सुभान्या

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

शेवंताला देवाघरी जाऊन दोनेक महिने उलटून गेले होते. आज लोचनाबाईंनी सुभान्याचा अक्षरशः दोसरा काढून गावकऱ्यांच्या लाडक्या आबांना आपले पती आबांना साखरवाडीला पाठवलं होतं. जाताना शेर भर गव्हाची खीर पितळी डब्यात दिली होती. गरमागरम खीर डब्यातून सांडू नये म्हणून आतून स्वच्छ फडकं तोंडाला बांधून दिलं होतं. डबा असलेली पिशवी पायापाशी ठेवली तर हिंडकळून डबा पडेल आणि डबा मांडीवर घेऊन बसलं तर चटका बसेल हे ओळखून डब्याखाली कापडाची मोठी चुंबळच तयार करून दिली होती. थंड खीर दिली असती तर एसटीतल्या वाऱ्या वावदानाने ती अजूनच थंड झाली असती आणि गार खीरीला सुभान्या तोंड लावत नव्हता हे त्यांना पक्कं माहिती होतं म्हणून रामपारी उठून जर्मनचं पातेलं मातीनं सारवून त्यात शेरभर गहू, किलोभर पिवळ्या धम्मक गुळाचा तुकडा, मुठभर वेलची, जायफळीचा मोठा लठ तुकडा घालून त्यांनी टचटचीत खीर करून कडीच्या पितळी डब्यात घालून आबांच्या हातात दिली होती. इतकंच नव्हे तर आपला नवरा कुठं तरी मन उदास करून रस्त्यालगतच बसून राहील, साखरवाडीला जायचाच नाही याचा अंदाज लावत त्या स्वतःच आबांला घालवून देण्यासाठी पांदीपर्यंत सोडण्याऐवजी मैलभर चालून हमरस्त्याला एसटीच्या थांब्यापाशी आल्या होत्या. मुलगा सुरेश याला आबांना सोडून यायला सांगितलं असतं तर आबांना मनातल्या भावना त्याच्याजवळ व्यक्त करता आल्या नसत्या हे ही लोचनाबाईंना माहिती होतं, त्यामुळेच सुरेशने मिनतवाऱ्या करूनही त्यांनी त्याला घरी थांबायला भाग पाडलं होतं.सकाळच्या वक्ताला एसटीची वाट बघत डांबरीवर उभ्या असलेल्या त्या दोघांना जोडीनं बघून गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटलं पण कुणाची बिशाद झाली नाही काही विचारायची ! कारण गोविंद भोसल्यांच्या घराला गावात मोठा मान होता. त्यांच्या घरातलं सुख दुःख गावाचं सुख दुःख होतं. याचं एक कारण असंही होतं की हे कुटुंब गावातल्या प्रत्येक घराच्या सुख दुःखात सामील होतं. लोचनाबाई म्हणजे गावाची लाडकी नानीबाई. गावात कुणाच्या घरी बाईमाणसाला काहीही झालं, कुणाला काही कमी पडलं, कुणाच्या चुलीवरचं भांडं रितं असल्याचं कळलं, कुणाची कूस उजवणार असल्याची बातमी कळली, कुणाला चोळी बांगडीची ददात असली की नानी त्या घरात यायचीच. त्या घरातल्या माणसाला तिच्यापर्यंत जावं लागत नव्हतं. कुणी ना कुणी ही वार्ता तिच्यापर्यंत पोहोचतं करायचाच ! बंद्या रूपया एव्हढं गोल गरगरीत कुंकू ल्यालेली सावळ्या रंगाची लोचनानानी आपसूक हजर व्हायची. चाळीशी पार केलेल्या लोचना नानीचं व्यक्तीमत्व खास होतं. ती काही खूप देखणी वा रुबाबदार स्त्री नव्हती. तिच्या चेहऱ्यात विलक्षण गोडवा होता, तेज होतं. आवाजात कमालीचं मार्दव होतं, डोळ्यात सदैव कणव दाटलेली असे. कुणाला काही द्यायचं असलं की तिचा हात आखडता नसे. आबांचंही असंच होतं, गावातलं तालेवार घराणं होतं त्यांचं. कुणाच्याही घरी तंटा बखेडा झाला की त्याचा तोडगा काढण्याचं काम त्यांच्याकडेच यायचं. त्यांच्या शब्दाला गावात मोठा मान होता. त्यांच्याकडे कुठलं पद नव्हतं की कसली जहागिरी नव्हती पण लोकांच्या सच्च्या प्रेमाचे ते खरे मनसबदार होते. त्यांचं सगळं सुखात चाललं होतं पण एकाएकी त्यांच्या सुखाला जणू बिब्बा उतला आणि होत्याचं नव्हतं झालं होतं. मागच्या काही दिवसात या दांपत्यांनं स्वतःला जणू कोंडून घेतलं होतं. त्यांच्या परिघात कुणीच नव्हतं, लोक मात्र त्यांना मदतीस आतुर होते पण काय बोलायचं आणि या दुःखाच्या डोंगरातून कसं बाहेर काढायचं हेच मुळी कुणाला उमगत नव्हतं, त्यामुळे इच्छा असूनही कुणी त्यांच्या दुखवटयावर उतारा शोधू शकले नव्हते. नाही म्हणायला गावातली जुनी जाणती मंडळी अनेकदा त्यांच्या घरी जाऊन आली होती, त्यांचं दुःख जरी मोठं असलं तरी त्यांनी आता ते विसरलं पाहिजे यासाठी आपल्या परीने बोलून आली होती. मात्र त्याचा फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळे आज आबांना निरोप द्यायला आलेल्या नानीला पाहून सर्वाना आश्चर्य वाटले होते.