परीराणीचा खरा स्वर्ग

परीराणीचा खरा स्वर्ग

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या निळ्याभोर आकाशात एक सुंदर परीराणी राहत असे. खूप सुंदर आणि खूप हुशार ... सर्वाना खूप जीव लावणारी. निळ्या आभाळात सोनेरी उन्हानंतर रोज सायंकाळी मावळत्या सूर्यराजाच्या लालसर प्रकाशाने खुललेल्या संध्यामध्ये त्या अबोली मेघपुंजक्यांमध्ये लपाछुपी खेळायला तिला फार आवडत असे. तिथे तिच्या त्या स्वर्गातल्या महालात ऐश्वर्याच्या सर्व सुखसोयी होत्या. आणि त्यामुळे ती आनंदी सुद्धा होती. पण तरी ती कायम मनातून थोडीफार दु:खी असायची कारण ती बरेचदा एकटी पडायची. इतके सर्व छान छान असूनही काहीतरी होते जे तिच्या मनासारखे नव्हते तिथे...काहीतरी हवेहवेसे पण तिथे मिळत नाही असे काही तरी ती कायम शोधत असे. एकदा तिची ही समस्या घेऊन ती देवबाप्पा कडे गेली. म्हणाली , " बाप्पा , इथे माझ्यासाठी छान छान कपडे आहेत...महालासारखे मोठे ढगांचे घर आहे... खायच्या प्यायच्या गोष्टींबद्दल तर विचारायलाच नको... खेळायला खूप काही आहे... पाण्याच्या थेंबाच्या रूपात चमचमणारे हिरे , ताऱ्यांचे शुभ्र मोती , सुवर्णकमळे , इंद्रधनूच्या रंगीत माळा असे खूप खूप दागिने आहेत,आसमंती विहरण्यासाठी चंद्राचा रथ आहे ... पण का कुणास ठाऊक मला इथे काहीतरी कमी आहे असे वाटते. काय असेल ते , त्याचाही पत्ता लागत नाही. तुला माहित आहे का असे काय आहे जे आता इथे नाही ज्यामुळे मी इतकी अस्वस्थ आहे आणि कुठे मिळेल मला ते. त्या एका गोष्टीसाठी मी हे सारे ऐश्वर्य त्याग करण्यास तयार आहे.फक्त ती एक अनमोल गोष्ट मला मिळू दे "बाप्पाने परीराणीचे हे बोल ऐकले आणि गोड हसून फक्त म्हणाला , "तथास्तु !"आणि काय आश्चर्य. ती परिराणी त्या आभाळातून थेट खालच्या दिशेने कोसळू लागली. त्या प्रवासात तिला स्वतःमध्ये बरेच बदल होत असलेले दिसले. तिचे पंख गायब झाले. तिचा आकार लहान होऊ लागला. ती अधिकाधिक गोड आणि गोंडस होत गेली. आकाशातल्या जगाचा जणू आता तिला विसर पडत होता. तिने खाली वळून पाहिले तर आयुष्यात प्रथमच तिने हिरवळ पाहिली. नाहीतर वर आकाशी झाडी देखील सोन्या रुप्याची होती. आपल्या परीदेशात ऐकलेला आणखी एक हिरवा-निळा असलेला हाच तर स्वर्ग नाही ना? हो हो हाच असेल... काय बरे नाव त्याचे... पृथ्वी , धरणी , वसुंधरा...आता या नव्या स्वर्गात प्रवेश मिळणार हे समजताच ती आणखी उत्साही झाली आणि तिने आणखी वेगाने झेप घेतली. जसजसा हा नवा ग्रह जवळ येऊ लागला , तसतसे तिला काही क्षणांपूर्वी लुप्त झालेले तिचे सप्तरंगी पंख आठवले. आता आपण खाली आपटणार कि काय या भीतीने तिने आपले डोळे गच्च मिटले.आता पाठ दाणकन आपटणार या भयविचारात असलेल्या परीराणीला आता सर्व स्थिर झाल्याचे जाणवले.रेशमी दुपट्याच्या मऊ स्पर्शासोबतच आणखी एक उबदार स्पर्श तिला जाणवला. कोण असेल बरे ही? आकाशातल्या गावी ऐकलेल्या गोष्टीतली आई असेल का? परीच्या आनंदाला आता भरती आली होती. ती खुद्कन हसली तशी तिला एक हाक ऐकू आली," हसली रे हसली , माझी परी हसली. बघ बघ कशी माझ्याकडे बघून हसते आहे ती"आणि असे म्हणत परीराणी त्या उबदार स्पर्शातून एका नव्या मायेच्या स्पर्शात विसावली. त्या ही  स्पर्शात ती परीराणी फार फार सुखावली. पण म्हणाली ," बाप्पा , मला आई मिळाली म्हणजे सर्व मिळाले असे वाटते आहे बघ. पण या नव्या देवदूताचे नाव काय ते तरी सांगशील ." इतक्यात बऱ्याच जणांचा गलका ऐकू आला. परीराणीचे कान त्याकडे टवकारले. " बघा बघा , बाबाची लाडाची लेक. कशी छान हसते आहे . इवल्याशा हातात घेतलेले बाबाचे बोट सोडवतच नाही तिला."'