रेड लाईट डायरीज - लता, नट्टीबाई, गुरुदत्त आणि प्यासा ...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

सोबतच्या फोटोत दिसणारी लता आहे. सात महिन्याची गर्भवती आहे, तरीही बाजारात उभी आहे. या अवस्थेत असताना तिच्याकडे येणार्‍या गिऱ्हाईकात सगळे आंबटशौकीन भरलेले असत. गर्भवती बाईसोबतची 'मजा' कशी असते याचा अधाशी हव्यास असणारे लोक तिच्याकडे येत. पन्नास ते पंधरा असा त्यांच्या वयाचा लंबक होता. असो..     लताच्या फोटोचा आणि गुरुदत्तच्या 'प्यासा'चा घनिष्ट संबंध आहे. लताला पाहिल्याबरोबर गुरुदत्तचा 'प्यासा'मधला तो सीन आठवला होता कारण लता सात महिन्याची गरोदर असूनही चमडीबाजारमध्ये रात्रीच्या अंधारास आपल्या उरावर घेण्यासाठी नटून थटून तयार व्हायची. शक्य झालं असतं तर अंधारानेही तिच्याशी समागम केला असता का असा प्रश्न पडावा अशी स्थिती.दुपारची जेवणं झाली की या बायका आपली दमलेली शरीरं घेऊन आपआपल्या पिंजऱ्यात झोपी जातात, अस्ताला जाणारा सूर्य यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण तो अस्त पावल्याची खूण म्हणून अंधार तिथं येतो, पाठीवरचं कुबड सांभाळत पाय खुरडत खुरडत यावं तसा हा अंधार येतो. जिला जास्त गरज असते ती आपल्या देहाचं गाठोडं ढिलं करते आणि आरशापुढे बसते, लेप चढवत राहते. आरसा छद्मीपणे हसत राहतो, रात्रभर कपडे चढत राहतात उतरत राहतात. तयार होण्याआधी चरबटलेल्या केसांवर वेटोळं घालून बसलेला अधाशी मोगरा मध्यरात्री उलटून गेल्यावर पुरता चोळामोळा झालेला.जवळपास अख्खी रात्र लतापाशी थांबलो होतो. रात्री दिडच्या सुमारास तिनं दोन घास जेवण केलं आणि पहाट होईपर्यंत सिगारेटी फुंकत आपला भूतकाळ उगाळत बसली. पोर जन्माला घालायचं होतं तिला, मुलगा झाला तर सांभाळणार होती आणि मुलगी झाली तर कामवाल्या नट्टीबाईला देऊन टाकणार होती कारण  मुलीच्या आयुष्याचा नरक होऊ द्यायचा नव्हता.  नट्टीबाईला पोर होत नव्हतं, नवरा मारझोड करायचा. तिचीच कमाई घेऊन व्यसनात उडवायचा. लताची पोर ती आपली म्हणून सांभाळणार होती त्यासाठी तिनं पोटुशी असल्याचं नाटकही रचलं होतं. लताला पोरगं झालं तर पोट खाली झाल्याची नौटंकी करून नवऱ्याचा अंगभर मार खाण्याची तयारी तिनं केली होती. लताच्या अड्ड्यावरून निघताना इतकं असहय अगतिक वाटलं की जिने उतरून खाली आल्यावर भडाभडा उलट्या झाल्या. रस्त्यावर नुकतीच रिक्षांची वर्दळ सुरु झाली होती. माझ्याजवळून जाणारा रिक्षावाला मला उलट्या करताना पाहून स्पीड कमी करत जवळ येत शिव्या हासडत म्हणाला, "***** थोडा कम पीने का.. स्साला... " किती तरी दिवस लताचा विचार मनातून गेलाच नाही. लताचं पुढे काय झालं हे नंतर चौकशी करून विचारण्याची हिम्मतही नव्हती, काही