रामायण? यह कलियुग है बाबा!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

गेल्या शनिवारपासूनदूरदर्शनलर रामानंद सागरनिर्मित रामायण ही लोकप्रिय मालिका सुरू झाली. सामान्यतः १३ भागांपेक्षा अधिक भागांना परवानगी न देण्याचे दूरदर्शनचे सुरूवातीच्या काळात धोरण ठरवले होते. परंतु रामायण, महाभारत आणि हमलोग ह्यासारख्या काही मालिकांच्या बाबतीत दूरदर्शनने ते धोरण शिथील करून अधिक भागांना परवानगी दिली होती. ह्या तिन्ही मालिकांनी लोप्रियतेचा उच्चांक मोडला! असो. रामायणावर हा ब्लॉगलेख मी मुद्दाम लिहीत आहे ह्याचे कारण रामाचे दैवतीकरण करण्याच्या नादात रामायणातल्या मानवात्वाच्या खुणा पुसल्या गेल्या! मी जळगावला मूळजी जेठा कॉलेजमध्ये असताना मराठी वाङ्मय मंडशळातर्फे वसंत कानेटकरांचे रामायणातील मानवत्वाच्या खुणा ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ह्या व्याख्यानात लक्ष्मणाच्या तोंडी रामायणात असलेले श्लोक उद्धृत करून कानेटकरांनी असे प्रतिपादन केले की रामायणातही मानवी भावनांचे पुरुरेपूर दर्शन घडते! अर्थात ह्या त्यांच्या विवेचनाकडे साहित्यविश्वाने साफ दुर्लक्ष केले. रामायणातल्या मनुष्यस्वभावाच्या वास्तवाकडे हजारो पिढ्या दुर्लक्षच करत आली आहे. म्हणूनच रामायणातील वास्तवदर्शन ह्या विषयावर लिहणे आवश्यक आहे. पण तसा प्रयत्न करणे सोपे नाही. परंतु रामायणातील स्वभावदर्शनासंबंधी लिहण्यापूर्वी रामायणासंबंधीच्या माहितीवर लिहणेसुध्दा तितकेच आवश्यक आहे.रामायणाचा काळ, रामायणातील प्रसंग, रामायणात आलेला भारताचा भूगोल इत्यादिसंबंधी १९ व्या शतकात आणि विसाव्या शतकात खूप संशोधन झाले आहे. त्या संशोधनाच्या निष्कर्षावर मी लिहण्याचे योजले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे रामायण-महाभारताच्या संशोधनात निष्कर्षाच्या बाबतीत एकवाक्यता नाही. रामायण हे आर्ष काव्य खरे. पण आर्ष काळाचा पट खूप आधीपासून सुरू होतो. उत्तरधृव प्रदेशातून आर्य भारतात आले तेव्हापासून तो सुरू होतो. सप्तसिंधू प्रदेशात त्यांची वस्ती स्थिर झाली तोपर्यंतचा काळ हा आर्ष काळ आहे. म्हणजे नेमका कोणता काळ? आर्यांचे आगमन पाचसहाशे वर्षे सुरू होते. त्यांचे भारतात आगमन होण्यापूर्वी द्रविड संस्कृती भारतीय उपखंडात नांदत होती. हडप्पा-मोहेंजोदडो उत्खनात सापडलेले शहर पाहिल्यावर संशोधकांचे असे मत झाले की ह़प्पाकालीन संस्कृतीदेखील आर्य संस्कृतीइतकीच प्रगत असली पाहिजे. अंदाजे इसवी सनपूर्व २१०० ते २५०० ह्या काळात तीन युध्दे झाली. पहिले युध्द झाले ‘राम-रावण’ ह्यांच्यात तर दुसरे दाशराज्ञ युध्द.‘दाशराज्ञ युध्द’चा संदर्भ ऋग्वेदातील काही ऋचात आला आहे. रामायणाचा मात्र ऋग्वेदातील ऋचात उल्लेख नाही. कारण रामायणातील घटना दाशराज्ञ युध्दापूर्वी २०० वर्षे आधी घडल्या होत्या. जनमानसात त्याच्या स्मृती चाळवल्या गेल्या असतीलही. परंतु त्यावर ग्रंथरचना झाली नाही. वैदिक ऋचादेखील स्फुरलेल्या आहेत. त्या कंठस्थ करण्यावर भर होता. रामायण महाकाव्य खूप नंतर रचण्यात आले. वैचारिक वर्चस्व कुणाचे असावे हे दाशराज्ञ युध्दाचे कारण फारच वेगळे होते. त्याबद्दल ह्या लेखात खोलावर जाण्याचे कारण नाही. फक्त एवढेच सांगतो की  