पांढरी माती ...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

भल्या सकाळी लवकर उठून नारायण त्याच्या रानातल्या वस्तीवर आला होता. गडी जरा तावातच होता. घरातून निघाल्यापासून जी त्याची धूसफूस सुरु होती ती रानात आल्यावर देखील कमी झाली नव्हती. कौशल्येच्या माहेरचं लग्न होतं, तिच्या वहिनीच्या चुलत बहिणीचं लग्न होतं. पण भावजयीशी पटत नसल्यानं तिच्या कोणत्याच कार्यक्रमास हजेरी लावायची नाही असं तिनं मनोमन ठरवलेलं असल्यानं तिनं नकार दिला होता. बायकोनं नकार दिला तरी सोन्यासारखा सासरा आणि जीवापाड जपणारा मेव्हणा गिरीधर यांच्यासाठी नारायणाचं मन ओढ घेत होतं. त्यानं खूप समजावून सांगितलं तरी कौशल्येनं काही केल्या आपला हेकेखोरपणा सोडला नाही. बायकोला घरी ठेवून आपण एकट्यानं तिच्या माहेरी जाणं हे काही त्याला पटत नव्हतं, नव्हे रुचतही नव्हतं. पण त्याचा नाईलाज झाला. एरव्ही त्याचा एकही शब्द खाली पडू न देणारी कौशल्या अलीकडच्या काही वर्षात तिच्या माहेरी जाताना नाराज असायची, तिला वाटायचं की आपल्या भावजयीला आपली किंमत नाही, ती मनापासून आपला मान ठेवत नाही. तिच्या मनात आपल्याबद्दल दुस्वास आहे, असंच तिला राहून राहून वाटायचं. वस्तूस्थिती अशी नव्हती, गिरीधरची पत्नी गिरीजाबाई एक चांगली सुस्वरूप, मायाळू आणि संसारी स्त्री होती. तिनं सासरच्या सगळ्या लोकांची ठेप चांगली ठेवली होती, शिवाय ती कामाची खमकी होती. एकट्यानं पहाडाचं काम करायची. घर सांभाळायची, शेतातली कामं करायची. तिची अडचण एकच होती, ती म्हणजे ती कमालीची मितभाषी होती. यामुळंच तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होत. काहींना ती घमेंडी, आढयताखोर आणि मिजासी वाटे. तिची नणंद असणारी कौशल्यादेखील याला अपवाद नव्हती. लाख मिनतवाऱ्या करूनही तिनं निर्णय बदलला नाही तेंव्हा नारायणास निघण्याची तयारी करावीच लागली.त्याचं जाणं हे असं अचानक ठरल्यानं त्यानं विशेष अशी काहीच तयारी केलेली नव्हती. कपड्याची पिशवी देखील भरली नव्हती. रानातली कामं तशीच अंधातरी होती, त्यांची काही तरी व्यवस्था लावून देणं गरजेचं होतं. आपण विनंती केल्यावर कौशल्या लग्नास जायला तयार होईल असा त्याचा होरा होता त्यामुळं त्यानं रानातल्या कामांची वास्तपुस्त केलीच नव्हती. तसं पाहिलं तर रानात फार मोठी कामं पडून होती अशातलीही बाब नव्हती. मौसम कूस बदलायच्या वाटेवर आहे हे कोणताही हाडाचा शेतकरी मातीच्या बदलत्या वासानं आणि हवेतल्या बदलानंच ओळखतो, त्याला नारायण अपवाद नव्हता. मागचे चार महिने सलग कडक उन्हं पडली होती, सगळं शेतशिवार रखरखीत झालं होतं. दरसाली वैशाखात असणारी धग त्यानं यंदा चैत्रातच अनुभवली होती. पुढच्याच महिन्यात चारा सुकून गेलेला आणि पाणी आटून गेलेलं. दुष्काळाची चाहूल त्यानं फाल्गुनातच ओळखली होती जेंव्हा वारा कमालीचा कोरडा झाला होता, सगळं वातावरण शुष्क झालं होतं आणि पानगळीनंतर नवी पालवीच फुटली नव्हती ! पावसाची हालचाल दिसल्याबिगर धूळपेरणीला हात लावायचा नाही आणि छावणी उघडली की गुरं तिकडं लावून द्यायची असं त्यानं मनाशी ठरवलं होतं आणि झालंही तसंच होतं.