भास..

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

सरूबाई खरं तर वाचाळ बाई नव्हती ! लोकांना एक नंबरची चवचाल वाटे त्याचं कारण तिच्या तोंडाचं चुलवण सदा न कदा पेटलेलं राही. याची अगणित उदाहरणे होती. कुणी नवी साडी घालून तिच्या समोर आलं की दातवण लावून काळेकुट्ट झालेली आपली बत्तीशी वेंगाडत ती म्हणे, "एका पिसाने कुणी मोर होत नाही गं रुख्मे !" मग तिच्या खऊट बोलण्यानं समोरचीच बाई गोरीमोरी होऊन जाई. असं बोलल्यावरही एखादी धिटुकली नेटाने समोर उभी राहिली तर ती पुढचं पान टाके, "रुख्मे अगं रुख्मे ऐकलं का, मोर सुंदर असला तरी त्येचं पाय काळंच असत्येत !" अशा बोलण्यामुळे तिच्यापुढं उभं राहण्याची कुणाची टाप नसे. मग त्या हिरमुसल्या बाईचं कौतुक करायचं झालं तर तिच्या तोंडून ते ही नीट होत नसे, "काळी काळी उंदर तिचा सैपाक सुंदर ! " असलं काही तरी भयानक ती बोले. खरं तर तिचा काही फार उजेड पडलेला होता अशातली बाब नव्हती पण वैगुण्यच दाखवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाई. तिच्या कुजक्या टोमण्यांनी ती बाई हैराण होऊन तिच्या डोळ्यात पाणी आल्यावर मात्र गालातल्या गालात हसत ती सावरून घेई, "दिसं कुरूप कलेवर, पर आत्मा असतो सुंदर !' मग समोरच्या बाईच्या ओठावर बेगडी हसू येई. इतकं सगळं घडल्यानंतर त्या बाईच्या लक्षात आलेलं असे की सरूबाईसंगं झेंगट घेऊन चालणार नाही, तिच्या जवळ जाऊन ही उपयोग नाही आणि तिला तोडून तर अजिबात चालणार नाही.सरूबाई हे औदुअण्णा सुपात्यांचे दुसरं खटलं. औदुअण्णांची दौलत रग्गड होती, जमीनजुमला गुरं सगळं दणकून होतं. औदुअण्णा घरातला कर्ता पुरुष, त्याच्या काळात कमी वयात लग्नं व्हायची तसंच त्याचं पण मिसरूड फुटायच्या बेतात लग्न झालेलं, बायको काशीबाई म्हणजे जाम खट ! दावणीत बांधलेली घुमणघुस्की मारकी म्हैस ! औदुला ती आवडत नव्हती पण ती पडली मामाची पोर आणि मामाकडं होता पैसाच पैसा. औदुच्या बेरकी बापाचा हावरा डोळा त्या पैशावर असल्यानं त्यानं ती पोरगी करून घेतली. सासरी येताच काशीबाईनं औदुला अक्षरशः बोटाच्या इशाऱ्यावर झुलवलं. दुभत्या गायीच्या लाथा गोड म्हणण्याशिवाय त्याच्याकडंही पर्याय नव्हता. काशीबाई खूप कमी बोलायची पण जेंव्हा बोलायची तेंव्हा काळजाला दाभण टोचवायची. सगळ्या घरादारानं आपलं ऐकलं पाहिजे असा तिचा तोरा राही. सासू सासरेही तिला वचकून राहत. बघता बघता तिने अख्ख्या घरावर ताबा मिळवला. ती म्हणेल ती पूर्वदिशा झाली. तिच्या वागण्यानं औदुअण्णा पुरता जेरीस आला होता, अस्ती बडवलेल्या बैलासारखी त्याची अवस्था झाली होती. एखादी फट मिळत्येयका याच्या शोधात तो असायचा. घरात सगळी सुखं होती पण बायकोचं सुख नव्हतं आणि ती आल्यापासून घरातली शांतता भंगली होती. त्याची तगमग त्याच्या जिवलग मित्राने श्रीपतीने नेमकी हेरली, त्याला हवी असलेली तृप्ती त्यानं मिळवून