'सिंहासन' ...

'सिंहासन' ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा ,किंचित वाढलेले दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस(निळू फुले) भल्या सकाळी घरातल्या लाकडी खुर्चीत अंगाचे मेटकुळे करून बसलेला आहे, काही वेळापूर्वी त्याला सीएमचा फोन येऊन गेलेला आहे. तो अजूनही त्या फोनच्याच विचारात आहे. इतक्यात डोअरबेल वाजते. सिगारेट शिलगावत रेडीओ सुरु करून तो दरवाजा उघडतो, बाहेर त्याची तरुण कामवाली बाई छातीवरच्या पदराचे नेहमीप्रमाणे भान नसल्यागत उभी असते. तिच्याकडे एक विलक्षण जहरी कटाक्ष टाकत दिगू बाजूला होतो. ती आत येते, रेडीओवर गाणे सुरु आहे, 'झुळझुळतो अंगणात तोच गार वारा ग हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा ग अजुन तुझे हळदीचे अंगअंग पिवळे… ' दिगू परत खुर्चीवर येऊन बसतो, बाई आत जाते अन फरशी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन बाहेर येते. दिगूची सिगारेट पेटलेली आहे अन डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले आहे. त्याचं सारं ध्यान तिच्याकडे आहे अन इतक्यात टेबलावरच्या फोनची घंटी वाजते. तो फोन उचलतो. पलिकडून संवाद सुरु होतात, "श्रीमंतांचा फोन आला होता वाटतं ? काय म्हणत होते श्रीमंत ?" दिगू सांगतो, "काही नाही, त्यांची तब्येत नरम आहे म्हणत होते, दुष्काळाचे विचारत होते …" पलीकडून प्रतिप्रश्न येतो ‘पण असं झालं काय अचानक, मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?’आता चांगली आलखन पालखन मांडी घालून खुर्चीवर बसलेला दिगू तीक्ष्ण नजरेने फरशी पुसणाऱ्या पाठमोरया असलेल्या कामवाल्या बाईच्या पुठ्ठयाला निर्लज्जपणे न्याहळत खवचटपणे छद्मी हसत म्हणतो, "काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल !"........विधानसभेचं सत्र चालू आहे, दुष्काळाच्या अन गावाकडच्या माणसांच्या व्यथा मांडणारा एक सच्चा माणूस म्हणून ख्याती असलेले श्रीपतराव शिंदे अगदी पोटतिडकीने बोलताहेत, "गाठा, उच्चांक गाठा. आम्ही दुष्काळी भागातली माणसं, उपाशी पोटांचे नगारे बडवीत तुमचे उच्चांक बघतो."......सदनात प्रश्नोत्तरे सुरु आहेत पण सीएम जिवाजीराव शिंदे (अरुण सरनाईक) साहेबांचे कशातच लक्ष नाहीये कारण एका निनावी फोनद्वारे अज्ञाताने त्यांना सांगितले आहे की त्यांच्या जवळचे, पक्षाचे लोक त्यांच्याविरुद्ध कट करताहेत. त्यांच्या डोक्यात त्याचा 'खोडकिडा' वळवळतो आहे, त्यामुळे सदनातील कामकाज टाकून बाहेर पडतात पण तत्पूर्वी सभागृहात त्यांच्या शेजारी बसलेले अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे (श्रीराम लागू) त्यांना विचारतात की, "तब्येत बरी आहे ना ? मी सोडायला येऊ का ? काही अडचण ?" हे प्रश्न विचारतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरचे बेरकी भाव अन डोळ्यातले आव्हान खूप काही बोलून जातं.. ......सीएमच्या निवासस्थानी फोन करून दिगू तिथल्या मोगरे ह्या सहायकाला विचारतो, "काय झालेय साहेबांना ?अहो मोगरे, प्रेसवाल्यांना सांगता ती माहिती मला सांगू नका !" हा दिगू सीएम अन विश्वासराव दोघांच्याही जवळचा आहे पण त्याचीही काही पत्रकारितेची अस्सल तत्वे आहेत तो भाडोत्रीही नाही अन आजच्यासारखा विकाऊ तर मुळीच नाही. त्याला पत्रकारिते इतकाच राज्याच्या भल्यासाठीच्या राजकारणात रस आहे…... नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयाच्या बाहेर जोड्याने मारीन असं आत्मविश्वासपूर्ण देहबोलीत ठासून सांगणारा कामगार नेता डिकास्टा (सतीश दुभाषी) आणि त्याचवेळेस पडद्यावर टोलेजंग इमारतीवरून दिसणारी अस्ताव्यस्त पसरलेली मुंबई दिसत असते. जणू ही लढाई मुंबईच्या साम्राज्याचीच असावी असा विचार त्या वेळी मनात तरळतो. यात अर्थमंत्री विश्वासराव दाभाडेंचा आत्मविश्वास गमावलेला तरुण मुलगा आहे आणि त्याची उठवळ पत्नी (रीमा लागू) आहे, जिची आपल्या पतीपेक्षा सासऱ्याशी जास्त जवळीक आहे. पती तिच्यादृष्टीने हरकाम्या आहे तर विश्वासरावांच्या लेखी ती एक हत्यार आहे. काहीही करून राजकारणात येऊन काही तरी घबाड हस्तगत करण्याच्या लालसेने आलेली त्यासाठी पदर पाडून काहीतरी पदरात पडावे म्हणून जीवाचा आटापिटा करणारी अधाशी नजरेची लालन सारंग आहे. धूर्त खेळी करून आपलं आसन बळकट करून घेणारे चलाख बुधाजीराव (मोहन आगाशे) आहेत. सिंहासन एका ठराविक कालखंडाचा प्रतिनिधी नसून त्यातील पात्रे आजही सजीव वाटतात हे याच्या कथेचे आणि विजय तेंडुलकरांच्या अद्वितीय पटकथेचे यश आहे... 