भूक

भूक

By Mohana on from mohanaprabhudesai.blogspot.com

"ए, अंग चोरून बसायचं नाही. गुमान उभं राहा माझ्यासमोर...हा, असं. उतरव कपडे अंगावरचे. रडायचं, भेकायचं नाही. जीव नाही घेत तुझा. ड्रामाबाजी बंद एकदम. मी सांगेन ते चाळे करायचे आणि चालू पडायचं दुसर्‍या सैनिकाकडे. काय समजलं का? एऽऽऽऽऽऽ" गोर्‍या कातडीच्या त्या माणसाकडे ती भेदरून पाहत राहिली. तो माणूस काय म्हणतोय तेच तिला कळत नव्हतं. त्यात त्याच्या हातातली बंदूक पाहून तिला जोरजोरात ओरडावंसच वाटत होतं, पण तो सारखा काहीतरी बोलत होता आणि त्याच्या न समजणार्‍या खाणाखुणांनी ती ओरडायचं विसरून वेंधळ्यासारखी उभी होती.त्यालाही भाषेची अडचण जाणवत होती. आता समजुतीने काही सांगायचं तर शांतपणे खाणाखुणा करून संवाद साधता येतो; पण बोलणं सुरू होण्याआधीच त्या पोरीचा घाबरलेला, गोंधळलेला चेहरा पाहून त्याच्या मस्तकात तिडीक गेली. त्याच्या भाषेत तो जोरजोरात हातवारे, आरडाओरडा, खाणाखुणा करायला लागला. तो संभोगासाठी भाषेची गरज नसतेच हे तिला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता. तिच्या डोळ्यातले भेदरलेले भाव त्याला उत्तेजित करत होते. उंदीर - मांजराच्या खेळाला एक प्रेक्षकही लाभला होता. त्याला मात्र त्याची कदर नव्हती. गाव सोडून तो सैन्यात आला तेव्हापासून शारीरिक उपासमार फारच वाढली होती. इतकी वर्ष बर्‍यांचदा गावी जायला तरी मिळत होतं; या वेळेस थेट युद्धालाच भिडायचं त्यांच्या देशाने ठरवलं तसं चित्र बदललं. सहा महिने झाले तरी युद्ध सुरू होण्याचं नाव नव्हतं. घाबरला होता त्याचा संरक्षणमंत्री. जगानेच विरोध करायला सुरुवात केल्यावर युद्धाची कळ दाबायला सारं सैन्य एकत्रित जमवूनही तो तयार नव्हता. दिवसा अंगाची लाही लाही होईल एवढं तापमान चढणार्‍या आणि रात्री गारठून अंग ताठ पडेल अशा या प्रदेशात प्रश्न होता तो किती महिने काढावे लागणार याचाच. पण ते निश्चित नव्हतं. युद्ध खरंच सुरू झालं तर या सैनिकी पोषाखातल्या देहाचं काय होणार ते काळच ठरवणार होता. त्यामुळे आता ताळतंत्र सोडून वागायचंच हा त्याचा निर्धार होता.’मजा मारायचा साला. कोणाला पर्वा आहे आपली नाही तरी आपली. मेलो तर एक दिवस फोटो झळकेल सगळीकडे. आता उदो उदो करता आहेत सैनिकांच्या नावाने, मिडियावाल्यांनी तर कहर केला आहे. कुणाच्या तरी घरातल्यांना गाठतात आणि व्ही. डी. ओ. भेट घडवतात त्या घरातल्या सैनिकाशी. अरे, आणखी जीव तळमळतो घरच्या आठवणींनी. दोन मिनिटं बघायचं आणि आय लव्ह यू चा धोशा लावायचा. सध्या भाव आहे, मेलो तर वर्षातून एकदा करतीलच तो मेमोरिअल डे साजरा आमच्या नावाने की झालं. एक बायको आणि पोरं चार दिवस अश्रू ढाळतील तेवढे...’ जागृत होणार्‍या भावना टाळत त्याने समोरच्या काळ्याभोर शिल्पाकडे पाहिलं. त्या पोरीबरोबर मजा मारायला बाकीच्या सैनिकांनी त्याला समजून एकांत दिला होता. खूप दिवसांची खुमखुमी काढणार होता तो.  कोपर्‍यात उभ्या असलेल्या  दुसर्‍या मुलीचं अस्तित्वं त्याला जाणवलं नसतं तर तो पुरुष कसला. मुद्दामच त्याने तिची दखल न घेतल्यासारखं केलं होतं. मिळालेल्या संधीचा त्याला सिनेमास्टाईलने उपयोग करायचा होता. तरीही त्याची आशाळभूत नजर कायलंचं शरीर भेदून आरपार शिरत होती. त्याच्या नजरेला ठळकपणे पडण्याआधी शरीर जेवढं आक्रसता येईल तेवढं आक्रसून घेत तिने थिजल्या नजरेने पाय मुडपून स्वत:ला अधिकच कोपर्‍यात रेटलं. आपलं अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न ती होता होईल तेवढा करत राहिली.गुरगुरत्या पुरुषी आवाजाने कायलचा थरकाप उडाला. पायात मणामणाच्या बेड्या अडकल्यागत तिने आपला देह त्याच्यासमोर रेटला. आपल्याच वर्गातल्या शेवंताचा उघडानागडा देह पाहताना तिने शरमेने मान खाली घातली होती, पण आता तिच्याच बाजूला उभं राहिल्यावर आपली अवस्था काय होणार हे तिच्या लक्षात आलं होतं. तरीही प्रतिकार करायची ऊर्मी तिला आवरता आली नाही. तिने शेवंताशी चाळा करणार्‍या त्याच्या हाताला जोरदार चिमटा घेतला. भडकलाच तो."थांब तुला पण मजा चाखवतोच." दातओठ खात त्याने तिचा शाळेचा पोषाख टराटरा फाडला. कायलने हाताने शरीर झाकायचा तोकडा प्रयत्न केला. आता दोन जीवांची मेजवानी त्याच्यासमोर होती. कशाची पर्वा करायची गरज नव्हती. दोघींचा आक्रोश, सैनिकी पोशाख, त्याच्या वाटेकडे डोळे लागलेली त्याची बायको, मुलं सगळं धूसर झालं होतं. उरला होता तो पशू. पशूसुद्धा बरा म्हणायची वेळ आणणारं वर्तन तो करणार होता आज. पहिल्यांदाच दाखवत असलेलं हे पुरुषीपण जरा जास्तच होतं आहे हे त्याला पटत होतं. तो इतका वाईट नाही असं त्याचं त्यालाच आतून आतून कुणीतरी सांगत होतं; पण वासनेने त्याच्या मनाचा तोल ढळलाच.’