बहुआयामी प्रतिभाशाली विद्रोही कलावंत - गिरीश कार्नाड

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आपल्या जन्मदात्या वडीलांच्या वंशातून न जन्मलेल्या पण आपल्या जन्माआधीपासूनच आपल्या मायपित्यासोबत राहणाऱ्या आपल्या सावत्र भावास आपल्याच वडीलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकट्या भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का ? नाही ना ?पण एक माणूस होता असा. त्याची ही दास्तान. गिरीश कार्नाड  त्याचं नाव.गिरीश कार्नाडांच्या मातोश्री किशोरीविधवा होत्या. कुट्टाबाई त्यांचं नाव. पहिल्या पतीपासून तितक्या अल्पवयातही त्यांना एक मुलगा झाला होता. पतीच्या निधनानंतर काही काळ खचलेल्या त्या स्त्रीने पुन्हा उभारी घेण्याचं ठरवलं. कर्मठ कुटुंबात जन्मास येऊनही त्यांनी पुनर्विवाह करायचं ठरवलं. त्या काळी असं धाडस करणं म्हणजे अग्निदिव्य होतं. त्या पेशाने नर्स होत्या आणि त्यांना ज्यांच्यासोबत पुनर्विवाह करायचा होता ते रघुनाथ कार्नाड डॉक्टर होते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. पण कुट्टाबाईंना खात्री वाटत नव्हती, की हा माणूस आपल्यासारख्या विधवेशी लग्न करेल किंवा नाही? खरं तर त्या प्रेमासोबतच आसरा शोधत होत्या. त्यांचं मत एकवेळ ग्राह्य धरता येत होतं पण रघुनाथांना समाज काय म्हणेल याची भीती होतीच. शेवटी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्या आधी ते दोघं पाच वर्षे एकत्र राहत होते. त्या काळी असा निर्णय घेणं हे मोठं धाडसाचं काम होतं. शेवटी त्यांनी लग्न केलं. तेव्हा तो विषय खूप चर्चेचा झाला होता. समाजात कुट्टाबाई आणि रघुनाथ यांच्याविषयी काहीबाही बोललं जात होतं. तेव्हा कुट्टाबाईंचा पहिला मुलगा भाऊ आठ-नऊ वर्षांचा होता. त्याच्या ते सगळं कानावर येत होतं. ते ऐकून त्याच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार करवत नाही. पुढे यथोचित पद्धतीने कुट्टाबाई आणि रघुनाथ यांचा विवाह झाला. त्यांच्या पोटी गिरीशजींचा जन्म झाला.आपल्या पहिल्या मुलाची हकीकत गिरीशजींच्या मात्या पित्यांनी त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. त्यामुळे तो ही आपलाच सख्खा भाऊ आहे असं ते अनेक वर्षे समजत होते. गिरीशजींच्या मातोश्रींनी वयाच्या ८२ वर्षी आपली कहाणी लिहिली, तेव्हा त्यांना त्याविषयी समजले. ती दास्तान वाचल्यावर त्यांना या गोष्टीचा उलगडा झाला. मात्र त्यामुळं ते विचलित झाले नाहीत की त्यांना त्याचं दुःखही वाटलं नाही, की दृष्टीकोनही बदलला नाही. खरा प्रश्न निर्माण झाला तो त्यांच्या वडीलांचं निधन झाल्यावर. कारण तेंव्हा लोक म्हणू लागले की गिरीशच्या मोठया भावाला वडिलांना अग्नी देण्याचा अधिकार नाही. कारण तो त्यांचा मुलगा नाही. तो गिरीशजींना देता येईल किंवा त्यांच्या मधल्या भावाला देता येईल. तेंव्हा त्यांना त्याचं कारण कळलं नव्हतं. कारण तो सावत्र भाऊही जन्मभर कार्नाड हेच नाव लावत होता. त्यामुळे आपल्या त्या भावाला आपल्या वडीलांचा नाव लावण्याचा अधिकार मिळावा यासाठी गिरीश कार्नाडांनी समाजाशी संघर्ष केला आणि नाव मिळवून दिलं ! गिरीशजींना जेंव्हा पुत्ररत्न प्राप्ती झाली तेंव्हा त्यांनी वडीलांच्या स्मृती जागवल्या आणि त्याचं नाव ठेवलं, रघु ! रघु कार्नाड !!