवर दोन बाय सहाचा छोटा कॉलम बहाल होतो ही आपली संवेदनशीलता! डॉ. प्रतीक्षा गवारे यांनी आत्महत्या केली त्याला आता आठवडा लोटलाय. तरीही या घटनेने अजूनह अस्वस्थ होतंय याचे संदर्भ या आत्महत्येच्या कारणांत, आत्महत्येच्या मानसिकतेत नि स्युसाईड नोटमध्ये दडलीत. पतीच्या संशयी वृत्तीमुळे व त्यातून होणाऱ्या छळाला कंटाळून प्रतीक्षाने आत्महत्या केली. तिने केवळ आत्महत्या केली इतकीच ही बाब मर्यादित नसून स्युसाईड नोटमधले तिचे विचार सामाजिक आत्मचिंतनाची गरज असल्याचे सूचित करतात. त्यातला सूर असा की प्रतीक्षाने स्वतःला विसरून पतीवर जिवापाड प्रेम केलं. त्या बदल्यात पतीने हसत्या, खेळत्या प्रतीक्षाला त्रास देऊन मंद करुन टाकलं! एका स्वावंलबी, महत्वाकांक्षी मुलीला परावलंबी बनवलं. अनेक स्वप्नं उरी बाळगून तिने लग्न केलं होतं. पती खूप जीव लावेल, काळजी घेईल, सपोर्ट करेल असं तिला वाटलं होतं. त्यांच्या सुखी कुटुंबात छोटा पाहुणा येण्याची तयारीही तिने सुरू केली होती. मात्र त्याला संशयाने पछाडलं होतं. प्रतीक्षाला तिच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईकांशी बोलण्यास मनाई होती इतकेच नव्हे तर तिच्या जन्मदात्या आई वडिलांशीही तिने बोलू नये अशी बंधने लादली गेली. तिने मोबाइल बदलला, नंबर बदलला तरीही त्याचे समाधान झालं नाही. आपण पतीशी प्रामाणिक होतो नि आपल्या चारित्र्यात खोट नव्हती हे त्याला पटवून देण्यासाठी तिने अखेरीस आत्महत्या केली.

स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणं हे आपल्याकडे अगदी कॉमन आहे. बाप वयात आलेल्या पोरीवर पाळत ठेवतो मात्र वांड झालेल्या पोरावर कोणतेही निर्बंध लादत नाही! तरुण भाऊ आपल्या बहिणीने मर्यादेत राहावे, तिचा पाय घसरू नये (!) म्हणून तिच्यावर पहारा ठेवतो मात्र त्याचवेळी तो हवे तिथे तोंड मारत असतो! मुलीची आईदेखील मुलीच्या चारित्र्याला बट्टा लागू नये म्हणून दक्ष असते! वास्तवात हे एक प्रकारचे मॉरल पोलिसिंग असते जे तिच्या चारित्र्यावरच संशय घेत असते. पुढे जाऊन मुलीचे लग्न होते, आता नवरा तिच्यावर पाळत ठेवतो, तिच्यावर संशय घेऊन तिच्याशी वाट्टेल तसं वागतो. प्रसंगी मारहाण करतो. अमानुष छळ करतो! हे सर्व करत असताना त्याचे चारित्र्य स्वच्छ असते किंवा कसे याचा धांडोळा कुणीच घेत नसतं. सारेजण हात धुवून त्या विवाहितेच्या मागे लागतात. घरातली बाकीची मंडळीही त्यात सामील होतात. यातूनच मग कधी कधी हत्याही केली जाते. हा त्रास तिला सहन झाला नाहीतर तिच्यापुढे दोनच पर्याय उरतात ते म्हणजे नवऱ्याला सोडून देणं अथवा विषय संपवणे! माहेरचे पाठबळ आणि आर्थिक स्वावलंबन नसेल तर मुली नवऱ्याला सोडून देत नाहीत, स्वतःला संपवतात! जो सर्वात चुकीचा मार्ग असतो तोच अवलंबतात! वास्तवात आपल्या सुनेवर आपला मुलगा संशय घेत असेल तर त्याला समजावून सांगणे हे सासू सासऱ्यांचे कर्तव्य आहे! इथे तर प्रतीक्षाचं सासर उच्चशिक्षित डॉक्टरी पेशाचं आहे, प्रतीक्षाने सासू सासऱ्यांची काळजी घेत त्यांना जीव लावला तर त्याला शोऑफ मानलं गेलं ही एक गंभीर विकृतीच होय. देखभाल केली नाही तरी सुनेच्या नावाने बोटे मोडायची आणि तिने काळजी घेतली तर ती दिखाव्यासाठी हे करते म्हणायचे हे सर्रास दिसते! ही लाजिरवाणी गोष्ट आहे!