युद्ध संपेल म्हणून गेले सहा महिने शरीर खितपत पडलंय एका एका सैनिकाचं, जागं होणारच ते. माणसाचंच लक्षण म्हणायचं असतं त्याला. पण ह्या पोरींनी जरा जाणीव दाखवली असती तर ही वेळ कशाला येईल? समजुतीचा मामला असला की बरं पडतं. प्रेतासारख्या थंड उभ्या आहेत दोघी.’ एकदम त्याचा पारा चढला."एऽऽऽ मी नाही तुम्हाला इथे बोलावलेलं. मेजरनेच सांगितलं आम्हाला की पैसा फेकला की तुमचा समाज पोरी पुरवतो म्हणून. त्यानेच केली ही व्यवस्था आणि तुम्ही काय चालवलाय हा तमाशा? बास झालं आता रडणंभेकणं. नीट वागलात तर मी सुद्धा प्रेमाने वागेन, नाहीतर माझा सैनिकी खाक्या दिसेलच ." दोघींच्या अंगावर धावलाच तो. त्यांना मारत, आडवंतिडवं तुडवीत आळीपाळीनं त्याने त्या दोघींना उपभोगलं. सुख ओरबाडलं.पन्नास हजार सैनिकांचा तो फक्त एक प्रतिनिधी होता. गेले सहा महिने नुसतीच प्रतीक्षा चालली होती. सुरुवातीचे दिवस बरे गेले म्हणा. वातावरणातला बदल, वेगळं अन्न, सगळ्याची बदललेली चव बरी वाटत होती; पण काही दिवसांतच नावीन्य संपलं. रटाळ कंटाळलेपण भरून राहिला सर्वत्र. आता युद्ध सुरू होण्याची वाट पाहण्याव्यतिरिक्त काहीच उद्योग उरला नाही. त्यांचा देश पुढारलेला. इ मेल, व्हिडिओ टेप अशा अत्यानुधिक सोयींनी घरच्यांशी संपर्क होताच. पण ह्याच गोष्टी मनाचा ताबा ढासळवून टाकणार्‍या ठरत होत्या हे कोण सांगणार त्याच्या देशातल्या प्रसारमाध्यमांना. ती तर चेकाळल्यासारखी देशभक्तीच्या भावनेने सैनिकांचं मनोबळ वाढवायच्या प्रयत्नात होती. आधीच भौतिक सुखाला सरावलेल्या सैनिकांना या वातावरणात रुळणं कठीण पडत होतं. प्रशिक्षण वेगळं आणि प्रत्यक्ष रणभूमी निराळी. खाण्यापिण्याच्या वेगळ्या सवयी,  आजारपणं, वैफल्य याच्याच जोडीला विषयवासनेने उद्दीपित झालेल्या सैनिकांना आवरण्यासाठी शेवटी मेजरला अतिशय धाडसी पाऊल उचलावं लागलं.हवेत मातीचा धुरळा उडवीत चार जीप गावात शिरल्या तशी तिथली शांतता ढवळून निघाली. भटकणारी काही पोरं गाड्यांच्या मागे धावत सुटली. शहरातला साहेब आला तरच दिसणारी गाडी वाड्यातल्या लोकांचं आकर्षण, विरंगुळ्याचं साधन होतं.  चारदोन पोरं, भुंकणारी एक दोन कुत्री याव्यतिरिक्त कंटाळवाणी स्वस्थता नांदत होती. वातावरणात कसलीच हालचाल नसलेलं ते गाव सुस्तावल्यासारखं भासत होतं. वाडीतल्या गर्द लाल विटांच्या झाडीत वसलेल्या घरांसमोरही तसाच आळसावलेला कंटाळा जाणवत होता. दुपारची निवांत वेळ. कामधाम आटपून मिश्री लावत बायकांचा आराम चालला होता. ही वेळ त्या सगळ्यांच्याच आवडीची. पुरुष शेतावर नाही तर रोजंदारीत गुंतलेले, पोरीबाळी टेकडीवरच्या शाळेत अडकलेल्या. जेवणखाणं आटोपलं की गप्पा मारता मारता गोधड्या शिवत बसणं हा नेहमीचा उद्योग. नीनाने ह्या गोधड्या शहरात नेऊन विकल्या की थोडेफार पैसेही मिळत. जेमतेम चार महिनेच त्यांना मिळत. एकदा का बर्फ पडायला सुरुवात झाली की चार भिंतींच्या आता राहणं सक्तीचं. मग सगळं ठप्प. अगदी कोंडल्यागत. त्यामुळे जीवघेणा उकाडाच बरा वाटायचा. निदान एकत्र जमून गप्पा मारत मारत गोधड्या शिवण्याचं काम चालू राहतं. आता तर लोणची, मसालेसुद्धा एकत्र बसून एकाच ठिकाणी करायचे असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. गप्पा होतात आणि कामाचा थकवा जाणवत नाही.  मुलं पण शाळेत गेलेली. चार खणांची टेकडीवरची शाळा म्हणजे बायकांची संजीवनी होती. शहरातले इनमिन दोन शिक्षक चार पाच वर्ग चालवत होते. गावातल्याच एक दोघांच्या घरी तो शिक्षकवर्ग रहायचा. चार महिने शिकवायचं. बर्फ पडायला लागला की गावाचा संपर्क तुटायचा जगाशी. त्याच्या आधी शाळा बंद करून शिक्षक शहरात परतत. गावाकडून दोन्ही शिक्षकांना प्रेमाची वागणूक मिळे. त्यामागे पोरंबाळं लिखापढी करून शहराचा मार्ग धरतील. आपल्या नशिबी दोन वेळची रोटी तरी येईल ही भावना तर होतीच; पण पोरं शाळेत गेली की चार क्षण निवांत घालवायला मिळतात. सुखदु:ख उगाळता येतात यातलं समाधान अधिक होतं.आजही गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. नीनाने नेहमीप्रमाणे काही तरी नवीन योजना त्यांच्यासमोर मांडली होती. तिचा उत्साह, हुशारी सगळ्या गावाला नेहमीच थक्क करून जायची. बुकं न शिकता ही एवढी हुशार कशी हे त्या वाडीच्या दृष्टीने कोडंच होतं. पण तिला कुणी विरोध केला नाही. झाला तर फायदाच झाला होता  सगळ्या वाड्यांना तिच्या नवीन नवीन योजनांचा. शाळासुद्धा तिच्याच पुढाकाराने चालू झाली. मुलांना शाळेत पाठवून काय करायचं असं विचारणार्‍या बायाबापड्यांना तिने पोरांच्या कचाट्यातून कशी सुटका होईल हीच लालूच दाखविली होती. नंतर मग सगळे फायदे आपोआपच लक्षात आले होते प्रत्येकाच्या. आत्ताही उत्साहाने ती काही तरी बोलत होती. तेवढ्यात तिच्या कानावर कसलासा आवाज आला. त्यानंतर जोरजोरात आरडाओरडा. क्षणभर हृदयाचे ठोके थांबल्यासारखं वाटलं नीनाला. एव्हाना बाकीच्यांच्या कानावरही आरडाओरडा पडला. ’साळा, साळा’ कुणीतरी आवाजाच्या दिशेचा वेध घ्यायचा प्रयत्न केला तशा जीवाच्या आकांताने सगळ्या जणी शाळेच्या दिशेने धावत सुटल्या.