फेरा

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

राऊताच्या घरी सकाळपासून भांडण लागलेलं. तिन्ही सुनांच्या कालव्याला कातावून म्हातारी गंगूबाई यिदुळाच रानात गेली. घरी बायकांचा धुरळा उठला होता तेंव्हा ज्ञानू राऊत कास्तकाराकडं उलथला होता. तिन्ही सुनांना आपणच वेसण घालतो आणि आपला कारभारी आपली बाजू घेत नाही असं गंगूला वाटायचं. ऐवीतैवी तिच्या लेखी ज्ञानू म्हणजे 'अंडं म्हणजे उंबर आणि ससा म्हणजे सांबर' अशा बैलबुद्धीचा माणूस होता. पण ज्ञानू तसा नव्हता. भोळसट स्वभाव होता त्याचा, व्यवहारात कमी होता, देणंघेणं कळत नव्हतं. मनानं मात्र सच्चा सीधा होता. आपल्या अंगी वकूब नसून सुद्धा लोकांची भांडणे मिटवायला जाणं हा त्याचा आवडता उद्योग. पण व्हायचं असं की तो जायचा तंटा मिटवायला आणि गव्हाची कणिक करून यायचा. नसती ब्याद गळ्यात पडलेली असायची आणि पदराला खार लागायचा तो वेगळाच. काहीसा धांदरट असलेला ज्ञानू अशा गुणांमुळे लग्न झाल्यापासून गंगूच्या पदराला बांधून होता. तिच्यापुढं चकार शब्द त्याच्या तोंडून निघत नसायचा. तिच्या तोंडाची टकळी चालू झाली की हा आढ्याला नजर लावून बसायचा. काहीच बोलत नसायचा. संतापाने तीळपापड झालेली गंगूबाई मग त्याच्यावर खेकसायची. तिच्या क्रोधाचा कडेलोट होताना ती शेवटी एका विशेष पालुपदावर यायची. जणू काही ती ब्रम्हवाक्ये ,म्हणजे तिच्या भांडणाचं धृपद होतं, हरेक भांडणाचा शेवट यानेच व्हायचा. कडाकडा बोटं मोडत गंगूबाई म्हणायची "बाई गं कुण्या जल्माचं पाप क्येलं आणि पदरी धोंडा बांधून घ्येतला, मुक्का मैंद आणि पक्का गोईंद हाय हा धोंडा. वरवर वाटतो भोळा पर पोटात आणतो गोळा. आरं द्येवा तुज्या दाराला लागली काठी.. " भांडता भांडता तिने देवांचा उद्धार केला की ज्ञानू दोन्ही हातांनी उलट्या बाजूनं गालफडात मारून घेत आबातोबा करायचा. "माफ कर गं बये, पर द्येवाला कामून मध्ये आणतेस ? चुकलो गं बाई माजे. हिथून पुढं कानाला खडा लावतो. "ज्ञानूनं हात जोडतात गंगूबाईचा पारा उतरत जायचा.कानाला खडा लावतो असं म्हणणारा ज्ञानू वास्तवात काहीच बदलला नव्हता. त्यांच्या घराची एकाची चार घरं झाली. त्याचं स्वतःचं खटलं घेऊन तो थोरल्या वाड्यात राहू लागला. पोरं मोठी झाल्यावर त्यांची लग्नं झाली. ज्ञानूचं खानदान नामांकित होतं, शिवाय जमीन जुमलाही भरपूर होता. गावात भलामोठा वाडा होता, शेतात दगडी खणांची ऐसपैस वस्ती होती. बापजाद्यांचं सोनंनाणं होतं. पोरं देखील मेहनती होती, दिवसभर राबराबून त्यांनी मातीतून सोनं पिकवलं होतं. एकंदर ज्ञानूच्या घरी लक्ष्मी पाणी भरत होती. त्यामुळं ज्ञानूच्या मुलांना चांगल्या घरच्या सोयरीकी सांगून आल्या. थोरल्याचं आणि मधल्याचं लग्न त्यानं एका मांडवात लावून दिलं. गावजेवण देत थाटात लग्न केलं. अनुसूया ही ज्ञानूची एकुलती लेक जी तिन्ही मुलांच्या पाठीवर काहीशा उशिराने झालेली. त्यामुळं गंगूबाईचा जीव तिच्यावर अंमळ जास्तीच होता. धाकटा पोरगा भरत आणि अनुसूयेचं लग्न एकाच मांडवात झालेलं. अनुसूयेनं आपल्या आईचे सगळे गुण घेतले होते त्यामुळे ज्ञानूला