दोन महिने झालं आपला घरधनी खिन्न बसून आहे याचं लोचना नानीस मनस्वी वैषम्य होतं. मागच्या कैक दिवसापासून अन्नाचा घास देखील त्याच्या घशाखाली नीट उतरत नाही ; तो नुसता आपल्या जीवाला खातो हे तिला ठाऊक होतं. घरात असला की आढ्याला नजर लावून बसतो. पारावर गेला की वडाच्या पारंब्यात गुतून पडतो आणि देवळात गेला की शून्यात नजर लावून बसतो, शेतात गेला की बांधावर बसून वाटंला डोळं लावून बसतो. पार थिजून जाईपर्यंत डोळ्यात प्राण एकवटून एका जागी मुकाट बसून राहतो. कुठलं काम करत नाही की कुणाशी बोलत नाही. त्याचं कुठं म्हणून चित्त लागत नव्हतं हे तिने पुरते ओळखले होते, यावर काय उपाय केला पाहिजेल हे मात्र तिला उमगत नव्हते. खरं तर आबांचं वागणं आधी असं नव्हतं. पण एकुलत्या एक पोरीचं आयुष्य डोळ्यादेखता उध्वस्त होताना पाहून त्याने हबका खाल्लेला. ज्या दिवशी त्यांची मुलगी शेवंता हे जग सोडून गेली त्या दिवसापासून या दांपत्याचं जगणंच खुंटलेलं. उगाच श्वास चालू आहेत म्हणून त्यांना जितं जागतं म्हणायचं. आठवणींच्या उमाळ्यातून वारंवार येणारी दुःखाची स्पंदने आणि त्यातून दाटून येणारी कणव सोडली तर त्यांच्या जीवनात कुठलाच रसरंग उरला नव्हता. आपला पती खचल्यावर आपण कंबर कसून त्याच्या मागं उभं राहीलं पाहिजे हे लोचनाबाईस ठाऊक होतं त्यामुळेच ती चेहऱ्यावरचं नैराश्य सफाईदारपणे झाकत उसनं अवसान आणून त्याला धीर द्यायची. आज मात्र सुभान्याचं निमित्त करून नानीनं आबांना गावाबाहेर पाठवण्यात यश मिळवलं होतं. त्याला ही ते सहजा सहजी तयार झालेले नव्हते. आठवडाभर मनधरणी केल्यावर त्यांनी होकार भरला होता. त्याला कारणही तसंच होतं, आबांचा सुभान्यावर अतोनात जीव होता. सुभान्या. करवंदी गायीचं खोंड ! करवंदीचा रंग काळा कुळकुळीत होता म्हणून तिचं नाव तसं पडलेलं. आबांच्या ऐन तारुण्यात घेतलेल्या वासराचं धष्टपुष्ट गायीत कसं परिवर्तन झालं ते कुणालाच कळलं नव्हतं. तिची तीन वेतं झालेली, सुभान्या तिचं शेंडेफळ. सुभान्या ज्या दिवशी झाला त्याच दिवशी लोचना नानीची कूस उजवलेली, शेवंताच्या पाठीवर जन्मलेला मोहन त्याच दिवशीचा. तेंव्हा थोरला सुरेश दहा एक वर्षाचा असेल आणि शेवंता होती पाच वर्षाची. सुभान्या जन्मला तेंव्हा ती शेतातच होती. करवंदीचं पोट तटतटून गेलेलं होतं, पार अवघडून गेली होती ती. तीन दिवस तडफडत होती पण एरंडाचा उतारा केल्यावर एकदाची ती मोकळी झाली. बादलीभर वार पडली होती. करवंदीच्या पोटाला जन्मलेला सुभान्या मात्र पांढरा फटक होता. त्याच्या मस्तकावर एकच गोल गरगरीत काळा ठिपका होता. बघता बघता त्याची आणि शेवंताची गट्टी जमली. सुभान्या सहा महिन्याचा असताना आबांचा मुलगा मोहन अतिसाराच्या आजारात दुर्दैवाने मरण पावला. तेंव्हा सगळे असेच हवालदिल झालेले. आपला मुलगा समजत आबांनी सुभान्याला जीव लावला. त्याला कधी डोंगरओझ्याला जुंपला नाही की कधी चाबकाची वादी त्याच्या अंगाला लागू दिली नाही. त्याच्या मऊसुत रेशमी अंगावरून त्यांनी मायेने हात फिरवला नाही असा एकही दिवस गेला नव्हता. टोकदार अर्धवर्तुळाकार शिंगे, मोठी लट वशिंड, पाठीवरची लांबलचक रुंद पन्हाळ, कवळाभर गर्दन आणि पखालीएव्हढं पोट, जोडीला हाडंपेरं मजबूत असलेले दणकट पाय, रुंद खणखणीत मणक्यांच्या रांगेच्या अखेरीस असलेली झुपकेदार शेपटी यामुळे सुभान्या उठून दिसायचा. त्याची बडदास्तही आबांनी तशी खास ठेवली होती, त्याच्या जोडीच्या बैलांनाही त्यांचा मायेचा हात असे पण सुभान्यावर विशेष मर्जी होती. सुभान्या म्हणजे शेवंताचा सर्वात जवळचा सवंगडी. अगदी खोंड असताना पासून ते अंगाग टरारलेला ताकदवान बैल झाल्यावर देखील तो शेवंताच्या मागं मागं चालायचा. आपल्या काटेरी जिभेने तिचे हात चाटायचा. ती समोर बसलेली असली की हा देखील निपचित बसून राही. सुट्ट्यांना ती रानात आलेली असली की हा पठ्ठ्या फक्त तिच्याच हाताने आमुण्याची पाटी ठेवू द्यायचा. अन्य कुणी येऊन कितीही लोणी लावलं तरी तो त्या पाटीला तोंड लावायचा नाही. खूप गट्टी जमली होती त्यांची. शेवंता न्हाती धुती झाली आणि काही वर्षात तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली. आबांनी एक तालेवार स्थळ पाहून तिची सोयरिक पक्की केली. लग्न ठरल्यापासून तरणीताठी शेवंता रोज एखादी का होईना पण चक्कर शेतात घालायचीच. सुभान्या तिची वाट बघत गावाकडच्या रस्त्याला डोळे लावून बसलेला असायचा. ऊन वारं पाऊस याची त्याला तमा नसायची. पण एकदा का शेवंताचा गंध त्याला आला की तो लगेच डुरक्या मारत कातडं थरथरवत तटकन उभा राहायचा. त्याच्या अंगात तेंव्हा दहा हत्तींचे बळ आलेलं असे. शेवंताचं लग्न आता दहा दिवसावर आलेलं. तिच्या अंगाला हळद लागली आणि तिनं वेस ओलांडू नये अशी ताकीद झाली. ती यायची बंद झाली आणि सुभान्याने चारा पाणी बंद केलं. सगळ्यांची पाचावर धारण बसली. ही बातमी शेवंताच्या कानावर येणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेतली. पण सुभान्याने लग्नाच्या आदल्या दिवशी बसकण मारली. त्याचं शेणकूट ही वाळून गेलेलं. कातडी पाठीला चिकटली, बरगडया बाहेर आल्या, डोळे मोठे झाले, डोळ्यांना लागलेल्या अश्रूंच्या धारांना माशा लागल्या, तोंडाला फेसाची धार