त्याच्या बांधाला बांध लागून असणाऱ्या शेजारच्या निवृत्तीनं आपल्या गुरासोबत नारायणची गुरं देखील छावणीत नेली, तेंव्हा कुठं त्यांच्या चारापाण्याची सोय झाली. नारायणनं निवृत्तीसोबत दोन बैलं, एक म्हैसजोडी लावून दिली पण भाकड झालेली कृष्णा गाय स्वतःजवळच ठेवून घेतली होती. गावातल्या आणखी काही लोकांनी भाकड गायी ठेवून घेतल्या होत्या पण त्याची कारणं वेगळी होती. एका शेतमालकाची पाचपेक्षा जास्ती जनावरं छावणीत चालत नव्हती, मग लोक आपआपली दुभती आणि कष्टाची जनावरं तिथं पाठवत. कारण तिथं जी सोय व्हायची ती रानात होणं अशक्य होतं. इकडं गावात प्रत्येकाची दावण बिनचाऱ्याची कोरडी असायची. त्यामुळं सगळेचजण बिनकामाची गुरं आपल्यापाशी ठेवून घेत, त्यातलीच काही चाऱ्यावाचून, पाण्यावाचून मरत. नारायणनं आपल्याकडं पाचच जित्राबं असूनही कृष्णेला छावणीत न पाठवता आपल्या वस्तीवरच ठेवून घेतलं होतं. याची कारणं वेगळीच होती. कृष्णा कधीही नारायण साळव्याचं शेत सोडून कुठंच राहत नव्हती, एकदा घरातली सगळी माणसं कुणाच्या तरी शुभकार्यास गेली होती तेंव्हा तिला निवृत्तीच्या शेतात ठेवलं होतं तर तिनं दोन दिवस एक घोट पाणी पिलं नाही की चाऱ्याला तोंड लावलं नाही. खेरीज तिला नारायणाच्या हाताची खूप सवय होती. जेंव्हा तिला चिक्कार दुधदुभतं होतं तेंव्हा नारायणचा हात पाठीवर पडल्याशिवाय तिची आचळं तटतटत नसत. तिचं त्याचं नातंच मुळात शब्दा पलीकडचं होतं. त्यात स्नेह, माया, विश्वास आणि आपुलकी ओतप्रोत भरली होती. आता भल्या सकाळी गावातून तीन कोस तंगडे तोडत आलेला नारायण खास कृष्णेसाठीच आला होता.चाळीशीत पोहोचलेल्या नारायणचा मोठा मुलगा जयदेव हा निवृत्तीसोबत गुराच्या छावणीत मुक्कामास गेलेला होता. गुरं तिथं ठेवून त्याला इकडं येणं शक्य नव्हतं. तर धाकटा मुलगा जगन्नाथ हा कालव्याच्या कामावर मुकादम म्हणून गेला होता. घरात दोन पोरी, बायको कौशल्या, थकलेली आई आणि अण्णा इतकी माणसं होती. नारायण लग्नास जायला राजी झाला तेंव्हा दोन्ही पोरी मामाच्या गावाला जायचं म्हणून त्याच्या मागं लागल्या होत्या. पण कौशल्येवर संतापलेल्या नारायणनं मुलींवर राग काढला. त्यांना चांगलेच रागे भरले. शिवाय नारायणपुढं पैशाची अडचणदेखील होती. आधीच आहेर मानपानाला काही रक्कम खर्ची पडणार होती, त्यात दोन्ही मुलींचा यायचा जायचा प्रवास खर्च वाढला असता तर ते त्याला परवडणारं नव्हतं. त्यामुळं त्यानं एकट्यानंच जायचं ठरवलं होतं