दिली. श्रीपतीचं बायजाबाईच्या कलाकेंद्रावर आधीपासूनचं येणंजाणं होतं तिथला फाया त्यानं औदुच्या हातावर असा काही चोळला गडी वास काढत बरोबर कलाकेंद्रावर पोहोचला. तिथल्या संगतीचा त्याला इतका लळा लागला की जरा कुठं अवकाश मिळाला की त्याची पावलं तिकडंच वळू लागली. या जवळीकीचा परिणाम व्हायचा तोच झाला. बारोमास तिथं पडून असणारी बायजाच्या बहिणीची मुलगी सरला त्याच्या नजरेत भरली. बैठकीच्या बारीत ती बसून असायची, नाचगाणं करत नसायची. तरणाबांड देखणा औदु तिच्यावर पुरता फिदा झाला. त्या सुखानं त्याच्या सुकल्या बुंध्याला पालवी फुटली ! घरी काशी आणि बाहेर सरला असं त्याचं 'जंतरमंतर' बिनबोभाट सुरु होतं. नियतीला मात्र त्याच्या ओंजळीत फुलांसोबत दगडगोटेही टाकायचे होते. काही दिवसांनी याचा प्रत्यय आला. महिन्यातनं एकदा सहवास घडूनही लग्नाच्या तिसऱ्या वर्षी काशी गरोदर राहिली, बायको नावडती असली तरी तिच्या पोटात वंशाचा दिवा वाढत होता ज्याच्यापायी औदुच्या मनात चलबिचल सुरु झाली आणि सरलेकडचं येणंजाणं कमी झालं. सरलाचा स्वभाव फाटक्या तोंडाचा होता, तिनंही त्याचा नाद सोडून दिला. काशीचं बाळंतपण सुखरूप पार पडलं, तिला जुळी मुलं झाली ! सुपात्यांचे घर आनंदात न्हाऊन निघालं. तुसड्या बायकोची तणतण सोसत औदु दोन्ही पोरं आपल्या मांडीवर खेळवू लागला. काही महिन्यांनी तर त्याला सरलाचा विसरही पडला. पोरांच्या सुखात तो दंग झाला. सुखाने त्याला वाकुल्या दाखवल्या. दोनेक वर्षानं काशी पुन्हा गरोदर राहिली. या खेपेस तिचं पोट मागच्या वेळेपेक्षा कमी होतं आणि तोंडही सुकून गेलं होतं, गावातल्या राहीबाई सुईणीनं तपासणी करून सांगितलं, 'लक्षणं तर पोरीची आहेत, औदुबाबा जिलेबीची तयारी करून ठेव लेका !" औदु सुखावला. काशीच्या वागण्यात काहीही बदल झालेला नसला तरी अंगणात खेळणाऱ्या बाळगोपाळांच्या संगतीला आता बहिण येणार याचा त्याला आनंद झाला. हा आनंद फार काळ टिकला नाही. नाळ गळ्यात गुरफटल्यानं पोर देठ खुडल्यागतच निपचित बाहेर आली. पोरीच्या विरहानं बाळंतवेड लागलं, त्या धक्क्यातून ती सावरू शकली नाही. अवघ्या काही दिवसात तिचा खेळ आटोपला. औदुच्या आयुष्यातला सगळा पट उलटा झाला, पेरणी पुरी व्हायच्या आधीच माती वाहून गेली ! औदुच्या अधाशी बापानं बक्कळ हुंडावाली पार्टी शोधायला सुरुवात केली तसं त्याचं पित्त खवळलं, वारूळ फुटून मुंग्यांचा लोंढा बाहेर पडावा तसं त्याच्या मनातला सगळा क्रोध बाहेर पडला. रागाच्या भरात तो जन्मदात्या बापाला खूप काही बोलून गेला. काशीचं लोढणंदेखील याच हव्यासापोटी त्याच्या गळ्यात पडलं होतं. ऊस मुळासकट खाऊन झाल्यावर आता माती खायला तो तयार नव्हता. त्यानं बापाला ठणकावलं. पुन्हा बोहल्यावर चढण्यास नकार दिला. पोरं सांभाळायला दाई ठेवली. पुन्हा पहिल्या दमानं शेतीत लक्ष घातलं. मन काबूत ठेवलं तरी धमन्यात सळसळणारं गरम