गिरीश कार्नाडांच्या विद्रोहात, बंडखोरीत आणि परखडपणात कारणीभूत असणारा हा इतिहास कमालीचा टोकदार आहे. त्यांच्या प्रतिभाशाली साहित्यकृतीतून याची सार्थ अनुभूती येते.स्त्रीच्या शोषणावर फोकस करणाऱ्या 'नागमंडल' या नाटकातून 'स्त्रीचा खरा पती कोण ?' या प्रश्नाचा खिळा ते प्रेक्षकांच्या मस्तकात ठोकतात हे मान्य. पण प्रत्यक्षात हे नाटक लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर जन्मदात्या आईचा दुःखद भूतकाळ आला असेल तेंव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील नाही का !'नागमंडल' नाटका मध्ये होते तरी काय ? आपल्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत हे माहित असूनही पत्नीने त्याच्याशी एकनिष्ठ राहावे, त्याची तक्रार करू नये ; त्या उलट झालंच तर स्त्रीजन्माचे भोग म्हणून ते सोसावेत. त्याचवेळी तिने मात्र कुठल्याही परपुरुषाशी बदफैली करू नये याकडे तिच्या पतीचा, कुटुंबाचा, समाजाचा पर्यायाने सगळ्यांचाच कटाक्ष असतो. तर दुसरीकडे बाहेरख्याली असणाऱ्या नवऱ्याने बायकोवर संशय घ्यावा अन खरं खोटं जाणून न घेता तिच्या अब्रूचे खोबरे आपल्याच हाताने गावभर उधळावे ही बाब आपल्याकडे सामान्य आहे. यावर अचूक बोट ठेवत गिरीश कार्नाडांनी 'नागमंडल' हे नाटक लिहिले होते. नागमंडलची पोस्टर्स देखील वेधक होती. सोबतच्या पोस्टरमध्ये कुलुपाच्या आतील बाजूस स्त्रीचा मुखवटा दिसतो. अत्यंत दुःखी कष्टी भावमुद्रेतील स्त्रीच्या मिटलेल्या डोळ्यात अश्रू दाटून आलेत अन तिची नजर खाली आहे, तिच्या मस्तकात चावी फिरवून तिला कुलुपबंद केले जाते. तिला कुलूपबंद करणाऱ्या हाताला एका नागाने वेटोळा घातला आहे जो की स्त्रीच्या मनातील तिला रिझवणाऱ्या पुरुषाचं प्रतिक आहे. हा नाग तिच्यासोबत कुलुपाच्या आतही आहे आणि बाहेरही आहे. कारण तिला तो हवा हवासा आहे. वास्तवात ते दोघेही तिला ताब्यातच ठेवू इच्छितात."नागमंडल" हे नाटक दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या काही सर्पविषयक लोककथांवर आधारित आहे. कर्नाटकातील दोन लोककथांचे हे एक सुंदर नाटय रुपांतरण आहे. भारताच्या अनेक भागात नाग-पंथाचे अस्तित्व आपणास आढळून येते. 'नागमंडल' मध्ये कार्नाड यानी दोन लोककथांचे एकच गुंफण केले आहे. पहिली लोककथा सामान्यपणे दंतकथांच्या विरोधभासात्म दुहेरी स्वरूपावर प्रकाश टाकते : त्याना स्वतःचे म्हणून एक खास अस्तित्व आहे आणि ते कथन करण्यावर अवलंबून नसते. तथापि एका कलाकाराकडून दुसर्‍याकडे अशी ती सांगितली गेल्यानंतरच त्यांच्या असण्याला अर्थ प्राप्त होतो. ह्या कथेतच दुसरी एक लोककथा दडलेली आहे - ती आहे 'राणी' या नवविवाहितेची गोष्ट. "लग्नबाह्य संबंधातून गर्भवती राहिली आहे" अशा नवर्‍याच्या आरोपावर ग्रामपंचायतीसमोर जाब देताना (खरेतर आपल्या आयुष्यातील पोकळी भरुन काढण्यासाठी) ती काल्पनिक कथा रचते. कल्पित आणि अर्धसत्यावर जगण्याची मानवी गरज राणीची बिकट अवस्था टोकदारपणे व्यक्त करते.