लोपामुद्रा आणि नंतर अगस्ती ह्या दोघांनी विश्वामित्राची बाजू घेतल्यामुळे वसिष्ठ आणि विश्वामित्र ह्यांचे दोन गट तयार झाले. ह्या दोन्ही गटातल्या स्पर्धेत दिवोदासपुत्र सुदासच्या राजकारणाने ठिणगी टाकली गेली. त्याचीच परिणती युध्दात झाली. ह्या यध्दात आर्य समूहातील राजे आणि त्यांचे राजऋषी मिळून दहा राजांनी भाग घेतला. म्हणून ते दाशराज्ञयुध्द ओळखले गेले. दाशराज्ञयुध्दाचा महत्त्वाचा भाग असा की एका बाजूचे नेतृत्व वसिष्ठाकडे होते तर दुस-या बाजूचे नेतृत्व विश्वमित्राकडे होते!  ह्या युध्दात विश्वामित्रासह अनेक ऋषी आणि राजांसह अनेक योध्दे मरण पावले. भार्गव परशुरामाने वसिष्ठांच्या आज्ञेनुसार त्यांचे क्रियाकर्म केले. त्यानंतर ६०० वर्षांनी कौरव-पांडवांचे १८ दिवसांचे महाभारत युध्द झाले! ह्या तिन्ही युध्दांचे वर्ष नेमके कोणते ह्यावर आधी झालेल्या संशोधनानंतर मात्र फारसे संशोधन झाले नाही. लेखनही झाले नाही. ह्याउलट दरवर्षी डिसेंबर महिन्यात इंग्रजी नियतकालिकात बायबल काळावर नित्य नवे लेख प्रसिध्द होत असतात. विशेष म्हणजे रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही युध्दांवर ब्राह्मण काळात महाकाव्ये लिहली गेली. राजे लोकांचा इतिहास सांगण्यावर सूतमंडळींची उपजीविक अवलंबून असल्याने त्यांनी रामायण आणि महाभारत सादर करण्यावर भर दिला. त्या सादरीकरणात अनेक आख्यायिकांनी रामकथेत आणि कौरवपांडवाच्या कथेत प्रवेश केला. काव्ये लिहणा-या कवींनी त्या आख्ययिकांचा उपयोग तर करून घेतलाच, शिवाय अतिशयोक्ती, उपमा-उत्प्रेक्षांनाचा वापर करून त्यंची काव्ये बहारदार केली. रामायणाची श्लोकसंख्या २४००० असून महाभारताची श्लोकसंख्या १ लाख झाली. संशोधकांच्या मते रामाचे देवतीकरण म्हणजे विष्णूचा अवतार वगैरे वर्णन असलेला पहिले कांड संपूर्ण प्रक्षिप्त आहे. खरी रामकथा तर  दुस-या कांडापासून सहाव्या कांडापर्यंतच आली आहे. ह्यानंतरचे सातवे कांड जवळ जवळ प्रक्षिप्त आहे. दोन्ही महाकाव्यात त्या काळात प्रचलित असलेली बहुतेक सारी आख्याने मोठ्या प्रमाणावर समाविष्ट झाली असून त्या आख्यावात कालविसंगती आहे हेही रचयित्यांच्या लक्षात आले नाही. बहुतेक आख्याने चमत्कारांनी भरलेली आहेत. महाभारतात तर संपूर्ण रामायण आख्यानरूपाने आले आहे. महाभारताविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सारी आख्याने जणू महाभारताच्या आश्रयाला आली आहेत! सूतमंडळींनी आख्याने घुसडल्यामुळे रामायण-महाभारत ही दोन्ही महाकाव्ये लोकप्रिय झाली. जनमानसात रामकथा लोकप्रिय आहे म्हटल्यानंतर कवी प्रवृत्तीची ब्राह्मण मंडळी पुढे सरसावली. त्यांनी त्यात नीतीकथा आणि आध्यात्मिकतेची भर घातली. मात्र, मूळ कथावस्तुला धक्का लागलेला दिसत नाही. जैन आचार्यांनी आणि बौध्द मुनींनी देखील रामायणाच्या कथेतले वेगळे दुवे त्यांच्या अनुयायांपुढे ठेवले. आणखी एका वैशिष्ट्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. राजांच्या वंशावळी सांगण्याचे काम मूळ सूतमंडळींचेच असल्याने त्यांनी राजांची कुळपरंपरा थेट सूर्य-चंद्र ह्या आकाशस्थ ग्रहता-यांपर्यंत भिडवली. अर्थात त्यांनी तरी ती का भिडवू नये? जर पित्यांची परंपर आकाशात दिसणा-या सप्तर्षी तारकासंपर्यंत ऋषींनी भिडवली. तेव्हा सूतमंडळींना त्यांचे अनुकरण केले असेल तर त्यांना नावे ठेवता येत नाही. सूतमंडळींनी बहुतेक राजवंशांच्या पहिल्या पिढीला देवादिकांचे स्वरूप पाप्त करून दिले. तरीही संशोधकांचे असे मत आहे की देवांची पहिली पिढी वगळता सूतमंडळींनी दिलेली वंशावळ खरी असली पाहिजे.  