मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग १० - पडावली आणि मितावली

By vihang8846 on from https://panthastha-awayfarer.blogspot.com

ग्वाल्हेरच्या बाहेरील ऐतिहासिक स्थळभेटीतला माझा पुढचा थांबा होता गढी पडावली. हेही या परिसरातलं सुंदर मात्र काहीसं दुर्लक्षित ठिकाण. या ठिकाणी दहाव्या शतकात बांधलं गेलेलं एक भव्य शिवमंदिर होतं. मुस्लीम आक्रमकांनी ते पाडून टाकलं. मग तेराव्या शतकात जाट राजांनी मंदिराच्या अवशेषांभोवती तटबंदी उभारून एक किल्ला बांधला. हा किल्ला म्हणजेच गढी पडावली. बटेश्वर मंदिरसमूहापासून हाकेच्या अंतरावर ही गढी आहे. आजूबाजूचा परिसर ASI ने संरक्षित केलेला आहे. मी आत शिरलो तेव्हा दुपारचे बारा वाजत आले होते. वातावरण तसे थंडच होते. बटेश्वरच्या तुलनेत इथे बरीच गर्दी होती. परिसरात शिरताच दृष्टीस पडले गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार. संपूर्ण इमारत वीसेक फूट उंच चौथऱ्यावर होती. वर चढायला रुंद पायऱ्या होत्या. एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला सिंहीण अशा दोन महाकाय शिल्पाकृती होत्या. त्या शिल्पांमुळे त्या प्रवेशद्वाराला एक वेगळाच शाही थाट लाभला होता. असे म्हणतात की मूळ सिंहशिल्पे ग्वाल्हेरच्या वस्तूसंग्रहालयात आहेत. इथे ठेवलेली शिल्पे म्हणजे प्रतिकृती आहेत. काळाच्या एवढ्या आघातांनंतर मूळ शिल्पे कुठेतरी जपून ठेवलेली आहेत हे ऐकून मला जरा हायसं वाटलं. अनेक पर्यटक त्या शिल्पांच्या शेजारी सेल्फी काढत होते. गढी पडावलीचे भव्य प्रवेशद्वार आणि तेथील सिंहशिल्पे मुखमंडपाचे कोरीव स्तंभ पायऱ्या चढता चढता दम लागत होता. चौथराच इतका उंच तर मूळ मंदिर किती उंच असेल! वर पोहोचलो आणि दृष्टीस पडला आधीच्या मंदिराचा मुखमंडप. इथे आधी मंदिर होतं हे सांगणारा एवढाच काय तो पुरावा आज शिल्लक आहे. त्याची रचना बघून खजुराहोच्या मंदिरांची आठवण झाली. नाजूक कोरीवकामाने त्याचा इंच न इंच सजवलेला होता. आतील छतावरचे कोरीवकाम तर थक्कच करणारे होते. एका बाजूला गजलक्ष्मी, दुसरीकडे शिव-पार्वती, तर सर्व बाजूंनी खालच्या ओळीवर रामायणातले प्रसंग अत्यंत कुशलतेने कोरलेले होते. तो मंडप बघून मूळ मंदिर किती भव्य आणि रेखीव असेल याची कल्पना मी करत होतो. नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येत होते. त्या काळातले हे या प्रदेशातले सर्वांत मोठे मंदिरे असावे. आज जर ते अस्तित्वात असते तर दक्षिणेकडच्या अनेक विशाल मंदिरांना स्पर्धा निर्माण झाली असती. असो. मंडपाच्या पुढे निव्वळ एक चौथरा उरला होता. चोहो बाजूंनी तटबंदी दिसत होती. उजवीकडे जाटांनी बांधलेल्या महालाचे काही अवशेष दिसत होते. वर जाणारा जिना दिसत होता. मी सहज म्हणून वर चढलो. इथून संपूर्ण परिसर नजरेच्या एका टप्प्यात दिसत होता. आजूबाजूला वस्ती फारशी नव्हती. बहुतांश शेतजमीनच दिसत होती. जाटांनी किल्ला बांधायला हे ठिकाण का निवडले असेल याचा प्रश्न मला पडला होता. कदाचित एखाद्या महत्त्वाच्या दळणवळण मार्गावर हे ठिकाण पडत असावे. असो. तिथे थोडे फोटो काढून मी बाहेर पडलो. छतावर साकारलेले पुराणातले प्रसंग छतावरचे नाजूक कोरीवकाम किल्ल्याच्या गच्चीवरून दिसणारे दृश्य तिथून मी पोहोचलो मितावलीच्या चौसठ योगिनी मंदिराकडे. आपल्या संसद भवनाशी साधर्म्य साधणाऱ्या या मंदिराच्या गोलाकार रचनेमुळे असे म्हटले जाते की संसद भवनाच्या स्थापत्यविशारदाने या मंदिरापासून प्रेरणा घेतली. तर हे मंदिर बघण्यासाठी मी कमालीचा उत्सुक होतो. मितावली गावाच्या जवळ पोहोचलो तशी लहानशी टेकडी दिसू लागली. गाव तर अगदीच लहान होतं. गाव कसलं, लहानशी वस्तीच म्हणा. टेकडीखाली दोन-चारच गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. रविवार असूनही इथे तुरळकच गर्दी होती. वर जायला पायऱ्या बांधलेल्या होत्या. मी वर चढू लागलो. आभाळ झाकोळून आलं