वशा सुतार

वशा सुतार

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

गेल्या काही दिवसापासून मी प्रचंड अस्वस्थ आहे. कशातच लक्ष लागत नाही. आता तुम्ही म्हणाल नक्की कधीपासून. तर वशा सुतारानं गळ्याला फास लावल्यापासून. आता परत तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या लोखसंख्येच्या देशात कोण ह्यो वशा सुतार? आणि त्याच्या मरणाचं कौतुक ते काय?  पण तुम्ही काहीही म्हणा. कारण...एकेकाळी सुतार, न्हावी, चांभार, कुंभार, मातंग, लोहार, सोनार, गुरव असे अनेक बलुतेदार कृषीसंस्कृतीचा एक भाग होते. त्यांनी गावाची सेवा करायची. त्या बदल्यात पसामूठ धान्य त्यांना मिळायचे यावरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण. काळाच्या ओघात बलुतेदारी संपली. कृषीजनांच्या संस्कृतीत हे घडणं स्वाभाविकच होतं. ती तशीच टिकून रहावी याचं समर्थन आता कोणीच करणार नाही. बैलगाड्या, हातगाड्या, वाड्यांचे लाकडी खांब, तुळया, चौकटी, दारे, लाकडी घाणे, मेणे, पालख्या, शेतीसाठीची औजारे अशी अनेक कामे सुताराला करावी लागत. पण काळ बदलला. बदलाचे वारे खेड्यापाड्यावरून घोंगावू लागले. घरोघरी नवीन तंत्रज्ञान घुसू लागले. बलुतेदारीच्या जीवावर चालणारी कित्येक खेडी तंत्रज्ञानाच्या रस्त्यावरून सुसाट धावू लागली. लाकडी कुळव, कुऱ्या, बैलगाड्या, कोळपणीची अवजारे बनवणाऱ्या सुतारांच्या हातातली "तासनी" थांबली. सगळीकडे आधुनिक लोखंडी अवजारे दिसू लागली. गावकीच्या व्यवसायावर जगणाऱ्या हातांना काम मिळायचे बंद झाले. वशा सुतारासारखे कित्येक कारागीर उपाशी पडू लागले. ज्यांची बाराखडीशी ओळख होती त्यांनी गाव सोडलं. शहरात जाऊन फर्निचरच्या दुकानात काम धंदा शोधू लागले. चार दोन रुपये गावाकडे पाठवून आपली पोरंबाळ शाळा शिकवू लागले. पण ज्यांची बाराखडीशी ओळख कधी उभ्या जन्मात नव्हती त्यांचं काय झालं? तर काहीजण खेड्यातच पुन्हा छोटी मोठी कामे शोधू लागले.त्यातीलच एक वशा सुतार. वशा गावचा बैत्याचा सुतार. बलुतेदारीवर मिळणाऱ्या पसामूठ धान्यासाठी त्याच्या कितीतरी पिढ्या खपलेल्या. त्याचं तेच जगण्याचं साधन. पण काळाच्या ओघात गावकीच्या तुकड्यावर भागेना. पोटाचे प्रचंड हाल. मग लाकडी अवजारे बनविण्याचं साहित्य पाठीवर टाकून खेडोपाडी उन्हातान्हात कामं हुडकत गावोगावी फिरत राहिला. मिळतील त्या पैशावर लोकांची काम करू लागला. वेळप्रसंगी रोजंदारीवर राबू लागला. आपल्या कित्येक पिढ्या यात खपल्या. निदान पोराबाळाचं आयुष्य सार्थकी लागावं. त्यांनी शिक्षण घेऊन शहरात नोकरी धरावी. यासाठी चार रुपये बाजूला काढू लागला. दरम्यानच्या काळात खेड्यापाड्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरू लागले. गावोगावी सहकारी पतसंस्था उगवू लागल्या. बँकांची दारे उघडू लागली. यात लोकं आर्थिक व्यवहार करू लागले. सावकारदारीला हादरे बसले. त्यात अडकलेल्या लोकांची सुटका झाली. लोकांचा पतपेढ्यावर विश्वास बसू लागला. महिन्याकाठी गावोगावी फिरून मिळणाऱ्या उत्पनातील काही हिस्सा वशा सुतार पतपेढीत साठवू लागला.