चार खोल्यांच्या त्या शाळेच्या आवारात क्रूरतेने थैमान घातलं होतं. आरडाओरडा, रडारड, पळापळ आणि हातात बंदुका घेतलेली दोनचार अनोळखी माणसं एवढंच दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. बंद ट्रकमध्ये टिपलेल्या मुली बंदुकीच्या नळीने ढकलल्या जात होत्या. आक्रोश, आरडाओरडा, जीपच्या टायर्सनी उडविलेले धुळीचे लोट आसमंत लालसर करून टाकत होते. आपापल्या मुलींना शोधता शोधता प्रसंगावधान राखून जिची सुटका करता येईल तिला हाताला ओढून बाजूला काढत होत्या सगळ्या जणी. थरथर कापणार्‍या नीनाचे डोळे कायलला शोधत होते. दरम्यान दोन तीन बायकांना झाडाच्या मागे आडोशाला धाडलं तिने. बाजूला ओढून घेतलेल्या मुलींना ती तिकडेच ढकलत होती. त्या दोघी मग हळूच बंदूकधारी माणसांना चुकवून उतारावरून लपतछपत त्या मुलींना वाडीकडे जायला मदत करीत होत्या. पण किती? दोन चार मुलींनाच सोडवता आलं. बंदुकीच्या नळ्या त्या माणसांनी आता या बायकांच्या जमावावरही रोखल्या तशी त्यांना माघार घेणं भागच होतं. तेवढ्यात घामाने थबथबलेल्या कायलचे वर्गाच्या दाराच्या आडचे डोळे नीनाच्या दृष्टीला पडले तशी तिने कायलच्या दिशेने धाव घेतली. ती कायलपर्यंत पोचेपर्यंत अंगाखांद्यावर पडलेल्या दंडुक्याच्या माराची तिला पर्वा नव्हती; पण ती कायलपाशी पोचून तिचा हात धरणार तोच बंदुकीचा दस्ता तिच्या डोक्यावर एवढ्याने बसला की ती कोसळलीच. अवघे चाळीस सेकंद. खाली पडता पडता तिच्या कपाळावरची शीर तडतडली. हाच क्षण आहे कायलला वाचवायचा. एकदा हा पोटचा गोळा हातातून सुटला तर पुन्हा म्हणून भेटायचा नाही."कायलऽऽऽ, कायलऽऽऽ" उठण्याचा प्रयत्न करीत तिने हात पुढे करण्याचा प्रयत्न केला पण पूर्ण शाळाच तिच्याभोवती गरगरा फिरली. तिने पुन्हा एकदा स्वत:लाच बजावलं. या क्षणी तिला उभं राहणं भाग होतं. जबरदस्त इच्छाशक्तीने ती कशीबशी उठून बसती झाली. डोळे उघडून तिने  इकडे तिकडे पाहिलं. पण सगळीकडे शांतता पसरली होती. शांतता, भयाण शांतता! डोक्यातून भळभळा वाहणारं रक्त थोपवण्याचा प्रयत्न करत ती उठून बसली. आजूबाजूला सगळ्या बायका असूनही तिथे पसरली होती शांतता. काळीज चिरून जाणारा आक्रोश बरा असं म्हणावंसं वाटणारी शांतता. प्रत्येक जण हृदयात न मावणारा आकांत अश्रूंनी ढाळत बसला होता. मूकपणे. बाकी सारं कसं अगदी शांत शांत होतं. थोडा वेळ नीना काय घडलं त्याचा विचार करत तशीच बसून राहिली. पण आता काहीतरी करायला हवं याचं भान लगेच आलं तिला."चला, रडून न्हाई काम व्हनार. आदमी धुंडाळा कुटं हायेत. त्येंच्या कानावर घालू म्हनत व्हते मी."नीनाने थरथरणारी बोटं दोघींच्या हातात गुंतवली. एकदोघींनी तिच्या गळ्यात पडून दु:खाला वाट मोकळी करून दिली. एकमेकीचा आधार घेत सार्‍याजणी उठल्या."माजी शेवंता, अगं नीना तू भैनीवानी ग आमाला. आनून दे माजी शेवंता. दे ना गं. दे..."शेवंताची आई धाय मोकलून रडायला लागली तसा सगळ्याजणींनीच गळा काढला. नीनाची त्यांना शांत करण्यासाठी तारांबळ उडाली. शेवटी सगळ्या जणी फॅक्टरीच्या दिशेने निघाल्या."कुटं नेलं असेल नराधमांनी या पोरींना? कुटं सोधायचं?कसं आननार परत त्येंना?कोन व्हती ती मानसं?आनी बंदुका गावल्या कुटं?" प्रत्येक जण नीनालाच जाब विचारत होती. प्रत्येकीलाच आपल्या पुरुषाला काय जाब द्यायचं या चिंतेने घेरलं होतं."मले काय बी मायत नाय ग बये. बंदुका व्हत्या सगल्यांजवल. पोरी पलवल्या म्हंजी पोलिसांकडं जाया लागेल येवढंच माज्या द्यानी येतं बग. टकली नगं उटवू कुनी माजी. आनी पोलिसात जायाचं तर किती घंटं लागतील कोनाला ठाव." नीनाने बायकांचं बोलणं थोपवलं."बापय मानसाला धाडू, मिट्ट कालोक पडल वापीस यायचं मंजी.""कसापायी या साळा सुरु केल्या मास्तरानं देव जानं. तुज्यामुलं जालं ह्ये रामायन" रुपा कावल्यागत पुटपुटली तसं नीनाने तिला थोपवलं."तू सबुद बोलायची कोसीस काय उगा करती व्हय? सालत सिकून पोरांनी आपल्याला बी आकल दिलीच की. या परसांगातून निबवायला पन त्येचाच उपेग व्हईल. पोरांकडून चार अकलंच्या गोस्टी सिकलो तेचा उपेग व्हनारच ना?"नीनाचं म्हणणं पटल्यासारख्या सगळ्याजणींनी मान डोलावली आणि त्या छोट्याशा गावातल्या कारखान्यासमोर पोचण्यासाठी  धावपळ उडाली. आजूबाजूच्या वाड्यांतले सगळे पुरुष इथेच कामाला होते. दिवसपाळी रात्रपाळी आटोपली की दारूच्या अड्ड्यावर धिंगाणा घालणं हे सगळ्या वाड्यांतल्या पुरुषांचा आवडता उद्योग. पुरुषांनी कामावरून दारूच्या अधीन व्हायच्या तिथे पोचणं भाग होतं. दारवानाने पांडेवाडीतल्या बायका आल्याचं सांगितल्यावर पुरुष धावत बाहेर आले. सगळ्या बायका एकदम का आल्या असाव्यात हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता.