मला भावलेली झी मराठी वरील मालिका

मला भावलेली झी मराठी वरील मालिका

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

"श्वास तू ध्यास तू , मैत्रीतील बंध तू..... झी मराठी ,मी मराठी "म्हणत घराघरात पोहोचलेली 'झी वाहिनी' आज अख्या महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या घराघरांतून डोकावतेय . आज खरेतर ढीगभर प्रसारवाहिन्या आणि त्यावर सुरु असलेल्या शेकडो मालिकांचे जाळे दूरचित्रवाणीवर जरी पसरलेले असले तरी अनेक मध्यमवर्गीय मराठी ज्ञात कुटूंबामध्ये हमखास आवडीने पाहिली जाणारी वाहिनी आहे - 'झी मराठी'. आमचे घरही याला अपवाद नाही, बरे का ? माझे लग्न झाले, सासरी आले आणि सासरच्या नव्या नात्यांसोबतच एक नवे नाते जीवनात निर्माण झाले ते झी मराठी सोबत, कारण इथे सर्वांचीच ती अतिशय प्रिय. 'दिल्या घरी तू सुखी रहा' ,'होणार सून मी त्या घराची', 'अस्मिता' , 'राधा ही बावरी' ,'जय मल्हार' यांसारख्या जुन्या मालिका असोत वा आता सध्या सुरु असलेल्या 'काहे दिया परदेस','लागिरं झालं जी' , ''तुझ्यात जीव रंगला ' यांसारख्या नव्या मालिका असोत, या सर्वच दर्शकांवर त्यांची छाप पाडण्यात यशस्वी झाल्या आहेत. आमच्या घरी तर रोज संध्याकाळी ६.३० वाजता 'दार उघड बये , दार उघड ' म्हणत झी मराठी आमच्या दूरचित्रवाणीवर अवतरते ते रात्री ११ वाजता 'जागो मोहन प्यारे ' म्हणत ती निरोप घेते.झी मराठी वरची प्रत्येक मालिकाच जरी खूप सुंदर असली तरी मला त्यामध्ये भावलेली मालिका म्हणजे - 'माझ्या नवऱ्याची बायको '. सुरुवातीला या अजब शीर्षकामुळे या मालिकेबद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्यामुळेच अगदी पहिल्या भागापासून पाहिलेल्या मालिकांच्या सूचीमध्ये तिचा समावेश झाला. एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर हा सध्याच्या समाजातील एक गंभीर तितकाच नाजूक प्रश्न ज्या सहजपणे आणि कल्पकतेने यात मांडला आहे ते खरेच वाखाणण्याजोगे. चित्रपटसृष्टी असो वा मालिका... हा विषय दर्शकांसाठी निश्चितच नवा नाही पण तरी याच विषयाला घेऊन एक वर्षांपूर्वी दर्शकांसमोर आलेल्या या मालिकेने सर्वांच्या मनात घर केले  ते तिच्या अप्रतिम मांडणीमुळे आणि मालिकेतील कलाकारांच्या समर्पक अभिनयामुळे.यात कुठेही अति भडकपणा नाही किंवा रेंगाळत एकाच जागी थांबलेले नकोसे वाटणारे प्रसंग नाहीत. सुरु झाल्यापासून ती संथपणे वाहतेच आहे एका नदीप्रमाणे...आपल्यातील गुणांनी दर्शकांना तृप्त करत. आणि जसजसे कथानक फुलत गेले ते अधिकाधिक सुंदर होत गेले यात शंकाच नाही.खरेतर 'माझिया प्रिंयाला प्रीत कळेना ' नंतर अभिजीत खांडकेकरला या अशा भूमिकेत पाहणे म्हणजे जरा जीवावरच आले होते . पण इथेही त्याने आपल्या भूमिकेला अचूक न्याय दिला आहे.