'दिल्लीश्वरा'विरुद्धची लढाई - मराठी मनाचा सल...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

राज्यात आजघडीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेसचे सरकार आरूढ आहे. या तीन पक्षांची विकास आघाडी स्थापन होताना आणि तीनही पक्ष भिन्न असताना त्यांचा एक प्रमुख नारा होता तो म्हणजे दिल्लीश्वरापुढे महाराष्ट्र झुकणार नाही. याचं प्रकटीकरण करताना महाराष्ट्राच्या राजकारणात सह्याद्री आणि हिमालय यांचा उल्लेख असणारी वाक्ये नेहमी झळकत असतात. वरवर हा प्रादेशिक अस्मितेचा भाग वाटेल किंवा राष्ट्रीय ओळख धारण करणाऱ्या मानबिंदूची नोंद वाटेल पण वास्तव इतकंच नाही, त्याचा परिघ मोठा आणि ऐतिहासिक आहे. तो जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पाने चाळावी लागतील.ख्रिस्तपूर्व तिसऱ्या आणि चौथ्या शतकाच्या काळात आता आपण ज्याला महाराष्ट्र असं म्हणतो तो भूमीप्रदेश मौर्यांच्या ताब्यात होता. ख्रिस्तपूर्व २३२ च्या दरम्यान या भूमीवर सातवाहनांनी कब्जा केला. त्यांनी जवळपास ४०० वर्षे राज्य केलं. गौतमीपुत्र सातकर्णी हा या घराण्यातला कीर्तिवान पुरुष होय. त्यांनी ग्रीकांना देखील अडवलं होतं. सातवाहनांच्या नंतर इ.स. २५० ते ४०० या कालखंडात वाकाटकांचे राज्य होते. इथे एक महत्वाचा भेद होता तो म्हणजे सातवाहनांच्या काळात प्राकृत भाषा अधिक वापरली जात होती तर वाकाटकांच्या काळात संस्कृत आणि प्राकृत दोन्हींचा वापर होता.सहाव्या ते आठव्या शतकाच्या काळात चालुक्यांनी इथे राज्य केलं. चालुक्यांच्या काळात दोन महत्वाच्या घटना घडली ज्याचा लेखाच्या पहिल्या परिच्छेदाशी संबंध आहे. या घराण्यातील राजा दुसरा पुलकेशी याने वर्धन घराण्यातील सम्राट हर्षवर्धन याचा पराभव केला होता. ख्रिस्तपूर्व चौथ्या काळापासूनच्या राजवटीस प्रारंभ गृहीत धरून गणना केल्यास ही एक निस्संशय महत्वाची घटना होती. कारण वर्धन घराण्याचे राज्य आताच्या उत्तर भारताच्या सकल भूमीवर होते. एक प्रकारे हा उत्तरेकडील राजवटीचा पराभव होता. चालुक्यांच्या घराण्यातील विक्रमादित्य दुसरा याने दुसऱ्या पुलकेशीच्या दोन पाऊल पुढे वाटचाल केली. त्याने आठव्या शतकाच्या प्रारंभी अरब आक्रमकांना अस्मान दाखवलं ! या दोन्ही घटनांत खूप काही दडलं आहे. ज्या सम्राट हर्षवर्धनचा पराभव चालुक्यांनी केला त्याचे वडील प्रभाकरवर्धन यांनी अति उत्तरेकडून आणि अतिपूर्वेकडून येणाऱ्या हुणांचा पाडाव केला होता हे विशेष. कारण हूण हे त्या काळातील सर्वात प्रबळ राजे होते. तर या हर्षवर्धनचा भाऊ राज्यवर्धन हा थानेसरचा राजा होता. हे शहर आताच्या हरियाणात आहे.चालुक्यांच्या राष्ट्रकुटांनी या भूमीवर राज्य केलं. अरबी प्रवासी सुलेमान यानं लिहिलं आहे की, "राष्ट्रकुटांचा राजा अमोघवर्ष हा जगातील सर्वश्रेष्ठ चार राजांपैकी एक आहे." चालुक्यांची राजधानी बदामी होती. तर मान्यखेत म्हणजे आजच्या कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील मळखेड ह्या नगरात राष्ट्रकुटांची राजधानी होती. आजही मराठी माणूस या शहरात गेला की हरखून जातो याची कारणे या इतिहासात असावीत. या दोन्ही राजवटी आताच्या कन्नडभाषिक प्रांतातील राजांच्या होत्या. राष्ट्रकुटांच्या काळात कन्नड, संस्कृत आणि पाली या तिन्ही भाषा वापरात होत्या. याचा आधार घेऊन कर्नाटकने आपली भूमी मागितली तर पंचायत होईल. म्हणून इतिहासाचे दाखले विभाजनासाठी वापरू नयेत. असो. हे विषयांतर झालं. आपण पुढे जाऊ.