रडत भेकत बोलणार्‍या बायकांना नीनाने आवरलं. काय झालं आहे ते तिने समजावून सांगितलं. बायकांना जबरदस्तीने परत पाठवून पुरुषांनी पोलिसचौकीच्या दिशेने धाव घेतली. फॅक्टरीभर ही बातमी वार्‍यासारखी पसरली. वाड्यावाड्यातले पुरुष मुलींचा शोध घ्यायला इकडे तिकडे पांगले.पोलिसचौकीत तक्रार नोंदवून, शक्य तिथे शोधण्याचा प्रयत्न करून वाडीतल्या लोकांना यायला मध्यरात्र उलटली. कुणाला काही अंदाज करता येत नव्हता. पुन्हा हे असं काही तरी प्रथमच घडत होतं. त्या भागातल्या वाड्या वाड्यांमध्ये तसा सलोखा होता त्यामुळे वातावरण शांतच असायचं. काही कुरबूर असली तरी पंचायत होतीच. आत्तापर्यंत भरदिवसा शाळेवरच धाड घालून मुलींना पळवून नेल्याची ही पहिलीच घटना. गाव सुन्न झाला.शाळेतल्या पंधरा मुली नाहीशा झाल्या होत्या. तरीही वाडीतली शाळा मात्र नीनाने बंद पडू दिली नव्हती. तिने वाडीतल्या बायकांची समजूत घातली. आळीपाळीने बायका, मुलं दंडुके, दगड घेऊन जवळपास लपून बसत होते शाळेच्या. पण तरीही शाळेमधली हजेरी कमी होत चालली होती. पुन्हा गेलेल्या मुलींचा शोध लागायचा होताच.  आता हे नित्याचं होत चाललं होतं. दर आठ दिवसांनी कुठल्या तरी वाडीवरची शाळा लुटली जायची. पुन्हा तोच आक्रोश, शोधाशोध आणि नंतर सगळीकडे रिक्त पोकळ मनं. शहरातली गुंडगिरी गावाच्या उंबरठ्यापाशी पोचली होती.रात्र रात्र विचार करून नीनाची रया गेली. कायलच्या बापाने तर पोरीचं नावच टाकलं. आता ती परत आली काय किंवा नाही त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच. तिच्या नावाने आंघोळ करुनही तो मोकळा झाला."नीना, तू बी सोडून दे पोरीचा इचार. एक बी पोर परत गावली नाय गावाला. सहा मयनं व्हतील. पोरी फकस्त चालल्या आहेत गावातून." सदाने नीनाला समजावण्याचा प्रयत्न केला तशी ती चवताळलीच."भाड्या लाज नाई का तुला?तुजी पोरगी कसातून जातीया तितं ते बग माज्या राजा."तो गप्प झाला. आपली बायडी येताजाता उखडलेली का असते हे बिचार्‍याला कधी उलगडलंच नव्हतं. शेजारच्या वाडीतली ही मुलगी लहानपणापासून अशीच. सगळ्या वाड्यात तोंडाळ म्हणूनच ओळखली जायची. येता जाता तिच्या दादल्याचं काय होणार लग्न झाल्यावर ही चिंता व्यक्त करायचा प्रत्येकजण. पण एकीकडे सगळ्यांना तिचं कौतुक पण होतं. बंडखोर, उद्योगी नीना कुठल्याही बाबतीत पुढाकार घ्यायला तयार असायची. तो तिच्या याच गुणावर भाळला होता. मामाच्या मागे लागून या मुलीशी त्याने पंचवीस वर्षापूर्वी सोयरीक जमविली तेव्हा वाड्यातल्या प्रत्येकाने त्याला तो निखारा पदरात बांधतो आहे असं म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण पुरुषांना काय पदर असतो निखारा बांधून घ्यायला असा विनोद करीत तो ठाम राहिला होता. पुढेमागे होईल शांत असं स्वत:लाच समजावत तो तिच्या स्वभावातल्या तिखटपणाचं मनातून कौतुकच करत असे. पण नीना तशीच राहिली. हळूहळू वाडीनेही तिचा स्वभाव स्वीकारला. कुठल्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडायचं तर वाडीसाठी नीना नक्कीच तिथे असणार हे प्रत्येकाला माहीत होतं, अपेक्षित होतं. आताही तिचं बोलणं त्याला झोंबलं तरी नवीन नव्हतं. नीनाचे विचार, कृती सगळ्यात कुठेतरी बंडखोरपणा असतो हे त्याला परत नव्याने जाणवलं. तो थोडा वेळ शांतपणे पडून राहिला. ती त्याच्याकडे नजर लावून बसली."नाही, सगलं थांबवनार हाय मी. ती पोर काई खुसीनं गेली? मी रान उटवनार, सगल्यांना जागं केल्याबिगर र्‍हानार नाय. पोरीचा सोद असा गुमान बसून न्हाई लागायचा.""कर काय करनार ते. माज्या मागं लागू नको म्हंजी जालं. ती माजी बी पोर हाय नी मला बी कालीज हाय येवडं द्यानात ठीव बरीक."’मग कालजावर दगुड ठीवल्यागत कसापायी वागनं तुजं?’ मनातला प्रश्न ओठावर येऊ न देता तिने विषय संपवला."सा मयनं जालं. कुनी बी गावात येतं. बंदूक दावतं आनं घेऊन जातं आपल्या पोरींना. आपण सोदंत रातो. पोलिस येतात निवांत. त्येच्या नंतर काय? सालंत बी जायला तयार न्हाई कुनी आता. आपनंच सोदून काडायला हवं ही मानसं कोन हायेत ते. उगी राहून न्हाई चालायचं."नीनाने वाडीतल्या पारापारावर भाषणं द्यायला सुरुवात केली. कधी गावच्या गाव लोटायचा तर कधी पडेल चेहर्‍याने ती घरी परतायची. शेवटच्या वाडीपर्यंत पोचेपर्यंत तिने चार पाच तासांची पायपीट केलेली असायची. हळूहळू नीनाबरोबर काम करणारे हात वाढले. कुठल्याकुठल्या वाडीतून येऊन लोक दु:ख मोकळं करायला लागले. आठवड्यातून एकदा वाडीतल्या पारावर बसून ती शोधकामाचा आढावा घ्यायला लागली.आणि अचानक एक दिवस रामवाडीतल्या ठाकुराने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. कॅमेरा घेतलेल्या माणसाला पाहून तिने आपला अचंबा पदरात लपवला. तिची धडपड, मुली हरवलेल्या लोकांचा आक्रोश सारं कॅमेर्‍यात बंदिस्त झालं.