होतं. पाऊस पडेल की काय असं वाटत होतं. दहा मिनिटातच मी वर पोहोचलो. समोरच गोलाकार आकारात बांधलेलं मंदिर दिसत होतं. अपेक्षेपेक्षा हे मंदिर लहानच वाटत होतं. त्याला ना कळस होता ना मंडप. आणि बाहेरील भिंतीवर काहीच विशेष कोरीवकाम नव्हते. एका बाजूला प्रवेशद्वार होते. तिथून मी आत शिरलो. आतले दृश्य मात्र थक्क करणारे होते. मधोमध गोलाकार गाभारा होता. त्यात एक शिवलिंग होते. त्याच्या बाजूने गोलाकार असा एक लहानसा मंडप होता. त्याचे खांब साधेच पण सुबक होते. त्याच्या बाजूने एक गोलाकार प्रांगण होते. बाहेरील भिंतीच्या आतल्या बाजूने पाच-सहा फूट उंच असा चौथरा होता. त्यावर एकसारखे असे चौसष्ठ कोनाडे होते. या कोनाड्यांत चौसष्ठ योगिनींच्या मूर्ती असत. मात्र सध्या तरी यांपैकी कोणतीही मूर्ती अस्तित्वात नाही. त्यांच्या जागी शिवलिंगे स्थापलेली आहेत. अनेक शिवलिंगे असल्यामुळे या मंदिरास इकत्तरसौ महादेव मंदिर असेही म्हणतत. एकंदरीत ही जागा एकदमच वेगळी होती. प्रथमदर्शनी अगदीच अनाकर्षक वाटणारे चौसठ योगिनी मंदिर आत शिरताच दिसणारा गोलाकार गाभारा चौसष्ठ कोनाडे हे मंदिर कच्छप राजा देवपाल याने अकराव्या शतकात बांधले. असे म्हणतात की त्या काळी सूर्याच्या अयन रेषेच्या आधाराने गणित आणि खगोलशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासाठी या मंदिराच्या वास्तूचा प्रयोग केला जाई. त्या काळी तंत्र परंपरेचा मोठा प्रभाव होता. या परंपरेचे साधक चौसष्ठ योगिनींची पूजा करत. योगिनींची पूजा करणारा हा संप्रदाय कमालीच्या गुप्ततेत असे. आजच्या घडीला या परंपरेचे कोणी उपासक अस्तित्वात आहेत की नाही याची काहीच कल्पना नाही. त्यांचे विधी, पूजा-अर्चा इत्यादींविषयी बाहेरील माणसाला कोणती माहिती मिळणे दुरापास्त. त्यामुळे या मंदिराविषयीही फार काही माहिती उपलब्ध नाही. किंबहुना १९४० पर्यंत हे मंदिर गुलदस्त्यातच होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात ग्वाल्हेर संस्थानात केल्या गेलेल्या अनेक शोध मोहिमांत कुठेच याचा उल्लेख सापडत नाही. संसद भावनाचे स्थापत्यकार एडविन लट्यंस आणि हर्बर्ट बेकर यांनी कधी इथे भेट दिल्याचाही पुरावा नाही. त्यामुळे संसद भवन या मंदिरावरून प्रेरणा घेऊन बांधले असल्याची कथा निव्वळ कल्पनाविलास ठरतो. असो. आतमध्ये थोडेफार फोटो काढून मी बाहेर पडलो. बाहेरच्या बाजूला एका लहानशा चौथऱ्यावर एक विष्णूचे मंदिर होते. इथून आजूबाजूचा सुंदर देखावा दिसत होता. जमिनीच्या लहानमोठ्या चौकोनी तुकड्यांत शेती डवरलेली दिसत होती. मी काही क्षण तिथे विसावलो. भव्य गोलाकार प्रांगण बाहेरचे लहानसे विष्णू मंदिर मध्य प्रदेशातल्या माझ्या सहलीचा हा शेवटचा थांबा होता. खजुराहोपासून सुरु झालेला हा प्रवास मितावलीला संपत होता. या सहलीत स्थापत्यकलेचा हात धरून जणू इतिहासाचीच मुशाफिरी मी केली होती. प्राचीन काळातली खजुराहोची मंदिरे, मग मध्ययुगात उभारले गेलेले ओरछातले महाल, ग्वाल्हेरमधला आधुनिक काळात पाश्चिमात्य आणि भारतीय शैलींचा मिलाफ घडवत बांधला गेलेला जय विलास महाल, आणि आता प्राचीन काळात बांधलेली, पण जमीनदोस्त झालेली, आणि आधुनिक तंत्रज्ञानाने पुन्हा उभारलेली बटेश्वरची मंदिरे. काळाचे एक आवर्तन पूर्ण झाल्यासारखे वाटले. माणसे मर्त्य असतात. पण कला अमर्त्य असते. श्रद्धा अमर्त्य असते. एखाद्या गोष्टीत जीव गुंतवून ती पूर्णत्वास नेणारी जिद्द अमर्त्य असते. अशा अमर्त्य विचारांचे मूर्त स्वरूपच मी या सहलीत अनुभवले होते. अनुभवांची पोतडी थोडी अजूनच श्रीमंत झाल्यासारखी वाटत होती. भरल्या मनाने मी त्या टेकडीवरून खाली उतरलो. वाटेत जेवण उरकून विमानतळाकडे रवाना झालो. मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पुढच्या सहलीचे नियोजन सुरु झाले होतेच!टेकडीवरून खाली डवरलेली शेते दिसत होतीसमाप्त 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!