रेड लाईट डायरीज - 'धाड' !

रेड लाईट डायरीज - 'धाड' !

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

मे महिन्यातील दिवस होते ते. जयश्री खूप खुश होती त्या दिवशी. तिची आई भौरम्मा तिला भेटायला आली होती. जयश्रीला पुण्यातल्या बुधवार पेठेत येऊन पाच वर्षे लोटल्यानंतर तिची आई आली होती. जयश्री गव्हाळ रंगाची, तुकतुकीत कांतीची, ठाशीव गोलाई अंगावर असणारी शंभरात उठून दिसणारी अशी होती. उभट चेहरा, अरुंद कपाळावरती रूळणारी कुरळ्या केसांची महिरप, मधोमध पाडलेल्या भांगात सिंधूर भरून करकचून बांधलेला आंबाडा, अबोली मोगरयाची केसाला पडलेली मिठी, लालबुंद रंगाच्या टिकलीला शोभून दिसतील अशा लाल खडयाच्या इअरिंग्ज, काळेभोर पाणीदार डोळे, तलम रसाळ ओठ, किंचित वर आलेले गाल आणि निमुळती हनुवटी अन सैलसर परकर पोलकं असं त्या दिवशी तिचं जालीम रूपरंग होतं. एरव्हीदेखील साध्या राहणीतही ती उठून दिसायची.जयश्रीचं गाव आंध्रप्रदेशातील किनारपपट्टीलगतच्या गुंटूर जिल्ह्यातील दरवेशपालेम. याच्या नाजिकची माडा जंगलं प्रसिद्ध होती. तिचे वडील शेतमजूर होते. तिच्या कुमारवयात सर्पदंशामुळे मरण पावलेले. त्यांच्या मृत्यूनंतर भौरम्मा सैरभैर झालेली. काय करावं अन काय नाही तिला काहीच कळत नव्हते. पदरात दोन मुली टाकून नवरा अकाली निघून गेलेला. घर नाही ना दार नाही. माहेरचे रस्ते गरिबीमुळे कधीच बंद झालेले अन सासरच्या लोकांनी पांढरया पायाची म्हणून हाकलून दिलेले. पोरींना उराशी कवटाळून ती थेट माडाच्या जंगलात निघून आलेली. तिथं जंगलात कसंबसं राहू लागली.तिथंच तिची ओळख मक्कुरशी झालेली. पस्तीशी पार करून गेलेला मक्कुर भौरम्माच्याच येरुकुला जातीचा होता. त्या जंगलातच त्याचं झोपडीवजा घर होतं. तिथं तो एकटाच राहायचा. जंगलातल्या वस्तू बाहेर विकून पैसा कमावून त्यावर आपली व्यसनं भागवायचा. पुढे दोघांच्या शरीराच्या अन पोटाच्या गरजा एकसारख्या निघाल्याने ते दोघं एकत्र राहू लागले. त्यांनी जंगलातच गंधर्वविवाह केला. तेंव्हा भौरम्मा पंचवीसेक वर्षाची अन जयश्री आठ वर्षाची तर लहानगी सुज्जी तीन वर्षाची असावी. जवळपास चारेक वर्षे त्यांची बरी गेली. यामुळे तिला आसरा मिळाला, त्याचा आधार झाला अन तिच्या रूपाने त्याच्या ताटाची, खाटेची सोय झाली. यात अडचण आली ती जयश्रीच्या शहाण्या होण्याने. हा पूर्ण भाग समुद्र किनारपट्टीलगत असल्याने, उष्म हवामान अन उष्म शरीर धाटणीची माणसं असल्याने मुली लवकर वयात येत. त्यामुळे उफाडयाच्या अंगाची जयश्री बाराव्या वर्षी वयात आलेली. रिवाज म्हणून ती तिला माहेरी घेऊन गेली, तिचे सासरचे लोकही तिथे आलेले. मोठा कार्यक्रम करून तिला त्यांना गोडधोड द्यावं लागलं. चारपाच वर्षात काटक्या कुटक्यांचं जळण विकून आलेल्या दिडक्या अशा रीतीने अकस्मात खर्च झाल्या. तिचे दीर हरामी होते, त्यांनी आपल्या भावाच्या पोरी आपल्याकडे असाव्यात म्हणून तिथं तगादा लावला. त्यांच्या मनातलं काळंबेरं ती ओळखून होती. तिने काही दिवस पोरी आपल्यापाशी ठेवून झाल्यावर पक्क्या न्हात्याधुत्या झाल्यावर आणून सोडते असं सांगून त्यांचा पिच्छा सोडवून घेतला.