सिनेमा टॉकीज.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

साताऱ्यात राजवाड्याच्या इथे समर्थ मंदिरला जाण्यासाठी बसचा थांबा होता. तिथे पूर्वी मोठया लोखंडाच्या बोर्डवर सिनेमाचे पोस्टर चिकटवलेले असायचे आणि कुठल्या टॉकीजला कितीचा शो आहे त्याची डिटेल असायची. वरच्या लाईनीत तीन ते सहा, सहा ते नऊ, नऊ ते बाराच्या पिक्चरचे पोस्टर लावले असायचे. त्या खालची लाईन मॅटिनीवाली बारा ते तीन. माझ्या आठवणीतला हा काळ आहे, नव्वद पर्यंतचा.त्यावेळी साताऱ्यात खूप सारे टॉकीज होते; चित्रा, समर्थ, राधिका, राजलक्ष्मी, जय विजय, आणखी दोन टॉकीजची नावे नाही आठवत आता........आम्ही रहायचो समर्थ मंदिराला. बससाठी उभं राहिलं की मी अगदी मान वर करून ती दुखेपर्यंत ते सगळे पोस्टर पुन्हा पुन्हा बघत बसायचे. बस येईपर्यंतचा टाईमपास होता तो माझा. त्या पोस्टरमध्ये दिसणाऱ्या हिरो हिरॉइनींकडे डोळे भरून बघत बघत, कुठले कुठले सिनेमे बघायचे (तसे बघायचे सर्वच असायचे), नक्की घरातल्या कुठल्या माणसाला मस्का लावला तर काम होईल, याची मी मनात बांधणीही करत बसायचे.आमच्या घरातही सारे सिनेमा प्रेमीच होते म्हणा, सर्वांनाच मोठी हौस होती सिनेमाची. सिनेमाला जायचं म्हटलं की सारे चटचट आवरून एकाच्या पुढे एक तय्यार असायचे अगदी!!!!आजी-आजोबा, मामा मामी(दोनचा सेट), मावशी आणि आम्ही चिल्ली पिल्ली......त्यावेळी सिनेमा बघायचं ठरायचं ते फक्त हिरो हिरॉईनीवरून, गाण्यांवरून ; स्टोरीशी काही घेणं देणं नव्हतं (किमान माझतरी....)जितेंद्र -जयाप्रदा-श्रीदेवी , मिथुन -पद्मिनी कोल्हापूरे यांची तोंडं पोस्टरमध्ये दिसली की मग माझं डनच डन होऊन जायचं.हिम्मतवाला, तोहफा, औलाद, मजाल, मवाली, स्वर्ग से सुंदर, प्यार झुकता नाही, ऐसा प्यार कहाँ, दादागिरी, संजोग, हकीकत असे कितीतरी सिनेमे त्यावेळी टॉकीजला जाऊन पाहिलेले आहेत.आता जेव्हा टिव्हीवर लागतात कधी कधी, तेव्हा हसायला येतं, वाटतं, मी कसे बघितले असतील हे सिनेमे; ते सुद्धा ते पाहण्यासाठी धिंगाणा घालून.....?? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); अमिताभ बच्चन तेव्हा फार मारामारीचे सिनेमे करायचे, आणि मला ढिशुंम्म् ढिशुंम्मची खूप भिती वाटायची. त्यामुळे मी त्यांचे सिनेमे पहायला फारशी इंटरेस्टेड नसायचे. पण माझ्या मामांना ते खूप आवडायचे.ऋषी कपूर, गोविंदा यांचे सिनेमे मात्र असायचे माझ्या लिस्टित.पण जेव्हा ती एक दो तीन करत माधुरी आली तेव्हा मात्र माझ्या लिस्टितले बाकी सगळे मागे पडले.........ती दिसली पोस्टरमध्ये की तो सिनेमा तर मला पाहायचा म्हणजे पाहायचाच असायचा. ती असली की हिरो कोणीपण असला तरी फरक पडायचा नाही. आपल्या मराठीतले सुपरस्टार अशोक सराफ आणि आमचा लक्ष्या (हो तो नेहमी आम्हाला आमच्या घरातलाच कोणी वाटायचा) हे असले की तो सिनेमा पहायलाच पाहिजे असं माझंच नव्हे, घरच्यांचही म्हणणं असायचं.सर्वांनाच भारी मज्जा यायची त्यांना बघायला...........