लागली. त्यानं दावण अशी काही धरली की आबांचा जीव कासावीस झाला. अखेर भल्या सकाळीच घरी कुणाला कळू न देता ते तिला शेतावर घेऊन आले. मग काय जादू झाली आणि सुभान्याची गाडी रुळावर आली. तिथून निघताना शेवंतेने त्याच्या कानात निरवानिरवीच्या गोष्टी केल्या. त्या दिवसानंतर सुभान्या पुन्हा कधीच कासावीस झाला नाही. जणू त्याने शेवंताचं बोलणं समजून घेतलं होतं. शेवंताचं लग्न झालं. ती सासरी नांदायला गेली. खरं तर सुभान्या आता थकायला झालेला होता. त्याचं वय भरत आलेलं होतं. पण शेवंताच्या आगमनाची त्याला आस होती. सोळकं झाल्यावर शेवंता दोनेक दिवसासाठी माहेरी आली आणि आल्या दिवशीच रानात सुभान्यापाशी आली. त्या दिवशी ते दोघंही खूप आनंदी दिसले. त्यांची मैत्री होतीच तशी. नुसत्या स्पर्शाने ते एकमेकांचं सुख दुःख जाणत असत. कधी सुभान्या आजारी पडला की त्याचा उतारा शेवंताकडं असे अन शेवंता गुमसुम असली की तिला खुश करायची जिम्मेदारी सुभान्याची असे. लग्नानंतर शेवंताच्या येण्यात मोठा खंड पडू लागला. तिच्या सासरचे लोक नंतर नंतर तिला सणवारालाही माहेरी धाडायचं टाळू लागले. तरीही एखाद दुसऱ्या दिसासाठी ती आलेली असली की सुभान्यापाशी येऊन बसायची. अलीकडे ती आल्यावर सुभान्या पहिल्यासारखा खुश नसायचा. ती त्याच्या कानापाशी गुंजन करायची आणि त्याच्या डोळ्यांना धारा लागलेल्या असायच्या. ती निघाली की हा शेपटी हलवत मातीला हनुवटी लावून पाय पसरून मुकाट बसून राहायचा. गोठ्यातल्या गड्यांना सुभान्याच्या वागणुकीतला बदल जाणवला. पण त्यात त्यांना काही वावगं वाटलं नाही. कदाचित शेवंताचं येणं रोडावल्यामुळं तो असं करत असेल असा त्यांचा समज झाला. शेवंताला सारखं सारखं माहेरी येताही येत नव्हतं. या साठी आबांवर तगादा लावण्याची वेळ आली. एक दोनदा सुरेशला तिच्या सासरी पाठवून दिलं पण इंगित काही केल्या कळत नव्हतं. शेवंताला विचारलं की ती सगळं आलबेल आहे असंच सांगायची. बघता बघता दहा महिने उलटून गेले आणि पहिली दिवाळी आली. शेवंता आपला नवरा भानू याला घेऊन माहेरी आली. जावईबापूंचा पहिला दिवाळसण !दिवाळी उरकून भाऊबीजेच्या दिवशी शेवंता आपल्या नवऱ्याला घेऊन शेतावर आली. तिला सुभान्याला आपल्या धन्यास भेटवायचं होतं. त्या उभयतांच्या दर्पानेच त्या दिवशी सुभान्याचं गणित बिघडलं. त्यानं दाव्याला हिसका द्यायला सुरुवात केली, कासऱ्याला ओढ दिली, त्याच्या नाकपुड्या फुरफुर करू लागल्या. तो जागेवरच खुरांनी माती खरडू लागला. शिंगं उगारू लागला, पुरता बेभान झाला. तो जन्मल्यापासून त्याचा असा रौद्रवतार कुणीच पाहिला नव्हता. त्या दिवशीचा त्याचा रागरंगच वेगळा होता. त्याच्या जवळ जाण्यास कोणताही गडी तयार होत नव्हता. अखेर शेवंताच हाईक हाईक चू चू असं चुचकारत त्याच्या जवळ गेली. तिचा हात पाठीवर पडताच तो क्षणात शांत झाला. तो शांत होताच शेवंता त्याच्या गळ्याच्या वाकळीशी खेळत भानूला त्याच्याबद्दल सांगू लागली. त्यालाही तिने आग्रह करून जवळ बोलवले. सुभान्या शांत झाला नव्हता, तो कानोसा घेत होता. डोळे विस्फारून हेरत होता. शेवंताचा नवरा जवळ येताच एकाएकी सुभान्याने सर्व ताकदीनिशी गिरकी घेतली आणि आपलं टोकदार शिंग त्याच्या पोटात खुपसलं आणि त्याला उचलून भुईवर आपटले. एका क्षणात त्यानं हे कृत्य केलं. शेवंताला तर काय होतंय हेच कळलं नाही. भानूने जोरात किंकाळी मारली अन सगळे जण तिथं गोळा झाले. सुरेशनं त्यांना गाडीत घातलं आणि तालुक्याच्या दवाखान्याकडे तो वेगाने रवाना झाला. शेवंता देखील त्याच्या बरोबर गेली.त्या दिवशी आबांनी सुभान्याला चाबकाने फोडून काढलं. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात भानूला भेटून आल्यावर पुन्हा शेतात गेले. सुभान्याच्या जवळ जाऊन ढसाढसा रडले. सुभान्याची अवस्था तर त्यांच्याहून वाईट झाली होती. त्याचे डोळे अखंड पाझरत होते. भानूसाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्याला बरं होण्यास जवळपास तीनेक आठवडे गेले. त्याच्या दवाखान्याचं बिल आबांनी भरलं. बरा होऊन घरी गेल्यानंतर त्याने शेवंताला सुभान्यावरून टोमणे देण्यास सुरुवात केली. आधीच तिला प्रचंड सासुरवास होता. लग्नाला वर्ष होत आलं तरी पोटपाणी पिकत नव्हतं यावरून बोलणारयांना आता नवे कारण मिळाले होते. लग्न झाल्यापासून माहेरहून पैसे आणण्यासाठी तिला छळलं जात होतं. एकदोन वेळा तिला मारझोडही झालेली. ती सगळा छळ सोसत होती पण त्यातला एकही शब्द आपल्या माहेरच्या गणगोतापाशी तिनं काढला नव्हता. तिनं आपलं मन फक्त सुभान्यापाशी मोकळं केलं होतं आणि ते ऐकून सैरभैर झालेल्या सुभान्याने रागाच्या भरात भानूवर हल्ला चढवला होता. भानू बरा झाला पण सुभान्यावर कुऱ्हाड कोसळली. भानूने सुरेशकडे टुमणे लावले आणि सुरेशने आबांचं मन वळवून सुभान्याला वस्तीवरून बेदखल करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडलं. आबांचा जीव कासावीस झाला पण ते हतबल झाले. त्याला बाजार दाखवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं, गावात कुणाकडे देखरेखीसाठी ठेवलं असतं तर तिथून रातोरात दावं तोडून तो पळून आला असता, त्यामुळे आबांनी त्याला साखरवाडीला राहणारा आपला जिवलग मित्र अण्णासाहेब प्रतापरावकडे देऊन टाकण्याचा मनसुबा केला.