माध्यमांतला युद्धज्वर - सारेच दीप मंदावले नाहीत !

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

पुलवामा हत्याकांडाच्या संतप्त प्रतिक्रिया देशभरात उमटल्या. जवानांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून देश शोकाकुल झाला. सर्व पक्ष, संघटना सरकारच्या पाठीशी उभ्या राहिल्या. सामान्य नागरिक आपला क्रोध, शोक मिळेल त्या स्पेसमध्ये व्यक्त करू लागला. अशा नाजूक, गंभीर आपत्तीकाळात नागरिकांच्या आणि व्यवस्थेच्या संतापाचे, शोकाचे, प्रतिशोधाच्या भावनेचे नेटके, संयत प्रकटन माध्यमातून होणं नितांत गरजेचे असते पण दुर्दैवाने आपल्या माध्यमांच्या अकलेचे दिवाळे निघालेलं असल्यानं याही वेळेस त्यांनी माती खाल्ली. यात वृत्तवाहिन्यांनी सोशल मीडियाच्या खांद्यास खांदा भिडवून आपल्या अपरिपक्वतेचे दर्शन घडवताना लाजिरवाणा पोरखेळ केला. वृत्तवाहिन्यांच्या आक्रस्ताळया सूत्रसंचालकांनी बटबटीत उथळ हेडींग्जद्वारे कळस गाठला. शहीद जवानांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या मुलाखती घेताना वाहिन्यांच्या रिपोर्टर्समध्ये एक असंवेदनशील हपापलेपणा होता ज्याला त्या कुटुंबीयांचं दुःख विकायचं होतं, वेदना 'कॅच' करायच्या होत्या, भावूक क्षणांच्या आडून टीआरपीचा नीच खेळ खेळायचा होता. हातात माईकचं दांडकं, काही हजारात मिळणारा कॅमेरा घेऊन ही टोळधाड या नातलगांच्या घरापाशी उभी होती. पत्रकारिता कशाशी खातात, कोणत्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, त्याचं वर्तन कसं असायला हवं, त्याचं सामाजिक भान कसं असायला हवं याचं तसूभरही संज्ञान नसलेली ही मंडळी अक्षरशः पिसाटलेली होती. एका जवानाच्या अर्धवट बेशुद्ध पत्नीच्या पुढ्यात बसलेल्या तीन वर्षाच्या चिमूरडीला एक निवेदक विचारत होता की, "आपके पापा अब कभी वापस नही आयेंगे, क्या आपको इसका एहसास बेटी ?" मानवतेला काळिमा फासणारं हे वर्तन होतं. पुलवामाच्या घटनेपासून वृत्तवाहिन्या बेताल, बेभान झाल्या होत्या. रक्तपिपासू युद्धज्वराने त्यांना इतकं ग्रासलं की भारतानं पाकवर हल्ला चढवला पाहिजे हे बिंबवण्यासाठी स्टुडीओत युद्धाचे डेमोसेट, डिजिटल साईन्स लावले. मग भडक विधानांचा भडीमार होऊ लागला. 'बच के रहना पाकिस्तान हम नही रहेंगा तेरा नामोनिशान', 'मिटेगा तेरा वजूद नक्शेसे तू सांस लेना जरा हौले से', 'तू तोडना छोड दे तो भी हम मारना नही छोडेंगे', 'अब की बार आरपार', 'घुसना हमें भी आता हैं अब की तेरा सिर काट कर लाना हैं', 'अबके तू नही घुसेगा हम मारेंगे घुसके', 'बच के रहना आतंकीस्तान अबके लढेगा नया हिंदुस्थान', एक ही वार पाक को करेगा तारतार', अशा अनेक अचाट ब्रेकिंग न्यूजची मढी वाहिन्यांनी आपल्या स्टुडीओत जाळली. सर्व ताळतंत्रे गमावून बसलेल्या देशभरातील स्थानिक भाषांच्या वाहिन्यांसह हिंदी, इंग्लिश वाहिन्यांत जणू अहमहमिका लागली. एका वाहिनीने तर