संकोच

By Mohana on from https://mohanaprabhudesai.blogspot.com

"तोच तोच विनोद तू मला का सांगतेस?" आईवर मी चिडले आणि दाणदाण पाय आपटीत माझ्या खोलीत आले. खोलीचं दार धाडकन बंद केलं."दार मोडेल. हळू आपट." घ्या, माझ्या रागापेक्षा आईला दाराची काळजी. पुन्हा एकदा दार उघडून जोरात आपटावं असं वाटलं मला; पण तसं केलं तर संपलंच. आईची बडबड जी चालू होईल ना ती थांबणं कठिण. मी पलंगावर अंग टाकलं आणि माझा राग हळूहळू शांत होत गेला. हो, आता मी चौदा वर्षांची आहे तर आई गेल्यावर्षीपासून तिच्या कामाच्या ठिकाणी पोनीटेलने केलेला विनोद सांगते दरवेळेस. कधी मला, कधी सर्वांना. इतकी लाज आणते ना. सगळे हसतातही तिच्या या विनोदावर. मूर्ख नुसते. आजही तेच म्हणाली,"पोनीटेल म्हणतो तसं तुला एका पिंपात घालायला पाहिजे आणि १९ वर्षांची झालीस की बाहेर काढू." हेच, दरवेळेस हेच. मग मी वर लिहिलंय ते म्हटलं आणि पुढे पुस्ती जोडली."त्यापेक्षा तुला पिंपात ठेवते आणि मी १९ वर्षांची झाले की बाहेर काढते." संपलं. खरं तर मी हे मनातच म्हणते नेहमी पण वर्षभर ऐकून एकदम आलंच तोंडून बाहेर. खरं सांगू? मला खो, खो हसायला येतंय आता म्हणजे मी कल्पना करतेय की आईला खरंच पिंपात टाकलं तर? एकवेळ मी राहीन पडून कितीही वर्ष पिंपात पण आई? छे, आतून पिंपाच्या झाकणावर बडवत बसेल, ’मला बाहेर काढा, काढा’ म्हणत. पिंपाला भोकं मात्र ठेवायला हवीत. श्वास घेता यायला हवा नं आणि भोकातून ठेव म्हणावं पूर्ण घरावर लक्ष. पण ते जाऊ दे. आमची खरी समस्या ही नाहीच. ही होती त्यावरची प्रतिक्रिया. मी हे असंच बोलते याला कारण आहे माझी आई. या पोनीटेलच्या सहवासाचा तिच्यावर परिणाम झालाय आणि तिच्यामुळे माझ्यावर.  आई पोनीटेलकडे काम करते.  तिथेच तिचा हा पोनीटेल काहीतरी पाचकळ विनोद करतो आणि आईला ते आवडतात. पोनीटेल हे त्याचं नाव नाही. तो पोनीटेल बांधतो म्हणून आई त्याला पोनीटेल म्हणते. माझ्या प्रत्येक प्रश्नावर, अडचणीवर आईकडे एकच उपाय, पिंपात टाकणे. जाऊ दे. पिंपाबद्दल खूप झालं.सरळच सांगायचं तर माझा बाबा ही आमची समस्या. नाही, नाही माझा बाबा मला छळत नाही, त्रास देत नाही. उगाच कान टवकारू नका. मला ठाऊक आहे तुम्ही वाचताय पण मला वाटतंय की मी तुम्हाला सांगतेय, तुमच्याशी बोलतेय म्हणून म्हटलं, कान टवकारू नका. हे असं होत चाललंय माझं. आईसारखं. आई मला म्हणते मी विषय भलतीकडे नेते पण मी तिच्याकडूनच हे शिकले आहे पटतच नाही तिला.  तर मुद्दा असा आहे की मला असं वाटतं, माझ्या बाबाचं माझ्यावर प्रेम नाही. कदाचित तुम्हालाही पुढे मी जे सांगणार आहे त्यावरून ते लगेच पटेल, खात्री होईल.