नवरी मिळे नवऱ्याला, धुमधडाका,दे दणादण, इरसाल कार्टी, गम्मत जम्मत, बनवाबनवी, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, थरथराट, आत्मविश्वास, एकापेक्षा एक, चगु मंगु, शेजारी शेजारी, धडाकेबाज ...... मला वाटतय मी लक्ष्या आणि अशोक सराफ जोडीचा एकही सिनेमा सोडला नसेल.आणि त्यातही सर्वात आवडते सिनेमे होते, जेव्हा त्यांच्याबरोबर सचिन किंवा महेश कोठारे असायचे. एकदा सिनेमा पहायचा ठरलं की घरातून निघेपर्यंत तशी कोणालाच चैन नसायची. अगोदरपासून बुकिंग फार कमी वेळा केलं जायचं. बघायला चाललोय तो मिळेल की नाही याची गॅरेंटी अजिबात नसायची. बरेचदा तर एक ठरवून निघायचो आणि दुसराच बघून यायचो, असंच व्हायचं. बहुतेकदा सिनेमाची तिकीटं आमची जत्रा तिथे पोचेपर्यंत संपलेलीच असायची. त्यावेळी ब्लॅकचा जोर होता. संपलेली असायची की संपवलेली असायची त्यांनाच माहीत. पण मग एकदा सिनेमाचं नाव काढलं की तो बिन बघता परत येणं हे कुणालाच चालायचं नाही. माझं तर सिनेमा बघायला मिळतोय ना कुठला का मिळेना, असंच गणित होतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); मला अजूनही त्या खिडक्या आठवतात, आणि ती गुलाबी किंवा पिवळ्या, फिकट हिरव्या रंगाची तिकीटं हातात पडल्यावर हरखून जाणारी मी लगेच दिसते डोळ्यासमोर.......आमची तिकीटं नेहमीच स्टॉलची असायची. कारण एक तर पूर्ण पलटण असायची, दिल्ली जशी नेहमी दूर असते, तशी बाल्कनी आमच्यासाठी नेहमी दूरच असायची. आणि तेव्हा काही वाटायचंही नाही त्याचं. स्टेटस बिट्स असले प्रकार नावालाही माहीत नव्हते.बाल्कनीचंही नाही, आणि इंटरवल मध्ये काही खायला मिळायचं नाही, त्याचंही काही वाटायचं नाही. आजी डब्यात चिवडा, नाही तर ग्लुकोजची बिस्कीट घ्यायची, त्याच्यावरही आम्ही खूष असायचो. फार तर फार गोरेंचं लालभडक भणंगाचं पाकिट असायचं एक रुपयाला, ते दोघात खायला मिळायचं. झालं तर उकडून भाजलेल्या शेंगा, खारे दाणे एवढेच ऑप्शन होते फक्त. ते सुद्धा कधीतरीच मिळायचे.पण सिनेमा बघायला मिळतोय त्यापुढे काही मोठं वाटायच नाही. येताना बहुतेक वेळी चालतच घरी  यायचो आम्ही. खूप लांब असेल टॉकीज तरच 'बस'. लहानपणी पाय दुखले की अर्ध्या वाटेतून दोन्ही मामा आळीपाळीने खांद्यावर घ्यायचे, एवढं नीट आठवतंय मला. रिक्षाचा विचार तर कोणाच्याही मनात कुठेही नसायचा.आता वाटतं, ती खरी मजा होती सिनेमा बघण्याची. जाण्याची हुरहूर, बघण्याचा आनंद, तो सिनेमा संपल्यावर त्यातली गाणी म्हणत रस्त्यातून भावंडांबरोबर ते नाचत बागडत येणं. घरचे लहानथोर सर्व एकत्र असणं, ती गंमत औरच होती!! आताचं मॉल मधलं वातावरण कितीही चकचकीत असलं, त्या सिटा कितीही भारी असल्या तरी, ती साताऱ्याची जुनी टॉकीजं, त्या लाकडी खुर्च्या, मधेच लाईट गेल्यावर होणारी तारांबळ याची सर त्याला येऊच शकत नाही. ते कोरलं गेलंय आठवणीत कायमचं!!ती धुंदी होती सगळी........ती धुंदी, मॉलमधल्या पॉपकॉर्न मध्ये नाही, समोश्यामध्ये, कोल्ड्रिंकमध्ये नाही. ती धुंदी ऑनलाईन तिकीट बुक करण्यात नाही. त्यातल्या अत्याधुनिक साऊंड सिस्टीम मध्येही नाही. ती धुंदी  अनुभवायला मला माझ्या लहानपणीच्या आठवणीतच जावं लागतं..........!!©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!