रक्त उसळी मारत होतं, ते त्याला सरलेची आठवण करून देत होतं. खूप प्रयत्न करूनही शेवटी पुन्हा एकदा तो सरलेच्या पुढ्यात हजर झाला. तिनं त्याला दूर लोटलं, बायजाने तिला खूप समजावलं. मालदार असामी आहे, पाट न लावता नुसतं ठेवून घेतलं तरी सात पिढ्याची कमाई होईल असं आमिष दाखवलं पण ती बधली नाही. बायजाने अन्य बायकापोरी पेश केल्या तरी औदुचं पाखरू सरलेच्या फांदीवरच झेपावत होतं. औदुला अक्षरशः नाक रगडायला लावल्यानंतर सरला राजी झाली. श्रीपतीच्या शेतात त्यानं तिला खोली करून दिली, संसार थाटून दिला. तिच्याकडे नेमानं जाऊ लागला. सरलेची भानगड त्यानं गावापासून लपवली नाही, गावाने चार दिवस नवल केलं नंतर गाव विसरून गेलं. पण औदुच्या बापानं हाय खाल्ली, औदुच्या भावांनीही त्याच्यापासून फारकत घेतली. औदुमुळे आपल्या कुंकवाचा धनी अंथरुणाला खिळल्याचं दुःख सखूबाईला सोसता आलं नाही, तिनं औदुला खातेफोड करून दिली. दुसऱ्या लग्नावरून बापाशी टोकाचं भांडण करून बसलेल्या औदुचे सगळे रस्ते बंद झाले. दोन्ही पोरांसह त्यानं घर सोडलं आणि त्याच्या वाट्याला आलेल्या शेतात घर केलं. सरलेलाही तिथं आणलं. गावाने तोंडात बोटे घातली, काहींनी बोटे मोडली. औदु आधी घाबरला पण सरलेनं त्याला भक्कम साथ दिली. पोरं मोठी झाली, शाळेत जाऊ लागली तसं औदुने गावात शेळवण्यांच्या वाड्यात नवं घर केलं. पाण्यानं आपल्या गतीनं झऱ्यातनं वाहत राहावं तसं तो आपल्या तालात गतीत जगत राहिला. दरम्यान बरेच वर्षे अंथरुणाला खिळून असलेले त्याचे वडील आणि त्यांच्या पाठोपाठ आई निवर्तली. औदुच्या भावंडांनी त्याला घराचे दरवाजे पुन्हा खुले केले पण सरलाच्या दबावापायी त्यानं राहत्या घरास सोडलं नाही. सरूची अपार इच्छा असूनही औदु तिला मुलबाळ देऊ शकला नाही. ती मात्र त्या सुखासाठी तडपत राहिली. औदुचा वंश आपल्या पोटात वाढला नाही तर उतारवयात आपल्याला कोण बघणार याची तिला धास्ती होती. दीर्घ सहवासानं तिच्या मनात औदुबद्दलचं प्रेमही फुललं होतं, पण तिची कूस कोरडी राहिली, त्या मातीत काहीच उगवलं नाही. औदुने सरूला धोका दिला नाही पण आपल्या पोरांना बापजाद्यांच्या पिढीजात घराचा लळा लावून दिला, भावकीशी नाळ जोडून दिली. वळचणीचं पाणी आढ्याला न जाता वळचणीलाच गेलं, ती पोरंही त्यात सुखी झाली. काळ वेगाने पुढं निघून गेला. औदुची पोरं मोठी झाली, त्यांची लग्नं झाली. पण त्यांच्या लग्नात सरूबाईला कुणी मानपान दिलं नाही. या अपमानानं सरूबाई धुमसत राहिली. सरूबाईला जमीन जुमला मिळाला, सुपात्यांचं नाव मिळालं, घरदार मिळालं पण जीवाला ज्याची ओढ असते ते सुख कसलं म्हणून मिळालं नाही. आपल्याला जे सुख गवसलं नाही ते आपल्याहून खालच्या दर्जाच्या स्त्रियांना मिळताना पाहून तिचा जीव आणखीनच होरपळून निघायचा. याची परिणती तिच्या कुजक्या शेरेबाजीत झाली. जीभ चाबकासारखी चालू लागली, जिभेवर नागफणा ताठून