आणि सासरी गोरेवाडीला जाण्यापूर्वी सकाळी उठून कृष्णेकडं तो आला होता. एरव्ही सगळी गुरं गोठ्यावर असली की नारायण आणि कौशल्या रानातच राहत असत. पण पिकपाणी जळून गेलेलं, चाऱ्याची ओरड, पाण्याची आबाळ, छावणीत गुरं धाडल्यामुळं रिता झालेला गोठा आणि जोडीला मातीतून व आभाळातून अशा दुई अंगानं येणारी धग या सगळ्या कारणांमुळे ते दांपत्य गावातल्या घरी गेलं होतं. बाकीची गुरं नसली तरी कृष्णेच्या निमित्तानं नारायण शेतात यायचा आणि दिवसभर कधी बांधावर तर कधी दंडाच्या रांगेत लावलेल्या झाडांच्या सावलीत बसून राहायचा. तर कधी शेताच्या बरोबर मधोमध असलेल्या आंब्याच्या डेरेदार झाडाखाली बसून राहायचा. या झाडाची एक न्यारीच कथा होती. नारायणाच्या वडीलांचे शेत अवघ्या तीन एकराचे होते. नारायणने दिवसरात्र मेहनत करून घाम गाळून काळ्या आईवर अंतःकरणापासून जीव लावत तिथं सोनं पिकवलं. त्यातून आलेल्या पैशातून त्यानं बांधाला लागून असलेलं खालच्या अंगाचं लिंबाजीचं चार एकराचं शेत विकत घेतलं. दोन्ही शेताच्या सीमा एक करताना मधला बांध फोडून काढला पण आंब्याचं झाड तसंच ठेवलं. भर उन्हाळ्यातदेखील शीतल विशाल सावली देणाऱ्या त्या झाडाचे आंबेदेखील मधुर रसाळ होते. त्यामुळं नारायण शेतात आला तरी वस्तीतल्या खोलीत तो क्वचित बसून असायचा. त्याची सगळी ओढ मातीत आणि मातीतल्या अंकुरात असायची. आता सकाळीच आलेल्या नारायणनं कृष्णेला गोठ्यातून बाहेर आणलं आणि दिवसभर उन्हे लागून त्रास होऊ नये म्हणून तिला आंब्याच्या बुंध्याला कासरा गुतवून बांधून ठेवलं. तिला फिरतं यावं म्हणून वावभर दावं मोकळं ठेवलं. तिच्या वशिंडावरून पाठीच्या पन्हाळीवरून हात फिरवताना तिनं कातडी थरथरवून दाद दिली. पाठीवर थाप देताच गर्रकन शेपटाचा गोंडा फिरवला आणि त्याला जणू निरोप देण्यास तयार असल्याचं सूचित केलं. कृष्णेचं वय झालं असलं तरी तिची तब्येत अजून बरी होती. बरगड्या दिसत नव्हत्या, पोटाची पखाल मोठी होती, मणके मजबूत होते, पायांची काडं मजबूत होती, चारच्या आकड्यातली शिंगं वाढती होती, गळ्याची मऊसुत कांबळ आणखी म्हणावी तशी ओघळलेली नव्हती. खूरं फाकलेली नव्हती, तीनेक वर्षापूर्वी ठोकलेल्या नाली टिकून होत्या. कृष्णेनं वैरण खाल्ल्याशिवाय संध्याकाळचा घास न खाणारा नारायण बऱ्याच काळानंतर तिला एकटं सोडून निघाला होता, याआधी तिला मागे ठेवून तो परगावी गेला होता पण तेंव्हा शेतात घरचं माणूस हजर असायचं. आजची गोष्ट वेगळी होती. घरातलं कुणीच हजर नव्हतं. मोठ्या घमेल्यात कृष्णेपुढं पाणी आणि बाजूला वैरण ठेवून नारायण गावात परतला. गावात येताच लगबगीनं हमरस्त्यावर असलेल्या एसटीबसच्या थांब्यावर आला. बऱ्यापैकी आवरून सावरून आलेल्या नारायणाला पाहून तिथल्या काहींनी हटकलंच. हसून उत्तर देत सासरला लग्नाची ‘तीथ’ असल्याचं त्यानं सांगितलं. बेरकी गावकऱ्यांनी विचारलं, “मग काय आता बोट पिवळं होणार का ?” या प्रश्नावर गालात हसत नारायण उत्तरला, “हे काय पहिलं लग्न आहे का ? अरे मेव्हण्याच्या चुलत मेव्हण्याचं लग्न आहे रे बाबांनो !’ हास्यविनोद करता करता गाडी कधी आली आणि तो गाडीत कधी बसला हे त्याला देखील उमगले नाही. तीनेक तासाच्या प्रवासानंतर अकराच्या सुमारास तो भयेमळ्यास पोहोचला. ‘पाव्हण्यां’च्या भेटीगाठी उरकल्या. गप्पांचा फड रंगला, हौशा गावशांना भेटून झालं. मंगलाक्षता झाल्या, वाजंत्र्यांनी वाद्यांचा गजर केला. आहेर मानपान झालं. तोवर सकाळपासून हवेत असलेला उकाडा वाढतच गेला. जेवणावळी सुरु असताना सोसाट्याचं वारं सुटलं आणि वीजांचा कडकडाट कानी आला तसा नारायण एकाएकी भानावर आला. आपल्या गावाकडंही मौसमानं कूस बदलण्याची चिन्हं होती, न जाणो हा पाऊस आपल्या शेताकडंही पडत असेल तर ? वीज चमकावी तसं ह्या प्रश्नाचं झालं. एरव्ही गेले कित्येक दिवस तो आतुरतेने पावसाची वाट पाहत होता पण आज मात्र त्याला पाऊस नकोसा वाटत होता कारण त्याला कृष्णेची चिंता लागली होती. कृष्णेला आपण गोठ्यातून बाहेर काढून आंब्याच्या झाडाखाली बांधल्याचं कुणालाच सांगितलं नाही, आता पाऊस पडत असेल तर तिला गोठ्यात परत कोण आणणार ? आभाळ गर्जत असंल तर ती बावरून जाईल, तिचे हंबरडे वाऱ्या पावसाच्या आवाजात कुणाला ऐकू जातील का ? पावसाबरोबर वीजा चमकत असतील तर ती घाबरून गेली असेल का ? आजूबाजूला झाडं, वस्ती नसलेल्या असलेल्या एकांड्या झाडावर वीज कोसळते म्हणतात, आपली कृष्णा तर शेताच्या मधोमध असलेल्या झाडाखाली बांधलीय. तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर ? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात डोकावू लागले. बराच वेळ विमनस्क अवस्थेत बसून राहिल्यावर त्याला एक उपाय सुचला. सगळ्यांच्या नजरा चुकवून लग्नस्थळापासूनच्या नजीकच्या टेलिफोन असलेल्या दुकानाचा शोध सुरु केला. बरीच पायपीट केल्यावर त्याला तसं दुकान सापडलं. खिशातल्या जीर्ण डायरीतला गावातल्या वाण्याचा फोन नंबर काढून त्यानं दुकानदारापुढं धरला आणि फोन लावून देण्यासाठी आर्जव केलं. बराच वेळ खटपट केल्यावर फोन लागला. फोन सरळ कसा धरायचा हे त्याला माहितीच नव्हतं, आयुष्यात फोन कानाला लावण्याची त्याची ती पहिलीच वेळ होती. त्यानं पहिला प्रश्न केला की गावात पाऊस आहे का ? उत्तर होय असं येताच त्याच्या छातीत धस्स झालं ? आभाळ किती आहे, अजून किती वेळ पाऊस पडेल ? सरींचा भार कोणत्या दिशेला जास्त आहे ? वारं वावदान आहे का ? एकामागं एक प्रश्नांची सरबत्ती त्यानं केली. मग पलीकडून उत्तरं येण्याऐवजी प्रतिप्रश्न आले आणि त्यातच बराच वेळ गेला. कोण बोलतंय, काय बोलतोय आणि काय निरोप आहे हे सर्व दोन्ही बाजूंनी