पत्नी सोडून इतर प्रेमप्रकरण यासारखे चुकीचे काम करायचेही आहे आणि ते करण्यासाठी सुरु असलेला गुरूचा आटापिटा ,पुढे नंतर प्रत्येक वेळी कुठेतरी अडखळून तोंडघाशी पडायचे अन नको तो मनस्ताप डोक्याला लावून घ्या ... पण तरी कुत्र्याच्या शेपटासारखे सरळ न होणारी माणसाची अशी एक जात त्याने आपल्या अभिनयातुन अतिशय प्रबळतेने समोर सादर केली आहे. अशावेळी अशा या गुरूचा राग येत असला तरी कित्येकदा त्याची कीवच येते. यातले एक आणखी मजेदार पात्र म्हणजे शनया. खरेतर शनया हे या मालिकेतील एकमेव खलनायिकेचे पात्र पण इतर खलनायिकांप्रमाणे हिचा कायम राग राग होतच नाही उलट ती मजेशीर वाटते ते तिच्या प्रत्येक प्रसंगी होणाऱ्या फजितीमुळे.गॅरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याइतकी शहाणी, काहीशी बालिश , आळशी आणि कायम इतरांच्या पैशांवर अवलंबून राहून स्वतः मौजमस्ती करू पाहणारी ही  स्वार्थी प्रेयसी, रसिकाने अतिशय सुंदरतेने साकारली आहे. राधिका हे या मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे म्हणूनच नव्हे तर ते पात्र मला अधिक भावते ते ती कित्येकजणींसाठी एक प्रेरणा ठरणारी व्यक्तिरेखा आहे म्हणून . अनिता दातेने साकार केलेली राधिका... एक अतिशय सुंदर ,साधी , सरळ पतिव्रता गृहिणी... घराच्या पसाऱ्यात स्वतःचे अस्तित्व शोधून ते मानणारी, कायम जवळच्यांच्याच नव्हे तर अगदी परक्यांच्याही मदतीला धावून जाणारी, नवऱ्याचे बाहेर सुरु असलेले प्रेमप्रकरण समजल्यावर भावुक होणारी पण तरीही नुसती हार मानून रडत बसण्यापेक्षा त्यातून नवा मार्ग शोधणारी, या शनयारुपी आलेल्या वादळाला अगदी हुशारीने आणि धैर्याने सामोरी जाणारी, परिस्थितीमुळे हतबल होण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करू पाहणारी... एक भविष्यातली उद्योजिका जी आज पुणे मुंबईच नव्हे तर अगदी सिंगापूरपर्यंत एकटी जाऊ शकणारी. ती व्यक्तिरेखा पाहून खूप काही शिकावेसे वाटते. 'एखाद्या स्त्रीने मनात आणले तर ती सर्व काही करू शकते' हा मंत्र या मालिकेतून नक्कीच घेण्यासारखा आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' हे कथानक प्रामुख्याने जरी या ३ व्यक्तिरेखांभोवती फिरत असले तरी त्यातील प्रत्येक प्रसंग जिवंत होतो तो या मालिकेतील इतर पात्रांमुळे मग ते राधिकाच्या मदतीला धावून येणारे आई-बाबा,आनंद ,जेनी असो ,सोसायटी मधले नाना-नानी  ,रेवती असो वा शनायाचे स्वार्थी मित्र. एकूण पाहता एक अतिशय गंभीर, एखाद्याच्या आयुष्यात वादळ घेऊन येणारा प्रश्न आणि त्यावरची उत्तरे अगदी हलक्या फुलक्या रीतीने प्रेक्षकांसमोर साकारल्याबद्दल या मालिकेचे दिग्दर्शक ,लेखक ,कलाकार अगदी सर्वांचेच मनापासून आभार मानावेसे वाटतात. आणि या यासोबतच या मालिकेच्या भवितव्यासाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा. शनया किंवा गुरुनाथ सुधारतील की नाही ते माहित नाही पण येणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून राधिकाची नक्कीच प्रगती होत जाईल आणि तिच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच नवे काही शिकायला मिळत जाईल.- रुपाली ठोंबरे. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!