आबांनी त्याला देऊन टाकायचं ठरवलं पण त्यांचं मन राजी होत नव्हतं. त्यांच्या अंतर्मनात द्वंद्व सुरु होतं. बघता बघता महिना लोटला. तिकडे सुरेश आपल्या मेव्हण्याच्या तब्येतीची विचारपूस करायला गेला. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर अत्यंत नाराजीत भानूने आपल्या मनातली गरळ ओकली, त्याच्या डोक्यात सुभान्या फिट बसला होता. 'सुभान्या अजून वस्तीवर कसा तो एव्हाना खाटकाकडे पोहोचायला पाहिजे होता' असं त्यानं सुनावलं. त्या दिवशी सुरेशला आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्या बहिणीला इथं म्हणावं तसं सुख नाहीये, तिने कितीही दिखावा केला तरी वस्तूस्थिती काहीतरी वेगळीच असावी असा त्याला संशय आला. शेवंता त्याच्या नजरंला नजर देत नव्हती. शेवटी त्यानं ठरवलं की गावातून बाहेर पडताना शेजार पाजारला या बद्दल थोडीसी चौकशी करावी. दिवस मावळायच्या सुमारास तो परत निघाला पण त्याने भानूच्या कुटुंबाबद्दल आणि शेवंतेबद्दल जे काही ऐकलं त्याने त्याच्या पायाखालची माती सरकली. खिन्न मनाने तो गावाकडं परतला. घरी येताच त्याने शेवंतेवर ओढवलेल्या संकटाची माहिती आई वडीलांच्या कानावर घातली. ते हादरून गेले. दोनेक दिवसात शेवंतेच्या सासरी जाऊन पाहुण्यांशी थेट बोलून घ्यावं असं त्यांनी ठरवलं. पण त्या आधी सुभान्याची रवानगी करणं अनिवार्य होतं.इकडे शेवंताच्या सासरच्या मंडळींनी तिचा अतोनात छळ मांडला होता. लग्न झाल्यापासून ते तिच्यामागे तगादा लावून होते. माहेरहून पैसा अडका आणावा यासाठी दबाव टाकत होते. तिने माहेरी हात पसरण्यास नकार दिल्याने तिला मारझोड होत होती, उपासमारही व्हायची. भानूला सुभान्याने मारल्यापासून तर तिच्यावर जणू कुऱ्हाडच कोसळली होती. तिच्या सोसण्याला कोणत्या मर्यादा उरल्या नव्हत्या. खरं तर ती आता थकली होती. आपल्या आई वडीलांना तिला दुःख द्यायचं नव्हतं आणि त्रासही सोसवत नव्हता. आपल्यामुळे आपल्या माहेरच्या लोकांना मनस्ताप होण्यापेक्षा जीव दिलेला बरा असं तिला राहून राहून वाटू लागलं. दरम्यान सुरेश गावाकडं आल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुभान्याला टेम्पोत घातलं गेलं. एका गाठोड्यात त्याची झूल, घुंगरमाळा, बेगडाचं बंडल, शिंगात अडकवायचे माटोटे, कवड्याचे हार, लाल झुपकेदार गोंडे, पैंजण पट्टे, अंबाडीच्या सुताची पांढरी शुभ्र वेसण, काळ्या रेशमी कडदोऱ्याचा गट्टू आणि शिंगाला लावायचा लालबुंद हुंगुळाचा नवा कोरा डबा ही सगळी सामग्री बांधली होती. सुभान्याची ही सगळी श्रीमंती आबांनी स्वतःच्या हाताने गोळा केली होती अन जीवापाड जतन केली होती. काळजावर दगड ठेवून आज ती परस्वाधीन केली जाणार होती.सगळी बांधाबांध झाल्यावर आबा धाय मोकलून रडले. सुरेशच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं पण त्याला आपल्या कलत्या वयाच्या बापापुढे रडता येत नव्हतं. लोचनानानी एक सारखी सुभान्याच्या अंगावरून हात फिरवत होती, त्याला आपल्या स्पर्शस्मृतीत साठवत होती. रानातली झाडं झुडपं अबोल झाली होती, गोठ्याला गदगदून आलं होतं, गोठ्यातल्या बाकीच्या गुरांनी एकच गलका उडवून दिला होता, अख्ख्या शिवारातली पाखरं सैरभैर झाली होती, बेमोसमी वारं वाव्दान इतकं घोंघावत होतं की झाडं हेलकावे खात होती, रोरावणारा आवाज आसमंतात घुमत होता. सगळ्या शिवारातल्या पिकांनी माना टाकल्या होत्या जणू त्यांना हे पाहवत नव्हतं. सुभान्याचे पाय ज्या मातीला लागले होते त्यातून सोनं पिकलं होतं पण आता त्याचीच इथून रवानगी झाल्याने माती घनव्याकुळ झालेली. सगळीकडं कुंद वातावरणाची झिलई चढली होती. सुभान्या मात्र निश्चल उभा होता, फुरफुरत नव्हता की अंग थरथरवत नव्हता. त्याच्या तोंडालाफेसाच्या धारा लागल्या होत्या, कासरा करकचून बांधला आणि टेम्पो ड्रायव्हरने मागचं दार लॉक करून गाडीचा स्टार्टर मारला तसा सुभान्याने एकवार मागं वळून पाहिलं आणि बसकण मारली. बैल बसला. आबांच्या काळजात एकच तिडीक निघाली आणि तोंडातून किंकाळी बाहेर पडली. सुरेशने त्यांना सावरलं. बघता बघता सुभान्याला घेऊन टेम्पो फुफुटा उडवत वेगाने पुढे निघून गेला.