तिची थोडी काळजी होती. अनुसूयेला बक्कळ हुंडा दिला होता, गोरख भोसल्यांच्या तालेवार श्रीमंत घरात तिला दिलं होतं. ती भोसल्यांची धाकटी सून झाली होती. गोरख भोसल्याचं गाव जवळच होतं आणि तो ज्ञानूचा चांगला मित्र होता. त्यामुळं लेकीच्या संसाराची ज्ञानूची चिंता मिटली होती. तर लाडकी लेक जाऊन धाकटी सून घरात आली तेंव्हा गंगूबाईची मानसिक अवस्था काहीशी चिडखोर झाली होती. या दोन्ही लग्नात ज्ञानू आपला भालदार चोपदार उभा असल्यागत उभा होता. सगळा कारभार वरमाईच्या हाती होता, गावालाही हे ठाऊक होतं त्यामुळं नवल वाटायचं काहीच कारण नव्हतं. कजाग, हेकेखोर स्वभावाच्या गंगूबाईला ज्ञानूनं कधी दुखवलं नव्हतं. किंबहुना त्याचा तो स्वभावच नव्हता. गंगूबाईनं काहीही फर्मावताच पडत्या फळाची आज्ञा गोड मानून घ्यायचा. त्याची मुलं देखील त्याच्याच वळणावर गेली होती. आईच्या शब्दापुढं जायची त्यांची मजल नव्हती. खरं तर त्यांना आपल्या बापाबद्दल सहानुभूती वाटायची. पण ज्ञानूच्या पारड्यात त्यांनी आपलं वजन कधीच टाकलं नव्हतं. कुठल्या निमित्तानं गंगूबाई परगावी गेली असली की राऊतांचं घर मोकाट असायचं, सगळी बंधनं झुगारून जो तो मन मानेल तसं जगून घ्यायचा. गंगूबाई आली की पुन्हा सगळं आळी मिळी गप चिळी होऊन जायचं. अनुसूयेचं लग्न झाल्यावर नव्या नवरीचं माहेरी 'येती जाती' करून झालं, द्येव द्येव करून झालं, धोंड्याचं कौतुक करून झालं, दिवाळसण झाला, हरेक सणवाराला चोळी बांगडी देऊन झाली. बघता बघता अनुसूयेच्या लग्नाला पाचेक वर्ष उलटून गेली. तिच्या संसारात दोन फुलं उमलली. बाळंतपणाच्या वेळी माहेरी आल्यावर तिचं आणि गंगूबाईचं मेतकूट पुन्हा जमलं. कुठल्या न कुठल्या कारणानं अनुसूया माहेरी यायची आणि आईच्या कानाला लागायची. माजघरात खेटून बसून चोरट्या आवाजात दोघी मायलेकी कुचूकुचू करत बसायच्या. रडक्या तोंडानं माहेरी आलेली अनुसूया परत जाताना खुश दिसायची. मधल्या काळात गोरख भोसल्यांनी दोनतीन वेळा ज्ञानूला बॊलवून घेतलं, नंतर एकेक करून ज्ञानूच्या पोरांनाही भेटीचे सांगावे धाडले. ज्ञानूची मुलं एकेक करून आपल्या बहिणीच्या सासरी जाऊन आली. तिकडून आले की या सर्वांचे चेहरे पडलेले असायचे. त्यांची गाडी रुळावर यायला बरेच दिवस लागायचे. बहिणीच्या घरी जाऊन आल्यानं तिच्या आठवणीनं आपली पोरं सुकून जात असावीत असं गंगूला वाटायचं. पोरगी माहेरी आली की तिला बगलेत घेऊन बसणारी, गोडधोड खाऊ घालणारी गंगूबाई सुनांना मात्र हिडीस फिडीस करायची. त्याही बापड्या ऐकून घ्यायच्या. सासूच्या नणंदेच्या पुढंपुढं करायच्या. पण यंदाच्या वर्षात काही तरी गणित बिघडलं होतं. गंगूबाईच्या सुनांची आपसात कळवंड लागायची, एकमेकींचा अंगावर धावून जायच्या, झिंजा उपटायच्या. त्यांचा हा रौद्रवतार पाहताच गंगूबाईची बोबडी वळायची वेळ येई. इच्छा असूनही ती मध्ये पडू शकत नव्हती. चुकून तिनं मध्यस्ती केलीच तर ती तिच्याच अंगी यायची. वानर लकडी शेकं अन शेकणीची लाकडं अशी तिची गत व्हायची. ज्ञानूला असल्या गोष्टी आधीपासूनच जमल्या नव्हत्या आणि त्याची पोरं देखील तशीच होती. त्यामुळं