माझ्या आईने बाबाशी लग्न केलं त्याला १० वर्ष झाली. चार वर्षांची होते मी. बाबाला त्याची आधीची दोन मुलं आहेत. मुलगे. आई त्यांना टोणगे म्हणते म्हणून मीही इथे आता त्यांना टोणगेच म्हणेन. माझ्या आईचं आणि बाबाचं, दोघांचीही ही दुसरी लग्न आहेत. पहिल्या जोडीदाराशी पटलं नाही म्हणून घटस्फोट घेऊन केलेली. माझे आई - बाबा का वेगळे झाले हे लहान असताना मला माहीत नव्हतं. दोन - दोन बाबा माझे लाड करतात याचा आनंद जास्त होता. तेच टोणग्यांचं. त्यांना दोन आया लाड करायला. एका गावात नसल्यामुळे दुसर्‍या बाबाशी कधीतरीच भेट व्हायची त्यामुळेही सर्व सुरळीत चाललं असावं किंवा आम्ही सर्वच लहान होतो त्यामुळे जाणही तितकीच. काय कारणं असतील ती असतील पण  मी मोठी होत असताना सगळं व्यवस्थित चालू होतं. कधीतरी वाढत्या वयाबरोबर वास्तव कळलं असेल. नातेवाईक आणि आजूबाजूची माणसं असतातच तुमच्या मनाचा तळ ढवळून काढायला असं आई म्हणते. काय असेल ते असेल पण गेल्या वर्षापासून मला जाणवायला लागलं की बाबा पूर्वीसारखा नाही वागत माझ्याशी. फक्त माझ्याशीच.  टोणग्यांशी त्याचं वागणं मला जास्त प्रेमाचं, जवळीक साधणारं वाटतं. आईला सांगावंसं वाटत होतं पण मी ते टोणग्यांनाच ऐकवलं. दोन्ही टोणगे माझ्यापेक्षा मोठे आहेत. दोन आणि तीन वर्षांनी. त्यांनी शांतपणे ऐकलं. एक टोणगा म्हणाला,"तुझ्या मनाचे खेळ आहेत. उगाच काहीतरी डोक्यात भरवून घेतेस स्वत:च्या आणि आमच्या डोक्याला त्रास देतेस." दुसरा टोणगा म्हणाला,"असेल. तसंही ते तुझे बाबा नाहीतच ना?" मला एकदम रडायलाच यायला लागलं. हेच असेल का खरं कारण? आतून कळलेलं का मला म्हणून इतक्या पटकन रडायला आलं? मला आता माझ्या स्वत:च्या बाबाकडे जावं असं वाटायला लागलं. आतापर्यंत खरंच असं कधी वाटलं नव्हतं पण जर माझ्या  बाबाला मी त्याची रक्ताची मुलगी  नाही म्हणून प्रेम वाटत नसेल तर कशाला राहायचं मी इथे? फक्त आई हवी म्हणून? तो विचार तिने करावा. हा तिढा ती सोडवू शकत नसेल तर तिच्यासाठी माझी किंमत तितकीच असा अर्थ मी काढलाय. मी रडता रडता विचार करत होते त्या वेळात टोणगे एकमेकांशी भांडायला लागले. ते तुझे बाबा नाहीतच असं एका टोणग्याने म्हणणं हे दुसर्‍या टोणग्याला क्रूरतेची परिसीमा असं काहीतरी असतं ना तसं वाटलं त्यामुळे त्यांची चांगलीच जुंपली. मी रडायचं विसरून त्यांच्या भांडणात सामील होणार तितक्यात आई डोकावलीच."काय चाललंय?" तिला आम्ही तिघं एकत्र असलो की भांडतो असंच वाटतं. भांडण सोडवताना ती आमच्या अंगावर  खेकसून सुरुवात करते,"काय चाललंय?" तिने पुन्हा खेकसून विचारलं."ती रडतेय." दोघांमधलं कुणीतरी पुटपुटलं."ते दिसतंय मला. कुणामुळे रडतेय असं विचारतेय मी." कुणीच काही बोललं नाही. मला मजा बघायची होती पण माझ्या रडण्यामुळे टोणग्यांना बोलणी खावी लागणार असतील तर जाणं भाग होतं. मी रडत-रडत माझ्या खोलीत जाऊन बसले. मग वाटायला लागलं, माझी आई वागते का टोणग्यांशी चांगलं? त्यांना काय वाटत असेल? त्यांना जावंसं वाटत असेल का त्यांच्या आईकडे कायमचं? डोकं भणभणायला लागलं. या घरातून पळून जावं असंही मनात यायला लागलं. पण कुठे जाऊ? कसं जायचं? नुसतंच पळायचं की गरजेपुरतं सामान घ्यायचं बरोबर? रस्त्यावर राहिले तर सुरुवातीला लागेल इतकं? कोण देईल अधिक माहिती? एकही पळून गेलेली मैत्रीण किंवा मित्र आठवेना. काय करू खरंच? शेवटी एका मैत्रिणीलाच सांगितलं. तिला सांगायला थोडीशी भिती वाटत होती. तिने तिच्या आईला सांगितलं तर माझ्या आईला सांगणारच ना ती. पितळ उघडं पडेल लगेच. मैत्रीण म्हणाली,"तू तुझ्या बाबांशीच बोल ना नाहीतर आधी आईशी बोल.""