वैवाहिक जीवनाच्या एका संवेदनशील प्रश्नाला नाटक स्पर्श करते. नाटकाची शैली लोककथेची आहे आणि त्याचे स्वरुपही तसेच आहे आणि नाटक एक प्रश्न स्पष्टपणे विचारते - 'खरा पती कोण ?' एका निष्पाप मुलीशी लग्न करणारी आणि स्वत:च्याच सुखात सदोदित रममाण होणारी व्यक्ती (तिचा बाहेरख्याली नवरा) की जी त्या विवाहित स्त्रीला जीवनाचा खराखुरा आणि परिपूर्ण आनुभव देणारी व्यक्ती (नाग). नाटक प्रामुख्याने तीन व्यक्तीवर केंद्रित आहे ~ अप्पाण्णा, त्याची पत्नी राणी, आणि नागराज - जो मानवाचे रूप धारण करू शकतो (लोककथेत असे उल्लेख असतात).कार्नाड यांच्या लेखनाचे एक प्रमुख वैशिष्ट असे आहे की ते भूतकाळाचा वापर करून वर्तमानकाळावर प्रकाश टाकतात. त्यासाठीच 'नागमंडल' ह्या नाटकात त्यानी प्राचीन आणि आधुनिक स्थिती यांचा संयोग घडवून आणला आहे. त्यानी मांडलेला प्रश्न (पतीपत्नी एकनिष्ठतेचा) आजही तितकाच प्रखर नि टवटवीत आहे आणि त्याची दाहकता आजही भारतीय स्त्री-जीवनाला पोळून काढते आहे. एका पारंपारिक लोककथेचा वापर करून ते वर्तमानावर प्रकाश टाकतात आणि अशाप्रकारे भूत आणि वर्तमान याना एकत्र गुंफतात. एका लोककथेमधून मानवी जीवनामधील व्यामिश्रतेचे ते दर्शन घडवतात. नाटकातून सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंतागुंतीचे दर्शन घडते. समाजात प्रचलित असलेल्या सामाजिक लांछनास्पद रुढींना नाटक छेद देण्याचा प्रयत्न करते. उदा. एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील जवळचे नातेसंबंध, पती उघडपणे व्यभिचारी असतानाही त्याचे मन जिंकण्यासाठी चालणारी भारतीय स्त्रीची हतबलता, पती कितीही बाहेरख्याली असला तरा आपण एकनिष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची विवाहित स्त्रीवरच लादलेली गरज; मात्र दुसरीकडे व्यभिचारी पतीला त्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल (समाजाकडून - नाटकात ग्रामपंचायतीकडून) साधा जाबही विचारला जात नाही हे प्रखर वास्तव आणि खेड्यातील न्यायव्यवस्थेचे एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी स्त्रीला 'नागाच्या वारूळात हात घाल' असा आदेश देणे- समाजाला मान खाली घालायला लावणार्‍या अशा काही महत्वाच्या समस्यांवर गिरीश कार्नाड यानी ह्या नाटकाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. लोककथांचे माध्यम कार्नाडांनी अत्यंत यशस्वीपणे आणि कलात्मकतेने वापरलेले दिसते.पण केवळ पुराणातल्या कथा वा लोककथा जशाच्या तशा उचलणे हा कार्नाड यांचा स्वभाव नाही. अशा कथांचे समकालाशी नाते जोडणे, त्यांचे स्वतंत्र अर्थ लावणे, कार्नाड यांना जमले. त्यामुळेच त्यांचे एकासारखे दुसरे नाटक नाही. एकाच छापाची नाटके नाहीत. ‘हयवदन’मध्ये अर्धा घोडा व अर्धा पुरुष असे प्रतीक त्यांनी वापरले होते. स्त्रीला एकाच वेळी बुद्धिमान आणि बलवान पुरुष हवा असतो, अशी संकल्पना असलेल्या या लोककथेत त्यांनी असा घोडा प्रतीक म्हणून वापरण्यात आला होता.'