भारतात मुद्रण कला आल्यानंतर रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही महाकाव्यांच्या संशोधनाला वेग आला! गोरेसिओ संपादित बंगाली प्रत, टुरीन प्रत (१८४३-६७ ). कलकत्ता प्रत ( १८५९-६० ) ह्या प्रसिध्द आहेत त्याखेरीज तीन भाष्यांसह तीन खंडात मुंबई प्रत (१८९५ ), के. पी. परबसंपादित निर्णयसागर प्रत (१९०१) पश्चिम हिंदुस्थानी प्रत ह्या प्रतीही प्रसिध्द आहेत. ऐतिहासिक काळात सर्व प्रांतातल्या कवींनी आपल्या भाषेत रामायण काव्याची रचना केली आहे. मराठीत एकनाथांचे भावार्थ रामायण प्रसिध्द आहे तर उत्तरभारतात गोस्वामी तुलसीदासांचे रामचरितमानस फारच प्रसिध्द आहे. तामिळमध्येही रामायण लिहले गेले आहे. रामायण मालिकेच्या टायटलमध्ये देशभरातल्या प्रमुख रामायणांचा रामानंद सागरांनी आवर्जून उल्लेख केला आहे. नुसाताच उल्लेख केला नाही तर काही प्रसंग त्यावर बेतलेदेखील आहेत. मघांशी वंशावळीचा उल्लेख केला. त्या संबंधात आणखी धोडेसे! रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. इक्ष्वाकू हा त्याचा पहिला पूर्वज. इक्ष्वाकूपासून सूर्यवंश आणि विदेहवंश हे दोन्ही महत्त्वाचे वंश सुरू झाले. इक्ष्वाकूची कन्या इलाच्या मुलापासून पुरूरवाचा चंद्रवंश सुरू झाला. कृष्णाचा यादववंश हा चंद्रवंशाचाच! ह्या कृष्णाचेच अनेक वंश गुजरात आणि खानदेशात पसरले आहेत. खानदेश नावाची उपपत्ती कान्हदेश अशी सांगितली गेली. कान्हदेश म्हणजे कान्हाचा देश!  रामाचे वास्तव्य नाशिक परिसरातच झाले. सीतेचे अपहरण पंचवटीच्या परिसरात झाले. पुरूरव्याच्या पौरव वंशातले भरत आणि दुष्यंत आणि भरत हे दोन राजे झाले. दोघेही इक्ष्वाकूच्या दिलीप राजाचे समकालीन होते. इक्ष्वाकूपासून १८६० वर्षांच्या काळातल्या ९३ व्या पिढीने महाभारत युध्दात भाग घेतला होता! त्याचा सहभाग कौरवांच्या बाजूने होता की पांडवांच्या बाजूने होता ह्या प्रश्नालर संशोधकांचे मौन आहे. रामाचा भाऊ शत्रूघ्न ह्याच्या पुढच्या पिढ्यांशी यादव कुळाशी संबंध आला. त्याच्या पिढ्या चंद्रवंशात मिसळून गेल्या.अध्योध्येचे राज्य दाशरथी रामाचे होते. रामराज्य म्हणून अयोध्येच्या राज्याचे भारतात सर्वत्र कौतुक होते. पण खुद्द रामाला मात्र त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली! ऋषींना त्रास देणा-या राक्षसांचा निःपात करण्याचे काम रामाला बालपणीच करावे लागले. त्या काळात सीतेचा रामाबरोबर विवाह होण्याचा योग रामाच्या आयुष्ता आला ही त्यातल्या त्यात चांगली घटना त्याच्या आयुष्यात घडली. पुढे अयोध्येत त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असतानाच त्याच्या नशिबी १४ वर्षांच्या वनवास आला. वनवास संपल्यावर सीतेच्या चारित्र्यावर संशय घेताला गेला. त्यामुळे अयोध्येच्या राज्याची राणी होण्यऐवजी ऋषीच्या आश्रमात राहण्याची पाळी तिच्यावर आली. राम वनवासात गेला त्यावेळी