नाही बोलायचं मला त्या दोघांशी या विषयावर." मैत्रीण माझ्यासारखीच आहे ती तटकन म्हणाली,"मग जा पळून.""कुठे जाऊ त्याचं उत्तर दे. तू येतेस माझ्याबरोबर? मजा येईल. नाहीतर पळायला मदत तरी कर.""मूर्ख आहेस. तुझ्या भावाचं बरोबर आहे. काहीतरी डोक्यात भरवून घेतेस. ते काढ. वेगळा चष्मा घाल डोळ्यावर.""आणि काय करू?""अगं जसा आपला दृष्टिकोन तसं समोरचं दिसतं असं तुझ्याच आईकडून ऐकलंय मी खूपदा.""ते काय लक्षात ठेवतेस तू? पोनीटेलकडे काम करता करता ती पोनीटेलचे सल्ले आणि विचार स्वत:च्या नावावर खपवते." तिला उडवून लावलं मी पण नंतर खरंच मी बदलायला हवं का असं वाटायला लागलं. पण म्हणजे मी नक्की करायचं काय? बदल मला झेपेल? मुळात बाबा सांगतो ते मी करते, त्याच्याशी उगाच वाद घालत नाही; हे मी का सांगतेय कारण आईला वाटतं मी वाद घालण्यात फार पटाईत आहे. सत्य असं आहे की मी वाद घालायला सुरुवात करते ते त्यांच्यामुळेच. कोणत्याही विषयावरची या दोघांची मतं ऐकली की धक्काच बसतो मला. या मोठ्या लोकांची विचित्र मतं फारच विचित्र आहेत. मागासलेले नुसते. असा कसा विचार करतात? अविश्वसनीय. त्यांची मतं, म्हणणं सगळंच चुकीचं असल्यामुळे खोडून काढणं भाग असतं.  मी मतं खोडून काढायला सुरुवात केली की आई थांबवते. तेवढं सोडलं तर मी नीट वागते, शाळेत काय झालं ते सांगते, त्याच्या कामातही मदत करते लहर आली की. तोही ऐकतो सगळं, करतोही सारं माझ्यासाठी पण ’आय लव्ह यू’ म्हटलं की जबरदस्ती ’आय लव्ह यू टू’ म्हणतो. कधीकधी तर उत्तर न देताच निघून जातो. हे फक्त माझ्याशी. आईशी आणि टोणग्यांशी त्याचं वागणं नेहमीसारखंच आहे. एकदा न राहवून मी विचारलंच त्याला,"बाबा, मी आवडत नाही का तुला?""आवडतेस." फोनमधली मान वरदेखील काढली नाही त्याने. ’आम्ही हेच केलेलं चालत नाही तुम्हाला’ असं पुटपुटत मी टक लावून त्याच्याकडे बघत राहिले. त्याची मान वर झाली नाही."आम्हाला व्याख्यान ऐकवता फोनमध्ये डोकं खुपसलं की." मी जोरात म्हटलं. तो वैतागला."बोल." कपाळावर आठ्या घालत त्याने माझ्याकडे पाहिलं.’स्वत:च्या टोणग्यांकडे बघतोस का असा कधी? सारखं ’आय लव्ह यू चालू असतं.’ मी मनातल्या मनात धुमसत होते. प्रत्यक्षात गप्प राहिले. निघूनच गेले तिथून. जाताना तो किती वाईट आहे याची उजळणी केली मनात. मला माझा बाबा माझ्यावर प्रेम करत नाही हे लक्षात आल्यापासून त्याच्या सगळ्या वाईट सवयी अगदी प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. उठसूठ ढेकर देत असतो, एकदा शिंकायला लागला की झालं; थांबतच नाही. लहान असताना आम्ही सगळे मोजायचो शिंका. आता दिलं सोडून. कळकट बनियन आणि चिटुकली चड्डी आणि पादणं...