सोलापूरची गड्डा यात्रा - नऊशे वर्षापासूनच्या एका अनोख्या यात्रेची गाथा....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

तथाकथित मोठ्या शहरातले सृजन माझ्या सोलापूरला बरयाचदा नाके मुरडतात, टवाळकी करतात. कधीकधी काही क्षणासाठी मी ही वैतागतो पण पुढच्याच क्षणाला मातीवरचे प्रेम उफाळून येते. काहीजण तर सोलापूरला एक मोठ्ठं खेडं म्हणून हिणवतात ! एका अर्थाने हे त्यांचा हा टोमणा बरोबर देखील आहे कारण यात्रा, जत्रा, उरूस हे आता मोठ्या शहरांचे घटक राहिले नाहीत. उलट खेड्यातून देखील ते हद्दपार होतील की काय अशी स्थिती झालीय. माझ्या सोलापूरमध्ये मात्र एक यात्रा दर वर्षी साजरी होत्येय ! ती ही तब्बल सातशे वर्षापासून. याचा सगळ्या सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आम्हाला कुणी डिवचलं की मी आवर्जून उत्तरतो, "ठीक आहे ! खेडं तर खेडं ! सिद्धेश्वर देवस्थान खेड्यात काय माणसे राहत नाहीत का ? खेड्यातल्या माणसाला आपण गावंढळ वा खेडूत म्हणतो. त्या नुसार आम्ही खेडवळ माणसं ! त्यात काय वाईट ? आम्हा सोलापूरकरांचा आमच्या मातीवर, इथल्या माणसांवर, सणावारांवर फार फार जीव ! इथे मोहरमचे पंजे अंगावर घेऊन नाचणारे, अंगावर पट्टे ओढून मोहरमचे वाघ झालेले अन पवित्र रोजे धरणारे हिंदू दिसतील. गड्डा यात्रेत मोठ्या संख्येने सामील होणारे मुस्लिम बांधव दिसतील, चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवासोबत अन्यधर्मीयही नक्कीच भेटतील. सर्व जयंत्या, उत्सव अन सर्व जातींचे सणवार सगळे मिळून साजरे करणारे आमचे हे मायेच्या माणसाचे तरीही थोडेसे उग्र बोलीभाषेचे सगळ्यांच्या मनामनातले गाव, सोलापूर !!! अशा या मुलुखावेगळ्या गावाची दर वर्षी भरणारी हौसेची - नवलाची यात्रा म्हणजे 'गड्डा यात्रा' !! सिद्धेश्वर महाराजांचा अड्ड (पालखी) यात्रा महोत्सव म्हणजेच गड्डा यात्रा !आजच्या काळात नानाविध कारणांमुळे यात्राजत्रा साजऱ्या करण्याचं प्रमाण कमी होऊ लागले आहे, 'त्यामुळे यात्रा उत्सव साजरे करण्यात काय हशील आहे ?' असं नव्या पिढीच्या काही शिलेदारांना वाटतं. ते योग्य की अयोग्य हे सांगण्याइतकं मोठंपण माझ्याकडे नाहीये. मात्र आमचे दहा लाख लोकवस्तीचे शहर म्हणा वा खेडं म्हणा, ते मात्र आमच्या दरसाली संक्रांतीत नंदीध्वज होमकट्ट्यावर आणताना  येणारया श्रीसिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेस तयार असतं ! जग काय म्हणतंय याची फिकीर सोलापुरी माणूस कधी करत नाही, त्यांमुळे कुणी किती नावे ठेवली तरी हा उत्सव परंपरागत उत्साहात साजरा होतोच आहे !! अंगात पांढरी शुभ्र बाराबंदी घालून, धवलशुभ्र धोतर नेसून डोईला घेरदार मुंडासे बांधलेले भक्तगण अन त्यांच्या भक्कम हातात अलगद विराजमान असलेले उत्तुंग देखणे नंदीध्वज जेंव्हा ६८ लिंगांना तैलाभिषेक करून प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्ताने शहरपरिक्रमाच पूर्ण करतात तेंव्हा सगळे शहर त्या शुभ्ररंगात न्हाऊन निघते अन भक्तीशक्तीचा हा सोहळा पुढे पुढे जात राहतो. 