गावातल्या तरुण पोरांनी तिचा कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेला फोटो दाखवायला गर्दी केली तेव्हा ती मात्र एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहिली."पुडं काय? काय व्हनार या फोटु आनि बातमीनं. परत येनार का पोरी? सोदनार का ते आपल्या पोरींस्नी? फोटु आला पेपरात म्हनून गुमान बसून नाइ चालनार.  काय तरी आनी कराया पायजे."अचानक तिला धागा सापडला. तिची मुलाखत घ्यायला आलेल्या वार्ताहरानं तिला विचारलं होतं की ती पंतप्रधानांकडे गार्‍हाणं घेऊन जाणार का? त्या वेळेस तिला पंतप्रधान कुठे राहतात तेही माहीत नव्हतं. पण त्या प्रश्नाने तिला एकदम जाग आली. शाळेतल्या मुलांच्या मदतीने तिने शुद्ध भाषेत  गावाची फरफट पंतप्रधानांना कळवली. आता पुन्हा तिच्या आशा पालवल्या होत्या. राहून राहून तिला वाटत होतं, एवढा अख्खा देश या माणसाला पंतप्रधान करतो म्हणजे त्याच्या इशार्‍यावर नक्की कामं होत असणार.ती दर पंधरा दिवसांनी येणार्‍या डाकेनं पंतप्रधानांच्या पत्राची वाट पाहत राहिली. दोन महिने झाल्यावर प्रयत्न निष्फळ ठरला या जाणिवेने निराश झाली. तिच्याबरोबर अथकपणे काम करणार्‍या वाड्यांमधल्या लोकांना तिची निराशा पाहवत नव्हती. कुणीतरी तिलाच पंतप्रधानांकडे भेटायला पाठवू अशी कल्पना व्यक्त केली आणि ती त्या कल्पनेने झपाटली.  पंतप्रधानांपर्यंत पोचायचंच हा निर्धार तिने वाडीवाडीतून व्यक्त केला. त्यांनीही तिला निराश केलं नाही. पै न पै जमवून तिला राजधानीत पाठवलं. सतत दोन दिवस ती पंतप्रधानांच्या निवासस्थानावर बसून राहिली. त्यांची भेट मिळाली नाही तर वर्तमानपत्र, दूरदर्शनवरून सतत मिळणार्‍या प्रसिद्धीने आपलं काम होणारच हे समजण्याइतपत खेड्यात वाढलेली नीना नक्कीच चलाख होती. पंतप्रधानांच्या भेटीशिवाय ती परत आली तरी देशाला नाहीतर मुली पळवून नेणार्‍यांना काहीतरी हालचाल करावीच लागेल याची तिला खात्री होती. तिला खात्री होती आणि गावाला तिच्याबद्दल प्रचंड विश्वास होता.तिच्या अविरत प्रयत्नांना यश म्हणून की काय अचानक नीनाला भेटीसाठी शहरातून सांगावा आला. गावात चेतना जागृत झाली. वर्तमानपत्रातल्या प्रसिद्धीने गावाला आवाज मिळवून दिला.  नीनाने ताबडतोब होकार कळवला,  गाव तिला एकटीला पाठवायला तयार नव्हतं. पण पर्याय नव्हता. तिला एकटीलाच भेट मिळेल हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. पुन्हा वाडीवाडीत तिने सभा घेतल्या. गावाबाहेर वाटाघाटी करून योजना तयार झाली.बघता बघता भेटीचा दिवस उजाडला. काळ्या रंगाची मोठी गाडी गावाच्या वेशीबाहेर उभी होती. अख्खा गाव तिला निरोप द्यायला उभा होता. बुरखा घातलेल्या चालकाने तिच्या पुढ्यात फडका टाकून डोळ्याला घट्ट बांधायला लावला. पट्टी बांधता बांधता तिने निसटता अश्रू सांभाळत तिने सदाकडे पाहिलं. त्याची मूक नजर तिच्या काळजावर चरा उमटवत गेली. ती कुठे चालली आहे, तिचं काय होणार, मुलींना ती आणू शकणार का, कशाचीही तिला अंधुकशीही कल्पना नव्हती. कायलसाठी, बाकीच्या मुलींसाठी ती परत आली नाही तरी हे काम चालू ठेवायला तिने सदाला बजावलं होतं. त्यानेही तिचा हात घट्ट दाबत मूक संमती दर्शवली होती. शांत कुणाच्या अध्यामध्यात नसणारा सदा तिचं काही बरं वाईट झालं तर तग धरू शकेल का याचीच तिला शंका होती. त्यामुळे मुलींचा शोध घेण्याचं काम नक्कीच त्याच्यासारख्या माणसाचं नव्हतं याची जाणीव असूनही त्याने मोडता तर घातला नाही या समाधानात ती गाडीत बसली. गाडीच्या काळ्या खिडक्यांपलीकडचं जग आता तिला दिसत नव्हतं. किती वेळ आपण गाडीत बसलो हेही तिला उमजलं नव्हतं. पण काही तास नक्कीच गेले होते. कोवळी उन्हं रणरणीत झाली होती. चालकाने गाडीतून उतरून तिला मूकपणे चलण्याची खूण केली.छोट्याशा झोपडीवजा खोलीत ती शिरली. उन्हामुळे डोळ्यासमोर एकदम अंधार आला. त्यात बरेच तास बांधलेल्या पट्टीमुळे तिला नीट दिसायला काहीसा वेळच लागला. खोलीतलं दृश्यं पूर्ण दिसायला लागलं आणि सैन्यातल्या कपड्यांतील माणसांना पाहताच तिला सारा उलगडा क्षणात झाला."अक्की दुनिया तुमासंग पारथना करतं तर ह्यो धंदं तुमचं. इतकी जवल हाय हद आनि आमाला संसय बी नाय आला तुमा लोकांचा. देसापायी लडनारी भली मानसं म्हनतो आमी तुमाला आनि ह्ये असलं उद्येग तुमचे.""शांत व्हा बाई. बसा इथे या खुर्चीवर."तिच्यासाठी भाषांतर करणार्‍या वाडीतल्याच श्यामच्या अंगावर ती चवताळून धावली. तिथल्याच सैनिकाने तिला अडवलं. जबरदस्तीने त्या सैन्याच्या अधिकार्‍याच्या समोर बसवलं."माज्या पोरी कुटं हायती? आनी कसापायी तुमी गेवून आले त्येंना ते बी कललं पायजेल." तीव्र कटाक्ष फेकत तिने त्या अधिकार्‍याला विचारलं."बाई, आम्ही बोलावलं आहे तुम्हाला. मला पाहिजे तेवढीच माहिती देईन. तुम्ही आवाज कमी करुन बोललात तर चांगलं. शांततेने बोलणी पार पडावीत हीच अपेक्षा आहे माझी.""