कळण्यास बराच वेळ गेला. वाण्याच्या गयावया करून त्यानं विनवणी केली की कौशल्येला निरोप द्या म्हणावं, कृष्णेला गोठ्यात आणून बांधा म्हणावं ! वाण्यानं होकार द्यायला आणि दोन्ही बाजूचं संभाषण बंद पडायला एकच गाठ पडली. दुकानदाराचा फोनच बंद पडला. सोसाट्याच्या वाऱ्यानं लाईन गेली अशी त्याची समज काढली. त्यानं मग दुसरा फोन शोधला, एव्हाना तिथंही भुरूभुरू पाऊस सुरु झाला होता. बराच वेळ तंगडतोड केल्यावर त्याचा शोध संपला. इथला फोन चालू होता पण गावातला फोन लागत नव्हता. तो ही पावसानं बंद पडला असणार, आता काय कारायचं असा यक्षप्रश्न त्याच्या पुढ्यात उभा राहिला. वाण्यानं होय नाही म्हणायच्या आधी बोलणं खुंटलं, कौशल्येला निरोप गेला असंल की नाही याचीच काळजी लागून राहिली. जड पावलांनी तो लग्नमांडवात परतला. खरं तर त्याचं चित्त तिथं नव्हतंच. तिथं सुरु असलेल्या लगीनघाईत त्याची भूमिका केवळ बघ्याची झाली होती. केंव्हा एकदा सगळे सोपस्कार आटोपतील असं त्याला झालं होतं. जेवणावळी सुरु झाल्या तेंव्हा त्याची इच्छा नसूनही इतरांसोबत चार घास खावे लागले होते. काही तरी निमित्त करून तिथून निसटून जावं असा विचारही त्याच्या मनात तरळू लागला पण नवरी वाटेला लावल्याबिगर आपण पोबारा केला तर पाहुण्यांना वाईट वाटेल, शिवाय कौशल्येला ही गोष्ट कळली तर ती मनाला लावून घेईल याची आशंकाही होती. गावाकडं जायची ओढ जितकी तीव्र होत होती तितकी प्रतीक्षा वाढत होती. पाव्ह्ण्यांची लगबग, कुरवल्यांची दंगामस्ती, पोराठोरांचा कालवा, वाजंत्र्यांची पीरपीर, नवरा नवरीची तगमग, वरमाईचा तोरा, जेवणाचा ठसका, मांडववाऱ्याचा जोर, हौशा गवशांच्या गप्पा, रुखवताचा रुबाब, वरबापाचा मान, आत्याबाईचा रुसवा फुगवा हे सारं एकेक करत शिगेला पोहोचत गेलं. तिथून निघण्यास नारायण आता पुरता आतुर झाला होता. त्याचं सगळं लक्ष आभाळाकडं होतं आणि त्याची शंका खरी ठरली. रुखवताची आवराआवरी सुरु व्हायला आणि पावसाची पहिली सर यायला एकच गाठ पडली. हळूहळू पावसाचा जोर वाढत चालला. लग्न सुखरूप लागल्यानंतर पावसानं हजेरी लावल्यानं सगळ्यांच्या चेहऱ्यावर तृप्तता झळकू लागली कारण या पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच होती. अगदी नारायणास देखील, मात्र तो एकटाच तिथं चिंतातूर वाटत होता. आता आणखी काही वेळ तिथं थांबणं त्याच्यासाठी वर्षानुवर्षाचा काळ थांबण्यासारखं झालं होतं. आता निघायलाच हवं असं त्यानं मनाशी ठरवलं. इकडून तिकडून त्यानं नजर फिरवली, कोण कुठे उभं आहे, कोण कुणाशी बोलतंय, आपल्याकडं कुणाचं लक्ष आहे का याचा तो अंदाज घेऊ लागला. आता निघणार इतक्यात गिरिधर आणि गिरीजाबाई त्याच्या पुढ्यात येऊन उभे राहिले, त्याचे हात हातात घेत गिरीधर म्हणाला, "दाजी कुठं निघालाव ? वाईच थांबा की ! कौशल्येचं