अकराव्या आणि बाराव्या शतकात दख्खनच्या पठारावर कल्याणी चालुक्यांनी (पश्चिमी चालुक्य) आणि चोळ घराण्यांनी राज्य केलं. कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण ही या चालुक्यांची राजधानी होती. तर या कालखंडात चोळांची राजधानी तंजावूर ही होती. त्यांची भाषा संस्कृत आणि तमिळ होती. विशेष म्हणजे या दोन शतकात साम्राज्यावरून अनेक लढाया लढल्या गेल्या. १२ व्या शतकात या भूभागावर देवगिरीच्या यादवांचे राज्य आलं. नर्मदा आणि तुंगभद्रेच्या खोऱ्यादरम्यानचा सगळा भूभाग यादवांच्या अधिपत्याखाली होता. कधी काळी चालुक्यांचे मांडलिक असणारे यादव राजे झाल्यानंतर त्यांनी या प्रांताला सोन्याचे दिवस दाखवले. दुसरा सिंघणच्या काळात यादवांची समृद्धी शिगेला पोहोचली होती. मात्र याच यादवांच्या काळात या भूमीवर सर्वात मोठं आक्रमण झालं !१२९६ मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर चढाई केली. यादवांचा सपशेल पराभव केला. १३०८ मध्ये त्याने मलिक काफूरला इथं पाठवलं आणि राज्यकारभाराची घडी हवी तशी बसवून घेतली.चौदाव्या शतकात मुहम्मद तुघलकाने दिल्लीची राजधानी हलवून दौलताबादला राजधानी केलं. १३४७ मध्ये तुघलकांचा पाडाव झाल्यावर इथली राजधानी पुन्हा दिल्लीला गेली मात्र त्याचवेळी बहामनी साम्राज्याचा दख्खनेत उदय झाला. ही इ.स.च्या १४व्या व १५व्या शतकांत अस्तित्वात असलेली दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील गुलबर्गा आणि बीदर येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती. मूळच्या बादाख्शान येथील ताजिक वंशात जन्मलेल्या अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. इ.स. १५१८ नंतर हिचे तुकडे पडून अहमदनगराची निजामशाही, वर्‍हाडातील इमादशाही, बिदर येथील बरीदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अश्या पाच सल्तनती उदयास आल्या.दिड शतके दख्खनच्या पठारावर राज्य केलेल्या या शाह्यांच्या काळात प्रशासनपद्धती होती आणि मुलकी अंमलाची यंत्रणा होती. हिशोबाची कारकुनीची कामे ब्राम्हण सांभाळत असत, तर महसूल गोळा करण्याची जबाबदारी मराठयांकडे होती त्यासाठी त्यांना पाटीलकी आणि देशमुखीची वतने दिलेली होती. भोसले, शिर्के, जाधव, घोरपडे, मोरे, महाडिक, निंबाळकर इत्यादी घराण्यातील मात्तबर सरदारांनी या कालखंडात विविध पातशाह्यांची चाकरी पत्करली होती. त्या काळी बहुतांश रयत हिंदू होती आणि तिची व्यवहाराची भाषा मराठी होती. याचा प्रभाव इतका होता की सुलतान अली आदिलशहा पहिला याने आपल्या न्यायालयीन कामकाजासाठी मराठीस देखील संमती दिली होती. त्याने मराठीत दस्त ऐवज ठेवण्यास आणि कारभार पाहण्यास अनुमती