नकुशी........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

जय आणि रागिणीच्या लग्नानंतर दोन वर्षांनी रागिणीला दिवस गेले. अर्थातच दोघांनाही खूप आनंद झाला.  रागिणीला लहानपणी आपल्याला एक छोटा भाऊ असावा असं खूप वाटायचं. पण तिला बहीण मिळाली. आणि भावाबरोबर खेळण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.आता दिवस राहिले तर तिला आपल्याला मुलगा व्हावा असं वाटू लागलं.सातव्या महिन्यात आई राहायला आली, तर ती आईला पण सारखी म्हणायची, मला ना मुलगा पाहिजे.लहानपणी भावाला खेळवावसं वाटायचं, आता तरी ती इच्छा पूर्ण होऊ दे.आई म्हणायची, तुला वाटतं ना तर मुलगाच होईल!!नवऱ्याला सांगितल्यावर तो म्हणायचा, जे व्हायचं ते होऊ देत, आपल्या हातात थोडंच आहे.तिला त्यावेळी खूप राग यायचा त्याचा, आपल्या मनासारखं बोलत नाही म्हणून.हळूहळू रागिणी वजनाने चांगलीच भरायला लागली, पोट मोठं आणि गोल दिसायला लागलं होतं.बाजूला राहणाऱ्या मैत्रिणीची सासू दिसली की नेहमी म्हणायची, मुलगाच होणार बघ तुला, माझा अनुभव आहे, माझे शब्द खोटे नाही ठरायचे. हिला खूप छान वाटायचं.बाळाला अंघोळ घालणारी बाई बघून ठेवली, तर तीही घरात आल्याआल्या म्हणाली मुलगाच होतोय बघा तुम्हाला.रागिणी खुष, लगेच तिला पक्की करून टाकली.तिला आता खात्रीच होती मुलगाच होणार.नवव्या महिन्याच्या शेवटी कळा सुरू झाल्या आणि रागिणीला ऍडमिट केले.त्रास खूप झाला आणि एक गोंडस बाळ घरात आले.नर्स म्हणाली, लक्ष्मी घरी आली, लक्ष्मी.हिने विचारलं, काय???मग ती नर्स पुन्हा म्हणाली, मुलगी झाली तुला, लक्ष्मी घरात आली, मिठाई वाटा मिठाई.तिथल्या तिथे हिला खूप रडायला आलं. तिने नीट पाहिलं पण नाही मुलीला.नातेवाईक दोघींना बघायला येत होते.जो तो म्हणायचा, नक्की मुलगीच आहे ना?? मुलगा वाटतोय अगदी. चार किलोची होती मुलगी. चांगली गुटगुटीत.हे ऐकून तिला आणखी वाईट वाटायचं. जय मात्र खुष होता.तिची आई म्हणायची, कृष्ण आला असता तर काय झालं असतं??घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी अंघोळ घालणारी बाई आली,तर मुलीला बघून म्हणाली, बघा मी बोलले की नाही मुलगा होणार, मला पोट बघूनच कळतं.डोळ्यात पाणी आणून रागिणी म्हणाली, मुलगी आहे हो.जे बघायला येतील ते हेच म्हणायचे, कोणी मुलगी म्हणणारच नाही हिला, तोंडावळ अगदी मुलासारखी आहे.हे सगळं सुप्तावस्थेत रागिणीच्या मनात शिरलं, आणि तिने हिला मुलगा म्हणूनच वाढवायचं ठरवलं.माझा राजा बेटा, माझा कृष्णा हेच ती मुलीला म्हणू लागली. नावही ठेवलं मधुर. दोघांसाठी असणारं.  नेहमी तिला सगळे मुलांचेच कपडे घालायची. बॉयकट ठरलेलाच.कुठे फिरायला गेली की कोणी विचारायचं, नाव काय हो तुमच्या मुलाचं?? ही अगदी खुष होऊन जायची.तिच्या मनाने मधुर ही मुलगी नसून मुलगाच होता.जय म्हणायचा, बंद कर हा खेळ. त्याने आणलेले मुलीचे ड्रेस सुद्धा हिने अंगाला लावू दिले नाहीत कधी.मधुरनेही जयचीच चेहरेपट्टी घेतलेली. रागिणी तर मधुर बेटा म्हणूनच बोलवायची तिला.मधुरला पण आपण बॉय आहोत असच वाटायला लागलं हळू हळू. रागिणीने तिला बॉयच करून टाकलेलं.शाळेत टाकल्यावर मधुरला फ्रॉक घालायला लागणार होता.तिथे सुद्धा रागिणीने खास परवानगी मिळवली. माझी मुलगी फ्रॉक घालतच नाही अजिबात. आणि खरंच मधुरलाही वाटत होतं, शर्ट, चड्डी, टि शर्ट हेच कपडे माझे, फ्रॉक गर्ल घालतात, मी तर बॉय आहे. तिच्या मनात रुजवल गेलं होतं. ती सगळ्यांना सांगायची मी बॉय आहे. आणि कोणी गर्ल म्हटलं की रडत घरी यायची. मला चिडवतात म्हणून.पण रागिणीचं खोटं अवसान किती दिवस टिकणार होतं???मधुर जशी जशी मोठी होत होती तशा तिच्यामधल्या मुलीच्या खुणा बाहेर पडू लागल्या होत्या.  तिला खूप प्रश्न पडू लागले होते. कितीही मुलाचे कपडे घातले तरी सुदैवाने तिचं मन स्त्रीचंच होतं, आणि ते वयात येता येता फुलायला लागलं होतं. तिचा गोंधळ उडायला लागला.ती रागिणीला सारखी म्हणायची, आई तू म्हणतेस मी मुलगा आहे. पण मला नाही वाटत मी मुलगा. माझा आवाज तर मुलीसारखा आहे, माझं वागणं बघून मला सगळे मुलगीच म्हणतात. सांग ना मी मुलगा आहे की मुलगी??