पंतप्रधान मोदींनाच अल्टीमेटम देण्याची भाषा केली, ती भाषा त्या सूत्रसंचालकास कधी तरी खोल 'अर्णवा'त बुडवेल हे नक्की ! २६ फेब्रुवारीच्या पहाटेस भारतीय वायूसेनेच्या विमानांनी पाकव्याप्त कश्मीरमधील भागात हल्लाबोल केला. खरे तर पाकवर हल्ला झाल्याचं वृत्त भारतीय माध्यमांनी घटनेनंतर बऱ्याच वेळानं दिलं, पाक लष्कराच्या प्रवक्त्याने ट्विट करून ही माहिती पहाटेच्या सुमारास दिली. त्यानंतर आपल्या युद्धखोर वाहिन्यांना जो चेव चढला होता तो शब्दांच्या पलीकडला होता. शत्रूला धडा शिकवल्याचा आनंद निश्चित व्हायला हवा पण त्याचे रुपांतर उन्माद आणि मस्तवालपणात झाले की विवेक हरवून जातो, उरतो तो दिशाहीन गुर्मीचा मिजास ! या प्रसंगीही काही वाहिन्यांनी याला हिंदूमुस्लीम रंग देण्याचा गलिच्छ प्रयत्न केला. या वाहिनीवर सातत्यानेच हिंदू मुस्लीम वाद भडकाणारी चिथावणीखोर विधाने केली जातात, त्यादृष्टीने ‘पोषक’ चर्चा परिसंवाद आयोजित करून वक्त्यांना, प्रवक्त्यांना हिरव्याभगव्या रंगात खेळवले जाते, द्वेषाचा चिखल उडवला जातो. कदाचित या वाहिनीच्या 'डीएनए'तच असावे ते ! २६/११च्या हल्ल्याच्या प्रसंगी देखील आपल्या वाहिन्यांनी अशीच अपरिपक्वता दाखवली होती, गत सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेसही माध्यमे अशीच वागलेली. रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न ऐरणीवर आला होता तेंव्हा यांनी हिंदूमुस्लीम भेदाची भिंत उभी करण्याचा प्रयत्न केला होता, केरळमधील जलप्रलयाच्या वेळी तिथलं सरकार कुठल्या पक्षाचं आहे तिथं कुठल्या धर्माचे लोक अधिक आहेत याची चर्चा चवीने केली गेली, शबरीमला दर्शन मुद्दा असो की रामजन्मभूमी वादाचा मामला असो आपल्या वृत्त वाहिन्या नाजूक व आपत्तीदायी घटनांना धंदा वाढवून देणारी इष्टापत्ती समजतात आणि त्यातून आपला छुपा अजेंडा राबवतात. हा विखार सोशल मीडियावर तर विषवल्लीसारखा पसरलाय. फेक न्यूज, खोटी माहिती, अफवा, चारित्र्यहनन, बुद्धीभेद यांनी आपला सोशल मीडिया खचाखच भरलेला आहे. अर्वाच्च शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी, गलिच्छ फोटो यांनी ही स्पेस व्यापून टाकली आहे. याला वृत्तवाहिन्या अधिक पेटवताना दिसल्या. भारताच्या हल्ल्याला पाकने प्रत्युत्तर दिल्यानंतर या सगळ्यांचाच तोल जाताना दिसला. काहींनी तर आपण स्टुडीओत नसून युध्दभूमीवर असल्याचा आव आणला. एका मराठी वाहिनीवरील निवेदक हातात खेळण्यातली बंदूक घेऊन लष्करी गणवेशात पाकला धडा कसा शिकवला पाहिजे याचे धडे देताना दिसला तेंव्हा ते दृश्य केवळ संतापजनक नुरता क्लेशदायक वाटले. एका वाहिनीवरील चर्चेत निवेदक सैनिकांचे हेल्मेट घालून सीमेवरील कुंपणावर असलेलं दोरखंडाचं जाळं त्याच्या मंचाला गुंडाळून कार्यक्रम (?) सादर करताना दिसले. एका वाहिनीने कहर केला, त्यांनी व्हीएफएक्स वापरत त्यांचा दिव्य निवेदक विमानाच्या पंखावर