शी, शी, शी काय सांगतेय मी हे. माझ्या वयाला शोभत नाही पण इतकी चिडलेय मी की हे सगळं जगाला ओरडून सांगायची माझी तयारी आहे. मला माझा बाबा ’कूल’ पाहिजे पण त्याला काय फरक पडतोय. मुळात तो मला त्याची मुलगी समजतच नाही त्यामुळे कशाला माझ्यासाठी तो त्याच्या सवयी बदलेल? आता काहीतरी करायला हवं. आहे हे स्वीकायरायचं इतकंच उरलंय की काय माझ्या हातात? का सापडेल मला मार्ग?"मला माझ्या बाबाकडे जायचं आहे कायमचं राहायला." मी आईसमोर जाऊन उभीच राहिले. मला वाटलं आता स्फोट होईल. तसं झालं नाही. चला, म्हणजे आईसुद्धा बाबाला सामील. ही ब्याद कधी टळते असं हिलाही वाटतंय की काय? माझे डोळे भरून आले. आई शांतपणे म्हणाली,"तू तुझ्या बाबाकडेच आहेस. खूळ काढून टाक हे डोक्यातून.""खूळ? मला हे सांगतेस तसं बाबाशी बोललीस का?""बोलले.""मग?""मग काय? त्याला नाही वाटत तसं.""त्याने ते मला सांगायचं ना? दुसरं म्हणजे तोंडाने बोलून काय उपयोग, वागण्यात दिसायला हवं.""तू विचार हे त्याला. नाहीतर असं करू आपण सगळे बसू आणि बोलू. हल्लीच घेतलं आहेस तू हे काहीतरी तुझ्या मनात.""आधी कळलं नव्हतं. उशिरा आलं लक्षात.""असं कसं अचानक बदलेल? तुझा दृष्टीकोन बदललाय. बाबाच्या प्रत्येक कृतीत तू अर्थ शोधायला सुरुवात केली आहेस हल्ली.""टोणग्यांवर तू तरी करतेस का प्रेम? ती तुझी थोडीच आहेत." मी अगदी तिच्या मर्मावर बोट ठेवलं. माझंच चुकलं म्हणत राहते. आता कर विचार माझ्या प्रश्नावर."बास हं. अती झालं हे." त्या दोघांना टोणगे म्हणण्याचा अधिकार तिचाच असल्यासारखं आई चिडली आणि नेहमी बोलते तसं तेच तेच परत बोलत राहिली. आईला उसकवलं म्हणून मला बरंच वाटलं. घरातल्या सर्वांना असाच त्रास द्यायचं मी ठरवलंय. तिची ’टेप’ थांबल्यावर मी म्हटलं,"टोणग्यांवर तू प्रेम करतेस का हा प्रश्न चिडण्यासारखा नाही तर स्वत:च्या मनात डोकावून पाहायला हवं असं वाटण्यासारखा आहे. माझ्या मनात हे खूळ आलंय तसं त्यांच्या मनातही येऊ शकतं ना?""येऊ शकतं पण मला नाही वाटत ती दोघं तुझ्याइतकी चक्रम आहेत." आईने संभाषण थांबवलंच.आमच्या घरातलं वातावरण माझ्या या खुळामुळे बदललं असं प्रत्येकालाच वाटतंय. आई तर हवालदिल झाली. इतकी वर्ष त्या दोघांनी एकमेकांची मुलं आपली मानली, भेदभाव केला नाही आणि आता हे काय भलतंच? असं तिला वाटत होतं. बाबा तर घरातच टिकेनासा झाला. माझ्याशी बोलायचीही त्याची तयारी नव्हती. मी प्रयत्न केला तेव्हादेखील तेच उत्तर."