बाबा'... तर या देवदूताचे नाव बाबा आहे तर. गोष्टीत ऐकले तसे या पृथ्वीच्या स्वर्गात प्रत्येक परीचा जीवनातला पहिला हिरो किंवा सुपरमॅन असतो तो हाच. हाच मला हवे ते सर्व आणून देईल. आई- मला प्रेमाची अंगाई ऐकवेल , प्रेमाने घास भरवेल ,कधी कधी रागावणार पण तेही प्रेमाने , योग्य मार्ग दाखवेल आणि बाबा- माझ्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी मदत करणारे हात, कधीतरी चूक झाल्यावर हेच हात उगारले जातील पण तेही खोटे खोटे कारण त्यातही प्रेम असेलच की. आणि या दोघांच्या सहकार्याने , स्वतःच्या शक्ती आणि बुद्धीने मी या जगात देखील माझे हरवलेले पंख पुन्हा मिळवेन आणि इथे सुद्धा उंच भरारी मारेन. बाप्पा, इथे देखील थोडे कष्ट घेतले कि सर्वच मिळेल बघ. आणि सोबत मिळेल ती अनमोल देणगी जी फक्त इथे जन्म घेणाऱ्यांनाच मिळते... प्रेम. प्रेमच तर शोधत होते मी तिथे. इथे आई , बाबा यांच्या रूपात तर मिळेलच पण क्षणाक्षणाला नवी ओळख देत असलेल्या आजी, आजोबा,आत्या, मामा, दादा, ताई या सर्वांच्या रूपात देखील इथे प्रेमाचा वाहता झरा माझ्या जीवनात सतत वाहत राहील असे वाटते. "असे मनातल्या मनात म्हणत परिराणीने मनोमन बाप्पाला धन्यवाद केले.  पृथ्वीवर अवतरलेल्या या परीला तिच्या आई-बाबांमुळेच एक नवे नाव मिळाले - तनया. तनया नाव असले तरी तिला वागणूक एका परीसारखीच होती. किंबहुना पऱ्यांची राणीच.आई-बाबा , दोन दोन आजी-आजोबा आणि कित्तीसारी नाती... यांच्या सहवासात १, २, ३ आणि आज ४ अशी चार वर्षे कधी उलटून गेली हे कधी तिला जाणवलेच नाही. रोज रात्री आईच्या परीकथेतील परीबद्दल ऐकताना तनयाला भारी मज्जा यायची. मध्ये एकदा बाबांमुळेच विमानात बसायला मिळाले आणि अगदी जवळून तिला तिच्या आकाशातल्या गावाचे दर्शन घेता आले. आणि त्यानंतर पृथ्वीवरच्याच एका नव्या स्वर्गात दाखल झाली. हे सर्व आज अनुभवायला मिळते आहे कारण तनयाच्या आईबाबांच्या स्वप्नांमध्ये जी मुलगी असायची ती हुबेहूब त्या परीराणीसारखी होती आणि बाप्पानेही अचूक ओळखले कि परिराणीला काय हवे आहे . म्हणूनच तर बाप्पाने या दिवसाला जगात निर्माण केले . म्हणून हा दिवस सर्वांसाठीच खूप खूप खास.औक्षण , केक , शुभेच्छा , मित्र-मैत्रिणी , खेळ, नवे गिफ्ट ... सारे सारे या दिवसासाठी.तनया,या सर्वांसोबत ही छोटीशी गोष्ट सुद्धा यावर्षी तुझ्यासाठीच, बरे का! तुला या चौथ्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू अशीच प्रेमात , आनंदाने ,उत्तम आरोग्याने , प्रगतीने वाढत राहो हि बाप्पाकडे प्रार्थना. आपल्याला या जगीसुद्धा उंच भरारी मारण्यासाठी लागणारे गेलेले पंख मिळवायचे आहेत ना मग तयारी आतापासूनच करायला हवी , आणि त्यासाठीच या एवढ्या साऱ्या शुभेच्छा - फक्त तुझ्यासाठी !!! - रुपाली ठोंबरे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!