तुज्या बाला सांग सांत व्हायाला. मला बी नाय चालत आसं बोललेलं. पर  येल आलीच तर बोलती मी या बासत." नीनाने त्याला प्रत्युत्तर केलं."आधीच आकाशपाताळ एक करुन तुम्ही आमची झोप उडवली आहे. मी आपली बोलणी शांततेने पार पडावीत या अपेक्षेने तुम्हाला बोलावलंय. तुम्हाला हे मान्य नसेल तर परत जाऊ शकता तुम्ही."  अधिकार्‍याचा रागरंग ओळखत नीनाने पडतं घ्यायचं ठरवलं. ती एकदम गप्प झाली."हो. आम्ही तुमच्या मुली वापरतो सैनिकांसाठी. आता लवकरच वर्ष होईल आम्हाला आमच्या देशातून आल्याला. युद्ध सुरु होण्याची चिन्ह नाहीत. युद्धाची वाट बघत किती दिवस भावना काबूत ठेवणार आमचे सैनिक? शरीरधर्म कुणाला चुकले आहेत?""हा ते काय पन असेल. आमच्या पोरी कसापायी वापरता तुमी? सेहरात पाटवा त्येंना. तितं मिलतात अस्या बायका." नीनाला त्या अधिकार्‍याच्या बोलण्याचा रोख कळत नव्हता. पण त्याने तिला एकदम थांबवलं."कशासाठी? आम्ही तुमच्या मुलींसाठी पैसे मोजतोच की. मलाच समजत नाही की सगळा मामला खुशीचा असताना पेपरवाल्यापासून पार तुमच्या पंतप्रधानापर्यंत पोचण्याचा आटापिटा का केलात तुम्ही? तुम्ही काय साध्य केलंत असं करून ह्याचं उत्तर हवं आहे मला. मुलींची किंमत कमी वाटत असेल तर सांगा. करू काही व्यवस्था.""तू काय बोलून राह्यला? मला काय बी उमज पडत नाय. कुटल्या पैक्याची बासा करतो तू? आमाला काय पैका मिलाला नाय आन असला पैका नगंच. आनी कुनीबी खुसीनं नाय गेलं. बंदुकीला घाबरलं त्ये. पैका दिला म्हनं. आमी काय पैक्यासाटी पोरीबालींची सरीरं विकनारी मानसं नाय सायब. सगल्य पोरीस्नी गुमान आना हिथं."काही क्षण गेले. सैन्यातल्या त्या अधिकार्‍याला नव्यानेच सगळा उलगडा झाल्यासारखा त्याचा चेहरा लालबुंद झाला. तो ताडकन उठला. बाजूला उभ्या असलेल्या माणसांच्या कानात पुटपुटला आणि ताडताड पावलं टाकत चालता झाला. क्षणभरात एक माणूस आठ दहा मुलींना घेऊन तिच्यासमोर येऊन उभा राहिला. सगळ्या गोर्‍या कातडीमध्ये तिच्याच रंगाचा तो माणूस पाहून नक्की काय चाललं आहे याची पुसटशी कल्पना तिला यायला लागली होती. ती खवळली."कोनाचा रं तू? तू पुरवतोस मुली या गोर्‍या राक्ससांना? पैका करतो तू आनी ते म्हनतात आमी खुसी खुसी देतो आमच्या पोरी त्येंना."दातओठ खात तो तिच्याकडे बघत राहिला. तेवढ्यात तो अधिकारी परत आला."इथल्या कँपवरच्या मुली ताब्यात घ्या बाई. या प्रकाराची कल्पना नव्हती. पण लवकरात लवकर सगळ्या मुली तुम्हाला परत मिळतील याची खात्री मी देतो तुम्हाला."नीनाला तो माणूस साक्षात देवमाणसासारखा वाटला. लवकरच सगळ्या मुली गावात परत येतील या भावनेने तिचे डोळे ओलावले."सायबा, इस्वास टेवायचा का नाय तुज्यावर ते मला ठाव नाय. पन तुजा सबुद तू पालसील असी आसा हाय. तुला ह्यो चाल्ला व्हता तो प्रकार कलला नवता. पण आता सारं ठाव जालंया. तू सगल्य पोरींना पाटीव परत. मायबापाचं दुवं मिलतील तुला." अधिकारी काहीही न बोलता निघून गेला.नीना आठ मुली घेऊन परतली. सगळा गाव तिच्याभोवती जमा झालं. ओलावल्या डोळ्यांनी तिनं ज्याच्या त्याच्या मुली ताब्यात दिल्या. मायलेकरांची गळाभेट डोळेभरुन पाहिली. सदाबरोबर ती घरात शिरली आणि हुंदक्यांनी तिचं शरीर गदगदलं."त्या मुलीमदं मी कायलला सोदत व्हते. ती दिसली नाय तसं मन लई उदास जालं. कसापायी करतीया मी ह्यी वनवन उपेग नसेल तर?"सदाने तिच्या हळव्या मनावर फुंकर घातली."तुजं काम वाया नाई जानार. कायल गावलंच बग. पण आज किती जनाचं दुवं मिलालं तुला. त्या बी आपल्या लेकीच ना. पोरी कुटं हायेत येवडं कललं ना. पुडं लई सोप हाय आता."नीनाला, तिच्या कामाला या सुटकेने अफाट प्रसिद्धी मिळाली. सैन्याविरुद्ध, दलालाविरुद्ध पावलं उचलण्याची सरकारने ग्वाही दिली. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी तिची जाहीर माफी मागितली. मुलींच्या सुटकेचं आश्वासन दिलं. गाव नीनाबरोबरच स्वत:वरही खूश झालं. मुलींच्या वाटेकडे डोळे लावून बसलं. परत आलेल्या मुलीचा आनंद त्यांच्याबरोबर जगाने साजरा केला. सैनिकांनी केलेले अत्याचार ऐकताना  मुलींबरोबर सगळी गळ्यात गळे घालून रडली. नीना प्रत्येक मुलीला वाडीवाडीतून फिरवून तिच्या यातना व्यक्त करायला सांगत होती. त्या निमित्ताने आणखी हात एकत्र येतील, मिळणार्‍या प्रसिद्धीमुळे सरकार जागं होईल या अपेक्षेत होती ती. पण वाटलं तेव्हढं सोपं नव्हतंच काही. मुली बोलायला तयार नव्हत्या, आई वडिलांना त्यांच्या हळव्या मनावर फुंकर कशी घालायची ते समजत नव्हतं.   आपल्या मुलीचं लग्न कसं होणार या विवंचनेत होते घरातले. त्यात भर म्हणून त्यातल्या एका मुलीला दिवस गेले. लक्षात आल्यावर वाडी बेचैन झाली. पळवून नेलेल्या मुली सगळ्याचं दु:ख होतं तरी अशा परिणामांची कोणाचीच मानसिक तयारी नव्हती. सैनिकांनी केलेले अत्याचार परवडले इतकं लाजिरवाणं वाटत त्या मुलीला. वाडीत कुजबूज सुरू झाली, वाढली आणि वाडीने संगनमताने त्या मुलीला जाळून मारलं. त्या दिवशी मध्यरात्री हा प्रकार कानावर घालायला दहा मैल धावत आलेल्या कातांचा चेहराच नीनाला दुसर्‍या लढाईची सुरुवात सांगून गेला.