रागिणीचा अट्टाहास अजून संपलाच नव्हता, ती म्हणायची तू लक्ष देऊ नको.तिला मधुरला मुलगाच ठेवायचं होतं, तिच्या नैसर्गिक भावना मारून.दिवसेंदिवस मधुरची घालमेल वाढत चालली होती आणि ती फक्त जयला दिसत होती.आता त्याने हा विषय कायमचा संपवायचा ठरवलं.मधुरही चांगलीच कळती झाली होती. तिचं स्त्रीमन आणि शरीरही तिला स्विकारावसं वाटत होतं.कुणी मुलाने तिच्याकडे पाहिलं की तिला मोहरल्यासारखं वाटायचं.तिला मुलगी असणंच जास्त आवडायला लागलं होतं. जयनेही तिच्या वागण्यातला फरक जाणून एक दिवस रागिणी घरात नसताना तिला सारं काही नीट समजावून सांगितलं. तिला तिच्यासाठी आणून ठेवलेले ड्रेस गिफ्ट दिले, आणि आता तूच काय तो मार्ग काढ हेही सांगितलं.मधुरने त्यातला एक छानसा ड्रेस घातला, आणि स्वतःला आरशात कितीतरी वेळ न्याहळत बसली. खूप आवडली होती ती स्वतःलाच.बाहेर गेलेली रागिणी परत आली आणि मधुरला अशा रुपात बघून तिचा तिळपापड झाला.मधुर तू माझा मुलगा आहेस, मुलगा. काढ ते कपडे अगोदर.मधुर तिला शांत करत म्हणाली, आई, तुझ्या मुलाच्या कपड्यात मी किती दिवस मुलगा बनून फिरणार ग??मी मुलगी आहे, माझं मन पण मुलीचंच आहे .लहाणपणी काही कळायचं नाही, तू म्हणशील ते सारं खरं वाटायचं, पण आता वाटतं, का माझ्या आईने मी मुलगी असून मला मुलगा बनवलं??आई, तुला मी नको होते का? मुलगा हवा होता का तुला??आता मुलगी बनून राहिले तर तू माझ्यावर प्रेम नाही करणार का??हे बघ आजच आम्हाला निबंध लिहायला सांगितलाय, मुलगा मुलगी एक समान!!काय लिहू सांग आता मी??जर माझ्याच घरी माझं अस्तित्व नाकारलं जातंय......ते ही माझ्या आईकडूनच !!!मला माझं मुलगी असणचं जास्त आवडतंय; तरीसुद्धा तुझ्या प्रेमाखातर मी मुलगा बनून, माझं मन मारून राहीनही.पण मुलगी म्हणून स्विकारलंस तर तुला माझा अभिमान वाटेल असं नक्की काही तरी करून दाखवीन. माझ्या नावाबरोबर तुम्हा दोघांचं नाव मोठं करून दाखवीन.  बोल आई, तूच सांग, काय करू मी??जयनेही रागिणीला आता तरी सत्याचा स्विकार कर, जाणून बुजून मिटून घेतलेले डोळे उघड म्हणून समजावले.रागिणीने मधुरला जवळ घेतले आणि म्हणाली, निबंध लिहिशील ना त्यात आवर्जून लिही, सर्वात पहिले मी माझ्या घरातली असमानता नष्ट केली, माझ्या आईला जागं केलं आणि आता मुलगा मुलगी एक समान हा नारा घेऊनच मी पुढची वाट चालणार आहे. माझ्या आईच्या जोडीने हा भेद मुळापासून उपटवून टाकण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. प्रत्येक नकुशीला हवीशी करण्यासाठी झटणार आहे!!!मधुरने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली हो आई, हेच लिहीन आणि हेच करून दाखवीन सुद्धा!!!गंमत म्हणून कधी लहानपणी मुलीला मुलाचे कपडे घालणं वेगळं आणि तिचं मूळ नाकारून तिच्याद्वारे आपल्या सुप्त इच्छा पूर्ण करून घेणं वेगळं.हे मुद्दाम लिहावंसं वाटलं कारण आताच्या काळात सुद्धा मी हे जाणून बुजून लादलेलं क्रॉस ड्रेसिंग बघितलं. मुलीला मुलगा करून मिरवताना बघितलं.एका चांगल्या सुशिक्षित बाईकडूनच मी ऐकलं की तिला मुलगा हवा होता, आणि मुलगी झाली तर तिला त्या मुलीचं काही करायची इच्छाच होत नव्हती. आणि पुढचा चान्स घेताना नवरा बायको दोघेही काहीही झालं तरी मुलाची खात्री करूनच पुढे जाणार होते.काय बोलावं या मानसिकतेला???कितीही समानतेचे डिंगे मारले तरी अजूनही ती पूर्णपणे रुजायला किती वर्षे जाणार आहेत , काय माहिती??नकुशीचं प्रत्येक घरातलं स्वागत खुषीने कधी होणार??मधुर तर भरकटण्यापासून वाचली, पण कितीतरी जणींनी या अट्टहासापायी आपलं मूळ अस्तित्व गमावलय.मला सांगा, मुलगा झाला असेल तर मुलीचे कपडे घालून फिरवताना बघितलंय का हो कोणी????किंवा तुमचा मुलगा अगदी मुलीसारखा दिसतो, म्हटल्यावर खुष होताना????सांगा बरं, बघा कुठं पाहिल्यासारखं आठवतंय का???©️स्नेहल अखिला अन्वित
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!