" गोष्टी फ़राळाच्या "

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

प्रत्यक्ष दिवाळीला १५-२० दिवस शिल्लक असतात, पण दसरा होतोन-होतो तोच दिवाळी जवळ आली की, काय काय करायचे याची चर्चा घरोघरी सुरु होते. याबाबतीत घरातील वडीलधारी मंडळी जरा जास्तच संवेदनशील असतात. " अरे आरामात काय बसलाय ? साफसफाई कधी करणार ? भांडी घासायची आहेत. रंगरंगोटी करायची आहे. बापरे फराळाच काय ? "  असे म्हणत एखादी आजी फराळ या मुद्द्यावर येऊन एक मोठा पॉस घेते. आणि रमून जाते ती,  गेल्या वर्षीच्या फराळाच्या आठवणीत. घरी काकु , आत्याबाई , मावशी अश्या कोणकोण सगळ्याच मग तीच्या शेजारी येऊन बसतात... आणि चालू होते फ़राळाच्या गोष्टीची ऊकळ-बेर !" वन्स गेल्या वर्षी त्या पिंट्याचे आईने लाडू दिले होते काय म्हणून सांगू ....तोंडात टाकल्या-टाकल्या विरघळले की. "आणि हो , त्या आक्काच्या नव्या सुनेने अनारसे केलेले , आठवतंय का हो ? काय चविष्ट होते सांगू...  आज कालच्या मुलीच हुशार बाई. नाहीतर त्या मामाच्या सुनेला काही धड करता येत नव्हते. " असे म्हणत आजी विषयाला हात घाली . ' मग शेजारच्या कोणाकोणाच्या चकल्या फसल्या , कोणाचे लाडू बसले, शेवेचा तर चुराच झाला , शंकरपाळे फसफसले आणि अनारसे कुस्करले . गेल्या वर्षीच नव्याने शिकुन तयार केलेला पदार्थ,   ते कळीचे लाडू खाऊन पोटात कळ यायला लागली, असे म्हणत मग सगळ्या खो-खो हसत. 'यात अगदी ५० वर्षापुर्वी आजीचं लग्न झाल होत तेव्हाची दिवाळी कशी साजरी केली जायची याचीही चर्चा होई . अशी तिखट-गोड पण खुसखुशीत चर्चा चविचविने चघळली जायची . मग यामध्ये काही असे विषय निघत जे दरवर्षी ऐकुन-ऐकुन कंटाळलेली कोणी काकु यामध्ये विषयांतर म्हणून आठवण करुन देत असे, " अहो सासुबाई ,  या वर्षीची काहीच तयारी झाली नाही. साफसफाईला सुरुवात करु म्हणते ! आणि माळ्यावर ची भांडी-कुंडी घासून-पुसुन ठेवू म्हणते. " अशी आठवण करुन दिल्याबरोबर सगळे महिला मंडळ तात्पुरती बरखास्त होई . आणि साफसफाई पासून सुरुवात होऊन त्याचा शेवट होई तो फराळानेच !बहुतेक घरी आजही फराळ बनवण्याचा श्री गणेशा होतो तो चिवड्यापासुन ! सहज सोपा पदार्थ म्हणजे चिवडा.  चिवड्यासाठी पोहे पातळच हवेत , यामध्ये खोबर्‍याच्या चक्त्या सुद्धा पातळ असु देत, शेंगदाणे खरपुस तळावे, नाहीतर चिवडा खवट लागतो.  पुढे शंकरपाळे.... ते प्रमाणबद्ध हवेत , उगाच वाकडा-तिकडा, छोटा-मोठा आकार करु नये.  चणा डाळ चांगली भाजुन घ्या कच्ची रहायला नको... लाडू जास्त मोठा नको, तसेच नीट गोल गरगरीत बांधावा. चकलीची भाजणी व्यवस्थीत करावी, उडिद डाळ कमी घ्यावी , यात जुना जाडा तांदूळ वापरावा यामुळे भाजणी फुलते व चिकट होते चकल्या फुटत नाहीत आणि खुसखुशीतही होतात. करंजी नंतर ही खुसखुशीत राहायला पाहीजे.  मऊ पडता कामा नये यासाठी मैदा मळताना यात थोडे तेलाचे मोहन घालावे.हुश्श्श  ! किती त्या सुचना.  यामध्ये घरी कोणाला डायबेटीस आहे हे पाहुन गोडाचे प्रमाण कमी जास्त केले जाते. तसेच म्हान-म्हातारी माणसे लहान मुलांचा विचार करुन तिकटाचे प्रमाण ही विचारात घेतले जाते. मागील फराळाच्या गप्पा, कडू-गोड आठवणी आणि त्यातून शिकलेले धडे, याचे मोजमाप समोर ठेऊनच प्रत्येक पदार्थ केला जातो.  यात अजीबात कोणतेही प्रमाण न लावता ओतपोत घेतला जाणार एक त्रुप्त घटक म्हणजे त्या गृहिणीचे प्रेम ! रात्र-रात्र जागुन हे पदार्थ बनवताना येणारा थकवा, आपली पाठदुखी , कंबरदुखी, जागरण हे सगळ सहन करुन आपल्या कुटुंबाच्या दिवाळीमध्ये खर्‍या अर्थाने आनंद भरण्याचा महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर त्या गृहिणीचा !अजूनही बऱ्याच ठिकाणी शेजारीपाजारी आणि नातेवाईकांना फराळाची ताटं किवा डब्बे पाठवण्याचा रिवाज आहे. कोणाकडे किती फराळ पाठवायचा ,  यामध्ये ते शेजारचे आपल्याला फराळ देतात की नाही . (खोखो स्माईली) गेल्या वर्षी बाजुवाल्या ताईने तीच्या फराळातून आपलेच लाडू आपल्याला परत दिले होते . समोरच्या काकुने तर उरलेला फराळ दिला होता. तीचे सगळे लाडू फुटलेले, करंजे तुटलेले आणि चिवडा पण चिवट  होता.  या वर्षी त्या दोघींना फराळ द्यायचा नाही असाही पवित्रा घेतला जातो.तर बाबुच्या मम्मीने छान खुसखुशीत फराळ दिला होता. आणि अनारसे तर फारच चविष्ट करतात त्या,  असे म्हणत त्यांच्या डब्यात दोन एक्स्ट्राचे लाडू भरले जातात. (स्माईली)प्रभात समई उटण्याची आंघोळ , नविन कपडे, घराची रंगरंगोटी झाली, दिव्याची आरास सजली, दाराला तोरणे आणि फुलापानांची माळा गुंफल्या, की शेवटी अंगणात रांगोळीचा सडा पडतो आणि मग  एकत्र बसून फराळाचा फन्ना उडवला जातो.डायबेटीस असुनही एखादा मुगाचा लाडू गपकन तोंडात टाकला जातो, ' जरासे शंकरपाळे बघते ' म्हणत डिशभर शंकरपाळे आणि वर दोन करंजा रिचवुनही अजुन काहीतरी खावे असे सारखे वाटत रहाते.दिवाळी आणि फराळ याचे गणितच वेगळे. फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाही. थोडा गोड, थोडासा तिखट व बराचसा खुसखुशीत चवदार असा ठेवा म्हणजे दिवाळीचा फराळ !तर अशा खुसखुशीत फराळाच्या आठवणीनसह , दिवाळी सणाच्या तुम्हा सगळ्यांना थोड्याशा तिखट , जराशा आंबट पण खुपसार्‍या गोड-गोड शुभेच्छा !( सिद्धि चव्हाण- ९८३३३२६६०९ )
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!