नीना पेटून उठली. स्वत:वरच उसळली. हे असं काही होऊ शकतं याचा विचार का केला नाही म्हणून स्वत:लाच दोष देत राहिली. सरकारने आश्वासन पाळलं नव्हतंच. ना सैन्यावर कारवाई झाली, ना त्या दलालावर. भरीत भर म्हणून परत आलेल्या मुलींच्या सुरक्षिततेची काळजी हा मोठा प्रश्न तिचं काळीज पोखरून काढत होता. आपल्याच पोटच्या गोळ्यांना त्यांचा दोष नसताना आयुष्यातून उठवणं म्हणजे सैनिकांच्या अत्याचारापेक्षाही भीषण आहे. असं काही घडलं तर सार्‍या गावाने एकत्रित मार्ग काढायला हवा; पण जीव घेणं हे माणुसकीचं लक्षण नाही हे समजविण्यासाठी ती वाड्यावाड्यातून फिरत रक्ताचं पाणी करत राहिली. मुलींच्या सुटकेचे प्रयत्न चालूच होते. आता तिने थेट गोर्‍या लोकांच्या राष्ट्राध्यक्षांनाच पत्र पाठवलं. ते पत्र पोचण्याआधीच प्रसारमाध्यमांनी तिचं गार्‍हाणं त्या देशातल्या जनतेसमोर मांडायला सुरुवात केली. अस्वस्थ मनाने ती वाट पाहत राहिली. तिकडून हालचाल होण्याआधीच सीमेवरून तिला पुन्हा बोलावणं आलं. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. पुन्हा एकदा गाव तिच्या पाठीशी उभं राहिलं. या वेळेस परत आलेल्या मुलींना अमानुषपणे वागवणार असाल तर मला भेटीसाठी जायचंच नाही म्हणून ती सांगत राहिली. तिच्यावर अवलंबून असलेल्या, मुलींचा वाट पाहणार्‍या गावकर्‍यांच्या माना लाजेने झुकल्या. पुन्हा असं होणार नाही याचं आश्वासन मिळाल्यावरच  ती तयार झाली. या वेळेस इतर मुलींबरोबर कायलला घेतल्याशिवाय परत फिरायचं नाही हा तिचा ठाम निश्चय होता.पुन्हा तीच गाडी गावाच्या वेशीबाहेर उभी राहिली. मात्र या वेळेस चालकाचा चेहरा झाकलेला नव्हता. त्याने तिलाही डोळे बांधायला लावले नाहीत. जेमतेम अर्ध्या तासात ते मागच्या ठिकाणी उभे होते.पुन्हा तोच अधिकारी आणि तोच दलाल तिच्यासमोर उभे होते."बाई, तुम्ही पार आमच्या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोचलात. रान उठवलंत तुम्ही. हालचाल करण्याशिवाय पर्याय नाही ठेवलात.""तुमी येवडं सुसिक्सित लोक सबुद पालायच इसरुन गेला नसताव तर ह्ये रामायन कसापाई जालं असतं? अजूनबी इचार करा. पोरी देवा आमाला परत. लई उपकार व्हतील. आनि सरिराची काज आसल येवडी तर तुमच्या पंतपदानाना सांगा आनि सागांवा पाटवा तुमच्या बायका पोरास्नी." सगळ्या वाड्यांच्या मनातलं ती त्या अधिकार्‍यांना म्हणाली."बाई, पंतप्रधानांना काय विनंती करावी हा आमचा प्रश्न आहे. पण तुम्ही म्हणता त्याच इराद्याने तुम्हाला बोलावलं इथे. परत करणारच आहोत तुमच्या लेकीबाळी आम्ही.""या टायमाला सगल्या पोरीस्नी घेऊन जानार हाय मी.""तसं करून चालणार नाही. आणि माझं बोलणंही पूर्ण करू दिलं नाहीत तुम्ही. आम्ही सांगत होतो की या वेळेस पोरी नाहीत फक्त एक पोर ताब्यात देणार आहोत आम्ही तुमच्या."त्या अधिकार्‍याचं बोलणं संपतंय तोच बंदुकीचा दस्ता पाठीला टोचलेल्या अवस्थेत कायल समोर आली. नीनाचे डोळे तुडुंब भरले."काय दसा जाली गं माज्या बयेची." ती स्वत:शीच पुटपुटली. एकदम तिला थकल्यासारखं वाटलं. ज्यासाठी गेले वर्षभर वणवण केली, जिवाचं रान केलं ती पोटची पोर मिळाली होती. एक अध्याय आता संपणार याचा आनंद होताच पण अचानक रिक्त गळलेपण तिच्यासमोर आलं. त्याला बाजूला ढकलायचा प्रयत्न करत तिने डोळे पुसले. आता फक्त कायल दिसत होती. सारं विश्व स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं तिला. ती क्षणभर तशीच कायलकडे पाहत उभी राहिली. तेवढ्यात तिथल्याच एका सैनिकाने जोरदार हिसडा दिला आणि कायलचा तोल गेल्यासारखी ती धडपडली. नीना तिला सावरण्यासाठी पुढे धावली."थांबा."करड्या स्वराने ती दचकली. खिळून उभी राहिली."तुमच्या मुलीला तुम्ही परत नेऊ शकता. अट एकच. यानंतर तुमचं तोंड बंद राहिलं पाहिजे. आमच्या विरुद्ध ब्र काढायचा नाही. आणि तसं झालं तर इथली कुठलीच मुलगी जिवंत हाती लागणार नाही तुमच्या."नीना तशीच पुढे धावली. त्याने पुन्हा तिला थांबवलं."तुम्हाला आमच्या अटी मान्य आहेत असं समजायचं का आम्ही?""आर, जवल तरी गेवू दे पोरीला. नंतर सांगतू मी काय हाय माज्या मनात.""नाही, तुम्ही मुलीला स्पर्श केलात तर आमच्या अटी मान्य आहेत असं समजून मुलीला न्यावं लागेल." सैन्यातला तो अधिकारी रुक्षपणे म्हणाला.नीना पुतळ्यासारखी स्तब्ध झाली. क्षणभर मायलेकी डोळ्यात डोळा घालून एकमेकींकडे बघत राहिल्या. हाताच्या अंतरावर असूनही त्याच्यांत अंतर शिल्लक राहिलं नव्हतं. नजरेने दोघींनी एकमेकांना काय सांगितलं कोण जाणे. कायलने शांतपणे मान फिरवली आणि नीना पाठमोरी झाली. त्या सैन्यातल्या अधिकार्‍याकडे, दलालाकडे तुच्छतेचा कटाक्ष फेकत ती वेगाने बाहेर पडली.