राहू लागला, संधी मिळताच ती कुणालाही दंश करू लागली. वार्धक्यात दम्याने बेजार झालेल्या औदुने आपला बाजार उरकला, फक डोळ्यात पाणी बघितलेलं. लोकांना वाटलं आता जमीन जुमला, वाडा विकून सरूबाई तिच्या मुळच्या जगात परत जाईल आणि गावाला शांती लाभेल. पण सरूबाईचं इप्सित वेगळं होतं. तिला नुसतं डसायचं होतं. वय वाढत गेलं तसं ती एकाच जागी बसून राहू लागली, येणाऱ्या जाणाऱ्यावर विखारी कटाक्ष टाकू लागली. बसून राहिल्यानं तिच्या अंगाचा घेर वाढत गेला आणि मनाचा परीघ आक्रसत गेला. पुढे जाऊन स्वतःच्या सजण्यासवरण्याबद्दलही तिच्या मनात आस्था उरली नाही. गबाळ्या, कळकटलेल्या अवस्थेतल्या सरूबाईला तिच्या तोंडावर नावे ठेवायची हिंमत कुणातच नव्हती.फुगलेल्या पुरीसारखं गोल गरगरीत अंग, नेसायला जरतारी साड्या असूनही कुठला तरी बोळा काढून तिनं आपल्या अंगाला गुंडाळलेला असे. केस विस्कटलेलं, निम्म्या दातांनी राम म्हटलेला असूनही पान तंबाखूचा बार गालाच्या कोनाड्यात ठोसून असे. तांबारलेले डोळे, तारवटलेली नजर, बोडक्या कपाळावरती टेकवलेला गुलाल, हातात अजब गजब रंगांच्या बांगडया, कळकटून गेलेली गळ्यातली सोनसर, रुंद खोलगट गळ्याचं पोलकं, साडीच्या आडून बाहेर आलेले परकाराचे लोंबते बंद, त्यावर ओघळणाऱ्या पोटाच्या वळकट्या, हातापायाची वाढलेली नखे, हातात पानविडयाचा पितळी डबा अशा बेढब अवतारात सरूबाई बसलेली असे. गावातल्याच काही रंडक्या बोडख्या बायकांचं तिच्याकडे येणं जाणं असे, आठवड्याकाठी किराणा घेऊन येणारा वाणी, पाणक्या म्हादू, दुध घेऊन येणारं नंदू गवळ्याचं पोर इतकीच काय ती तिच्याकडे वर्दळ असे. अख्खा दिवस ती बाहेर बसून असायची. रात्र होताच एकट्याने त्या घरात रहायची. मध्ये एकदा घराला कुलूप लावून ती चार दिवस बाहेर गेली तेंव्हा गावात अफवांना उधाण आलं. पण बायजाबाईच्या तरण्या नातवाला, गरोदर सुनेला घेऊन ती परत आली. लोक चकित झाले पण तिने त्यांना भिक घातली नाही. बायजाबाईची नातसून बाळंत झाल्यावर बाळाच्या बारशाला तिने गावातल्या सगळ्या विधवा बायकांना बोलवलं ! एकाही सवाष्ण स्त्रीला बोलवलं नाही.दांडके तुटलेल्या लाकडी खुर्चीत आपला देह कसाबसा सामावून लोकांची वाट बघत बसलेली सरूबाई दिसली की बायका त्यांचा रस्ता बदलत. गावाला टोमणे मारतच तिचा अंतःकाळ सरला. तिच्यामागे बायजाच्या नातवाने जमीन, घरदार सगळं विकून फुकटात पैसे कमावून गाव सोडलं. गल्लीच्या वळणावर शेळवण्याच्या ज्या वाड्यात सरूबाई बसून तो वाडा जवळपास जमीनदोस्त झालाय. तिथून जाताना कधीकधी सरूबाई दिसते. तिच्या हातात तान्हं मुल असलं की ती फार शांत सात्विक वाटते, ती एकटीच असली की स्वतःच्याच कोपात होरपळत असल्यासारखी भेसूर दिसते. भयाण असले तरी हे भास हवेहवेसे वाटतात...- समीर गायकवाड. दैनिक लोकसत्तामधील लेखाची लिंक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!