एक आठवडा तिकडं घालवून ती आपल्या झोपडीत परत आली. ती परत आली अन तिची पोर मोठी झाल्याची बातमी झाडांच्या पानांतनं वारं वाहत जावं तशी फॉरेस्ट खात्यातल्या लोकांपुढे गोंडा घोळणाऱ्या सॉ मिलवाल्या लाकूडतोड्या लोकांच्या टोळीच्या कानावर गेली. या संपूर्ण जंगलातल्या लाकडांवर त्यांची नजर होती. त्यांनी अनेकदा भौरम्मा आणि मक्कुरला जंगलात पाहिलं होतं. त्यांना ते नवरा बायको वाटायचे. भौरम्मावर कुणाची नजर खिळून राहावी असं काही तिच्या अंगी खास नव्हतं अन तिचं अंग म्हणजे जणू हाडाचा सापळाच. जोडीला तिचा चेहरा सदा भेसूर उदासवाणा असे. अंगावरच्या कपडयांची लक्तरे झालेली असत. त्यामुळे तिच्या वाटेला कुणी जात नसत. जयश्रीचं तसं नव्हतं. निसर्गानं तिला मादक सौंदर्याचं वरदान दिलेलं होतं. तेच पुढे शाप बनून तिच्या मागे लागलेलं. तिचं मुसमुसलेलं अंग लपवायला भौरम्माकडं पुरेसे कपडेही नव्हते. मक्कुरची जयश्रीवर वाईट नजर नव्हती पण त्याला तिची फिकीरही नव्हती. मात्र एके दिवशी आक्रीत घडलं.... मक्कुर लाकूडतोडया लोकांच्या लॉरीत बसून गुंटूरला निघून गेला होता अन त्याच सॉ मिलवाल्याचा तरणाताठा देखणा मुकादम, एकदम दाक्षिणात्य नटांच्या वेशभूषेला शोभावे अशा कपड्यात मक्कुरला शोधत तिथं आला. बहुतेक त्याला रक्तचंदनाच्या झाडांची माहिती हवी होती. नेमकं त्याच वेळी भौरम्मा लाख गोळा करायला जंगलात गेली होती. झोपडीत जयश्री अन सुज्जी दोघीच होत्या. जयश्री पाणी भरत होती, ओढ्यातून हंड्यात आणलेलं पाणी तिच्या अंगावर सांडून ती निम्मीअर्धी ओली झालेली. ओलेत्या अंगातल्या जयश्रीला पाहताच त्याच्या तोंडाला लाळ सुटली. पहिल्याच नजरेत रुबाबदार व्यक्तीमत्वाची छाप पाडून त्याने तिच्या हृदयावर कब्जा केला. त्यानंतर तो रोज गुपचूप येऊन तिला भेटू लागला. तिलाही त्याचे आकर्षण वाटू लागले. दोघांची भीड चेपली तशी त्याची लगट वाढू लागली, मर्यादा लांघल्या गेल्या. त्यातून व्हायचे तेच झाले. जयश्रीला दिवस गेले. मक्कुर आणि भौरम्माला सगळं ध्यानात येईपर्यंत फार उशीर झाला होता. तिचं बाळंतपण झालेलं भौरम्माच्या सासरी कळाले असते तर त्यांनी त्या सर्वांची खांडोळी केली असती. शिवाय सॉ मिलवाले लोकंही त्याला जयश्रीवरून दम देऊ लागले. त्याला ब्लॅकमेल करू लागले. त्यातल्या काही लोकांना तो नकार देऊ शकत नव्हता कारण त्यापायी त्या सर्वांना जंगल सोडून बेघर व्हावे लागले असते, पोटाला मुकावे लागले असते.