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिध्देश्वर महाराज की जय' या जयघोषात शहर दुमदुमते. संमती कट्ट्यावरचे विधी असोत वा होमकुंडातले विधी वा असो वासराकडून केल्या जाणारया भाकणूकीचा कानोसा घेणं असो ते विहंगम दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी सारं शहर लोटलेले असते. या यात्रेचे गारुड काही औरच असते, इथला जल्लोष न्याराच असतो हे सगळेजणच मान्य करतात. प्रत्येक खेड्याला जसे एक ग्रामदैवत असते तसेच सोलापूरलाही आहे. ते म्हणजे सात शतकांची भक्तीमय परंपरा असणारे शिवयोगी श्रीसिद्धरामेश्वर. श्रीसिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार या परिसरास सोन्नलगे असे संबोधले जायचे. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी  असे रूपांतर झाले. यादव वंशापर्यंत सोलापूरचे संबोधन सोन्नलगी असे होते. मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे संबोधले जातात. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर तर तिथल्याच दुसर्याक भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असा आहे. सोनलपूर, सोलपूर ते सोलापूर असा हा नावाचा प्रवास आहे. सिद्धेश्वर महाराजांनी हे गाव वसवलेलं. सामाजिक सुधारणा करताना त्यांनी परिश्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याकाळी त्यांनी सामूहिक विवाह सोहळेही पार पाडले होते. जनतेचे पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे नष्ट करण्यासाठी सामूहिक श्रमातून त्यांनी तलावाची निर्मिती केली. विविध नद्यांतून पाणी आणून त्यांनी तलावात ओतले होते. सोन्नलगीच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांसह अष्टविनायक व अष्टभैरवांची प्रतिष्ठापना केली होती. ग्रामदैवताच्या या समृद्ध सामाजिक जाणिवांची साक्ष अजूनही ठळक आहे, देवस्थानाची सामाजिक कार्यांची महती दूरदूरवर विख्यात आहे अन महत्वाचे म्हणजे जाती-धर्म, लिंग, प्रांत, वय, भाषा अशा कोणत्याही भेदात न अडकता सर्वसामान्य सोलापूरकरांशी या ग्रामदैवताची नाळ जुळलेली आहे. सिद्धेश्वर यात्रेचा इतिहास कथन करताना एक आख्यायिका सांगितली जाते. सिद्धेश्वर महाराज दररोज ध्यानधारणा करीत असत, तेव्हा त्यांच्या साधनागृहाबाहेर सडासंमार्जन करून रांगोळी रेखाटली यात्रा काळातील सिद्धेश्वर मंदिराचे विहंगम दृश्य  जात असे. ही सेवा कोण करते, याचा शोध लागत नसे. एके दिवशी सिद्धेश्वर महाराज साधनागृहातून लवकरच बाहेर आले असता बाहेर एक सुंदर कुमारिका सडा-समार्जन करून रांगोळी घालत असल्याचे दिसून आले. सिद्धेश्वर महाराजांनी तिची विचारपूस केली तेव्हा तिने आपण कुंभारकन्या असल्याचे सांगून त्यांच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. ब्रम्हचर्य जपायचे असल्याने महाराजांनी विवाहास नकार दिला. परंतु कुंभारकन्येचा हट्ट पाहता अखेर सिद्धेश्वर महाराजांनी आपल्या योगदंडाबरोबर विवाह करण्यास अनुमती दिली. त्याप्रमाणे विवाह सोहळा झाला. त्यावेळी स्वत: सिद्धेश्वर महाराजांनी रचलेल्या मंगल अष्टका म्हटल्या. या विवाह सोहळ्यासाठी शहराच्या पंचक्रोशीतील सर्व देवदेवतांना आमंत्रित करण्यात आले. विवाह सोहळ्यानंतर वरात निघून सर्व देवदेवतांच्या भेटी घेण्यात आल्या. नंतर कुंभारकन्या होमकुंडात आहुती देत सती गेली. आता सतीच्या प्रथेस सर्वांचाच विरोध आहे. या विवाह सोहळ्यातील सर्व तपशिलांसह सिद्धेश्वर यात्रेतील विधी पार पाडले जातात. यात्रेचे प्रमुख ७ नंदीध्वज तसेच त्यांच्या सरावाचे ७ असे १४ अधिकृत आणि मान्यता दिलेले इतर नंदीध्वज नंदीध्वजांची पूजा  हाती घेऊन सराव सुरु झाले की यात्रा जवळ आल्याची चाहूल लागते. वर्षभर हे नंदीध्वज विशेष निगराणीत ठेवलेले असतात..