दुनियादारी - मुजऱ्याच्या पाऊलखुणा ...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

बहुतांश लोकांना वाटते की, नाचगाणे करणाऱ्या सर्व बायका देहविक्रय करत असाव्यात. हे म्हणजे कंट्री बारमध्ये कुणी पाणी जरी प्याला तरी त्याने दारूच ढोसली असं समजण्यासारखं आहे. असो. उत्तर भारतातील सर्व मुख्य शहरातील वेश्यावस्त्यांत देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांव्यतिरिक्त नाचगाणं करणाऱ्या कलावंतीणी आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ, जालंधर, दिल्ली, आग्रा, पतियाळा, वाराणसी, झांशी, दरभंगा, बिलासपूर, भोपाळ अशी अनेक नावं आहेत. आपल्याकडे चक्क मुंबईच्या कामाठीपुऱ्यातल्या अकराव्या लेनमध्ये एका इमारतीत अगदी देखणं नाचगाणं सादर होतं. बॉलीवूडमधल्या हिरॉईन्स झक माराव्यात अशा लावण्यवतीही इथे आढळतात. असं सांगितलं जातं की 'मुकद्दर का सिकंदर'चा पूर्ण स्टोरीप्लॉट आणि रेखाने साकारलेली जोहराबाई ही इथलीच देण आहे. असो. इथलं नाचगाणं जरी अप्रतिम असलं तरी ते देहमिलनाच्या वाटेवरचे नाही हे नक्की.१९३० च्या आसपास विभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी 'हिंगेर कचोरी' (हिंगांची कचोरी) ही कथा लिहिली.त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीस वर्षांनी आणि कथेच्या लेखनानंतर चाळीस वर्षांनी अरविंद मुखर्जी यांनी त्यावर 'निशी पद्मा' हा बंगाली सिनेमा बनवला. सिनेमा खूप चालला, त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. १९७२ मध्ये शक्ती सामंत यांनी याच सिनेमावर आधारित 'अमर प्रेम' बनवला. यातला राजेश खन्नाने साकारलेला आनंदबाबू आणि शर्मिला टागोरने साकारलेली पुष्पा विसरणं अशक्य गोष्ट आहे.विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या आयुष्यात इतके चढ उतार आणि हलाखीचे दिवस येऊन गेले की त्यांच्यावरच एक सिनेमा निघायला हवा. त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर एका वर्षात निवर्तली. तेंव्हा त्यांचे वय होते एकोणीस वर्षे. वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले. तारादास नामक मुलाच्या जन्मानंतर चार वर्षांनी आताच्या झारखंडमधील घाटशिला येथे त्यांचे १९५१ साली निधन झाले. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जवळजवळ सत्तावीस वर्षे ते विधुर म्हणून एकांताचे आणि अनेक हालअपेष्टांचे जिणे जगले. याच काळात त्यांनी जी दुनिया बघितली त्यावर आधारित अनुभवांना ते शब्दबद्ध करत गेले. त्यांनी तब्बल सोळा कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथांवर अनेक महान चित्रपटांची निर्मिती झाली. कोलकत्याच्या बदनाम गल्ल्यात 'हिंगेर कचोरी' मधील अनंग बाबू त्यांना वास्तवात भेटला होता. त्याचा जीव की प्राण असलेली पुष्पा तिथेच गवसली होती. विभूतीभूषणनी त्यांना नानाविध रंग चढवत आपल्या कथेत गुंफले. कोलकत्यात एकोणीसाव्या शतकात दोन प्रकारच्या वेश्या होत्या, एक देहविक्रय करणाऱ्या आणि दुसऱ्या कोठेवाल्या. यातल्या कोठेवाल्यांचा शोध प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी देखील घेतला होता, दरम्यान काही काळातच त्यांचे निधन झाले. पण 'प्यासा'त याची एक झलक दिसते. विभूतीभूषणना या कोठेवाल्या पुष्पाने भुरळ पाडली आणि त्या दरम्यान त्यांना मानहानी सहन करावी लागली. कोलकत्यातील कोठेवाल्या तवायफ स्त्रियांत वर्गवारीही होती. याचा उल्लेख 'पाकिजा'त छुप्या पावलांनी येतो. मुजरा करणाऱ्या स्त्रियांची मूळ गावे आणि त्यांच्या मालकीणींचे कुळ यावर ही वर्गवारी ठरायची. बहुतांश करून बोलीभाषा व उर्दू - हिंदीतील गायकी सादर व्हायची. जिची गायकी उच्च असे तिच्याकडे येणारा कदरदानही श्रीमंत असे असा सारा मामला होता. बिहार, झारखंड, स्वातंत्र्यपूर्व भारतातील पूर्व बंगाल, आसाम, उत्तरप्रदेश येथून या कोठ्यांच्या मालकिणी तिथे आल्या होत्या आणि तिथे येऊन त्यांनी आपले बस्तान मांडले होते. काहींचे कोठे हवेलीवजा उंची होते. या सर्व स्त्रियांचे मूळ शोधायला गेलं तर ते लखनौमध्ये सापडतं. तिथून या स्त्रिया विस्थापित होत वेगवेगळ्या प्रांतात स्थायिक होत गेल्या.मुजऱ्याचा इतिहास मुघलांपासून सुरु होतो. जयपूरमध्ये सर्वात आधी मुजरा सादर केले गेले. तिथे त्याचे स्वरूप कौटुंबिक आणि राजेशाही थाटाचे होते. कथक नृत्यशैलीला ठुमरी व गझल गायकीची जोड दिली गेली आणि मुघलांनी आपल्या दिवाणखान्याची शान वाढवण्यासाठी मुजरा वरती उत्तरेत आणला. बहादूरशहा जफरच्या काळात याचे खूप पेव फुटलेलं. मुजरा सादर करणाऱ्या कलावंतीणी स्त्रियांच्या प्रारंभीच्या माहितीनुसार ही कला आईकडून मुलीला वारसा हक्कात दिली जायची. कोठ्याची मालकी देखील सोबतच यायची. विविध कदरदान लोकांसमोर कला सादर करताना कधी कधी त्यांचे बीज यांच्या गर्भात रुजायचे. त्याला टाळता येणं जवळपास अशक्य नसलं तरी कठीण होतं, पण सर्वच कोठेवाल्या याला राजी नसत. मग जी स्त्री अंगाला हात लावू देत नसे तिचा मुक्काम एका जागी टिकतच नसे. शेवटी कंटाळून तिला कुणाचा न कुणाचा आश्रय घ्यावा लागे.- समीर गायकवाड 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!