मुली आईवडिलांच्या आर्थिक मदतीने अभ्यासावर मेहनत घेत शिकतात. त्यानंतर स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. या दरम्यानच जीवनाचा जोडीदार निवडताना त्यांनी आपलं स्वावलंबन धोक्यात आणू नये. बऱ्याचदा लग्नाआधी आणि नंतरही मुलीने तिची कमाई कुणाकडे द्यावी यावर देखील बंधने घालण्याचा प्रयत्न होतो! एखादी स्त्री कमावती असेल तर तिच्या आर्थिक नियोजनाचे स्वातंत्र्य तिला दिले गेले पाहिजे, तेही नवऱ्याने, बापाने, भावाने, मुलाने ठरवू नये! मुळातच आपल्यावर पुरुषप्रधान विचारसरणीचा इतका पगडा आहे की स्त्रीला आपली मालमत्ता, दासी, बटीक मानण्याकडे आपला कल असतो. घरातील पुरुषांना हवे तसे वागता येते मात्र त्याच वेळी घरातील स्त्रियांनी कसे वागायचे हे घरातले पुरुष ठरवतात! उच्चशिक्षित, मध्यम उच्चमध्यम वर्गीयांत देखील हा प्रॉब्लेम आहे. स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणं म्हणजे तिच्या नैतिकतेवर आपण प्रश्नचिन्ह लावत आहोत याचं आपल्याला भान नसतं. घरातले पुरुष बदफैल असतील तर त्यांचे चारित्र्य तपासणार कोण? कुणीच नाही! पुरुष हव्या त्या भानगडी करू शकतो, रखेल ठेवू शकतो, छुपं वाढीव लग्न करू शकतो, त्याचे विवाहबाह्य संबंध हा किरकोळीत घेण्याचा विषय असतो मात्र तोच पुरुष आपल्या बायकोवर पाळत ठेवून असतो! घरातील अन्य नालायक लोकांना याचे सोयरसुतक नसते ही नीतिहीन विवेकहीन माणसांची लक्षणे होत!

रामायणापासून आपल्याकडे स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे दाखले मिळतात! जगाने सीतामातेला सोडलं नाही, रेणुकेचा तर शिरच्छेद केला गेला! मात्र आपल्याला याचा अंतःकरणपूर्वक पश्चात्ताप होत नाही कारण आपल्या सर्वांच्या अंतरंगात तो पुरुषप्रधान विचारसरणीचा संशयात्मा अंशभर तरी जिवंत आहे! अशा बुरसटलेल्या विचाराच्या पुरुषासाठी आपल्या मेहनतीवर, महत्वाकांक्षेवर, स्वप्नांवर पाणी फिरवणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आणि अतिरेकी भोळसटपणा आहे! नवरा हा देव आहे त्याचं ऐकलं पाहिजे, बाईने कायम पुरुषासमोर वाकलं पाहिजे, त्याच्या आज्ञेबाहेर जाऊ नये अशा मध्ययुगीन विचारांत स्त्रियांनी जगू नये! उलटपक्षी अशांना चांगली अद्दल घडवून आपण आपल्या पायांवर खंबीरपणे उभं राहून नव्याने आयुष्याची सुरुवात केली पाहिजे. प्रतीक्षाचे प्रेम अपार आंधळे होते, आपल्या आत्महत्येनंतर आपला नवरा कुठेही उडायला मोकळा आहे असं लिहिलंय! त्याला कुठेही तोंड मारण्यास मोकळीक देण्यासाठी आपला जीव कशाला द्यावा हे उमगायला पाहिजे होतं! आपण शुद्ध चारित्र्याचे आहोत हे कुणाला पटवून देण्याची गरजच काय? नात्यांमध्ये विश्वास असणं अनिवार्य असतं, विश्वास नसलेल्या जोडीदाराला कसं नि किती पटवून देता येईल याचे तारतम्य स्त्रियांना असलं पाहिजे! स्त्रीत्वाचं ओझं मस्तकावरून काढल्याशिवाय हे भान कदापिही येणार नाही! आपल्या जोडीदाराला फ्री बर्ड करण्यापेक्षा आपण का बरे फ्री बर्ड होऊ शकत नाही असा विचार त्यांच्या मनात आला पाहिजे!

आपल्या भवतालात अशा घटना घडत असताना प्रत्येक कुटुंबात यावर लक्ष दिलं पाहिजे की केवळ मुलीला विनम्र आज्ञाधारक बनवून चालणार नाही, मुलांनाही तेच वळण लावलं पाहिजे. पतीपत्नीच्या नात्यात विश्वास उरला नसेल तर ते नातं तोडलं पाहिजे न की ते ताणले पाहिजे. आपली मुलगी घटस्फोट देऊन माहेरी परतली म्हणजे काहीतरी बदनामी झाली या कालबाह्य विचारधारेतुन बाहेर आलं पाहिजे. मुलाच्या आईवडिलांचीही तितकीच जबाबदारी आहे, आपल्या मुलाचे सुनेशी पटत नसेल तर त्यांनी आधी दोन्ही बाजू प्रामाणिकपणे तपासल्या पाहिजेत आणि नातं संपुष्टात आलं असेल तर काडीमोड घेणेच योग्य! दोघांचाही नवा संसार होऊ शकतो, मात्र त्यासाठी आत्महत्या होत असतानाही कुटुंब, समाज मौन राहत असेल तर आपण एका किडलेल्या रोगट मानसिकतेच्या समाजाचे घटक आहॊत ज्याची आपल्याला शरम वाटली पाहिजे हे नक्की! आणि आपल्याला असे वाटत नसेल तर आपण माणूस नसून पशू आहोत असं समजावं! आपल्याला विवेकी न्याय्य समतावादी समाज हवा असेल तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून नि आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे, नाहीतर आणखी एखाद्या प्रतीक्षा गवारेच्या आत्महत्येस आपणही कारणीभूत असू!

– समीर गायकवाड

पूर्वप्रसिद्धी दैनिक दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी.
दि. 03/09/24

Read More 

What do you think?

13 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

शनी गायत्री मंत्र