योगदंडपूजना नंतर १३ जानेवारीस भोगीच्या दिवशी सिध्देश्वर महाराजांची यात्रा यण्णीमज्जनाने सुरू होते. सकाळी हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज मार्गक्रमण करतात. ते दुपारच्या सुमारास सिध्देश्वर मंदिरात येतात. त्यानंतर संमतीकट्टा मार्गे शहरातील विविध भागातून मल्लिकार्जुन मंदिरपर्यंतचा १३ किलोमीटरचा प्रवास दहा ते अकरा तासांत पूर्ण करतात. सातपैकी पहिला नंदीध्वज २८ फूट उंच आहे, त्यास जवळपास १० फुटपर्यंत लिंबू आणि खोबर्यां च्या वाट्या भक्तांकडून बांधल्या जातात. पहिला नंदीध्वज सिद्धेश्वर देवस्थानचा असून, दुसरा कसब्यातील देशमुखांचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा आणि पाचवा विश्व ब्राम्हण समाजाचा, सहावा आणि सातवा मातंग समाजाच्या असतो. भक्त मोठ्या एकाग्रतेने हे नंदीध्वज पेलतात. सिध्देश्वर मंदिरातून ६८ लिंगांच्या प्रदक्षिणेस निघालेली मिरवणूक रात्री उशिरा विसावते. त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारीस सिद्धेश्वर तलावानजीक असणाऱ्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा साजरा होतो. उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात पूजेचे मानकरयांच्या हस्ते पूजा होते. त्यानंतर अक्षता सोहळ्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज अक्षता सोहळा मिरवणुकीने मार्गस्थ होतात.अग्रभागी असलेल्या पालखीचे आणि पाठोपाठ असलेल्या नंदीध्वजाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा प्रचंड गर्दी होते. बालपणी अनेकदा चेंगराचेंगरी सहन करत याचा आनंद घेतलेला आहे. हिरेहब्बू यांच्या घरापासून निघलेलेली मिरवणुक दाते गणपती, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूरवेस, पंच कट्टा, सिद्धेश्व र प्रशाला मार्गे दुपारी एकच्या सुमारास संमती कट्ट्यावर सातही नंदीध्वजासह येताच "सिद्धेश्वतर महाराज की जय...‘चा घोष होतो. त्यानंतर योगदंडाच्या साक्षीने सुगडी पूजा आणि गंगापूजन करून बारा मडक्याामध्ये पाणी भरुन त्या समोर पानाचा विडा ठेवण्यात येतो. कुंभार घराण्यातील मानकरयांना हा विडा दिला जातो. संमतीला मडक्याोतील पाणी, दूध, हळद, कूंकू तांदूळ अर्पण करून दिवटीने ओवळले जाते, विधिवत पूजा होते. मानकरयांना संमती दिली जाते. त्यानंतर अक्षता सोहळयास प्रारंभ होतो. कन्नड भाषेतून संमती वाचन होते. पाच वेळा संमती वाचन केले जाते. प्रत्येक कडव्याच्या शेवटी "सत्यम...सत्यम‘ असे उच्चारण होताच उपस्थित असणारे लाखो भाविक सत्यम सत्यमच्या घोषात अक्षता वर्षाव करतात. आठ ते दहा मिनिटाचा हा सोहळा असतो. यावेळी औट गोळ्याची आतषबाजी होते आणि तुतारी, नागऱ्याचा निनाद होतो. त्यानंतर नंदीध्वज अमृतलिंगाजवळ येतात. मानकऱ्यांना विडा दिला जातो.