सुभान्याला शेतातून घालवून दिल्याचा निरोप भानूला पाठवला. निरोप मिळताच भानूच्या चेहऱ्यावर विकृत समाधान विलसलं. त्यानं ही गोष्ट शेवंतेच्या कानावर घातली आणि ती पोर अधिकच खचून गेली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचं मन तिला खाऊ लागलं. तिच्या मनाला अपराधाची टोचणी लागली. आपण सुभान्यापाशी मन मोकळं केलं नसतं तर त्यानं आपल्या नवऱ्यावर हल्ला केला नसता आणि त्यानं काहीच केलं नसतं तर तो आता आपल्या शेतावर मजेत असला असता. सुभान्या नजरं पडला नाही तर आपल्या वडीलांची अवस्था किती अश्रूव्याकुळ होऊन जाते हे तिला ठाऊक असल्याने तिच्या काळजात विचारांचं एकच काहूर माजलं. या नंतर काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी तिच्यामागे धोशा लावला की आता तिनं माहेरी जाऊन पैसा अडका आणला नाही तर सुभान्याला जसं शेताबाहेर जावं लागलं तसं तिला घराबाहेर जावं लागेल. बघता बघता तो दुर्दैवी दिवस उजाडला. होळीच्या दुसऱ्या दिवशी शेवंताला अंगावरच्या नेसत्या कपड्यानिशी बाहेर काढलं गेलं. जणू तिच्या जीवाची आता धुळवड होणार होती. घायाळ हरिणीसारखी अवस्था झालेली ती स्वाभिमानी पोर कोसळून गेली. बावरलेल्या अवस्थेत तिने अविचार केला आणि स्वतःला संपवलं. आडरानातल्या विहिरीत तिनं जीव दिला...शेवंतेनं जीवाचं बरंवाईट केल्याच्या घटनेनं गोविंद भोसल्यांच्या घराची रया गेली. बाभळीचा काटा रुतावा तसं आपल्या एकुलत्या पोरीच्या अकाली जाण्याचा सल त्यांच्या काळजास लागून राहिला. रीतसर पोलीस फिर्याद झाली. खटला उभा राहील तेंव्हा त्याचा काय तो निकाल लागणार होता पण इकडे ताठ मानेनं उभं असलेलं कुटुंब मातीला खिळून गेलं होतं. गावातल्या अनेक थोरामोठ्यांनी त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण ती जखम काही केल्या भरून आली नाही. कित्येक दिवस त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं. शेताची वाट धुंडाळली नाही की गावकुसाची वेस ओलांडली नाही, घराचा उंबरा देखील त्यांनी लांघला नाही. पाखरं उडावीत तसे दिवस निघून गेले पण आबांच्या घरावर सुख समाधानाची पालवी काही केल्या उमलली नाही. आपला धनी असा झुरताना पाहून लोचनानानीचा जीव तगमगत होता, तिनेच सुभान्याची आठवण काढली आणि त्याचे निमित्त काढून कारभाऱ्याला उंबऱ्याबाहेर काढण्यात यश मिळवलं. खरं तर आबांच्या डोक्यात सुभान्या रोजच तरळायचा पण त्याचं नाव काढायची त्यांची हिम्मत झाली नव्हती. आपला पोरगा, आपली बायको काय म्हणेल आणि साऱ्या गावात ज्याची चर्चा झाली होती त्या प्रकरणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सुभान्याचं नाव घ्यायचं तरी कसं याचा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. पण आता त्याचं नाव निघालं की फारसे आढेवेढे न घेता आणि दुनियादारीचा विचार न करता त्यांनी होकार भरला होता. बघता बघता दिवस पक्का झाला, प्रतापला निरोप न देता थेट सुभान्याला भेटून मनातलं दुःख हलकं करावं असा त्यांचा विचार होता. तरीही सुरेशने प्रताप अण्णांना साखरवाडीत निरोप पोहोचता केला होता. आबांची आबाळ होऊ नये आणि त्यांना सुभान्याशी लवकर भेटता यावं जेणेकरून त्यांचं काळीज हलकं होईल याची त्याला रास्त काळजी होती. जमलंच तर सुभान्याला परत आणण्याची सगळी बोलाचाली करून आणि त्याची काय ती तजवीज करून यायचं असं आबांनी मनाशी पक्कं केलं होतं. आपला हा विचार देखील त्यांनी लोचनानानीपाशी बोलून दाखवला होता. त्यामुळे परतायला रात्र होईल असं त्यांनी सांगितलेलं.एसटीत बसल्यापासून आबांच्या डोळ्यापुढे सुभान्याचा आणि शेवंतेचा जीवनप्रवास डोळ्यापुढे सरकत होता. त्यात ते गढून गेले होते. हातातल्या खिरीच्या डब्याचा उष्मा कमी होत गेला आणि आसवलेल्या डोळ्यातलं पाणीही हळूहळू कमी होत गेलं. वादळ शमावं तसे ते स्तब्ध होत विचारात गढून गेले. कंडक्टरने बेल वाजवून साखरवाडीचा दोन तीन वेळा पुकारा केला तरी त्यांना ध्यानात आले नाही. भानावर येताच आस्ते कदम खाली उतरले. बघतात तर काय, समोरच अण्णा आणि त्यांचा मुलगा उभे होते. त्यांच्या जीपमध्ये बसून ते त्यांच्या वस्तीकडे निघाले. वाटेने अण्णा खूपच शांत बसून होते. नेहमी बडबड करणारा आपला मित्र इतका निशब्द झाल्याचं आबांना आश्चर्य वाटलं, पण आपल्या दुःखापायीच तो स्तब्ध झाला असावा अशी त्यांनी समजूत करून घेतली. सगळ्या रस्त्याने आबाच बोलत होते. अण्णा मान डोलावत होते, मधूनच एखादा होकार द्यायचे, जीवावर आल्यागत उसनं हसायचे. आबांची गाडी सुभान्यावर आल्यावर ते विषय बदलायचे. असं करता करता अर्धा एक तास गेला. साऱ्या रस्त्याने फुफुटा उडवत त्यांची गाडी अखेर शेतात आली. आबा पुरते अधीर झाले होते आणि प्रतापराव व त्यांच्या मुलाची अस्वस्थता वाढत होती. शेवटी त्यांच्या मुलाने त्यांना सावरलं आणि आबांना बाजेवर बसता यावं म्हणून त्यावर गोधडी अंथरली. तो पाणी आणण्यासाठी आत गेला. आता मात्र आबांचा धीर संपत आला होता. कधी एकदा सुभान्याला बघेन असं झालं होतं. ते अक्षरशः हातघाईला आले होते. हातातला खिरीचा डबा त्यांनी अजूनही खाली ठेवला नव्हता. डाव्या हातातल्या शेल्याने घाम पुसत ते ताडकन उभे राहिले."