बंदूक घेऊन उभा आहे आणि तिथून खाली पाहत (?) तो रिपोर्टिंग करतो आहे असं अचाट दृश्य दाखवलं. अनेक वाहिन्यांनी डोंगर, विमाने, बॉम्बवर्षावाची चित्रे, मृत शत्रू सैनिकांची कलेवरे यांची दृश्ये सर्रास आपल्या बॅकड्रॉपमध्ये वापरली. निवेदक बातम्या (?) देतोय आणि मागं बॉम्ब टाकणारी विमाने असं हे बुद्धीभ्रष्ट दृश्य होतं. पुन्हा कधी जर युद्धजन्य स्थिती उद्भवली तर या लोकांनाच सीमेवर पाठवायला हवे कदाचित मगच यांचा युद्धकंड शमेल.विंग कमांडर अभिनंदन यांच्या कुटुंबियांची ओळख जाहीर करणे, पत्ता सार्वजनिक करणे, त्यांचे मित्र शोधून त्यांची मुलाखत घेणे असे अश्लाघ्य प्रकार करताना आपण काय करतो आहोत याचे भानही त्यांना नव्हते. अपवाद वगळता एकाही वाहिनीने जिनिव्हा कन्व्हेन्शनवर कार्यक्रम केला नाही. आजवरच्या युद्धजन्य स्थितीचा आढावा घेताना झालेल्या जीवित वित्त हानीवर संशोधनात्मक सादरीकरण, युद्धसदृश्य काळात संयमाचे आवाहन, नागरी मालमत्तेच्या सुरक्षासंवर्धक बाबी, युद्धाचे दुष्परिणाम, धोरणातील विसंवाद, अन्यत्र झालेल्या युद्धांचे अभ्यास, कूटनीतीयुक्त विश्लेषणे, घटनेचे जागतिक परिणाम अशा अनेक पैलूंतून यावर प्रकाश टाकणं अभिप्रेत असूनही त्याची वानवा दिसली. तटस्थ वृत्तीने पाहत साधकबाधक दृष्टीकोनातून दिशादर्शक चर्चा घडवून आणणे व या घडामोडींचा भविष्यावर होणारा परिणाम यावर टोकदार कटाक्ष टाकणे अशी वृत्तीही दिसली नाही. या अनागोंदीत 'एनडीटीव्ही' वाहिनीचे वेगळेपण उठून दिसले, त्यातही रविशकुमार यांचे अभ्यासपूर्वक, सौम्य, नेमके विश्लेषण आणि जोडीस असणारी सटीक मार्मिक टिप्पणी ‘सारेच दीप मंदावले नाहीत’ याचा दिलासा देऊन गेली.कुणाचंही नियंत्रण नसलेल्या आणि राजकीय फायद्याचं सुलभ हत्यार झालेल्या सोशल मीडियाने धर्मभेदातून जन्माला घातलेलं मॉबलिंचिंगचं हलाहल जसं हरेकांच्या घरी नेलं तसाच युद्धज्वरही सर्वत्र पोहोचवलाय. अशा वेळी नागरिकांचे कर्तव्य बनतं की काय पाहिलं पाहिजे, कशावर विश्वास ठेवला पाहिजे हे त्यांनी ओळखायला हवं. आपल्यासमोर मांडली जाणारी माहिती खरी की खोटी, त्यामागची उद्दिष्टे काय असावीत याचा अंदाज घेऊन मगच त्यावर विश्वास ठेवण्याचा हा काळ आहे. सत्यता पडताळण्यासाठी विविध वेबपोर्टल्सवरील तथ्ये, परस्परविरोधी विचारधारांच्या दैनिकांच्या वेबआवृत्त्या वाचणे हे सोपे मार्ग ठरू शकतात. कुणाचीही मने दुखावली जातील वा भावना विचलित होतील अशी माहिती शेअर करण्याआधी त्यातील तथ्ये तापासली पाहिजेत इतकं भान आपल्याला यायला हवं. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाचा काही लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी मनमुराद गैरवापर करत आहेत असं गृहीत धरलं तरी आपला विवेक शाबूत ठेवून आपणच याला उत्तर द्यायला हवं, कारण रिमोट अखेर आपल्याच हाती आहे ! - समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!