परत आलेली नीना नेहमीची नीना नव्हती. बंडखोर, उस्ताही नीनाचा लवलेश तिच्या जागी नव्हता. वाड्यावाड्यातून रोजचे सात आठ तास  केवळ लोकांना या प्रश्नावर पेटून उठवण्यासाठी फिरणारी नीना हरवून गेली. स्वत:ला घरात डांबून ठेवल्यासारखी बाहेर फिरकेनाशी झाली. असं होऊन चालणार नव्हतं. लोकांना पूर्वीची नीना परत हवी होती. आपल्या मुली प्रत मिळवण्याचं बळ त्यांच्या एकेकट्याच्या अंगी नक्कीच नव्हतं. एव्हाना सीमेवरचं हे गाव आणि मुलींवर होणारे अनन्वित छळ पार बाहेरच्या देशांपर्यंत पोचले होते. जशा त्या मुली, ते गाव, तशी हे सारं रामायण पुढे आणणारी नीनाही लोकांच्या मनामनात रुजली होती. तिथं काय झालं या प्रश्नाला नीनाकडे उत्तर नव्हतं की तिला ते द्यायचं नव्हतं? कुणकुण लागली होती पण नक्की काहीच समजत नव्हतं. वर्तमानपत्र, दूरदर्शनच्या वार्ताहरांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. नीनाचं मौन संपत नव्हतं. सगळ्यांनी हार पत्करली. वेळ आली की मी बोलेन हा एकच धोशा तिने लावला होता. आणि आता सगळे त्या वेळेची वाट पाहत होते.शेवटी तिने जाहीर केलं."आज मी लोकांनी आपली दुगं मोकली करावी, सगल्यांनी मदत कलावी म्हनून चालं जालंल्या आनि पंचवीस वरसं प्ररसिद आहे त्या पोग्रॅम मदे बोलनार हाय. त्यो बगा आनि सांगा मी येगलं काय कराया पायजे व्हतं ते."नीना गोर्‍यांच्या देशातल्या प्रसिद्ध कार्यक्रमात सारं काही सांगणार होती. तिच्या गावासाठी या शोचं खास सॅटेलाईट प्रक्षेपण होणार होतं. किंबहुना तिचं बोलून झाल्यावर गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय हेही हा कार्यक्रम लगेच दाखविणार होता. गावकर्‍यांना जशी काय घडलं ते ऐकण्याची उत्सुकता होती तशी तिच्या माणसांच्या सगळं ऐकल्यावर काय प्रतिक्रिया होतील या शंकेने नीना अस्वस्थ होती.वरवर पाहता ती शांतपणे बसली होती. जगातले लाखो लोक आज तिला पाहत होते. तिच्या कर्तृत्वाची गाथा माहितीपटाने संपली. कॅमेरा तिच्याकडे वळला. तिची अश्रूभरल्या नजरेने प्रेक्षकांचा जीव हेलावला. कॅमेर्‍याकडे स्थिर नजरेने पाहत ती बोलत राहिली."त्यांनी मला सांगितलं तू तूजी मुलगी गेवून जा आनी बस गप. कायलला आनलं बी माज्या म्होरं. किती आसुसलं माजं मन तिला जवल घेयाला. पन तेंची अट व्हती. लेकीला गेवून जायाचं तरच हात लाव म्हनाले. आनि सबुद नाई काडायचा त्येंच्याइरुद. लेक माजी लई खराब जाली व्हती. उबी व्हती डोल्यात पानी व्हतं. आमी येकमेकींना डोलाबरुन पायलं. कायलनं मान वलवली. आन मी उटलं तितून. पोरगी सिकली बगा माज्याकदून. मागं लागती तर काय कलनाल व्हतं मी? आनलं आसतं गुमान माज्याबरुबर, पन कोन सोदवनार मग माज्या तितं रावलेल्या लेकीबालींना? मी काय मोटी बाई नाई. मला मोटेपना बी नगं. मी बोलत नवती, वाटायचं मी केलं त्ये बरुबर केलं की नाय. नाय तर लोग मनायचं की आई हाये की वैरीन. म्हनून चुप बसली मी. मी आईच हाये पण तितं अदकून रायलेल्या सगल्यांची. माज्या सगल्या कायल मला परत आनायच्या हायत गरी.""आणि अजूनही कायलची, इतर मुलींची सुटका झालेली नाही?" तिच्या निश्चयाला, टाळ्यांच्या मिळालेल्या कडकडाटाला भेदत निवेदिकेनं तिला बोलतं ठेवलं."नाय, पाच साल जालं या गोस्तीला. येक पल नाय जवा मी सोताला इचारते की कायलला परत आनलं नाय यात माज चुकी नाय ना जाली? पन ही लदाई लदायची हाये मला. सगले आले माज्यासंगत तर सगल्यांना गेवून नायतर येकलीने. जागं करायचं हाय मला या प्रसनावर सगल्यांना. मला पोरीचा लई अबिमान वाटतुया. ती म्हनली असती तर मी आनलं बी असतं तिला. सेवती आयेचं दिल हाय, पन कायलंनं रोकलं मला. आता तिला आनि सगल्या मुलींना आननारच परत. माजी बुमिका मी दावलीया आता. पक्की हाय मी माज्या निचयावर. फकस्त गाववाल्यांनी माग याया हवं. इस्वास टेवाया हवा तेंनी."कॅमेरा गावातल्या लोकांवर वळला. आपल्या मुलीसाठी स्वत:च्या लेकीला परत आणायची संधी नाकारलेल्या बाईच्या मोठेपणाला दाद मिळत होती अश्रूने.गोर्‍यांच्या देशांतील लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शाळेचं तोंडही न पाहिलेल्या बाईच्या शहाणपणाला, धडपडीला मानवंदना दिली. भरल्या डोळ्यांनी नीना उभी राहिली. आता तिला नव्याने बळ आलं. मरगळ कुठल्या कुठे उडाली. परतल्यावर पुन्हा त्याच जोमानं मुलींच्या सुटकेचे प्रयत्न चालू ठेवायचे हा निश्चय तिने समोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांत डोकावत केला.हुंदक्याच्या आवाजात एका कहाणीत पुन्हा रंग भरले जात होते. एका आईच्या अनेक लेकी सोडवून आणायला सारी दुनिया पुढे सरसावली. त्याच कार्यक्रमात वाडीवाडीतून फिरणार्‍या तिच्या थकल्या पावलांना विश्रांती मिळावी म्हणून गाडी देण्यात आली. ही फक्त सुरुवात होती......
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!