गर्भवती जयश्रीला राजरोस कुस्करले जाऊ लागले तशी भौरम्मा कासावीस होऊ लागली. जयश्रीचा जीव तर हादरून गेला. भेदरलेल्या हरिणीसारखी तिची गत झाली. ते सगळं वेदनेच्या पलिकडचे होते. त्या चौघांना तिथून हलताही येईना अन जयश्रीला कुठे नेऊन सोडावे म्हटले तर तेही जमेना. त्यातच एके रात्री जयश्रीने फास लावून घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा ते दोघे घाबरून गेले. त्यांनी यातून मार्ग काढायचे ठरवले कारण गरोदर जयश्रीच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर सगळ्यांचीच धडगत नव्हती. अखेर हिम्मत करून मक्कुर तिला आपल्या दूरच्या बहिणीकडे शांतीकडे कडप्पाला सोडून आला. जयश्रीचं पोट खाली करण्यासाठी तिच्याकडे थोडेफार पैसेही दिले. त्याची बहिण म्हणजे पैशासाठी काहीही करायला तयार असणारी अवदसा होती. शिवाय ती वाईट चालीचीही होती. तिची वाकडी पडलेली पावले कधीच सन्मार्गावर आली नव्हती. तिच्या चलाख नजरेने जयश्रीचा काय भाव येऊ शकतो हे हेरले होते. असं न तसं ती तिची कुणीच लागत नव्हती. सहा सात महिन्यापुरती तिला तिच्यापाशी ठेवण्यासाठी मक्कुर तिला तिथं सोडून गेला होता पण त्याआधीच शांतीने तिची वासलात लावली होती. तिला जयश्रीच्या रसरशीत अंगाची किंमत चांगलीच ठाऊक होती. तिने दलाल गाठून जयश्रीला विकून टाकलं. पुण्यात नेऊन पोट खाली करायचं असं कारण तिने पुढे केलं होतं. ती स्वतः तिच्यासोबत तिला रवाना करायला गेली होती. नंतर तिने मक्कुरला कळवले की जयश्री दवाखान्यातून पळून गेली.ही बातमी भौरम्माच्या कानी पडली तेंव्हा तिच्या पोटात गोळा आला. कंठातून आवाज फुटेनासा झाला. हातापायाला पेटके आले. दरदरून घाम फुटला. अंग लटलट कापू लागले. श्वास गतिमान झाले. मस्तक फुटते की काय असे वाटू लागले. त्या नंतर किती तरी दिवस भौरम्मा आपल्या धाकट्या मुलीला घेऊन जवळच असणाऱ्या चेरूवी नदीच्या काठी जाऊन बसायची. तासनतास हिरव्या निळ्या पाण्याच्या प्रवाहाकडे बघत राहायची, तेंव्हा सुज्जीला वाटायचं की आपली मोठी ताई, आपली जयश्री या पाण्याच्या प्रवाहातून परत येणार आहे म्हणूनच आपली आई आपल्याला घेऊन रोज इथे येतेय. भौरम्माला वेड लागल्यागत झालं, झाडांच्या बुंध्यांखाली शून्यात डोळे लावून बसलेली भौरम्मा दिसली की मक्कुर तिच्या जवळ जायचा. तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा तिला बिडी द्यायचा. ताज्या तेंदूपत्त्याचा तिला ठसका लागायचा. कधी कधी वाडग्यात कल्लू प्यायला द्यायचा. शिंदीसारखं ते पेय पिलं की भौरम्माचं अंग हलकं होऊन जाई. दुःखाचा विसर पडे. मक्कुरचा तिच्यावर जीव होता अशातला भाग नव्हता, आपल्या पोटापाण्याच्या चिंतेपायी तो तिची अशी जुजबी काळजी घ्यायचा. आता सॉ मिलवालेही त्याला त्रास देत नव्हते, त्यामुळे त्याचं आयुष्य काहीसं स्थिरावलं होतं....