आणि तुमचं मानपान द्यायचं राहिलंय. तेव्हढं नेलंच पाहिजे, नाहीतर आमच्यावर ओझं होईल ! " नारायणला आता थांबणं भाग पडलं. थोड्याच वेळात त्याचा आहेर करून झाला. आता नवरी निघायची हालचाल सुरु झाली, मग मात्र नारायणला राहवलं नाही. त्यानं हिय्या करून गिरीधरला आपली अडचण सांगितली. गिरीजाच्या आईवडीलांना भेटून तो तडक मांडवाबाहेर निघाला. दाजी, पाऊस थांबेपर्यंत तरी थांबा असं गिरीधरनं त्याला समजावून पाहिलं पण त्यानं ऐकलं नाही. भर पावसात तो एसटी स्टॅन्डच्या दिशेने निघाला. मिळेल त्या वाहनानं गावाकडं गेलंच पाहिजे हा एकच ध्यास आता त्याच्या मनात होता. एव्हाना दाट भरून आलेलं आभाळ आणखीच गडद झालं होतं. बराच वेळ थांबूनही एकही एसटी आली नाही की कुठलं जीपडं देखील आलं नाही. शेवटी तो तिथून बाहेर पडला. गावाकडं जाणारया रस्त्याच्या दिशेनं चालू लागला. आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता, गावातही असाच पाऊस असंल आणि कृष्णेला झाडाखालून काढलं नसंल तर काय अनर्थ ओढवेल याची त्याला भीती वाटत होती. अखेर बऱ्याच पायपिटीनंतर एकदाचा तो तिकटीपाशी येऊन थांबला आणि त्याचं गाऱ्हाणं नियंत्यानं ऐकलं. फडफड आवाज करणारी एक टमटम आली. त्यात बसून तो निघाला. एकदाची गाडी मिळाली हे समाधान फार वेळ टिकलं नाही. कारण टमटम गलांडेवाडी पर्यंतच जाणार होती. अर्ध्या तासात ते तिथं पोहोचले. तिथं पुन्हा गाडीची वाट बघणं आलं. पुन्हा दुसऱ्या टमटमनं तो सारूळयापर्यंत आला. तिथून त्याला थेट गावापर्यंत येणारी जीप भेटली मग मात्र तो आश्वस्त झाला. पण चिंता काही कमी झाली नव्हती कारण सगळ्या रस्त्यानं इथून तिथून जोराचा पाऊस होता. गावात पोहोचेपर्यंत अंधारानं वेशीवर माथा टेकला होता. गावातही मुसळधार पाऊस सुरूच होता, आता घरी जाण्यापेक्षा थेट शेतात गेलेलं बरं असा विचार करून त्यानं थेट शेताचा रस्ता धरला. इतका पाऊस पडूनही वाटंनं म्हणावा तसा चिखल ऱ्याडरबडी झाला नव्हता. पाय मात्र घसरत होते. अधून मधून चमकणाऱ्या वीजा, सुंसुं आवाज करत वाहणारा सोसाट्याचा वारा आणि त्याच्या तालावर हलणारी झाडं, अधून मधून येणारा गुरांचा हंबरण्याचा आवाज यामुळे वातावरण गूढ होत चाललं होतं. नारायणला कशाचीच तमा नव्हती. त्याचं सगळं लक्ष कृष्णेकडं लागून होतं. शेताच्या मधोमध असलेल्या झाडावर वीज पडण्याचा धोका अधिक होता जो कृष्णेच्या जीवावर बेतला असता. भर पावसात पायपीट करून थकवा येऊनही नारायणची पावलं वेगानं पडत होती. शेत जसजसं जवळ येऊ लागलं तसतसे त्याचे श्वास वाढू लागले. वाटेत जाधवाच्या वस्तीवर रंगू जाधवांनी त्याला हाळी दिली होती पण तो थांबला नव्हता सदाशिव मान्यांच्या पोरानं घराबाहेर येत त्याला अडवून पाहिलं पण नारायणानं त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. तो