भाऊसाहेब ..

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

भाऊसाहेबाला जाऊन एक दशक होत आलंय पण अजूनही गावात त्याचं नाव निघतं. कुणी आदरानं, प्रेमानं, कृतज्ञतेनं तर क्वचित कुणी कुचेष्टेने त्याचं नाव काढतात. पण एक काळ होता की भाऊसाहेबाशिवाय गावाचं पान हलत नव्हतं, नव्हे गाव ठप्प होत होतं. भाऊ दशरथ रास्ते हे त्याचं पूर्ण नाव. त्याचे वडील दशरथ यांना चार भावंडे होती, चौघात मिळून दोन एकर जमीन होती. त्यामुळे थोरल्या दशरथसह तिघे दुसऱ्यांच्या जमिनी कसायला जात, वा जमीन घेऊन खंडाने करत. धाकटा सोमेश्वर मात्र त्यांची स्वतःची जमीन कसे आणि अर्धा हिस्सा त्या तिघांना देई. मिळालेल्या घासात रास्त्यांचं कुटुंब समाधानी होतं. रास्ते मंडळी जितकी कामसू होती तितकीच बेरकी होती, पाण्यावर लोणी काढायची कला त्यांना अवगत होती. लोकाच्या विळ्याचा खिळा होई पण रास्त्यांची मंडळी खिळ्याचा फाळ करत आणि आडवं येणाऱ्याला तोच फाळ लावत ! पण त्यांनी कधी चोरीचपाटी केली नाही की कामचुकारपणाही केला नाही. या बोटावरचं त्या बोटावर करण्यात ते कुशल होते. पैसा कुठं वाचवावा, कुठं काढावा आणि आयजीच्या जीवावर बायजी कसं व्हावं याचं ज्ञान त्यांना चांगलंच अवगत होतं. याच तत्वाला अनुसरून या चारी भावंडांची एका मांडवात लग्नं झाली, शेळीची लेंडं पडावीत तशी घरात पाच वर्षात वीस लेकरं झाली. त्यांच्या घराला लागून असलेली शेळक्यांची खोली त्यांनी लग्नात जानवसघर म्हणून जी घेतली तिचं पुढं जाऊन बाळंतघर झालं. तिथं सदा अंधार असे. आत दोन पलंगावर दोन बाळंतीण बाया बसलेल्या असत. मौसम कुठलाही असो अंगावर वाकळ पांघरून, साडीचा पदर डोक्यावरून गच्च आवळून कानटोपडं गुंडाळून छातीला लेकरू पाजीत बसलेली बाई तिथं ठरलेली असे. पलंगाखालून गवऱ्यांच्या धुरीचा शेक सुरु असेम लेकरांची पीरपीर त्यात रंग भरे. तर या खंडीभर लेकरात सर्वात थोरला होता तो भाऊसाहेब रास्ते !घरची बेताची परिस्थिती आणि अंगचे बेरकी गुण यामुळे भाऊसाहेबाचं रुपांतर एका अजब गजब रसायनात झालं. नेणता असताना लहान भावंडांपेक्षा तोच आईच्या दुधाला जास्त ओरपत असायचा. रांगता झाल्यावर बाकीच्या भावंडांना ढकलायचा, चालू लागल्यावर गल्लीतल्या पोरांच्या खोड्या काढू लागला. चार गोष्टींची अक्कल येण्याआधी आपलं पान आपण पिसलं पाहिजे याचं ज्ञान त्याला आधी प्राप्त झालं. गावातल्या झेडपीच्या शाळेत घातल्यावर इतरांच्या वह्यापुस्तके वापरून 'पास' होऊन दाखवत त्यानं बन्ने मास्तरला तोंडात बोटं घालायला लावलेली. पाटीपेन्सिल एकाची, वह्या दुसऱ्याच्या, पुस्तक तिसऱ्याचं आणि गुंड्यांच्या जागी पिना टाचण्या लावलेला विरायला झालेला