सौदी अरेबियातील बदलाचे मतितार्थ ...

सौदी अरेबियातील बदलाचे मतितार्थ ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

 सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व तिथले सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारियाचा कायदा चालतो. सलमान हे सौदीचे सध्याचे राजे आहेत. सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकुण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. सध्या हा देश चर्चेत आहे त्याचे कारण म्हणजे तिथल्या राजवटीने स्वीकारलेले परिवर्तनाचे वारे ! मागील तीन दशकात जगभरात इस्लामी मुलतत्व वादयांना छुपे पाठबळ देणारा हा देश एके काळी मागील दाराने केल्या जाणाऱ्या टेरर फंडींगसाठी ओळखला जायचा. पेट्रोडॉलरची भाषा बोलणारा हा देश आपल्या राजेशाहीच्या छानछौकीसाठी आणि अमर्याद ऐश्वर्यासाठी जितका ज्ञात होता तितकाच कर्मठ इस्लामी कायद्यांच्या, रिवाजांच्या अंमलबजावणीसाठीही परिचित होता. ओसामाबिन लादेन पासून ते आयसीसपर्यंतच्या कट्टरतावादयांचे अप्रत्यक्ष पालकत्व सौदीच्या पेट्रोडॉलरमध्ये होतं. पण सौदी राजवटीने कधीही खुले समर्थन देऊन आपल्या अंगावर राळ उडवून घेतली नाही. सौदीविरुद्ध जगभरातील बलाढय देशांनीही कधी कठोर शब्दांत निर्भत्सना केली नाही कारण तिथल्या तेलसाठ्यांचे आमिष आणि तेलाची निकड ! मात्र या देशात आता बदलाचे वारे वाहू लागलेत ज्याचे अनेक मतितार्थ आहेत. २८ सप्टेबरला महिलांना ड्रायव्हिंग करण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक निर्णय सौदी अरेबियाने जाहीर केला. त्यांनतर काही दिवसात सौदी क्रीडा संघटनेच्या प्रमुखपदी रीमा बींत बंदार बीन सुल्तान यांच्या रूपाने प्रथमच एका महिलेची निवड करण्यात आली आणि जगाला आश्चर्याचा धक्का बसला. सौदीत महिलांना सार्वजनिक क्षेत्रात भाग घेण्यास परवानगी दिली जात नाही. त्यांना अभ्यासासाठी, प्रवासासाठी आणि इतर उपक्रमांसाठी कुटुंबाच्या पुरुष मंडळीशी सामान्यत: वडील, पती किंवा भाऊ यांची परवानगी मिळणे आवश्यक आहे. असे असताना हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण जगात महिलांना ड्रायव्हिंगवर बंदी असणारा अतिपुराणमतवादी सौदी हा एकमेव देश होता आणि या गोष्टीबद्दल त्यावर जगभरातून टीकाही होत होती. सन 1900 पासून सौदीमधील महिला अधिकार कार्यकर्त्या महिला या विरुद्ध आवाज उठवत होत्या. समान हक्काच्या लढाईतील महिलांना ड्रायव्हिंगची असलेली बंदी झुगारून ड्रायव्हिंग करण्याचे धाडस करणाऱ्या महिलांना शिक्षा देण्याबद्द्ल सौदी अरेबिया जगामध्ये बदनाम होता.आता ही बंदी उठवून महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी देण्याच्या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. अद्यापही अस्तित्वात असलेला पुरुष संरक्षक कायदा रद्द व्हावा यासाठी तिथे अजूनही चळवळ चालूच आहे, पुरुष संरक्षण कायद्यामुळे कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य महिलांना नाही. उदा. त्या स्वतंत्र प्रवासही करू शकत नाहीत. आता ही अट देखील शिथील केली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. केवळ ड्रायव्हिंग परवाने मिळाल्याने तिथे अभूतपूर्व बदल होणार आहेत असं काही नाही परंतु बदलाचे हे परिमाण अत्यंत आश्वासक आहे. मोहम्मद बिन सलमान यांची अभिषिक्त राजपुत्र म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्यांनी सौदी अरेबियाला नव्या मुक्त स्वातंत्र्याच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न सुरू झालेत. इराणमधल्या इस्लामिक क्रांतीपासून ज्या बंधनात राहिलो, त्या बंधनात आता आपण राहणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलंय. महिला आणि तरुण मंडळींचा आर्थिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग असणारी नवी धोरणे ते आता आखणार आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेस, आपल्या समाजास आधुनिकतेच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी मोहम्मद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ ही ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे, ज्याचे तिथल्या तरुणाईला आकर्षण आहे. आपली पकड कायम ठेवून देशाला आधुनिकतेच्या मार्गावर न्यायचे आव्हान त्यांच्यापुढे आहे कारण देशातील