तुझ्या मनातल्या खेळांना मी काही करू शकत नाही. चार वर्षांची होतीस तू या घरात आलीस तेव्हा. त्या क्षणापासून मी तुला माझीच मुलगी समजतो. आता ते सारखं कसं दाखवून द्यायचं मला ठाऊक नाही आणि इच्छाही नाही." तो हुप्प होऊन माझ्याकडे बघत राहिला. मला वाटलं त्याचे गाल ओढावे आणि कुशीत शिरावं पण माझ्या भावनांना खूळ म्हणणार्‍या लोकांचा मला आता प्रचंड राग यायला लागलाय. बाबाच काय, कुणीच माझ्यावर प्रेम करत नाही असं  वाटतंय. मला आता या विषयावर कुणाशीही बोलायचंच नाही. तशी आता किती वर्ष राहिली आहेत या घरातून बाहेर पडायची. शिक्षण संपलं की यांचा संबंध संपला. माझी मी कमावेन आणि खाईन पण या माणसांचं तोंड पुन्हा बघायचं नाही. मनातल्या मनात मी दृढनिश्चय केला तेवढ्यात आई आली. नको तेव्हा ती टपकतेच नेहमी."चल. लगेच निघायचं आहे.""कुठे?""तू चल तर खरी." आईने जवळजवळ मला फरफटतच घराबाहेर काढलं. काय करणार आहे ही माझं? एकदा एखाद्याचं प्रेम उडालं की माणूस कुठल्याही थराला जातो...!"तुझी आई मला तुझ्याबद्दल रोज सांगते." आईने मला पोनीटेलसमोर आदळलं. मी रागाचा कटाक्ष आईकडे टाकून निर्विकारपणे पोनीटेलकडे पाहत राहिले."ऐकलंस का?" त्याने मृदू स्वरात विचारलं."ऐकलं. तुमच्याबद्दलपण ती आम्हाला रोज सांगते." कुसकटपणे मी म्हटलं."अरे वा. चांगलंच बोलते ना?" मी उगाचच द्विअर्थी मान हलवली, त्याला त्याचा काहीच फरक पडला नाही."पिंपाचा विनोद सांगते. पाठ झालाय आमचा." मी तसं रागानेच म्हटलं हे पण ते दोघं आयुष्यात पिंपाचा विनोद पहिल्यांदा ऐकल्यासारखे हसले. मी ढिम्म. अखेर पोनीटेल म्हणाला,"हे बघ. मला सगळं ठाऊक आहे त्यामुळे आधी उपाय काय ते सांगतो मग तू तुझं म्हणणं सांग. उलट्या पायर्‍या चढू." मी काहीच बोलले नाही तसं त्याने उलट्या पायर्‍या चढायला सुरुवात केली."तू आता किती वर्षांची झालीस?""चौदा." गुरकावल्यासारखं मी उत्तर दिलं."तुझी पाळी कधी सुरू झाली?" मी आईकडे डोळे मोठे करून पाहिलं. माझ्या पाळीशी माझ्या समस्येचा काय संबंध? आई शांत होती म्हणून नाईलाजाने उत्तर दिलं."गेल्यावर्षीपासून.""म्हणजेच तुझ्या शरीरात बदल होत चालले आहेत. यौवनावस्था म्हणतात याला.""शिकलेय शाळेत." हेच ऐकायला आले की काय इथे? म्हणजे माझ्या वागण्याला मीच जबाबदार. चिडणं, आक्रस्ताळेपणा, निराशा असं काय काय होतं म्हणे या वयात त्यामुळे या बदलाशी जुळवून घेताना काही प्रश्न निर्माण होऊ शकतात असं शाळेत शिकलेलं भलंथोरलं वाक्य पाठ झालंय. हे इतकं सगळं सांगण्याऐवजी दोन शब्दांत मी उत्तर दिलं."तू शिकली आहेस पण तुझा बाबा नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय त्याला तू जबाबदार नाहीस. तुझ्या आईला वाटतंय तसं हे खूळ नाही." पोनीटेल काय म्हणतोय ते कळलंच नाही मला क्षणभर. प्रकाश पडला तसं मला खुर्चीतल्या खुर्चीत टुणकन उडी मारावीशी वाटली. उडी मारली नाही पण माझा चेहरा खुलला."बाबाचं प्रेम नाही हे बरोबर आहे ना?""नाही. ते साफ चुकीचं आहे पण तुझे बाबा तुझ्याशी जे वागतायत ना त्याचं कारण तुझं वय आहे.""अं?" पोनीटेल सल्लागार आहे हे ठीक पण इतकं गहन कशाला बोलायचं? माझ्या चेहर्‍यावरचे भाव वाचत तो म्हणाला,"तुझ्या बाबाला तुझ्या शरीरातल्या होणार्‍या बदलामुळे थोडंसं अवघडलेपण आलंय. त्याचं तुझं रक्ताचं नातं नाही हेही कारण असेल पण तेच एक कारण असेल असं म्हणता येणार नाही. सख्ख्या नात्यातही हे होतं. नकळत होतं. मला खात्री आहे तुझ्या बाबाला स्वत:लाही हे कळलेलं नसेल.""