गणवेषाचा सदरा चौथ्याचा असा मामला असे. जी काही दोन अडीच रुपयांची फी असे ती इकडून तिकडून गोळा केलेली राही. असं करत त्यानं शाळा शिकलेली, किंबहुना त्यानं मास्तरांना काही कला शिकवलेल्या. पाणवठ्यावर येणाऱ्या कोणत्या बाईची घागर कोण भरून देतंय, पांदीत कोण कुणासाठी थांबतंय, कोण ऊसाच्या फडात घुमतंय, कुणाच्या बाजेची दिवसा किर्रकिर्र सुरु असते अशा बारा भानगडयांवर त्याचं बारीक लक्ष असे. त्या माहितीची देवाण घेवाण करून समोरच्या पार्टीची चंची ढिली करण्यात त्याचं कसाईकसब होतं. विशेष म्हणजे गावातल्या तमाम गायी या बारकाल्या कसायाला धार्जिण होत्या. दरसाली गावातली बोटावर मोजण्याइतकी हुशार पोरं सातवीपर्यंत शिकून मॅट्रिकसाठी शहरात जात. त्यापुढे क्वचित कुणी शिकलेलं. भाऊसाहेबानं कशीबशी रडत रखडत सातवी 'काढली' ! मुळात त्याच्या घरात कुणी शिकलेलं नव्हतं, कुठली साधने नव्हती आणि मुख्य म्हणजे त्याच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे वेळ पाठबळ काहीच नव्हतं. तरीही स्वतःच्या हिकमतीवर त्यानं हा पल्ला गाठला. खरी कमाल त्यानं नंतर दाखवली.तो सातवी उत्तीर्ण व्हायला आणि गावात एसटीबस सेवा सुरु व्हायला एकच गाठ पडली. त्यानंतर पाचेक वर्षे त्यानं आपण मॅट्रिक शिकतो आहोत असं गावाला सांगितलं आणि त्यासाठी त्यानं रोज गावातून सोलापूरला येजा सुरु केली. त्या साली रामभाऊ पाटलांचा पोर जयवंत हादेखील मॅट्रिकसाठी सोलापूरला आला. पण जिल्हापरिषदेच्या मालकीच्या जवाहरलाल वसतीगृहात त्यानं नेटाने बस्तान मांडलं. भाऊसाहेब मात्र रोज अपडाऊन करायचा. त्याचं रोजचं येणंजाणं होऊ लागल्यामुळे लोकांनी आधी दबत तर नंतर हक्कानं त्याला आपली कामं सांगायला सुरुवात केली. तो देखील हरेकाचे काम ऐकायचा. निरोप पोहोच कारायचा, कुणाचा बाजार घेऊन यायचा तर कुणाचं दुध पोहोचतं करायचा. बघता बघता गावातल्या लोकांच्या हरतऱ्हेच्या कामामुळे विविध क्षेत्रातलं व्यावहारिक ज्ञान सहज उपलब्ध झालं. सातवीनंतर सहा वर्षे तो मॅट्रिकच शिकत होता ! रामभाऊ पाटलांचा पोरही त्याच्याच रांगेत होता, नंतर त्यानं मॅट्रिक झाल्याचं सांगितलं. पण तो खराच मॅट्रिक पास होता कि नाही हे फक्त भाऊसाहेबाला ठाऊक होतं आणि भाऊसाहेब सातवीनंतर शाळा शिकत होता की फक्त गावकीची कामे करून आपल्या कुटुंबाचा खर्च त्यातून काढत होता हे जयवंताला माहिती होतं. यामुळेच की काय ह्या दोघांत अगदी घट्ट मैत्री होती पण तिचं नातं वाघ आणि मोराच्या मैत्रीसारखं होतं. जयवंत सरपंच झाल्यावर ही मैत्री अधिक दृढ झाली. जयवंतनं आपण पास झाल्याचं सांगितलं, भाऊसाहेब त्याच्या साक्षीस होता. भाऊसाहेबाने मात्र आपण