एक गट या सुधारणावादी विचारांशी सहमत नाही. तेलावर आधारित अर्थकारणाचे दिवस संपत आल्यामुळे अर्थव्यवस्थेची नव्यानं उभारणी करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्यासाठीच स्त्रियांना हळूहळू सूट देण्याची ही योजना आहे, असेही बोलले जातेय. एकीकडे ड्रायव्हरच्या कामावर असणारे अनेक परदेशीय यामुळे नोकरीस मुकतील, उबेरसारख्या कंपन्यांकडे जाणारा पैसा थांबेल आणि सौदी स्त्रिया वाहने चालवू लागल्याने वाहन विक्रीत प्रचंड वाढ होईल ही याची व्यावसायिक बाजू आहे. याच निर्णयाला आणखी बळकटी देताना सौदी अरेबियाने रोबोंच्या बाबतीत आगळावेगळा निर्णय घेतला. ‘सोफिया’ या रोबोला सौदीमध्ये नागरिकत्व बहाल करण्यात आलं. रोबोला सिटीझनशीप देणारा सौदी हा जगातला एकमेव देश ठरला. या निर्णयामुळे तिथे रोबोटिक्सच्या व्यवसायाला आणि संशोधनाला मोठी चालना मिळेल ज्यामुळे तेलाचे आकर्षण वजा जाऊन रोबोटिक्सच्या टेक्नोलॉजीच्या पायाभरणीसाठी अनेक कंपन्या सौदीत येतील हा व्यावसायिक हेतू आहे. रोबोट्सचा वापर वाढल्यास परकीय कामगार आपल्या मायदेशी परतावेत हा अंतस्थ हेतूही सिद्धीस जाईल. आपल्याकडे हा निर्णय मोदींनी घेतला असता तर आपल्या माध्यमांनी त्यांना किती डोक्यावर घेतले असते याची कल्पना करवत नाही. सौदीने हा मोठा निर्णय घेऊनही आपल्याकडे त्याची अत्यंत नगण्य अशी चर्चा झाली कारण आपली प्रसारमाध्यमे इस्लामी देशांचे कट्टर, कडवट रूप दाखवणे जास्त पसंत करतात. भारतापासून हजारो मैल दूर असणाऱ्या सिरीयन गृहयुद्धांवर नित्यनेमाने काही वाहिन्यांवर बाईट्स सुरु असण्याचे कारण हेच असावे. एकीकडे सुधारणा सुरु असताना दुसरीकडे भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचे कामही सौदीत सुरु झालेय. भ्रष्टाचारविरोधी ‘निर्णायक’ कारवाईत सौदी अरबच्या प्रमुख उद्योजकांसह अकरा राजपुत्र आणि डझनभर माजी मंत्र्यांना अटक करण्यात आलीय. युवराजांनी भ्रष्टाचारविरोधी आयोगाचं गठन करुन अनेकांना तत्काळ अटक केलीय. त्यांच्या या कारवाईमुळे अनेक भष्ट्राचारी लोकांचे धाबे दणाणलेय. या आयोगाने भ्रष्टाचाराच्या जुन्या प्रकरणांची चौकशी सुरु केलीय. जेद्दाहमध्ये २००९ला आलेल्या महापुरानंतर झालेल्या मदतकार्यात मोठा भ्रष्टाचार झाला होता. यासह इतर काही प्रकरणांमध्ये हे अटकसत्र सुरु झाले. अनेकांनी सलमान यांच्या या कारवाईला समर्थन दर्शवलं आहे. दरम्यान सलमान यांच्या मार्गात अडथळे ठरू शकणाऱ्या राजपुत्रांचे संशयास्पद मृत्यूही होत आहेत ही बाबही नजरेआड करता येत नाही.देशातील अति-पुरातनमतवादी धार्मिक नेते अजूनही प्रभावी आहेत. अनेक सौदी लोकांनाही आपल्या जुन्या गोष्टी सोडण्याची इच्छा नाही. यामुळं अनेक स्तरांतून सौदी राजकारण्यांवर दबाव पडताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून कच्च्या तेलातून मिळणाऱ्या महसुलात घट होत आहे. त्यामुळं इच्छा नसतानाही राजकारण्यांना अनेक निर्णय घ्यावे लागत आहेत. याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर पडत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रानंही विकासकामांना हातभार लावणं अपेक्षित आहे. पण त्यांची वाटचाल अतिशय संथगतीनं होत आहे. हा असा देश आहे जिथं लोकांना स्वस्त पेट्रोल मिळतं, कुठलाही कर नाही, तसेच वीज आणि पाणी मोफत आहेत. पण आता धोरणं बदलली आहेत. सरकारने अनुदानात कपात केली आहे आणि विक्रीकर लावला आहे. सौदीमधल्या गरीब कुटुंबियांचा भार उचलण्याच्या दृष्टीतून हे पाऊल सरकारने उचललं आहे. ‘आता आपल्या देशासाठी काही करा आणि जलदगतीने करा’, असं इमोशनल आवाहन तिथे केलं जात आहे.येमेनला धडा शिकवताना कतारला एकटे पाडून भौगोलिक वरचष्मा बळकट करणारा आणि देशांतर्गत कारभार सुधारताना कट्टरतावादाची जुनाट झूल फेकून देणारा सौदी अरेबिया कडवट इस्लामी राष्ट्रांची जगभराच्या जनमानसात रूढ होत चाललेली कर्मठ प्रतिमा मोडीत काढण्यात बिनीच्या शिलेदाराचे काम करणार आहे. सौदीतील परिवर्तनाचे चक्र गतिमान झाले तर मध्यपूर्वेतील कट्टरतावादासह अनेक मुलभूत धोरणात बदल घडून येतील जे भारतासह जगभरावर प्रभाव टाकतील. - समीर गायकवाड. (आजच्या दैनिक दिव्य मराठीच्या संपादकीय पृष्ठावर प्रिझम या पाक्षिक सदरामध्ये प्रकाशित हा लेख प्रकाशित झाला आहे)
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!