दिली होती. १५१८ मध्ये बहामनी साम्राज्याचे तुकडे पडल्यानंतर उदयास आलेल्या पाचही शाह्यांनी आपसात अनेक लढाया केल्या पण विजयनगरच्या साम्राज्याचा बिमोड करण्याची वेळ आली तेंव्हा हे पाचही जण एक झाले आणि १५६५ मध्ये त्यांनी विजयनगरला परास्त केले. याच काळादरम्यान या परिसरात आणखी काही महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या त्यांचा उल्लेख करणे इतिहासाच्या दृष्टीने निकडीचे आहे. पोर्तुगीजांनी १५३५ मध्ये मुंबई बळकावण्याआधी गुजरातच्या राजपूत मुस्लिम सल्तनतेचा मुंबईवर ताबा होता. (मुंबईमध्ये गुजराती लोक मोठ्या प्रमाणात का आढळतात याचा पुसटसा खुलासा इथे होतो) मुझफ्फरिद घराण्यातील मुझफ्फर शहा पहिला जफर खान याने नासिरुद्दीन मुहम्मद बिन तुघलक चतुर्थ याची नियुक्ती तिथल्या वजीरपदी केली होती. त्याने हा ताबा बर्करार ठेवला होता. बहामनी साम्राज्याविरुद्धच्या लढाईत मोलाची साथ देणाऱ्या मलिक अहमद उर्फ मलिक राजा याच्या नेतृत्वाखालील फारुकी घराण्याचे १३८२ ते १६०१ या काळात खान्देशावर राज्य होते. नंतरच्या काळात मुघलांनी त्याचा पाडाव केला होता. इतकं वैविध्य महाराष्ट्राच्या इतिहासात होतं. मात्र महाराष्ट्राचं स्वतंत्र अस्तित्व या काळापर्यंत कुठंच दिसून येत नव्हतं हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट होतं. इथल्या भूमीने मंडलिक राजे दिले, मातब्बर सरदार दिले, योद्धे दिले, संत दिले पण जेतेपद वा नेतृत्व दिलं नव्हतं. एव्हढा मोठा सहयाद्री होता पण त्याच्या छाताडावर नाचणाऱ्या सल्तनतीच भवताली होत्या, त्या पर्वतरांगांना आपलं म्हणणारा आणि त्यांच्या साहाय्याने अस्मानास छेद देणारा कुणीच नव्हता हे सत्य होतं !मात्र ही उणीव एका माणसाला जाणवली ! त्यानं कमालीचा डाव खेळला. कारण या माणसाने जे केलं ते आजही महाराष्ट्राचे राजकीय धुरीण करत आहेत. ही दूरदृष्टी असणाऱ्या त्या माणसाचं नाव होतं मलिक अंबर ! होय तोच तो मलिक अंबर, निजामशहाचा वजीर मलिक अंबर. इ.स. १६०७ ते १६२६ या काळात तो कार्यरत होता. त्याने मुर्तुजा निजामशहा दुसरा याची ताकद वाढवली, त्याने पाचही शाह्या एकत्र करून अजस्त्र अवाढव्य मुघलांना टक्कर देण्याची बेफाम खेळी केली. इतकेच नव्हे तर मुघल सत्तेच्या साठमारीत भागही घेतला. जहांगीरची बारावी पत्नी नूर जहाँ हिला आपला जावई दिल्लीच्या गादीवर बसवायचा होता आणि तिच्या मार्गातला मुख्य काटा होता सम्राट जहांगीरचा मुलगा खुर्रम ! मलिक अंबरने या खुर्रमला साहाय्य केलं, पुढे तो गादीवर बसला आणि शाहजहाँ म्हणून विख्यात झाला. मलिक अंबरच्या चालीमुळे शाहजहाँने कधीही निजामशाहीकडे डोळे वटारून बघितले नाही. मात्र याचा अधिक फायदा घेत मलिक अंबरने मुघलांचे सुभे ताब्यात घेण्याचा धडाका लावला. गनिमी काव्याचे तंत्र त्याने नेमके वापरले. खवळलेल्या शाहजहाँने निजामशाहीवर एक लाख वीस हजरांचे सैन्य पाठवले तेंव्हा त्या सैन्याला निजामशाहीच्या वतीने पाणी पाजण्याचं काम दस्तुरखुद्द शहाजी राजांनी केलं. शहाजी राजांकडे २० हजार सैनिक होते. त्यातले दहा हजार