'सिंहासन'चे कथासूत्र तसे बघितले छोटेसेच आहे पण त्याला चिरंतन चैतन्याचा वसा मिळाला असावा. राजकारणाच्या बुद्धिबळाची ही कालातीत गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी(सीएमनी) आपले स्थान कसे राखले हे पत्रकार दिगू टिपणीस सारे पाहत असतो. मुख्यमंत्र्यांचे पहिले प्रतिस्पर्धी अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे सीएमना अडचणीत आणण्यासाठी कामगार पुढारी डिकास्टाला हाताशी धरून ‘मुंबई बंद’चा कार्यक्रम आखवतात.त्याच्या बदल्यात अर्थमंत्र्यांनी कामगारांवरील खटले काढून घ्यायचे असतात. सीएमच्या अडचणीत वाढ होत असताना नेतृत्वात बदल हवा म्हणून अर्थमंत्री राजीनामा देतात.मराठ्वाड्याचे माणिकराव पाटील मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत असतात. महसूल,अर्थ व शेतकी मंत्री सीएमना खाली खेचण्याचा संयुक्त प्रयोग करतात. सीएमना हृदयविकाराचा खोटा खोटा झटका येतो (!) त्यातल्या सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ होऊन मंत्रीमंडळाचा विस्तार करून असंतुष्टांना आपल्या तंबूत घेऊन ते आपले शासन स्थिर करतात.महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या विधानसभा सदनातील कामकाज वाटावे असं उत्तुंग आणि उत्कट चित्रीकरण झालेला हा सिनेमा काळजाच्या पडद्यावर असा कोरलेला आहे की त्यातलं एकही दृश्य पुसलं जात नाही... 'ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार' असं गाणारी तरुण स्मगलरची कोवळी पोर असो वा त्याच्याशी दगाफटका करणारा नाना पाटेकरचा स्मगलर असो वा जिवाजीराव पुन्हा मुख्यमंत्री पदी आरूढ झाल्यावर विषमतेवर आसूड ओढत परिस्थितीची हतबलता दर्शवणारे अप्रतिम काव्य 'उषःकाल होता होता काळरात्र झाली..' असो. ही सर्व छोटे घटक आहेत पण कथेच्या बळकटीत यांचा मोलाचा वाटा आहे. सुरेश भटांच्या गाण्यावर जब्बारनी जो क्लायमॅक्स केला आहे तो प्रेक्षकाला समूळ हादरवून टाकतो आणि आपण किती लाचार होऊन हताश विमनस्कतेचे बळी होतो आहोत हे दाखवून देतो. हे सगळं जसंच्या तस्स डोक्यात भिनलेलं आहे....'मुंबई दिनांक' ही अप्रतिम पण काहीशी अस्ताव्यस्त तर 'सिंहासन' ही खिळवून ठेवणारी कादंबरी ! अरुण साधूंच्या या दोन्ही कादंबरीतील निवडक प्रसंगावर बेतला होता जब्बार पटेलांचा 'सिंहासन' ! विजय तेंडुलकरांनी या सिनेमाची पटकथा अन संवाद असे भन्नाट लिहिले आहेत की पडद्याच्या कॅन्व्हास वरून प्रेक्षकाचे डोळे हटत नाहीत. डोक्यात सगळा सिनेमा जसाच्या तसा रुतून बसलाय ….सिंहासनचा प्रत्येक संवाद बोलका आहे, प्रत्येक फ्रेम देखणी आहे, सर्व अभिनेत्यांचे काम दमदार आहे. प्रकाशयोजना आणि नेपथ्य अत्यंत प्रभावशाली आहे. पार्श्वसंगीत प्रसंगी काळजाचा ठोका चुकवते तर कधी डोळ्याच्या कडा ओल्या करून सोडते. राजकीय विषयावरील चित्रपट असूनही याला अफाट लोकप्रियता मिळाली होती. यातील गाणीही रसिकप्रिय झाली. समीक्षकांनीही अगदी मुक्तकंठाने त्याची स्तुती केली होती. 'सिंहासन'च्या तोडीचा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा झाला नाही. 'सिंहासन'मध्ये जे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि वैकल्पिक मुद्दे केंद्रस्थानी ठेवले गेले आहेत ते मुद्दे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जसेच्या तसे आहेत. 'सिंहासन' १९७९मध्ये येऊन गेला. त्याला आता ३८ वर्षे पूर्ण झालीत. दोन वर्षांनी त्याची चाळीशी पूर्ण होईल. पण महाराष्ट्राच्या राजकारणात, सत्ताकारणात, अर्थकारणात आणि समाजकारणात तसूभरही फरक पडलेला नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणायची की 'सिंहासन'कर्त्या अरुण साधू आणि जब्बार पटेलांची दूरदृष्टीपूर्ण सापेक्षता समजायची याचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही...- समीर गायकवाड .
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!