पैशाच्या अडचणीपायी शाळा सोडत असल्याचं सांगितलं. पण गावातल्या लोकांच्या कामाखातर शहरातली कामं करत राहू असं पिल्लूही सोडलं. त्याच्या शिक्षणाचं कुणाला सोयरसुतक नव्हतं, पण त्याच्या व्यवहारज्ञानाच्या कुबड्या ज्याला त्याला हव्या होत्या. आधी बाजारपेठा, मंडई, शाळा, मार्केट, कोर्ट, सिव्हील हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड इत्यादी परिघापुरता मर्यादित असलेला भाऊसाहेब नंतर सुसाट मोकाट सुटला. जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, प्रांत कचेरी, समाजकल्याण समिती, महामंडळांची कार्यालयं यातलं काहीच त्यानं बाकी ठेवलं नाही. कुणी काहीही सांगितलं तरी नंदीबैलागत मान हलवायचाच. लोकांनाही त्याचं भारी कौतुक वाटे. भाऊसाहेब सोबत आहे म्हणजे काम फत्ते होणारच हे समीकरण रूढ झालं. भाऊसाहेबाची भीड इतकी चेपत गेली की हळूहळू त्यानं विभागीय कार्यालय, सचिवालय, मंत्रालय इथंही धडक मारायला मागं पाहिलं नाही. हे सर्व उद्योग करताना त्याच्या व्यक्तीमत्वाचा विलक्षण फायदा त्याला झाला. डोक्याला सुगंधी तेल पचपचीत चोपडलेलं, एका रेषेत पडलेला टोकदार भांग, रुंद गोऱ्यातांबूस कपाळावरती ठळकपणे लावलेला गोपीचंदन अष्टगंधाचा गोल गरगरीत टिळा, जाड भुवयांखालचे पाणीदार डोळे, तरतरीत नाक, कानाच्या लंबोळक्या पाळ्या, वर आलेले सफरचंदी गाल, टकटकीत बत्तीशी, खर्जातला भारदस्त आवाज, गळ्यातली रुद्राक्षाची माळ (जिची तो वारंवार आण घेत असे), दोन्ही हातांच्या बोटातल्या खऱ्या वाटणाऱ्या खोट्या खड्यांच्या अंगठ्या, मनगटाला गुंडाळलेले लालकाळे धागे, पांढरा शुभ्र सदरा पायजमा, केसांतलं तेल पिऊन काळीपिवळी होऊ नये म्हणून डोक्यावर अलगद टेकवलेली कडक इस्त्रीची पांढरी शुभ्र टोपी, बखोटीला मारलेली चामडी काळी हॅन्डबॅग जिच्यात शेकड्याने कागद कोंबलेले असत, खेरीज एक शबनम बॅग खांद्यावर असे ज्यात फायलींचे बाड असे. भाषा एकदम रासवट गावरान निब्बर, बोलणं नम्रतेचं असलं तरी समोरचा 'धपकला' पाहिजे असं त्याचं गणित. डोळ्यात डोळे घालून अधिकारवाणीनं बोलण्याची सवय यामुळे भाऊसाहेबाची कामं सहज होत. पंचक्रोशीतली माणसंही त्याच्याकडं येऊ लागल्यावर झेडपीतल्या लोकांसाठी तो दैनंदिन घबाड आणून देणारा मध्यस्थ झाला होता. त्यामुळे तिथं त्याची खातीरदारीही होऊ लागली. एखाद्या नव्या माणसानं त्याचं काम अडवलं की गावच्या लोकांना तो सरळ सांगून टाके, याची अमुक तमुक भानगड होती, याला बदली करून घेण्यासाठी माझी मदत हवी होती पण आपण खोट्याचं काम करत नाय, काय करणार ? मग असा वाईटपणा घ्यावा लागतो. समोरच्या माणसाला प्रभावित करण्यासाठी वाट्टेल ती थाप ठोकणारा, इकडची