बालपण जागवणारा पाऊस

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

बालपण जागवणारा पाऊस-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)लहानपणी पावसात भिजला नसेल असा माणूस दुर्मिळच. जून-जुलैला सुरुवात झाली की लहानपणी खरंतर शाळेत जाण्याची लगबग  असायची. पण त्याहीपेक्षा 'एक्साइटमेंट' असायची ती पावसाची. मला आठवते सायंकाळी पाच वाजता शाळा सुटेपर्यंत दिवस उकाड्याने व अभ्यासाने हैराण झालेले आम्ही सारे दोस्तमंडळी. सायंकाळच्या गारव्याने अन पावसाची चाहूल लागल्याने काहीसे सुखद अनुभवायचो. एरवी 'शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली.' असा आरडाओरडा करत शाळा कधी सुटते अन कधी घरी जातो, अशा उत्साहातील आम्ही.पावसाळ्यात मात्र 'येरे येरे पावसा..' म्हणून त्याला लाडीगोडी लावत विनवायचो. अन रोज  पटापट घराकडे जाणारी पावलं आता काहीशी संथ गतीने चालत असायची. आणि अपेक्षा करायचो की आता तरी बरसेल हा... आता तरी. अन येगं येगं सरी म्हणता-म्हणता मृगाची सर बसायला लागायची अन आयुष्यातील सर्वोच्च आनंद हाच. या भावनेने त्या पावसात मनसोक्त भिजायचो. मग सुरुवात व्हायची ती   'कागदी होड्यांचा' खेळ. अगदी खऱ्याखुऱ्या समुद्रात नाव वल्हवणाऱ्या नावाड्याच्या जोशात सगळे चालायचे. यात कसले घर, आई-बाबा, अन भूक आठवते. असं वाटायचं जणू हा पाऊस फक्त आपल्यासाठीच असावा कदाचित खरंच आपल्यासाठी असावा. या सगळ्या प्रकारात ज्या नव्याकोऱ्या पुस्तक, वह्या, दप्तराला जिवापाड जपतोय ते ओले होते आहे, याचेही भान नसायचे.पावसाचा जोर ओसरला की मलाही घराची ओढ लागायची. तोपर्यंत नाले, ओढा, गल्ली-गल्लीतून पाणी खळखळत वाहायचे. आमचे ते 'टायटॅनिक' तर कधीच पाण्याखाली गेलेले असायचे आणि अशातच घराच्या अंगणात येऊन मी उभा राहायचो.  आनंदाने फुललेला चेहरा थोडा पाडून थांबायचो तोच बाळा अरे! ताप, सर्दी होईल पुरे झाले आता चल ये घरात! असा वात्सल्यपूर्ण पण थोडा रागीट असलेला स्वर कानावर पडला की घरात जावंच लागायचे. अगदी तोपर्यंत पाऊस जणुकाही त्याच्या आईच्या धाकाने परतलेला आहे, असेच वाटायचे.यानंतरच्या सृष्टीचे रूप त्या बालवयात अत्यंत आनंद द्यायचे. हळूच इंद्रधनुचे सप्तरंग बाहेर यायचे आणि आपणच सप्तरंगी झाल्याचा भास मला व्हायचा. यानंतर व्हायचा तो प्लान गावाकडच्या टेकडीवर जायचा आहा! उंच उंच टेकडीवरून दिसणारे हिरवेगार शेत, तलाव, कौलारू शाळा, गावातलं मुक्ताई देवीचं मंदिर हे सारं माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव असायचा. यातच टेकडीवर रंगायचा लपंडावाचा खेळ. कसा? प्रत्येकाने त्या टेकडीवरून आपले घर शोधायचे. खरं तर घर जेथे आहे तेथेच असायचे. पण, ते कोठेतरी झाडाच्या आड लपतयं आणि अशातच सापडलं... सापडलं म्हणत लपंडावाचा खेळ पहिला मीच जिंकला या आनंदात टेकडीवरून सरसर खाली उतरायचो. खरंतर टेकडीवरून मी खाली यायचो पण आनंद हा गगनाला भिडायचा. पुन्हा एकदा तोच पाऊस भरून आलाय. कदाचित पुन्हा कोणीतरी पावलांची गती संथ करून  निघाला असेल घरून आपली नाव वल्हवत, म्हणत येरे.. येरे.. पावसा....
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!