पाणी नंतर पिऊ की !आधी सुभान्याला भेटायचं मगच पाणी प्यायचं ! त्याशिवाय नरड्याखाली घोट कसा उतरणार ?"त्यांच्या या उद्गारासरशी अण्णांचा चेहरा सर्रकन उतरला. ते कावरे बावरे झाले. त्यांच्या अंगाला कंप सुटला. हात थरथर कापू लागले. डोईवरचा फेटा निघून खाली मातीत पडला.कुणाला काही कळायच्या आत ते वस्तीवरच्या औजाराच्या खोलीकडे भेलकांडतच निघून गेले.एकाएकी आपल्या मित्राला काय झाले हे त्यांना कळले नाही. अण्णा गेलेल्या दिशेला ते आ वासून बघत राहिले.अण्णांचा तरणाबांड पोरगा लख्ख पितळी तांब्यात पाणी घेऊन आबांच्या पुढ्यात उभा होता आणि त्यांचे लक्ष मात्र प्रतापकडे होते. औजाराच्या खोलीतून घागरी पडल्यासारखा आवाज आला आणि नंतर घुंगरमाळा वाजल्या त्यासरशी आबा तरातरा खोलीकडे निघाले, ते पोहोचण्यापूर्वीच आतून अण्णा बाहेर आले. त्यांच्या हातातल्या गाठोड्यात झूल होती, घुंगरमाळा होत्या, शिंगाचे माटोटे होते, हुंगुळाचा डबा होता, झुपकेदार गोंडे होते, पैंजण पट्टे होते, त्या सर्व जिनसा होत्या ज्या सुभान्यासोबत दिल्या होत्या. त्या सर्व चीजा बघून आबांच्या पोटात खड्डा पडला. ते अण्णांच्या दिशेने झेपावले. पण गर्भगळीत झालेल्या अण्णांच्या हातून गाठोडे खाली पडले. त्यांनी आबांना मिठी मारत हंबरडा फोडला. त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून आबांच्या काळजात कालवलं. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला. वेड्यासारखे त्या सगळ्या जिनसांवरून हात फिरवू लागले. सुभान्याची झूल त्यांनी छातीशी गच्च कवटाळली. ते रुबाबदार गोंडे मुठीत आवळून धरले. अण्णांच्या मुलाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला त्यांना जमिनीवरून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी पाय घट्ट रोवले होते. ते बराच वेळ खाली बसकण मारून होते. त्या सर्व चीजवस्तूंवरून मायेने थरथरता हात फिरवत होते. बऱ्याच वेळाने त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध आटल्यावर अण्णांनी त्यांना उठवले आणि बाजेवर बसवले.धोतराच्या सोग्याने आबांचे डोळे पुसत अण्णा सांगत होते. सुभान्या इथं आल्यापासून एकदम शांत होता. त्याचं खाणं एकदम कमी झालं होतं, तब्येत रोडावली होती. बरगड्या वर आल्या होत्या, पाठीची पन्हाळ स्पष्ट दिसत होती, पाय झडून गेले होते, फऱ्याचं मांस गळून गेलं होतं, त्याची वशिंड कलून गेली होती, पोट खपाटीला गेलं होतं, कधी कधी आठवडाभर तो आमुण्याला तोंड लावत नव्हता. नुसता दावणीला बसून असायचा. त्याच्या डोळ्यांना सदोदित धार लागलेली असायची. अण्णा सांगत होते आणि गोविंद आबांचे डोळे वाहत होते. त्यांच्या डोळ्यापुढे सुभान्याच्या आयुष्याचा पट तरळत होता. खंगून गेलेला सुभान्या तरळत होता. त्यांच्या तोंडून हुंदके बाहेर पडत होते. अण्णांचं कथन जारी होतं. सुभान्याने नंतर नंतर बाटुक देखील चघळणं बंद केलं होतं. शून्यात नजर लावून शांत बसून असलेला सुभान्या आजही आठवला तरी काळीज तुटून जातं ! पण आमचा काहीच इलाज चालत नव्हता. डॉक्टर झाले, दवादारू झाली पण त्याची स्थिती काही केल्या उभारी घेत नव्हती. उन्हे वाढत गेली तशी त्याच्या जीवाची घालमेल वाढत गेली. गोठ्यातल्या रात्री त्याने अक्षरशः रडून घालवल्या. सुभान्या असा बसून असला की सगळा गोठा उस्मरून जायचा, बाकीची जनावरंही खिळून जायची. असं करता करता होळी येऊन गेली. होळीच्या दिवशी तर तो फार अस्वस्थ होता. त्याच्या अंगात आता कुठलेच बळ शिल्लक नव्हतं. त्याच्या जीवाची धास्ती लागून राहिली होती. शेतात पिकं जळून गेलेली, सहा परसाची खोल विहीर आटून गेलेली आणि गोठा हा असा मरायला टेकलेला ! रानात जीवच लागत नव्हता. पण आपलं पोर आजारी असलं म्हणून आपण त्याला भेटायचं टाळतो का ? मातीत तर आपला जीव गुंतलेला. सुभान्या असा कणाकणाने झिजत होता आणि जीवाला घोर लावत होता. पण त्याने जास्त दिवस असं आणखी कढत जगायचं टाळलं असावं. धुळवडीच्या रात्री त्यानं जीवाची तगमग संपवली.अण्णांच्या या वाक्यासरशी आबा ताडकन सावध झाले."काय म्हणलास प्रताप ? धुळवडीच्या दिवशी ?"