टोपी तिकडं करणारा, कुठल्याही कामात नकळत आपला हिस्सा राखून ठेवणारा भाऊसाहेब एका गोष्टीत खूप पक्का होता. त्यानं इकडची काडी तिकडं कधीच लावली नाही. सगळी टेबलं त्याला सारखीच होती आणि तिथले सगळे बाबू सारखे होते, गावात देखील अनेक राजकीय पक्षांचे अनेक कारभारी होते पण त्यानं कधी कुणाची बाजू घेतली नाही की कधी कुणाच्या विरोधातही गेला नाही. पण जो सत्तेत असेल त्यानं आपल्याकडे यायला पाहिजे याची तजवीज तो करून ठेवी. तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील सगळे त्याला टरकून असत. कोणत्या योजनेतून निधी आणायचा, कुठे बंडल ढिले करायचे, कुठं कोंबडी बाटलीचा नैवेद्य द्यायचा, कुठं हात आखडता घ्यायचा, कुणाला अजिबात भीक घालायची नाही आणि कुठं साष्टांग दंडवत घालायचं याबद्दलचं त्याचं गणित एकदम पक्कं होतं. चाळीस वर्षात एकही सरपंच त्याच्या मदतीशिवाय काम करू शकला नाही इतकं त्यानं गावाला आपल्यावर विसंबून ठेवलं होतं. गावाला त्याचं भारी कौतुक वाटे. भाऊसाहेबाचं लग्न होऊन त्याचा संसार सुखाचा झालेला. बापासारखा केळीचा घड त्यानं होऊ दिला नाही, दोन पोरांवर थांबला. पोरांना शिकवून मोठं केलं, बायकोच्या सुखदुःखात सामील झाला, कामाचं निमित्त करून त्यानं तिलाही मुंबई पुण्यास फुकटात फिरवून आणलं. म्हाताऱ्या बापाचा दवाखाना केला, बहिणींची लग्ने केली, भावंडांना हात दिला, शेतीवाडी वाढवली. खऱ्या अर्थाने तो सगळ्यांचा 'भाऊ' झाला आणि 'साहेब'ही झाला. सतराशे साठ लोकांना गुपचूप काठी घालत गावदेवळाचा जीर्णोद्धार करताना सगळं श्रेय स्वतःला घ्यायला तो विसरला नाही. हरहुन्नरी आणि हजरजबाबी भाऊसाहेब त्याच्या घरात फक्त सांजेस आणि रात्रीस असे. बाकी लोक त्याच्या घरी खेटे मारत. त्याचे तीन ठीय्ये होते, गावातली एकुलती एक असलेली म्हादबाची कँटीन वजा पानटपरी, इथं तो फुकटात चहा नाश्ता उरके. नाश्ता झाल्यावर वेशीबाहेर पिंपळाखाली जिथं एसटीबस उभी राहे तिथं दोन मोठाले दगड होते त्यावर बसून दात टोकरत गावातल्या भानगडींची खबरबात घेत त्याचा पुरेपूर वापर करे. तिसरा ठिय्या संध्याकाळचा होता, तो म्हणजे गावातला पार. वडाच्या भल्या मोठ्या झाडाभवती बांधलेल्या भक्कम दगडी पारावर बसून तो बारमाही पतंग उडवत राही, त्याने कितीही ढील दिली तरी लोक आ वासून ऐकत राहत. एकदोघांना त्यातली अतिशयोक्ती कळे, त्याची चलाखी उमजे, त्याचा वकूब समजे पण त्यांनी तोंड उघडलं तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नसत. 