इकडं बायकांच्या बाजारात उभं केलेल्या जयश्रीला अंगावर वीज कोसळल्यासारखं झालं होतं. ना छप्पर, ना आधार ना परिवार फक्त वासनेचा बाजार ! तिला ज्या कुंटणखाण्यात विकलेलं होतं तो भामाचा होता. ती देखील आंध्रातलीच होती. तिच्याकडच्या सगळ्या मुली त्याच भागातल्या होत्या. जयश्रीचं पोट तिनं आधी मोकळं करून घेतलं, तिला धंदा शिकवला. माणसं ओळखायला ती आपोआप शिकली. बाई इथे ते आपोआप शिकतेच ! इथून पळून जायचं तरी कुठं आणि का हा मोठा प्रश्न तिच्या पुढ्यात असल्यानं तिनं विरोध असा कधी केलाच नाही. मागच्या तीनेक महिन्यात नाहीतरी तिने अशाच यातना सहन केल्या होत्या. राहून राहून तिला आई आणि बहिणीची आठवण मात्र सारखी येत होती. मनाला आवर घालत ती कसबसे दिवस घालवू लागली. कधीतरी आई भेटेल तेंव्हा तिला भेटून आपला यात काहीच दोष नाही हे पटवून द्यायचं आणि मग मोकळ्या मनानं जीव द्यायचा एव्हढेच तिचे ध्येय होते. तिचे देवाकडे फार मोठे मागणेही नव्हते.काळ पुढे जात राहिला. तिला इथं येऊन चार साडेचार वर्ष झाली, तिच्यावर लावलेली भामाची बोली तिने केंव्हाच फेडून टाकली होती. तिचा पैसा आता निम्मा का होईना पण तिच्या हाती येत होता. जयश्रीला वाटू लागले की हा पैसा असाच साठत जावा. आपलं आयुष्य उध्वस्त झालं म्हणून काय झालं सुज्जीचं कधी ना कधी लग्न होईल तेंव्हा तिला हे पैसे द्यावेत. तेव्हढाच तिच्या संसाराला आधार होईल अन मोठ्या बहिणीची जबाबदारी थोडी का होईना पार पाडल्याचं समाधान आपल्याला मिळेल असा तिचा होरा होता. पण सुज्जी अन भौरम्मा भेटणार तरी कशा हे मोठं कोडंच होतं. तिला दरवेशपालेमला परतणे शक्य नव्हते अन भौरम्माला तिचा सुगावा लागणे कठीण होते. मात्र तिची तीव्र मनोकामनाच तिच्या कामी आली. ज्या दलालाने तिला इथं आणले होते त्याची नि तिची योगायोगाने गाठभेट झाली. तिनं एक पांढरी नोट त्याच्या हाती सरकावत आपल्या गावाचा पत्ता त्याला दिला, आईचा नाकनक्षा सांगितला, माडाच्या जंगलातील रस्त्यांची माहिती दिली. काम फत्ते झालं तर वाट्टेल ती 'सेवा' पुरवण्याचं वचन दिलं....जयश्रीची तगमग कामी आली. भौरम्मा आणि मक्कुरला जयश्रीची खरी स्थिती समजताच हादरा बसला. मक्कुर तडक शांताच्या घरी गेला. पण तिने काखा वर केल्या. भौरम्मा उन्मळून पडली. सुज्जीला तर नेमकं काय घडतंय याचा अंदाज आलाही नाही. मक्कुर जयश्रीला परत आणण्याच्या विरोधात होता. असला व्यवसाय करणारी मुलगी आपण घरी आणल्याचं कळल्यास बिरादरीवाले बहिष्कार घालतील याची त्याला भीती होती. आपण मेलो तर आपल्या मयतीला बिरादरीचे लोक आले नाही तर आपला आत्मा भटकत राहील असले भ्रामक विचार त्याच्या मनात असत. तर भौरम्माचं म्हणणं होतं की जयश्रीला गावी परत आणता आलं नाही म्हणून काय झालं ? आपण तरी तिला जाऊन भेटून यावं, पोर एकटीच राहत्येय. तिनं काय काय सोसलं असेल याची कल्पना सहन होत नाही'. भौरम्माच्या या हट्टावरून त्यांच्यात कुरबुरी होऊ लागल्या. अखेर मधला मार्ग काढला गेला. त्याने स्वतः जायला नकार दिला पण भौरम्माला जाण्यास अनुमती दिली. त्याच दलालासोबत श्रावण महिना उलटल्यावर ती जयश्रीकडे बुधवारात आली.