नागमंडल’मध्येही मूळ कथेत त्यांनी कथेशी व कथेच्या आशयाशी सुसंगत असे बदल केले होते. हे बदल त्यांच्या लोककथांना, पुराणकथांना एका वेगळ्याच पातळीवर पाहण्याच्या दृष्टिकोनाचे दर्शक ठरले. ही नाटके कन्नड रंगभूमीपुरतीच मर्यादित राहिली नाहीत. हिंदी व मराठीतही ‘हयवदन’चा अतिशय उत्तम असा प्रयोग झाला. अमरिश पुरी, सुनिला प्रधान, अमोल पालेकरांनी त्यात काम केले. विजया मेहतांनी याच नाटकाचा प्रयोग मराठीमध्ये एनसीपीएसाठी केला. पुढे त्यांनी ‘नागमंडल’देखील केले. गिरीश कार्नाडांना उत्तम मराठी येते. त्यांची अभिनेता, दिग्दर्शक म्हणूनही भारतीय स्तरावरती उत्तुंग प्रतिमा आहे. हयवदन, तुघलक जेव्हा राष्ट्रीय स्तरावर गेले, त्या वेळी त्यांना अर्थातच मान्यता मिळाली आणि प्रादेशिक नाटकाने प्रादेशिकतेच्या पलीकडे रंगभूमीला नेऊन ठेवले. कर्नाटकात ज्ञानपीठ मिळवणारे अनेक दिग्गज आहेत, त्यात कार्नाड महत्त्वाचे मानले जातात. केवळ नाटककार म्हणून त्यांना ज्ञानपीठ मिळणे, ही भारतीय रंगभूमीसाठी अत्यंत सन्मानाची व महत्त्वाची बाब आहे.साहित्यसेवा  -साठ-सत्तरच्या दशकातील कार्नाड यांची ही नाटके पाहता रंगभूमीची इतर भाषांमध्ये देवाणघेवाण होण्याबरोबरच नाटकाची तत्कालीन परिभाषा बदलण्यामध्येदेखील ही नाटके महत्त्वाची ठरतात. त्यातल्या त्यात 'ययाति', 'हयवदन', 'तुघलक', 'नागमंडल', 'अग्निवर्षा', 'उणे पुरे शहर एक' या नाटकांची मराठीत भाषांतरे व प्रयोगही झालेले आहेत. नाटककार कितीही चांगला असला तरी त्यास चांगला दिग्दर्शक, चांगले नट, चांगली नाट्यसंस्था आवश्यक असते. तरच त्या नाटकाची रंगभूमीवरील अभिव्यक्ती दर्जेदार होऊ शकते. गिरीश कार्नाड यांना सुदैवाने अशा चांगल्या नाट्यसंस्था व तितकेच चांगले कलाकार लाभत गेले. सत्यदेव दुबे, अमोल पालेकर, विजया मेहता, भास्कर चंदावरकर, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शाह, अरुण शर्मा, ओम पुरी, अरविंद देशपांडे यांनी मराठीतले नाटक दुस-या भाषेत नेले, तर कन्नड व इतर भाषांमधली नाटके आपल्याकडे आणली. त्यातली सर्वाधिक भाषांतरे ही मराठी रंगभूमीवर कार्नाडांच्या नाटकांची झाली आहेत. त्यातील ‘तुघलक’ व ‘हयवदन’ ही आजदेखील अत्यंत महत्त्वाची नाटके आहेत. या नाटकांचे तसेच ‘नागमंडल’सारख्या नाटकांचे प्रयोग पाहिल्यानंतर कार्नाडांच्या नाट्यविषयक कल्पना लोकपुराणकथा, लोककथा यांवरती आधारित आहेत, असे सहजपणे लक्षात येते. पुराण, फॅँटसी, इतिहास यांवर आधारित लेखन करण्याची कार्नाड यांची पद्धत आहे. किंबहुना लोककथा व पुराणातून समकालीन संदर्भ शोधणे हा कार्नाडांचा लेखनस्वभाव आहे.बायोस्कोप -अंतर्मुख करणारं सर्जनशील लेखन, नवदृष्टी देणारं दिग्दर्शन आणि प्रभावी पण, संयत अभिनयामुळं भारतीय साहित्य व कला क्षेत्रावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कार्नाड यांचं आज निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून कार्नाड आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्यामागे पत्नी सरस्वती, मुलगा रघु आणि पत्रकार, लेखिका कन्या राधा असा परिवार आहे. कार्नाड यांच्या निधनामुळं भारतीय साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे.बहुभाषिक व बहुपेडी व्यक्तिमत्त्व असलेल्या कार्नाड यांनी तब्बल चार दशके नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयानं रंगभूमी गाजवली. कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झाली. वेगळ्या धाटणीची व नवा दृष्टिकोन देणारी त्यांची नाटकं सुजाण प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ययाती, हयवदन व नागमंडल ही त्यांची नाटके प्रचंड गाजली. १९६४ साली रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या 'तुघलक' या नाटकानं इतिहास घडवला. या नाटकामुळं त्यांचं नाव देशभरात गेलं. साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल १९९८ साली त्यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.चित्रपटाशी नातं - गिरीश कार्नाड हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. ते केवळ रंगभूमीवरच रमले नाहीत. सिनेमाचा पडदाही त्यांनी गाजवला. यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारीत 'संस्कार' चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'उत्सव' या हिंदी चित्रपटानं समीक्षकांची वाहवा मिळवली. दूरदर्शनच्या 'टर्निंग पॉइंट' या विज्ञानविषयक कार्यक्रमात त्यांनी निवेदकाची भूमिका पार पाडली. 'पुकार', 'इक्बाल' व 'टायगर जिंदा है' या हिंदी चित्रपटांतूनही ते झळकले होते. ३३ वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'उंबरठा' या गाजलेल्या मराठी चित्रपटात गिरीश कार्नाड यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची भूमिका केली होती.सामाजिक दृष्टीकोन - वयाची पंच्च्याहत्तरी पार केल्यानंतरही कार्नाड कार्यरत होते. सार्वजनिक कार्यक्रम, चर्चासत्रे व साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर हजेरी लावत होते. आपली मतं ठामपणे मांडत होते. गिरीश कार्नाड यांनी त्यांची मतं वा भूमिका कधीच लपवल्या नाहीत. देशातील वाढती असहिष्णुता व साहित्यिक, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात त्यांनी नीडरपणे आवाज उठवला. पत्रकार गौरी लंकेश आणि विद्रोही विचारवंत प्रा. एम. एम.कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चांमध्ये ते सहभागी झाले होते. देशातील पुरोगामी चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते.गिरीश कार्नाड यांचा एकूण प्रवास प्रेरणादायी होता. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान इथं १९ मे १९३८ साली त्यांचा जन्म झाला. कर्नाटक विद्यापीठातून १९५८ साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं. पुढं फेलोशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं त्यांनी एमएची पदवी घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. अफाट वाचन, चिंतन आणि प्रयोगशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या साहित्य व नाट्यकृतीतून त्यांची ही सर्जकता सतत प्रतिबिंबित होत राहिली.गिरीश कार्नाड यांनी धर्मवादाविरुद्ध अत्यंत टोकाची  मते नेटाने मांडली, पुरोगामित्वाची कास धरताना त्यांनी उजव्या विचारसरणीवर प्रहार केले म्हणून त्यांना विरोध करताना त्यांचं साहित्य झाकोळलं जाऊ शकत नाही. दुर्दैवाने हा सुजाणपणा समाजाला येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हे समाजाचे दुर्दैव म्हणावं की आत्मघातकी सोशल मीडियानं माणुसकीवर केलेली मात म्हणावी ?- समीर गायकवाड.टीप - 'नागमंडल'वरचे भाष्य श्री.अशोक पाटील यांच्या लेखातून साभार.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!