तो २५ वर्षांचा होता तर सीता अवघी २० वर्षांची होती. वनवासात सीताहरणाचे दुःख त्याला सहन करावे लागले. त्या दुःखाने तो वेडापिसा झाला अशा आशयाचे श्लोक रामायणात आहेत. सीतेचा शोध सुरू केला तेव्हा जटायूकडून त्याला सीताहरणाचा वृत्तांत समजला. पुढे वालीला ठार मारून त्याचा सख्खा भाऊ सुग्रीव ह्याच्याशी त्याचा मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. तिथेच हनुमंताची भेट झाली आणि सीतेची सुटका करण्यासाठी सुग्रीव सैन्याची त्याला मदत मिळाली. सेतु निर्माण कामात त्याला नलनील ह्यांचे सहाय्य झाले. लंकेत प्रवेश आणि रावणाशी युध्द करण्यापूर्वी रामाला अनेक अडचणींचा सामन करालवा लागला. रावणाला ठार करून सीतेची सुटका करण्यात त्याला यश मिळाले. त्याच्यासोबत वनवासाला गेलेल्या लक्ष्मणावरही प्राणान्तिक प्रसंग आला. अवतार कल्पनेनुसार राम हा विष्णूचा अवतार तर लक्ष्मण हा शेषाचा अवतार. मनुष्य जन्मात विष्णूबरोबर शेषालाही खूप त्रासाला सामोरे जावे लागले. ह्या संदर्भात संत नामदेवांनी मजेशीर गोष्ट सांगितली आहे. कृष्णावतार घेण्याची वेळ आली तेव्हा विष्णूने शेषाला सांगितले, ‘अवतार घेण्यास तयार हो!’ त्यावर शेष म्हणाला, ‘नाही बोवा! मागे मी तुझ्याबरोबर लक्ष्मणाचा अवतार घेतला तेव्हा तुझ्याबरोबर मला निष्कारण वनवासात पायपिट करावी लागली होती. त्यावर विष्णू म्हणाला, कृष्णावतारात तू माझा मोठा भाऊ बलराम हो. मी कृष्णाचा अवतार घेणार असल्यामुळे राज्यकारभाराची कटकट मी सांभाळणार. तू मोठा भाऊ असल्यामुळे तू राज्याचा प्रमुख राहशील. तुझ्या डोक्याला कुठलाच ताप होणार नाही!एकूण रामाचे आयुष्य तसे पाहिले तर खडतर होते. पण रामायणात त्याचे चरित्र असे काही रेखाटण्यात आले आहे की लाखो लोकांना ते अतिशय प्रेरणादायक वाटते. ते इतके प्रेरणादायक आहे की भारतीय जनमानसाने रामाला देवत्वाचा दर्जा बहाल केला. देशभर त्याची देवळे उभारली गेली. अयोध्येतही त्याचे विशाल देवालय उभारले जात आहे. रामाचे चरित्र जितके स्फूर्तीदायक तितकेच कृष्णचरित्रदेखील स्फूर्तीदायक आहे. महाभारताचा बराचसा भाग कृष्णचरित्राशी संबंधित आहे. किंबहुना कृष्णाच्या साह्याविना पांडवांचा विजय झालाच नसता. कोरोना संकटात सोशल डिस्टन्सिंग सांभाळण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकावर स्वतःच्या घरातल्या घरातच स्थानबध्द होण्याची वेळ आली आहे. ही स्थानबध्दता वनवासतुल्य आहे. सध्यातरी सोशल डिस्टन्सिंग ह्या एकाच उपायाने कोरोना विषाणूचा फैलाव थांबवता येण्यासारखा आहे हे खरे असले तरी ही अभूतपूर्व स्थानबध्दता अनेकांना झेपण्यासाररखी नाही. स्थानबध्दतेसारखी दुसरी शिक्षा नाही. ती शिक्षा भोगण्यासाठी बळ मिळावे म्हणून दूरदर्शनामधील कुणाला का होईना रामायणा मालिकेचे पुनःप्रसारण करण्याची बुध्दी झाली असावी!  असावी म्हणण्याचे कारण इंदिराजींच्या काळात अटलबिहारीच्या सभेला गर्दी होऊ नये म्हणून ‘जिस देशमें गंगा बहती है’ ह्यासारखा सुपरहीट सिनेमा लावणारे डोकेबाज अधिकारी दूरदर्शनमध्येच सापडले होते. प्रकाश जावडेकरांनाही दूरदर्शनमध्ये डोकेबाज अधिकारी भेटला असावा! बाबा हे कलीयुग आहे!! रमेश झवर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!