'भाऊसाहेबावर जळतो लेकाचा' असं म्हणत त्याचीच भंबेरी उडवत. पण जेंव्हा जेंव्हा भाऊसाहेब पारावर बसलेला असे तेंव्हा पार गच्च भरून गप्पांचा फड एकदम रंगात येई. जागा न मिळालेली गडीमाणसं आशाळभूतागत उभी राहत. गुरं घेऊन माघारी आलेली पोरंठोरं म्हशीच्या गळयातला कासरा धरून त्या गप्पांना कान देत, मावळतीला आलेला सूर्य त्या गप्पात सामील होई, वडाच्या पारंब्या कान टवकारून दक्ष होत आणि कंबरेला बांधलेल्या पानाच्या चंच्या नकळत मोकळ्या होऊन त्यातून पानविडे रंगत, टाळ्यांना उधाण येई, गडगडाटी हास्य होई, पाणचट शेरेबाजी झाली की हास्याची फिदीफिदी कारंजी उडत. भाऊसाहेबाचं बोलणं सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत. कारण आत्याबाईला मिशा होत्या आणि जंगलात नाचणारा मोर पाहिला होता याला कुणीच साक्षीदार नव्हतं, पण हे खोटं आहे असंही कुणी म्हणत नव्हतं. भाऊसाहेब एकापाठोपाठ एक किस्से सांगत राही. अंधार पडला की मैफल पांगे, जो तो आपआपल्या घरी जाई, जाताना भाऊसाहेबाची मोठी होत चाललेली छबी सगळ्यांच्या मस्तकी असे. काळ आपल्या गतीने जात राहिला, दशके उलटली, जमाना बदलला, लोकांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं. नवनवीन साधने आली, दळणवळण सहज व सुलभ झालं. दरम्यान भाऊसाहेबही थकून गेला आणि एका पावसाळ्यात त्यानं राम म्हटलं. मोठया शहरात नोकरीला असलेली त्याची पोरं गावात येऊन त्याच्या चितेस अग्नी देताना ढसाढसा रडली, गावानेही शोक केला. काळ वेगाने निघून गेला, आता जो तो आपआपली कामे करतो. मोबाईलही गावात आलाय, त्यावरूनही कामे होतात. संध्याकाळी पारावर फारसं कुणी बसत नाही. चुकून गप्पांची मैफल भरली तर गावकीच्या कामाचा, राजकारणाचा, विकासाचा विषय निघतो. मग जुनी खोंडं हटकून भाऊसाहेबाचं नाव काढतात. एकाचं दहा करून भाऊसाहेबाचं गुणगान गातात, "अरे कुठं लागाव्यात तुमच्या ओळखी ? काय त्यो तुमचा मोबाईल ? काय ती तुमची टेंडरं ? आमचा भाऊसाहेब नुसता टेबलावर फाईल ठेवी, समोरचा साहेब चळाचळा कापायचा ! काय दरारा होता गड्याचा ! त्यानं केलं नाही असं कुठलं काम नव्हतं." लोकांचे हे उद्गार कानी पडताच वय झालेल्या वडाच्या पारंब्याना गहिवरून येतं, झाड अंतर्बाह्य गदागदा हलतं, पानं सळसळतात आणि गप्पाष्टकात हरखून जातात. अस्ताला जाणाऱ्या सूर्याची छाती भरून येते, गुरं घेऊन माघारी येणारी गुराखी पोरे तिथं घटकाभर थांबत. भाऊसाहेबाच्या गप्पा ऐकताना त्यांच्या भादरलेल्या डोक्यावरल्या कलायला झालेल्या मळकट गांधी टोपीस ते हातात घेऊन झटकत, नकळत तिचं टोक बाहेर काढून झुपकेदार पद्धतीने किंचित वाकडी करून तिला डोक्यावर ठेवत आणि अंगात तरतरी आल्यागत घराकडे मार्गस्थ होत.- समीर गायकवाडदैनिक लोकसत्तामधील लेखाची लिंक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!