आपला झपाझप चालत राहिला. त्याला कधी एकदा कोरक्याचा बांध लागतो असं झालं होतं. तो बांध ओलांडला की शेत नजरंस पडायचं. अखेर एकदाचा कोरक्याचा बांध लागला आणि त्याला हायसं वाटलं. मात्र त्याचा आनंद फार टिकला नाही. कानठळ्या बसवणारा आवाज आलां आणि काळजात कळ यावी तशी आकाशात वीज कडाडली. प्रचंड आवाजापाठोपाठ डोळे दिपवणारा प्रकाश पडला. नारायणच्या शेताच्या दिशेने आगीचा लोळ झेपावला. दिग्मूढ झालेला नारायण पाहतच राहिला. जणू त्याच्या अंगातलं बळ एकाएकी नाहीसं झालं. पुढच्याच क्षणी तो भानावर आला. सगळं बळ एकवटून धावत निघाला. धावताना धोंड्यात पाय अडखळून खाली कोसळला. अंग चिखलात बरबटून गेलं. उठून पुन्हा धावू लागला आणि पावसाचा जोर एकाएकी प्रचंड वाढला. समोरचं दिसेनासं झालं. रोजच्या सवयीची वाट असल्यानं तो अंदाजानं पावलं टाकत निघाला, वस्ती जवळ आली तसं त्याचा हुरूप वाढला. धावतच त्यानं कृष्णेला हाळी दिली. पण तिकडून प्रतिसाद आला नाही, त्याच्या अंगावर शहारे आले. इतक्या पावसातही कानामागून घामाचा थेंब ओघळला. क्षणाचाही विलंब न लावता ढेकळांचा चिखल तुडवत तो कृष्णेच्या दिशेनं दौडत निघाला. त्याचा तोल जात होता पण लक्ष्य टप्प्यातच होतं. आता जेमतेम काही फर्लांग अंतर उरलं होतं. त्याच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या होत्या. कृष्णेचा आवाज कसला म्हणून कानी पडत नव्हता. एरव्ही त्याची चाहूल लागली की ताडकन उठून उभी राहणारी मोठ्यांनं हंबरडा फोडणारी कृष्णा आज काहीच प्रतिसाद देत नव्हती. दुरून कुठून तरी वीज पडल्यानं झाडाच्या जळण्याचा वास आसमंतात धुमसत होता. नारायण आता पुरता कावराबावरा झाला होता. काही ढांगात आता तो कृष्णेजवळ पोहोचणार होता. इतक्यात त्याला कृष्णेच्या हंबरण्याचा आवाज आला आणि त्याच्या जीवात जीव आला. काही क्षणात तो तिच्यापाशी पोहोचला. तिनं देखील अंग थरथरवलं. तिच्या अंगावर आंब्याची मोठी फांदी पडली होती, ती तिनं सगळी ताकद एकवटून बाजूला केली आणि एका दमात ताडकन उभी राहिली. नारायण तिच्यावर अक्षरशः झेपावलाच. तिच्या पाठीवरून त्याचा हात फिरत होता आणि मान वेळावून आपल्या काटेरी जिभेने ती त्याचं ओलेतं अंग चाटत होती. दोघांच्या डोळ्यातला पावसाला आता वाट मिळाली होती. त्यांचं रडणं पाहून पावसानं हात आखडता घेतला. एकाएकी पाऊसही थांबला. काही वेळ ते दोघं तसेच निशब्द होत एकमेकाला अनुभवत होते. आकाश निरभ्र होत गेलं आणि लुकलुकत्या चांदण्या दिसू लागल्या. त्यांचं हसू पानाफुलावर पाझरू लागलं. तटतटलेल्या कृष्णेला पुन्हा पान्हा फुटला आणि मातीला पांढरा मुलामा चढू लागला. मातीच्या कुशीतला अंकुर खऱ्या अर्थानं तृप्त झाला... - समीर गायकवाड.दैनिक लोकसत्तामधील लेखाची लिंक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!