भौरम्माला पाहून जयश्रीला अस्मान ठेंगणं झालं. आपल्या आईला कुठे ठेवू अन कुठे नको असं झालं. दुपारी भौरम्मानं तिला आपल्या हातानं अंघोळ घातली. तिचं अंग दाबून दिलं. गेली कित्येक वर्ष तिच्या अंगावर वासनेचे साप रेंगाळत होते, आता किती तरी वर्षानंतर तिच्या अंगावरून मायेचा हात फिरत होता. तिथले दुर्दैवाचे दशावतार पाहून भौरम्माला अन्नाचा घास घशाखाली जाईनासा झाला. कसंबसं दोन घास खाऊन प्रवासाचा शीण हलका करायला तिनं पाठ टेकली. तिचा डोळा लागला तेव्हढ्यात भामाने जयश्रीला आवाज दिला, "जया स्वल्प इक्कड रा.." (जरा इकडे ये)...आईची झोप मोडणार नाही अशा बेतानं ती बाहेर आली. पाहते तर भामापाशी करीमभाई उभा होता. व्हीआयपी कस्टमर असायचे त्याच्याकडे. अडीअडचणीला तो पैसाही द्यायचा त्यामुळे त्याला कुणी खाली हात पाठवत नसे. पण आताची बाब वेगळी होती. किती तरी वर्षांनी आई आलेली होती त्यामुळे जयश्री आढेवेढे घेऊ लागली. भामाने डोळे वटारले तरी ती बधेना. अखेर तिने धिटाई दाखवत करीमभाईला आपली अडचण सांगितली. त्यासरशी त्याने आधी भामाच्या अन नंतर जयश्रीच्या कानात पुटपुट केली. ती रक्कम ऐकून ती हबकून गेली. शिवाय तो सांगत होता की, 'तिला पूर्ण रात्र थांबायची गरज नाही, रात्री बाराच्या आत परत आणून सोडतो, पण कस्टमर जुने आहे त्याला जयाच हवीय.'सांज कलायच्या बेताला भौरम्मा जागी झाली. आजूबाजूचा तो माहौल पाहून ती सर्द झाली. प्रत्येकीचा आरसा चालू होता. वेणीफणी पासून ते स्कीन कोम्प्लेक्शन पर्यंत हरतऱ्हेच्या रंगरंगोटीला उधाण आलेलं होतं. गिऱ्हाईक रिझवण्यासाठी हा देखावा किती आवश्यक असतो हे जयश्री भौरम्माला सांगत होती अन ती चोरून पदराने डोळे पुसत ऐकत होती. 'काही तासासाठी बाहेर जावे लागेल तोवर टीव्ही पहा किंवा आराम कर' असं तिने आईच्या कानावर घातलं. करीमभाई येताच त्याच्यासोबत नाईटच्या कस्टमरकडे ती रवाना झाली. आपल्या दृष्ट लागेल अशा पोरीला कुणाचाही हात अंगावर फिरवून घ्यावा लागतो या कल्पनेनेच भौरम्माचा थरकाप उडाला होता.जयश्रीला जाऊन जेमतेम एक तास झाला होता. इतक्यात सायरनचा आवाज कानावर आला आणि त्या चाळवजा इमारतीत सर्वत्र गोंधळ उडाला. दाणदाण पाय आपटत पोलिसांचा अख्खा फौजफाटाच तिथं दाखल झाला. उंबरठयापाशी लेडीज कॉन्स्टेबलला पाहून भामा जोरात ओरडली, "दाSSSड, दाSSSड पारीपू, पारीपू !!" (धाड, धाड, पळा पळा) काही वेळ तर नुसता कोलाहल माजला. काही चलाख पोरी मागच्या दाराने समोरच्या घरात घुसल्या. काही वेळात तिथेही पोलीस धडकले. दरम्यान भामानं आणलेलं बारा वर्षाचं नवं 'सावज' शेजारच्या घरातील माळ्यावरच्या ट्रंकेत जाऊन बसलं होतं. पोलिसांना कुणी तरी हीच खबर दिली होती अन त्या आधारे त्यांनी 'रेड' टाकली होती. त्या आधी एक डमी कस्टमरदेखील त्यांनी आत धाडला होता. त्याने ग्रीन सिग्नल दिल्यावरच पोलीस