वर्षांनी तिथं पुन्हा गेलो तर ती तिथं नव्हती. कुठे गेली कुणालाच माहिती नव्हतं. हे एक बरं असतं, इथल्या बायका आपली जागा बदलून गेल्या की त्या आणि त्यांचा भूतकाळ एकमेकासाठी मरुन जातो. नट्टीबाईने तिथलं काम सोडून बरीच वर्षे झालेली पण तिला शेवटचं कुणी कधी पाहिलं ते सांगणारं भेटलं नाही. एकदोघींना वाटलं चौकशीचं नाटक करत सावज हेरायला आलाय, बाकीच्यांनी खुणावताच त्या मागे सरल्या. पुन्हा लताची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही पण मेंदूच्या कप्प्यातून तिला बाहेर काढू शकलो नाही. आता तुम्ही म्हणाल यात गुरुदत्त आणि 'प्यासा' कुठून आले ? त्यांचा काय संबंध ? तर संबंध आहे मित्रांनो. त्यासाठी आणखी थोडं वाचावं लागेल. 'प्यासा'च्या सुरुवातीच्या दिवसांत निर्णय घेण्यात आला होता, की सिनेमाची थीम शूट कोठ्यावर आधारित असेल आणि तिचं चित्रीकरणही वास्तववादी असेल. ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चालू होतं. एका गाण्याच्या शूटिंगला मात्र घोडं अडलं. गाण्यासाठी परफेक्ट लोकेशन ठरवता येत नव्हते. गुरुदत्तनी तर पक्के केले होते की, कोलकत्त्यातील रेड लाईट एरियातील एका बनारसी कोठ्यावरच हे गाणं शूट करायचं. त्याशिवाय गाण्यात सच्चेपणा येणार नाही, त्याशिवाय ते प्रेक्षकांच्या मनाला भिडणार नाही. त्यांचा निर्णय पक्का होता पण अडचण अशी होती की गुरुदत्त कधीच कोठ्यावर गेलेले नव्हते. पण त्यांनीच निर्णय पक्का केलेला असल्याने पिक्चरायजेशनसाठी आधी सेट पोझिशन्स आणि कॅमेरा अँगलच्या नोंदी घेण्यासाठी आपला लवाजमा टाळून आपल्या मित्रांसह गुरुदत्त तिथे गेले.गुरुदत्त तिथे येताच त्यांची खातरदारी झाली. चिकाच्या पडद्याआड नर्तकी येऊन उभी राहिली आणि बाहेरच्या लफ्फेदार बैठकीत मैफल सजली. मनगटाला गजरा बांधून झाला, हातावर अत्तर मळून झाले, वादक मंडळी सज्ज झाली, विडा देऊन झाला आणि मुजऱ्यास सुरुवात झाली. इथवर गुरुदत्त कमालीच्या उत्सुकतेने सर्व बारकावे टिपत होते. पण मुजरा सुरु झाल्यानंतरचे दृश्य पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला. काही क्षण त्यांना स्वतःचीच लाज वाटली.मुजरा पाहताना त्यांच्या चाणाक्ष नजरेने ताडले होते की, कोठ्यावर नाचणारी ती तरुणी जवळपास सात महिन्यांची गर्भवती होती. ती हसऱ्या चेहरयाने नाचत होती पण तिच्या हालचाली अवघडलेल्याच होत्या, त्यातून तिची मजबुरी साफ झळकत होती. ती नेटाने अन कष्टाने नाचत होती आणि तरीदेखील लोक मिटक्या मारत तिचा नाच पाहत होते. तिच्यावर दौलतजादा करत होते. हे विदारक दृश्य पाहताच गुरुदत्त आपल्या मित्राशी कानगोष्ट करून तिथून उठून गेले. जाताना त्यांच्या हातातली नोटांचे बंडले त्यांनी तिथेच ठेवली. ते सर्व पैसे त्या मुलीच्याच हाती देण्याविषयी ते बजावून गेले....