काळ पुढे धावत राहिला. पोरंबाळ मोठी होत गेली. काळासोबत वशा सुतारही थकत गेला. पोरं शिकली. लग्नाला आली. तरी त्यांच्या हाताला काम मिळना. पोरगीच्या लग्नाला स्थळ येऊ लागली. पतपेढीतले पैस दामदुप्पट झाले असतील या भाबड्या आशेवर तो अजून तग धरून होता. पण घडलं भलतंच. पुढाऱ्यानी खेडोपाडी उभ्या केलेल्या या सहकारी संस्था बुडू लागल्या. भ्रष्टाचाराचा मोठा पूर खेड्यावरुन वाहू लागला. संचालकांनी स्वतःचे कर्जदार नातेवाईक मालामाल केले. स्थानिक दैनिकांचे मथळे भरू लागले. वार्ताहराना सुगीचे दिवस आले. “असा केला भ्रष्टाचार” “अशी वाटली बोगस कर्जे”. कित्येक दिवस बातम्या झळकत राहिल्या. कित्येक वशा सुतरासारख्याचे पैसे या संस्थात बुडाले. वशा सुताराने याचा धसका घेतला. उरलेलं आयुष्य  अंथरुणावर पडून राहिला. शरीराने खंगत गेला. मनाने मुका होत गेला. गावकीशी कायमचं नातं  तोडलं. साऱ्या संसाराचाच विस्कुट झाला. एक ना शेकडो जणांचे पैसे बुडाले. ते कधीतरी मिळतील या आशेवर पुढे वशा किती तरी वर्षे तग धरून राहिला. त्याच्या सारखे इतर अनेकजण पतपेढ्यांचे उंबरे झिजवत राहिले. पण कुलपे निघालीच नाहीत. अखेर वशा सुताराने गळ्याला कासरा लावल्याची बातमी गावोगावी झळकली.आज अशी अनेक बंद पडलेली पतसंस्थांची कार्यालये खेडोपाडी तुम्हाला दिसतील. त्या बंद कुलपांच्या आत असलेल्या रजिस्टरावर कित्येक वशा सुतारांच्या जळून गेलेल्या उपाशी आतड्यांची राख पसरलेली दिसेल. सहकारी संस्थांचे जाळे उभे करून लुबाडणारे छोटे मोठे लिंबू टिंबू पुढारी आता चार चाकी गाड्या हवेत उडविताना तुम्हाला दिसतील. पतपेढ्या ओरबाडून अंगावर चढवलेल्या त्यांच्याच मणभर दागिन्यांना आता प्रतिष्ठेचं वलय प्राप्त झालंय. बऱ्याच जणांनी आता “साहेब” “राजे” ही पदवी गावोगावी प्राप्त केलीय. उरलेले उपटसुंभ आमदार खासदारांच्या सोबत वावरताना दिसतात. पण वशा सुतारासारख्या कित्येक गरीब बलुतेदारांच्या संसाराची राखरांगोळी झाली त्याचं काय? पान भरून रोज 'मी लाभार्थी" च्या जाहिराती दाखवणाऱ्या इथल्या कित्येक सरकारांना वशा सुतारासारख्यांना लाभार्थी का बनवता आलं नसेल? किमान अशा कित्येक कारागिरांच्या कौशल्याचा उपयोग करून त्यांच्या हातांला नव्या संधी देण्याचं कामसुद्धा इथल्या राजकीय व्यवस्थाना कधीच का जमलं नसावं? कित्येक उद्ध्वस्त झालेल्या कुटूंबांचं काय? पाणी पिऊन उपाशी झोपलेल्या त्यांच्या चिमुकल्या पोरांचं काय? आणि यातून निर्माण झालेल्या भविष्यकालीन जीवघेण्या प्रश्नाचं काय?... ...शेवटी अशा अडाणी वशा सुतारासाठी काळ थांबणार तरी किती? त्याला त्याचा म्हणून वेग असणारच कि? आहो आता सगळंच अश्यक्य! कारण जागतिकीकरणानं आपण गतिमान झालोय ना?  मग लोकशाहीत हे सारं चालायचंच... नाही का???#ज्ञानदेवपोळफोटो प्रातिनिधिक, सौजन्य: नितीन 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!