शंकर मामा.........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

तो खरंतर माझ्या आईच्या मैत्रिणीच्या भावाचा मित्र होता. कराडला असताना कॉलेजमध्ये सगळे एकत्र होते, ओळखीने ओळख वाढून तो माझ्या आईच्या ग्रुपमध्ये आला. तिथून मग आमच्या घरात. त्यावेळी मुलामुलींचे मित्र- मैत्रिणी हे अगदी घरातल्यासारखेच असायचे. मग आईचा मित्र म्हणून दोन्ही मामांचा, मावशीचा सगळ्यांचाच मित्र झाला. आमच्या घरातलाच झाला अगदी तो. त्यावेळी आजोबा कराडला पोस्टमास्तर होते. त्यांच्या बदल्या, ह्या गावाहून त्या गावी सारख्या होतच असायच्या. पण जिथे जिथे आजोबांच्या बदल्या झाल्या, त्या लोकांशी कायमचा ऋणानुबंध जोडला गेला. सतत एकमेकांच्या संपर्कात असायचे सारेजण. तेव्हा कुठलेच फोन कुणाकडे नव्हते. पण पोस्टकार्ड लोकांना जोडून ठेवायचं काम चोख बजावायचं. आणि महिन्या दोन महिन्यात भेटही ठरलेलीच असायची. काहीही न कळवता डायरेक्ट, मनात आलं; आणि भेटायला निघालं असा मामला होता सारा. कधी ते यायचे, कधी आमची मंडळी जायची. हे अगदी आजी-आजोबा चालते फिरते असेपर्यंत असंच होतं. बदलीच्या सगळ्या गावातली गोतावळी संपर्कात होती. आता तेवढी संपर्कात नसली तरी आठवणीत मात्र नक्कीच आहेत.त्याच गोतावळ्यातला माझ्या कायम लक्षात राहिलेला हा, आम्ही मुलं त्याला शंकर मामा म्हणायचो.आजोबांच्या बदल्या होत होत त्यांचं कुटुंब नंतर कायमसाठीच साताऱ्याला स्थायिक झालं. पुढे सगळ्या मुलांची लग्न झाली. माझी आई आणि एक मामा मुंबईला, मावशी कोकणात, दुसरा मामा तेवढा साताऱ्याला होता.पण तरीही एकदा जोडलेली नाती तुटली नव्हती. सगळ्या मुलामुलींचे मित्र मैत्रिणी, त्यांचे आईवडील आवर्जून साताऱ्याला आजी-आजोबांना भेटायला यायचेच. मैत्री पूर्ण घरदाराचीच जुळलेली असायची.तसाच हा शंकर मामा देखील वरचेवर कराडवरून भेटायला यायचा. आम्हीही कधीतरी जायचो सर्व मिळून त्याच्याकडे कराडला. तेव्हा मी साताऱ्यालाच राहायचे, आजी-आजोबांकडे.शंकर मामा लक्षात राहायचं कारणही तसंच होतं.एकतर तो अतिशय जाडजुड होता. गोल गरगरीत चेहरा, टम्म फुगलेले गाल, खरंतर सगळच फुगलेलं होतं. मी बाहेर खेळत असले तर, लांबूनच हलत डुलत येताना दिसायचा. 'मुझको भी तो लिफ्ट करा दे' गाण्यातला अदनान सामी आठवतो का? तसाच होता हा शंकर मामा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); त्याला बघून मला, माझ्या भावंडाना भारी गंमत वाटायची.मला तो आवडायचा कारण तो आमच्यासाठी मोठा ग्लुकोज बिस्किटाचा पुडा घेऊन यायचा. आणि जाताना म्हणायचा, चल त्या कोपऱ्यापर्यंत, तुला चॉकलेट घेऊन देतो. आणि प्रत्येकवेळी तो मला दुकानात नेऊन माझ्यासाठी आणि माझ्या भावंडांसाठी पाहिजे ते चॉकलेट, गोळी घेऊन द्यायचाच. ते मला खूपच आवडायचं. असं घरी आलेलं दुसरं कोणीच करायचं नाही. आणि त्यावेळी चॉकलेट, गोळ्या पण सारख्या मिळायच्या नाहीत. मी त्याचा हात धरून दुकानात जाताना माझ्या मैत्रिणी आम्हाला बघून हसायच्याच. त्यांना शंकरमामाला बघून हसू फुटायचं. इतका जाडा माणूस सहजी पाहायला मिळायचा नाही ना? तसं त्याला बघणाऱ्या प्रत्येकालाच हसायला यायचं. एकदा पहाणारा वळून दुसऱ्यांदा पहायचाच त्याच्याकडे.दुकानातून मी घरी यायचे, तो तसाच पुढे जायचा, मग मैत्रिणी मला खास थांबवून विचारायच्याच, कोण होते ग ते?मी अभिमानाने सांगायचे 'माझा मामा' होता तो.