समुपदेशनाची गरज

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

समुपदेशनाची गरज-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)गेल्या दोन-तीन वर्षापासून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिस व वाहतूक सुरक्षा स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पण, अद्याप कित्येकजण सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. स्वतःच्या गाड्या रस्त्यावर आल्यानेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. एका बाजूला वाहन खरेदीचे प्रत्येक मुंबईकराने उचललेले पाऊल आणि दुसरीकडे त्यांनी वाहतुकीचे नियम मोडण्यात घेतलेल्या आघाडीने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबईतील ६०% वाहन चालक नियम मोडतातच मोडतात. वाहतुकीसाठी नियमन करण्यासाठी लावण्यात आलेली बॅरिकेट्स, मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करणे, नो पार्किंग, एक दिशा मार्ग असे फलक उखडून फेकून देणे, हेल्मेट न घालता मर्यादेपेक्षा अधिक वेगात वाहन चालवणे, नो एंट्रीमध्ये वाहन चालवणे, बाईक स्वरांचा तर यात पहिला नंबर लागतो. आता तर  ऑनलाईन खरेदी घराघरात पोहोचली आहे. परिणामी, घरबसल्या सगळ्या गोष्टी खरेदी करता येऊ लागल्या आहेत. खाद्यपदार्थ, फास्टफूड क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवण्याकडे झुकला आहे. खाद्यपदार्थ ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर ते खाद्यपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या कंपन्यांमध्ये यामुळे  मोठया प्रमाणात स्पर्धा  दिसून येत आहे. त्यामुळे बाईक वरून ऑर्डर घरपोच पोचविणारे बाईकस्वार रस्त्यावरून कशाही बाईक चालविताना दिसून येतात. ऑर्डर लवकर पोहचविण्याचा नादात त्यांना वेगाचेही भान राहत नसल्याचे निदर्शनास येत आहे.मुंबईत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पण, कारवाई  करण्यात आलेले बहुतांश दुचाकीस्वार हे तरुण आहेत. पोलिसांच्या केवळ दंडात्मक कारवाईचा त्यांच्यावर फारसा परिणाम होईल असे सध्या तरी वाटत नाही. त्यातच अपुरे ज्ञान, शारीरिक व मानसिक दुर्बलता, मद्यपान आदींचे प्रमाणही अशा तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे आर्थिक दंडाबरोबरच त्यांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करायला हवेत. पोलिसांनी रस्त्यावर बाईकस्वारांवर कारवाई केल्यास पोलीस कारवाईच्या विरोधात ओरड केली जाते. दंडात्मक कारवाई होऊनही हेल्मेट आणि सीटबेल्टची गरज वाहनधारकांना समजलेली नाही. नो पार्किंगच्या ठिकाणीही कशाही गाड्या उभ्या केल्या जात आहेत. नागरिकांच्या मानसिकतेत अद्याप बदल झालेला दिसत नाही. नियम मोडल्यास काय फरक पडतो अशी मुजोरी कायम होताना दिसते. कॉलेज, स्वयंसेवी संस्था पोलिसांच्यावतीने कायमच वाहतूक सुरक्षेच्या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येते. अतिशय चांगल्या पद्धतीने वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जागरूक करूनही शहरात हवा तितका बदल घडलेला दिसत नाही. जेव्हा शहरातील सर्व वाहनधारक वाहतुकीचे, पार्किंगचे सर्व नियम पाळतील तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होईल. त्यासाठी दंडात्मक कारवाई, जनजागृती मोहीम यांच्या जोडीला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन होण्याची आवश्यकता आहे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!