खरंच? म्हणून तो चार हात दूर राहत असेल माझ्यापासून? तुम्ही त्याला सांगाल समजावून?" मला आत्ता याक्षणी बाबाला इथे आणावं असं वाटत होतं."ते येणार नाहीत कारण ते तुझ्यावर प्रेम करतात यावर ते ठाम आहेत. ही समस्या नसून हे तुझ्या डोक्याने घेतलेलं खूळ आहेत हेच त्यांच्या मनाने घेतलंय.""मी जाते लगेच घरी. तुम्ही जे सांगितलंत ते सांगेत." मी उतावीळ झाले."नको. लगेच नको. आधी मी सांगतो ते अमलात आणू. नंतर हा बदल तुझे बाबा कसा स्वीकारतात ते पाहा. एकदा का तुझं मन शांत झालं की जे आपण बोललो ते सांग तुझ्या बाबांना. चालेल?" पहिल्यांदाच मला पोनीटेलने स्वत:च्या तोंडून पिंपाचा विनोद पुन्हा सांगितला तरी चालेल असं वाटलं. मी आनंदाने पोनीटेल सांगेल ते करायचं ठरवलं. येताजाता बाबाला, ’आय लव्ह यू’ स्वत:हून पुढाकार घेऊन  म्हणायचं अगदी लगेच ठरवलं. माझी तक्रार तीच होती ना की तो कधीही स्वत:हून हे म्हणत नाही. यापुढे मी ’आय लव्ह यू’ म्हणून थांबणार नाही, त्यालाही उलट म्हणायला लावेन. पोनीटेल म्हणाला, ’पुरुषांना भावना  व्यक्त करणं जमत नाही. ते तुमच्यासाठी सतत काही ना काही करत राहतात. तेच त्याचं प्रेम असतं. ते एकदा ओळखता आलं की झालं.’  मला ते पटलं. आतापर्यंत त्याने माझे सगळे लाड पुरवले. मला शाळेत तोच सोडतो, अभ्यास घेतो, माझं जगाबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून माहिती देतो, पुस्तकं भेट देतो...अशा अनेक गोष्टी करतो. आता फक्त त्याला प्रेम बोलून दाखवायला शिकवायचं होतं. आता तुम्ही म्हणाल, तुझ्या बाबांचं प्रेम आहे हे कळलं हे खूप नाही का? खरं आहे पण मला आवडतं प्रेम व्यक्त केलेलं, शब्दांनी व्यक्त केलेलं प्रेम! मुलीचा इतका हट्ट बाबाने पुरवला तर बिघडतं कुठे? मी मोठी होतेय, माझ्या शरीरात बदल होतायत यामुळे त्याच्या नकळत तो माझ्यापासून दूर जात असेल तर पोनीटेलने सांगितलेलं काम अगदी सोपं होतं.  माझ्या मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला. कधी नव्हे ती आई मला आवडली आणि पोनीटेलही. पोनीटेलचा निरोप घेऊन मी आईसह घरी निघाले. घरी गेले की मी बाबाला घट्ट मिठी मारणार आहे. हो, हो. पोनीटेलने हळूहळू पावलं टाकायला सांगितली आहेत ते आहे लक्षात. बाबा नक्कीच अवघडून जाईल माझ्या मिठीमुळे पण मला आता कारण कळलंय ना त्यामुळे मला राग न येता हसायलाच येईल. तो चिडेल पण होईल सवय  आणि जाईल त्याचं अवघडलेपण.  माझ्या नजरेसमोर दिसतंय मला  दृष्य. आता मी अगदी उतावीळ आहे झाले आहे. एका नविन बदलासाठी माझ्या बाबाला तयार करायला. नव्याने आमचं नातं रुजवायला!माझा मराठीचा बोल (मामबो) दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रसिद्ध.दुवा - https://www.mambodiwali.com/
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!