प्रतापराव बोलते झाले, "होय गोविंदा ! होय ! धुळवडीच्या रात्री त्यानं दावणीचा कासरा तोडला आणि खालच्या बरड माळावर असलेल्या खोल कोरड्या विहिरीत उडी घेऊन जीव दिला !"आता मात्र आबा अक्षरशः छाती पिटून घेऊ लागले.प्रतापराव सांगत होते - "झालं असं की...शेवंताची बातमी कळल्याबरोबर आम्ही सगळे जण तुमच्याकडं येऊन गेलो. शेवंतेच्या दहनावरून परत येईपर्यंत खूप रात्र झालेली. त्यामुळे रानात वस्तीवर जायच्या ऐवजी आम्ही गावातच मुक्कामाला होतो... चालण्याचे देखील बळ नसलेल्या सुभान्याने त्या रात्री दावणीचे दावं कसं तोडलं असेल आणि जुन्या विहिरीपर्यंत तो कसा चालत गेला असेल, विहिरीच्या मचाणावर चढून त्याने उडी कशी मारली असेल आणि खालच्या मोठाल्या दगडधोंड्याच्या ढिगावर पडून शेवटचे श्वास घेताना त्याने त्या वेदना कशा सोसतील काहीच कळत नाही .... इतकी ताकद त्याच्यात कुठून आली असंल हे कधीच कळलं नाही ...."आबा खिळून गेल्यागत ऐकत होते. जणू त्यांचे श्वास कोंडले असावेत इतके ते दिग्मूढ झाले होते.तुमच्या घरी आधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यामुळे आम्ही मुद्दामच सुभान्या गेलेला कळवलं नाही.बराच वेळ निशब्द शांततेत गेल्यावर आबा बोलले, 'शेवंता गेल्याचं दुःख त्या मुक्या जीवाला झालं असणार... त्याचा लई जीव होता तिच्यावर .... आम्ही पोटच्या पोरीबिगर कसं का होईना जगतो आहोतच ना ? पण सुभान्याचा आमच्याहून जास्ती जीव होता तिच्यावर .... खरंच त्याचा लई जीव होता... तिने आपला प्रवास संपवला तसा यानं देखील आपला श्वास थांबवला .... कुठं फेडू रे तुझे हे उपकार... माझा सुभान्या आता मला कुठं दिसणार ....."अण्णांनी पुढे होत गोविंदरावांना आपल्या बाहूपाशात घेतलं. त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना शांत केलं. बराच वेळ ते गोठ्यात दावणीजवळ जाऊन बसले जिथल्या खुटीला सुभान्या बसून असे. बाकीची गुरं चरायला गेलेली असल्याने गोठा सूना होता. तिथं बसलेले खिन्न चेहऱ्याचे आबा आणखीनच भेसूर वाटत होते. ज्या विहिरीत सुभान्याने अखेरचे श्वास घेतले तिथं गेल्यावर त्यांच्या अश्रुंचे बांध पुन्हा एकदा फुटले. त्यांना शांत होण्यास खूप वेळ लागला. आणखी काही वेळ अण्णांच्या शेतात घालवल्यानंतर जेवणाचा आग्रह करूनही सुभान्या गेलाय आता खाण्याचं मन नाही असं म्हणत गोविंदरावांनी परत फिरण्याचा दोसरा सुरु केला. प्रतापरावांनी बरंच अडवून पाहण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्यांची मानसिक अवस्था जाणत त्यांना आणखी आग्रह केला नाही. अखेर आबा निघाले. सुभान्याच्या सगळ्या वस्तू त्यांनी एका चुंगडयात भरून घेतल्या. खिरीचा डबा मात्र तिथेच ठेवला. अण्णा आणि त्यांचा मुलगा त्यांना एसटी स्टॅन्डपर्यंत सोडायला आले. उन्हे तिरपी होण्याआधी आबा एसटीत बसले. खालून अण्णांनी हात हलवला, प्रत्त्युतरादाखल आबांचा हात हललाच नाही. त्यांचे डोळे पाणावले होते आणि पापण्या थरथरत होत्या. देहास कंप भरला होता. सांज होण्याची वेळ असल्याने एसटी जवळ जवळ रिकामीच होती. आबांच्या ओळखीची माणसे त्यांची ही अवस्था पाहून शहारून गेली. त्यांना वाटलं कदाचित लेकीच्या दुःखाची कुठली तरी खपली निघाली असंल, काहीतरी आठवलं असेल. पण वास्तव कुणालाच ठाऊक नव्हते.गावात एसटी यायला आणि दिवस मावळून अंधार व्हायला एकच गाठ पडली. हातात भलं मोठं चुंगडं घेऊन एसटीतून उतरणारे पडलेल्या चेहऱ्याचे आबा पाहून डांबरी सडकेवरच्या गावकऱ्यांना नवल वाटलं. काहींनी चुळबुळ सुरु केली, तर काहींनी दबक्या आवाजात अंदाजास वाव दिला. एकदोघे पुढे झाले."आबा, सुरेश भाऊ यायला वखत असंल तर मी सोडून येऊ का ?"आबा उत्तर द्यायच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांनी मानही डोलावली नाही की नकारही दिला नाही. त्यातल्याच एकाने त्यांच्या हातातले चुंगडे घेतले आणि मोटरसायकलवर त्यांना अज्जात बसवले. आबांना काही कळण्याआधी त्याने गाडीला किक मारली देखील. हातातल्या चुंगडयावरून हात फिरवताना आबांच्या डोळ्यांना पुन्हा धार लागली आणि त्यांना पाहणाऱ्या गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.