रोज उठून चालणाऱ्या सुनांच्या भांडण तंट्यांनी गंगूबाई पुरती कातावली होती. आता तर तिच्या सुनांचा कज्जा इतक्या विकोपाला गेला होता की त्यांनी वायलं काढून द्यायचा धोसरा लावला होता. नवऱ्याच्या घुम्या स्वभावानं घर तुटतं की काय या भीतीनं गंगूबाईला पुरतं ग्रासलं होतं. आतादेखील रामपारीच भांडणाची राळ उडाली होती. मेंदूचा गरगटा झालेली गंगूबाई कावून शेताकडं गेली होती. कास्तकाराकडे गेलेला ज्ञानू घरी परतला तर गंगूबाई रानाकडं गेल्याचं कळलं. पोरं तर सकाळीच रानात गेली होती त्यामुळं तो ही झपाझप पावलं टाकत निघाला. धोंडीच्या माळावर लिंबाच्या झाडाखाली गुडघं दुमडून बसलेल्या गंगूजवळ अल्लाद जाऊन बसला. वारं सुसु करत कान भरत होतं, गरम फुफुटा पाला पाचोळयासंगं उडत इकडून तिकडं घुमत होता. नवरा आल्याची जाणीव होताच गंगूनं त्याच्याकडे न बघता पदर ठीकठाक करत कपाळावरून खाली ओढला, एक टोक दातात धरलं. गुडघ्याभोवती हाताची मिठी केली अन जोडवं मातीत रुतली तरी बोटांनी माती टोकरू लागली. ज्ञानूनं आधी घसा खाकरून बघितला. हात झटकून सभोवताली नजर टाकत ठस्कून बघितलं. पण गंगू बधत नव्हती. काही क्षण निशब्द गेले. ज्ञानूने गंगाच्या पाठीला हळूच स्पर्श केला, तसा मोठ्या फणकारयाने तिने तोंड फिरवलं. 'एव्हढा राग बरा नव्हं' म्हणत त्याने गोडीगुलाबी करायचा प्रयत्न सुरु केला."एक टाचकं कुठल्या सुनंला उचलाया लावू नगासा. कडबा कुट्टी दिकून मी करीन पर कुटल्या सुनेला अन कोणत्या लेकाला वाडं कापाया सांगू नका. सगळी कामं मी करीन. अजून मी मोप धड धाकट हाय, मला इतक्यात धाड भरत नाय. रक्ताचं पाणी करीन पर तुमी माझं ऐका. एक गुंठा दिकून कुणाच्या नावावर करू नका. आपण इथंच वस्तीवर राहू." एका दमात गंगूनं तिच्या मनातलं ओठावर आणलं. ज्ञानूनं मोठा सुस्कारा सोडला आणि होकार दिला खरा पण त्याच्यानं काहीच होणार नव्हतं. आणि झालंही तसंच. गंगूच्या सुनांचं भांडण विकोपाला गेलं, एका घरात चार चुली झाल्या. भिडस्त स्वभावाचे नवरे आणि सासरा निव्वळ बघे झाले होते. अखेर वाटणी करायचं ठरलं. गंगूबाईनं लाख बोंब मारून बघितली पण तिच्याकडं कुणी लक्ष दिलं नाही. भावकीकडून सांगून झालं, पाव्हण्या रावळ्यांनी शब्द टाकून बघितला पण सगळं व्यर्थ ! अखेर गंगूबाईनं सरपंचांकडे धाव घेऊन पंचायत बसवून तंटा मिटवायला सांगितलं. संक्रातीच्या दिवशी पंचायत बसायची ठरली. आपल्या घरात चाललेल्या घडामोडींनी अनुसूया देखील भांबावून गेली होती. ती आदल्या रात्रीच माहेरी आली. ती येताच गंगूबाईनं सगळा पाढा तिच्यापुढे वाचला. पण आता वेळ टळून गेली होती. गंगूबाईला हा आपला पराभव वाटत होता. आता गाव आपल्याला घाबरणार तर नाहीच पण आपल्याला किंमत नसणार याचं तिला शल्य वाटू लागलं. तिनं ज्ञानूला अखेरचा प्रयत्न करून पाहण्याची विनंती केली पण इतक्या दिवसांचा जुनी व्याधी एका रात्रीत थोडीच बरी होणार होती ? अखेर तिनं निश्चय केला. सकाळी सर्वांच्या आधी उठून तिनं सगळ्यांच्या आधी आवरलं. तिन्ही सुना झाडलोट करत असताना तिची वेणी फणी उरकली होती. सडा सारवण करणाऱ्या सुनांपाशी ती गेली