या घटनेनंतर दोन दिवस स्वतःला बंदिस्त केलं, त्या धक्क्यातून सावरताच गुरुदत्तनी 'प्यासा'मधील गुलाबोला (वहिदा रेहमान) कळवले की, "मला साहिरच्या 'त्या' गाण्यासाठी कुंटणखाण्याचा सीन मिळाला आहे."आणि आधी ठरवल्याप्रमाणे त्याच लोकेशनप्रमाणे त्यांनी ते गाणे शूट केले आणि हिंदी चित्रपटसंगीताच्या खजिन्यात एका अनमोल रत्नाची भर पडली. एसडींनी संगीत दिलेलं, काळजाला पीळ पाडणारे रफींच्या दर्दभरया आवाजातले ते आर्त गीत होतं - 'जिन्हें नाज है हिंदपर, वो कहा है.....'हळव्या मनाचा माणूस कोठा, तवायफ आणि वेश्यांकडे गेला की छिलून निघतो हेच खरे आहे, जे मी अनेकदा अनुभवले आहे, पाहिले आहे. 'प्यासा'साठी गुरुदत्तला त्रिवार सलाम ! गुरुदत्त तिथून निघून आले पण त्या मुलीला ते तिथून बाहेर काढू शकले नाहीत. त्या मुजरेवाल्या तवायफ तरुणीसारखीच लतादेखील सात महिन्याची पोटुशी असून कैकांच्या भुका मिटवत होती. लताच्या गर्भावर आशा ठेवून बसलेली नट्टीबाई धंदा करत नव्हती पण धंदेवालीपेक्षा वाईट जीवन ती जगत होती. लताला आपल्या भविष्याच्या तजविजीसाठी मूल हवं होतं तर नट्टीबाईला नवऱ्यासोबत जगण्यासाठी आधार म्हणून मूल हवं होतं. या दोघीत मला फरक असा वाटलाच नाही. त्यांची सर्व माहिती असून मी ही काही करू शकलो नाही, गुरुदत्तनी निदान त्या बाईला पैसे देऊन मनावरचे ओझे हलके केले पण माझे काय ? लताचे ओझे अजूनही काळजावर आहेच !तेंव्हा लताचं वय तिशी पार होतं. सभ्य जगातल्या स्त्रिया आपल्या मुलाची वाढ नीटनेटकी व्हावी म्हणून डॉक्टरकडे जाऊन नित्य तपासणी करून हेल्थ सप्लिमेंटस, औषधे इत्यादी घेतात. पण लता सिगारेट दारू प्यायची. हे चालू ठेवलं तर गर्भातल्या मुलावर वाईट परिणाम होतील असं म्हटल्यावर ती मोठमोठ्याने हसली होती, सिगारेटची धूम्रवलये हवेत सोडत अत्यंत कोरड्या स्वरात उत्तरली, तुमच्या दुनियेतलं शेळपट पोर हवंय कुणाला ? मला जगवायचं म्हणजे त्याला सगळं काही सोसता आलं पाहिजे ! भडवेगिरी सोडून सगळं काही करता आलं पाहिजे ! " पुन्हा विकट हास्य करत ती धुरांच्या वलयात हरवून गेली. मी निरुत्तर झालेलो. अजूनही त्या आठवणींनीं कासावीस व्हायला होतं. लता आणि नट्टीबाईचं पुढं काय झालं असेल ? तिची प्रसूती झाली असेल का ? मूल की मुलगी ? दोघीतली कोण हरली असेल ? आता कुणी हयात असेल का ? एक ना अनेक प्रश्न मागे ठेवून रोजची लढाई लढावी लागते, त्याला पर्याय नाही. 'जिसका कोई नही उसका खुदा है' असं म्हटलं जातं मग इथं तर यांचं कुणीच नसतं ! याच जित्या जागत्या देवता, याच यांचं भविष्य ठरवणार आणि घडवणार. - समीर गायकवाड 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!