दिसायला जरी लठ्ठ होता, तरी मनाने अतिशय चांगला होता शंकर मामा. मला तर खूप साधाच वाटायचा. कारण मी त्याला रागवताना पाहिलंच नाही कधी.आमच्या घरी तर अगदी जवळच्यासारखंच होतं त्याचं वागणं. आजी-आजोबा, मामा सगळेच त्याला शंकऱ्या म्हणायचे. सगळ्यांच्या मनात त्याच्यासाठी ओलावा होता. हातचं काही न राखता मनमोकळं बोलायचा तो नेहमी. म्हणूनच त्याच्या जाडजुडपणाबरोबर त्याचा मृदू आणि गप्पीष्ट स्वभावही माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय. आपल्या घरचं सारंकही सांगायचा अगदी आपलेपणाने तो. त्याच्याही वाट्याला इतरांसारखी दुःख होतीच. पण चेहऱ्यावर नेहमीच शांत भाव आणि हास्य असंच बघितलं मी कायम त्याला. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  तो मला घरातल्या लग्न किंवा आणखी कुठल्याही कार्याला, आलेला आठवत नाहीये. पण सहज म्हणून जुन्या माणसांची विचारपूस करायला नातेसंबंध जपायला, अडचणीच्या, दुःखाच्या वेळी मात्र हमखास आलेलं पाहिलय मी त्याला. त्याला शेवटची भेटले तेव्हा मी आईकडे ठाण्याला राहायला आले होते. कॉलेजला होते. तो कुठल्या कामानिमित्त मुंबईला आला होता म्हणून खास आमचा बदललेला पत्ता, मामाकडून मागून घेऊन आमचं घर शोधत आला होता. मुंंबईला जायचं म्हणून पत्त्यासाठी त्याने साताऱ्याची फेरी आधी केली होती. त्यावेळी मोबाईल आलेले, पण सरसकट सगळ्यांकडे नव्हते. ना आमच्याकडे होता ना त्याच्याकडे. पण तरी तो खास मुद्दाम वाकडी वाट करून पत्ता शोधत, आम्ही घरी भेटू की नाही काही माहिती नसताना, त्याच्या जुन्या मैत्रिणीला भेटायला आला होता. मला त्या वयातही त्याचं ते वागणं खूप आवडलेलं.माझ्यासाठी बिस्किटपुडा होताच हातात.आई आणि तो दोघांनीही पन्नाशी पार केलेली. तरी आपला सवंगडी भेटल्यावर उफाळून येणारा खटयाळपणा त्यांच्या डोळ्यांत दिसलाच मला. सूऱ्या आक्की, संज्या, लिली ही माझ्याच मामा मावशींची नावं!! पण त्याच्या तोंडून अशी शॉर्टफार्म मध्ये खूप दिवसांनी ऐकताना फार भारी वाटलेलं मला. भरपूर गप्पा मारून तो निघाला. पण निघताना तेव्हा सुद्धा मला म्हणलाच,चल की मला कोपऱ्यापर्यंत सोडायला, तुला चॉकलेट घेऊन देतो. मी मनात म्हटलं, अय्या हा अजूनही अगदी तसाच आहे!!लहाणपणाची ती चॉकलेटची क्रेझ गेलेली माझी, पण मला त्याचं ते तसंच असणं खूप खूप जास्त आवडलेलं. मी आनंदाने गेले त्याला कोपऱ्यापर्यंत सोडायला. मधेच मला थोडा हळवा होऊन म्हणाला, आईची काळजी घे आता. आम्ही सगळे खूप कष्टातून वर आलोय. मला ते ही आवडलं.दुकानात गेल्यावर तो मला चॉकलेटच्या ऐवजी कॅडबरी घेऊन देत होता, पण मी मुद्दाम त्याच्याकडून चॉकलेटच घेतलं. त्याला निरोप देऊन मी ते अगदी थोडा थोडा तुकडा तोडून चवीचवीने खात बसले होते. मला तर कधी ते चॉकलेट संपूच नये वाटत होतं, माझं लहानपण होतं त्यात, शंकर मामाचं साधेपण होतं त्यात.........खरंच सांगते, एवढ्या अवीट गोडीचं चॉकलेट त्यानंतर मला आजपर्यंत कधीच खायला नाही मिळालं .......!!मी कथेत नाव बदललं नाहीये मामाचं, आतापर्यंत पहिल्यांदाच हे असं झालंय की मी ज्याची कथा त्याच्याच नावाने लिहिलीये. मी खूप नावं लावून पाहिली त्याला, पण मला तो दुसऱ्या कुठल्याच नावात आपला नाही वाटला. मला तो जसा दिसलाय, भावलाय, अगदी तसाच मी त्याला तुमच्यासमोर मांडलाय.......... ©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!