आणि हात जोडत म्हणाली की, "तुम्ही आता खुशाल भांडत बसा मी जात्ये जीव दयायला .. " तिला वाटलं होतं की आपल्या सुना आपल्याला अडवतील, गयावया करतील आणि मग आपण त्यांचं भांडण मिटवू. पण झालं उलटंच. सुनांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. गंगूबाई तणतणत निघून गेली. ती गेल्याची माहिती घरात जरा उशिरानंच कळली. अनुसूया तर तोंड बडवून घेऊ लागली. जीव द्यायचा म्हणून गंगू घरातून निघून गेली खरं पण तिची पावलं पुढं जात नव्हती. वाटेतल्या वस्त्यांवर थांबत नजर मागं ठेवत बऱ्याच उशिरानं ती रवाना झाली. तिला वाटलं होतं की आपल्याला अडवायला कुणी तरी नक्की येईल पण कुणी आलं नाही. अखेर ती शेताजवळ पोहोचली. जड पावलांनी आणि उदास मनानं ती चालत होती, वाटंतला फुफुटा पायावर साचला होता. अंग घामाघूम झालं होतं, पाठीवरून वाहणारे घामाचे ओघळ कंबरेपर्यंत आले होते. केस विस्कटले होते. वार्‍यावर उडणारा पदर आवरायचं भान ही तिला राहिलं नव्हतं. अंग थरथर कापत होतं, श्वास वेगानं होत होते. मान लटपटत होती. शेताच्या निसरड्या बांधावरून खाली मान घालून चालताना ती घसरत होती, रोजची पायाखालची ओळखीची वाट असूनही तिच्यासाठी सारं बिनभरवशाचं झालं होतं. ती आपल्या तंद्रीतच होती. "कारभारीण बाई, औ कारभारीण बाई" ज्ञानूच्या आवाजानं ती भानावर आली. गालातल्या गालात हसत गोरख भोसले त्याच्याबाजूला उभा होता. असं अवकाळी वख्ताला आपल्या व्याह्याला पाहून गंगूबाई वरमून गेली. तिने प्रश्नार्थक मुद्रेने ज्ञानूकडे पाहिलं, पदर डोईवरून घेत पावलं चोरून घेत ती जागीच थबकली. काही क्षण निशब्द गेले. मग गोरखच बोलला, अवो ताईसाब जीव द्येयाची काहीच जरुर नाही, सगळं नाटक होतं ह्ये ! तुमच्या सुना तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. पण मीच त्यास्नी गळ घातली होती. " गंगूबाई आता पुरती चक्रावून गेली. पाव्हणा कोडं का घालतोय हे तिला उमगत नव्हतं. तिचा चेहरा वाचून होताच गोरख म्हणाला, "अनुसुयेने आमच्या घरात ह्येच कुटाणा क्येला. तिला वायलं काढून पाहिजे होतं. तिच्या डोस्क्यातली माती टोकरून बघितली तर तुमचं नाव समोर आलं, तवा आधी ज्ञानूशी बोललो मग तुमच्या मुलास्नीबी बोललो. मंग हे सगळं ठरलं. तुमच्या पेरणीचा फेरा तुमच्याकडं येणारच की ! आता तुमचं घर फुटतंय याचं अनुसूयेला वाईट वाटतंय नव्हं, तसं आमचं घर फुटताना आमाला बी वाईट वाटतं, तकलीफ हुत्ये. तवा तिला चार शब्द समजावून सांगा, तिच्या तिच्या घरी पाठवा. सारखं म्हायेरात पाय कशाला पाहिजे ? तुमच्या सुनास्नी पाठवता का असं ? न्हाई ना ? मंग आता कसं ? तर उद्याच तिला पाठवून द्या.. मी हिकडल्या हिकडं आल्या पावली जातो. उगाच चर्चा नको व्हायला." एका लयीत गोरख बोलत होता आणि खाली मान घालून उभ्या असलेल्या गंगूला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं.दुसऱ्याच दिवशी आपला बाड बिस्तरा गुंडाळून अनुसूया सासरी गेली ती लवकर आलीच नाही. कधी नव्हे ते राऊताच्या घरी ज्ञानूच्या शब्दाचं वजनही वाढलं.- समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!