आत घुसले होते. पोलिसांनी अड्ड्यात असलेल्या सगळ्या बायका पोरी व  हजर असलेल्या किरकोळ कस्टमरवर धावा बोलला. त्यातल्या एक दोघी अव्वल नंबरच्या अट्टल बदमाश होत्या. त्यांनी महिला पोलिसांना अन पीआयला सातपिढ्यांची शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. त्यांचे ते अचकट विचकट हावभाव, बोलताना हाताचं मधलं बोट हलवत केलेले अश्लील अविर्भाव पाहून पोलिसांची मती गुंग झाली. मद्धीनं तर कहर केला, शेजारच्या घरातल्या हसीनाचं शेंबडाळलेलं, मुतून चड्डी ओलं केलेलं पोर जे तिथं रांगत रांगत आलं होतं त्यालाच उचलून घेतलं. त्या पोराच्या बुडाला जोरात चिमटाही काढला, त्या सरशी ते पोर जोरात भोकाड पसरून रडू लागलं. त्याचं रडणं इतक्या मोठ्या आवाजात होतं की रेडवर आलेले पीआय कातावून गेले. त्याने ही रडणाऱ्या पोराची आई तिथंच ठेवायला सांगितली, रात्रभर हे पोरगं लॉकअपमध्ये रडत बसलं तर नाईट शिफ्टवाल्यांच्या डोक्याचा भुगा करेल हे त्याला ठाऊक होते. शिव्या देणाऱ्या दोघींनाही तिथंच ठेवलं. त्या दोघी खूप तमाशा करतात, न जाणो त्यांच्यामुळे पत्रकार मागे लागले तर काय घ्या हा विचार करून तो गप्प राहिला. लेडीज कॉन्स्टेबल बायका ओढत बाहेर आणत होत्या. त्यात भौरम्माचाही समावेश होता. तिला तर हिंदी मराठी काहीच कळत नव्हते. सगळ्या बायकांसोबत तिलाही गाडीत कोंबलं गेलं.... गाडीत बसल्यावर भौरम्माच्या शेजारी बसलेल्या तेलुगुभाषिक मुलीने तिला हे सगळं काय चाललंय याचा अंदाज दिला, ते ऐकताच तिचा चेहरा काळाठिक्कर पडला. पोलिसांनी सगळ्यांची नावे रजिस्टरमध्ये नोंद करून घेतली. गुन्हा नोंद केला आणि सकाळी जजपुढे उभं करण्याआधी त्यांची मेडिकलही करून आणली. 'भौरम्माला यातून सोडा ती यातली नाही' असं भामापासून अनेक पोरींनी सांगून पाहिले पण पोलीस बधले नाहीत. दरम्यान काही तासांनी नाईटसाठी बाहेर गेलेली जयश्री परतली अन तिथला किस्सा कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती मटकन खाली बसली. उरलेल्या मुलीही तिथं एकेक करून गोळा झाल्या. जयश्रीपुढं आता भौरम्माला सोडवून आणण्याचं आव्हान उभं ठाकलं होतं. दुसऱ्या दिवशी कोर्टाने काहींना ताकीद देऊन तर काहींना दंड करून तर काहींना एक दिवसाची शिक्षा करून सोडून दिले. तर भौरम्मा आणि आणखी एका बाईला एक वर्षासाठी महिला सुधारगृहात रवाना केले. केस नील होईपर्यंत आपल्या आईला महिला सुधारगृहातून कोणत्या 'दिव्या'तून जावं लागणार आहे हे ध्यानी येताच जयश्रीच्या काळजाचे पाणीपाणी झाले. सुज्जीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे जयश्रीने भौरम्माला तिथून बाहेर काढण्यासाठी खर्च केले. तरीही त्यात दिडेक महिना मोडला. यातून बाहेर आलेल्या भौरम्माने सुधारगृहाच्या चार भिंतीआड तेच भोगले होते जे जयश्रीने बाह्यजगात उघड उघड झेलले होते. सुटकेनंतर एक दिवस स्वतःजवळ ठेवून घेऊन भौरम्माला तिने गुंटूरच्या बसने पाठवून दिले. आपल्या आईला आपण आरामही देऊ शकलो नाही अन आपल्यामुळे तिच्या आयुष्यात हे संकट उद्भवल्याचं तिला मनोमन डाचत राहिलं.