काही मिनिटातच आबांना घेऊन तो तरुण भोसल्यांच्या वाड्यासमोर आला. आबांना आता पुरते भरून आले होते. कसेबसे ते गाडीवरून उतरले. गाडीवर बसलेल्या आबांचे हळुवार हुंदके ऐकणाऱ्या तरुणाला एव्हाना काहीतरी कमीजास्त झाल्याचा संशय आला होता त्यामुळे तोही आबांच्या पाठोपाठ खाली उतरून त्यांच्या मागे निघाला. वाड्याच्या भल्या मोठ्या दारापाशी उंबरठयावर पाय ठेवताच इतक्या वेळ मोठ्या संयमाने सांभाळलेला धीर सुटला आणि त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. सुभान्याच्या नावाची किंकाळी त्यांच्या तोंडून निघाली. माजघरात असलेल्या लोचनानानीला उंबरठयापाशी हालचालीची चाहूल लागली पण नेमकं काय झालं याचा अंदाज आला नव्हता. आबांच्या आवाजाने तिच्या काळजाचे पाणीपाणी झाले. त्यांचा हंबरडा ऐकून बघ्यांची गर्दी दारात झाली. शेतात गेलेला सुरेशही तितक्यात परतला. आपल्या घरासमोरील गर्दी पाहून काहीतरी आक्रीत झाल्याचा अंदाज त्याला आला. आत आई आबांना हमसून हमसून रडताना पाहून तो गर्भगळीत झाला. आबांच्या हातातील चुंगडे गळून पडले होते आणि त्यातल्या सुभान्याच्या वस्तू विखरून पडल्या होत्या. सुरेशला काही क्षणात अंदाज आला पण एव्हाना रडणाऱ्या मात्यापित्यांना पाहून तो ही कोलमडून गेला होता. बघता बघता सगळा गाव गोविंद भोसल्यांच्या दारात गोळा झाला. बायापोरी रडू लागल्या. सुभान्याची हकीकत कळताच गडी माणसेही कासावीस झाली, उसासे सोडू लागली. पोरं बाळं कावरी बावरी झाली. त्या रात्री गावातल्या काही घरात चूल पेटली नाही आणि वेशीवरल्या देवळात दिवाही लागला नाही. ती रात्र आबांच्या कुटुंबाला खूपच जड गेली.दुसऱ्या दिवशी सकाळीच लोचना नानीने आपल्या नवरयाला या दुःखाच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी वस्तीत राहायला जायचं पक्कं केलं. तिथल्या वातावरणाने जरा फरक पडेल आणि त्यांचं मन लागेल या विचाराने तिने सकाळपासूनच आबांना शेतात जायची घाई केली. अखेरीस सकाळ ओसरून दिवस डोईवर यायच्या बेतात असताना सुरेशने आणलेल्या गाडीतून ते दोघे शेताकडे रवाना झाले. जाताना साऱ्या वाटंने त्यांना राहून राहून सुभान्याचे उमाळे दाटून येत होते. सगळी वाट निशब्द शांततेत पार केली आणि ते वस्तीवर आले. सगळं वातावरण निरव होतं. गोठ्यातली गुरं चरायला गेली होती. मंद वारा वाहत होता. पाखरांचे आवाज शांतता भंग करत होते. आभाळ पुरते निरभ्र होते. बांधावरून येणारी पानांची सळसळ हवेत घुमत होती. पिकं मुकाट उभी होती. तिथं आल्यानंतर बराच वेळ ते नुसते गुडघ्यात डोकं खुपसून बसून होते. इतक्यात त्यांना खोंडाच्या फुरफुरण्याचा आवाज आला. आवाज परिचयाचा वाटला. आबांनी आणि नानीने कान टवकारले. पुन्हा चांगली डूरकी ऐकू आली तसे ते गोठ्याकडे पळतच निघाले. गुरं तर चरायला गेली होती, नांगरणीची बैलं जुंपलेली होती मग गोठ्यात कोण आहे याची त्यांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यांच्यामागे नानीही धावतच आत आली. गोठयात येताच आबांचा जीव अक्षरशः हरखून गेला. त्यांचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. सुभान्या दोनेक वर्षाचा तरणा खोंड असताना जसा दिसायचा सादमुद तसंच दिसणारं एक पांढरं शुभ्र खोंड आत उभं होतं आणि त्याच्या वेसणीला हात धरून प्रतापराव आणि त्यांचा पोरगा उभे होते !आबांच्या तोंडून सुभान्याच्या नावाचे उद्गार बाहेर पडले. नानीसुद्धा डोळ्यात आनंदाश्रू आणून थक्क होऊन पाहत उभी होती.अण्णा बोलले - "गोविंदा आठवतेय का तुला दोन अडीच सालाखाली तुझ्या वस्तीवर आम्ही आमची जनी गाय सुभान्यासंगट रेत करण्यासाठी खास आणली होती ... बघ बरं आठवतंय का ?"आबांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ते धावतच त्या खोंडाच्या जवळ गेले आणि त्याच्या रेशमी पाठीवरून हात फिरवू लागले. ते मुके जनावर त्यांचे हात चाटू लागले. त्याच्याही डोळ्याला धार लागली आणि आबांच्या डोळ्यांत तर पाण्याचा बांधच फुटला होता. मोठ्याने ओरडत त्यांनी त्याला मिठी मारली आणि ते हमसून हमसून रडू लागले. बघणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणवले. एव्हाना गडी गोळा झाले होते. हा चमत्कार पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या झाल्या. थोडंसं सावरल्यावर आबांनी अण्णांना मिठी मारली. दोघेही रडू लागले. सुरेशने अण्णांच्या मुलाला मिठी मारली आणि नानीने खोंडाच्या गळ्यापाशी लाडाने हात फिरवत त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले.आता हे खोंड तुमचेच ... हा तुमचा सुभान्या, देवाने याला परत धाडलेय, तेंव्हा तुमचा ऐवज तुमच्यापाशी दिलेला बरा... आम्ही फक्त निरोपे झालो... सुभान्या आमच्या शेतात गेल्याने आम्हाला अपराधी वाटत होतं त्याची सल आता जरा तरी भरून निघंल आणि आपली नाती जन्मजन्मात टिकून राहतील.. काय बरोबर बोलतोय नव्हं आबा ?"आबांनी मान डोलावली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.बऱ्याच दिवसांनी गोविंद भोसल्यांच्या वस्तीवरची फुलं खुलून गेली आणि पानाफुलात प्रसन्नतेची लकेर धावून गेली.- समीर गायकवाड. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!