होमविधीच्या दिवशी (संक्रांत) यात्रेतील पहिल्या नंदीध्वजाला नागफणा बांधण्यात येतो. त्यानंतर  नागफणा नंदीध्वज मिरवणुक सायंकाळी काढली जाते. होम मैदानावर विधी होतात आणि गड्डा यात्रेस प्रारंभ नागफणा बांधलेला नंदीध्वज   होतो. हा नागफणा इतका वजनदार असतो की दोन ते तीन माणसांना देखील नंदीध्वज पेलवत नाही. परंतु सिद्धेश्वरांचे मानकरी, भक्त एकट्यानेच प्रारंभापासून ते अखेरपर्यंत नागफणी बांधलेला नंदीध्वज घेऊन जातात. १६ जानेवारीस (किंक्रांत) रात्री आठ वाजता अबालवृद्धांचे आकर्षण असलेले शोभेचे दारुकाम होते. हे अतिशबाजी पाहणे हा एक तृप्तीसोहळाच असतो. मिळेल त्या जागी लोक बसून घेतात आणि दीड ते दोन तास आकाशाला व्यापून टाकणाऱ्या दारूकामाचा आनंद घेतात. भोगी, संक्रांती आणि किंक्रांतीनंतर १७ जानेवारीला रात्री दहा-बाराच्या दरम्यान, मल्लिकार्जुन मंदिरात नंदिध्वजांच्या वस्त्र विसर्जनाच्या (कप्पडकळी) कार्यक्रमाने यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते. होम मैदान अन तिथे भरणारी ग्रामदैवताची गड्डा यात्रा ही आमच्या सोलापूरची ओळख आहे. भले मोठाले वेगवेगळ्या आकारातले पाळणे, विविध मनोरंजनाची पुरेपूर हमी देणारी आनंदनगरी, विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणारी दुकाने, सौंदर्यप्रसाधनापासून ते नंदीध्वज मिरवणूक  खेळण्यांपर्यंत अनेक वस्तूंची बाजारपेठ, शेतीमालाचे देखणे प्रदर्शन, हस्तकलांच्या सामग्रीची दुकाने अन रसपानगृहे ही यात्रेतली नेहमीची वैशिष्ट्ये असतात पण तरीही ती इथल्या प्रत्येकास ओढ लावत राहतात. जानेवारीच्या थंडीच्या मौसमात सिद्धेश्वर तलावाच्या पाण्यात सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचे देखणे प्रतिबिंब रात्र वाढेल तसतसे पसरत जाते अन होम मैदानाकडे आलेली पावले समाधानी मनाने तृप्त होऊन घरी परततात हा इथला शिरस्ता पिढी दर पिढी चालू आहे, लहानपणीच्या गड्डा यात्रेच्या आठवणी हा प्रत्येक सोलापुरी माणसाचा वीकपॉईंट असतो यातच या यात्रेचे अन या ग्रामदैवताच्या आस्थेचे यश सामावले आहे असं ओलेत्या डोळ्याने सांगताना मला वेगळाच अभिमान वाटतो… मागील वर्षी यात्रेच्या अनुषंगाने काही वाद झाले होते पण त्यातून चांगलेच निष्पन्न झाले हे नक्की ! यंदाही सुरक्षा आणि स्वच्छता यांवर कटाक्ष ठेवत नियोजन गड्डा यात्रेचे रात्रीचे दृश्य केले गेले आहे. प्रदूषण असो वा आरोग्य वा सुरक्षा या सर्व बाबीवर दरवर्षी नव्याने धोरणे ठरत राहतील अन जनहिताचेच निर्णय त्यातून होतील. मनात कपट न ठेवता वैरभाव एका स्मितहास्याने संपुष्टात आणणारा सगळा वीरशैव इथे सर्व लोकांत एकवटतो अन यात्रा विनासंकट पार पडते असा आजवरचा अनुभव आहे. लाखो लोक एका मैदानावर येतात, जत्रेचा आनंद घेतात अन कुठलाही अपघात वा घातपात न होता हा उत्सव आनंदात पार पडतो असंच आम्ही पिढ्यानपिढ्या अनुभवले आहे, पण नवनव्या कायद्यानुसार अन नागरी सुविधांच्या सर्व आघाड्यांवर त्यात बदल तो केलाच पाहिजे. संयोजक- आयोजक त्यास बांधील आहेत अन राहतीलही. त्यानुसार निर्विघ्नपणे यात्रा पार पाडण्याची जबाबदारी सर्व सोलापूरकर नागरिकांची देखील आहे. - समीर गायकवाड.सोलापूरची गड्डा यात्रा  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!