दीडएक महिन्याने आपल्या आईला परत आलेली पाहून सुज्जीचं देहभान हरपलं. तिने आईला खच्चून मिठी मारली. भौरम्माला यायला इतके दिवस लागले याचे मक्कुरला नवल वाटले होते. मात्र त्याचवळी तिला पाहून त्याला हायसे वाटले होते. तो सारखी लगट करू पाहत होता मात्र जयश्रीकडे राहून आल्यापासून भौरम्मा त्याच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हती. या वागण्याचा उलगडा त्याला तीनेक दिवसात झाला. त्या रात्री सुज्जी लवकर झोपी गेल्यावर मक्कुरने भौरम्माला आपल्या बिछान्यात ओढलं, त्याच्या या कृतीनं ती जाम घाबरून गेली. एक अनामिक भीतीची लहर तिच्या धमन्यातून वाहत गेली. तिच्या छातीचा भाता जोरात हलू लागला होता. थोड्याच वेळात त्यानं काय ते बरोबर जोखलं अन मोठ्याने खाकरत, पच्चदिशी थुंकत तो तिच्यापासून उठून दूर गेला. भौरम्मा हुंदके दाबत रडू लागली. तिच्या डोळ्यातलं खारट पाणी गालावर ओघळू लागलं. ती रात्र तिच्या हमसून रडण्यात गुरफटून गेली. त्या नंतर आठवडाभर मक्कुर तिच्याशी बोलला नाही. अगदी घुमनघुस्क्यागत वागत होता तो. त्याला कशाचा संताप आलाय हे भौरम्माने ताडलं होतं. त्याच्याशी बोलायचा देखील तिने प्रयत्न करून पाहिला पण काहीच साध्य झाले नाही. त्यानंतरच्या रात्री पेराली गावाहून येताना त्याने एक बाई सोबत आणली. तिलाही त्यानं त्या झोपडीत ठेवलं. त्या दिवसापासून भौरम्माच्या डोळ्यादेखत तो तिला भोगू लागला. दिडेक महिना महिला सुधारगृहात राहिलेल्या भौरम्माने तेच भोगले होते जे तिची मुलगी जयश्री बाहेर राहून भोगत होती. तिच्यावर झालेली बळजोरी चाणाक्ष मक्कुरने बरोबर ताडली होती.त्या दिवसापासून भौरम्माच्या अंगाला तिच्या पतीने कधीही हात लावला नाही पण मुलीच्या वयाची पोर मात्र भोगायला आणून ठेवली. तर तिकडे जयश्रीच्या आयुष्यात एकही दिवस असा गेला नाही की दहा लोकांनी तिला विवस्त्र केलं असेल. आता जयश्री पूर्ण ताकद एकवटून धंदा करत्येय, बहिणीच्या लग्नाचे पैसे तिला गोळा करायचे आहेत तर भौरम्मा आता रोज पहिल्या सारखं नदीकाठी येऊन बसते. नदीला प्रश्न विचारते, बाईच्याच वाटेला हा भोग का यावा म्हणून अश्रू ढाळते. तिचे अश्रू नदीत मिसळले की नदीच्या प्रवाहाला शिरशिरी येते, थरारून तरंग उठतात. गटार, नाल्यांचे, ओढ्याचे पाणी सामावणाऱ्या चेरूवूचं पाणी भौरम्माच्या अश्रूंसह पुढे तुंगभद्रेला मिळतं अन तिथून समुद्रात जातं. स्त्रीजन्माच्या दुःखाचं उत्तर शोधायला थेट समुद्राच्या तळाशी जातं. बहुधा म्हणूनच समुद्र जितका खोल असतो तितका तो शांत अन धीरगंभीर असतो....- समीर गायकवाड.                          
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!