त्यांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगरला ठेवलं आणि फक्त दहा हजाराचं सैन्य आपल्याकडे ठेवलं. ऐंशी हजार सैन्यासह विजापूरचा आदिलशाह त्यांना सामील झाला. भातवडीच्या लढाईने शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. आपण मुघलांना हरवू शकतो हे शहाजीराजांना उमगले. मात्र आपली एकट्याची ताकद त्यात कमी पडते हे ही त्यांनी ताडले. नंतर शहाजहानने निजामशाहीतील पुरुषाना एकेक करून ठार करवले, जेणे करुन निजामशहीला वारस रहाणार नाही. तेव्हा शहाजीराजानी, निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादिवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. त्यानी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.अखेर शहाजीराजांना नमवण्यासाठी शहाजहानने ४८,००० सैन्य पाठवलं तेव्हा घाबरुन जाऊन आदिलशहा शहाजहानला मिळाला. मुघलांच्या अफाट ताकदीपुढे एकटं पडलेल्या शहाजीराजांचा पर्यायाने निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजी राजांनी नेटाने लढा चालू ठेवला. दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहिल आणि शहाजी आदिलशहीत जातील असे ठरले. सावधगिरी म्हणुन शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तोही त्यांच्या कडेच ठेवण्यात आला.शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. याच काळात जिजाऊँच्या मनात स्वराज्याची बीजे रोवली गेली. त्यांनी शहाजीराजांना यासाठी उद्युक्त केलं. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यानी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्यांना मांडलिक ठेवले, जेणे करुन गरज पडली तेव्हा हे राजे त्यांच्या मदतीला आले. शहाजी राजांनी मलिक अंबरच्या पुढे जात आपलं धोरण ठेवलं. याच वाटेवर वाटचाल करत शिवाजीराजांनी दोन पावलं पुढे टाकली, त्यांनी स्वतःचं राज्य निर्मिलं. शिवाजींचे स्वराज्य मुघलांच्या तुलनेत आकाराने लहान असले तरी ते स्वयंभू होते, त्यात पिढीजात राजेशाही नव्हती, ते सर्वथा मराठी रयतेच्या आणि मावळ्यांच्या जोरावर उभं केलेलं लोककल्याणकारी राज्य होतं, ज्याला एक सार्वभौम राजा होता. एक सनद होती, शिक्का मोर्तब होतं, चलन होतं, नियम होते, प्रशासन होतं आणि मुख्य म्हणजे ध्येय धोरणं होती. मुघलांशी टक्कर देण्याची वेळ आली तेंव्हा शिवाजी राजांनी आदिलशहाला चुचकारून आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याची परतफेडही केली. बेरजेचे हे सूत्र स्वराज्यास फायद्याचे ठरले.शहाजीराजे १६६४ मध्ये निवर्तले तर शिवबांचे देहावसान १६८० मध्ये झालं. त्यांच्या पश्चात संभाजीराजे, राजाराम आणि ताराराणीने मुघलांना झुंज दिली. मराठेशाही दुभंगून कोल्हापूर आणि सातारा येथे स्वतंत्र गाद्या अस्तित्वात आल्या आणि त्याच दरम्यान पेशव्यांकडे राज्यकारभाराची सूत्रे गेली. १७४९ ते १८१८ या काळात पेशवाईत राज्यविस्तार वेगाने झाला. दिल्लीच्या सल्तनतीतले हेवेदावे पथ्यावर पडले असले तरी मराठयांना पानिपतच्या युद्धात उत्तरेकडील राजांनी साथ का दिली नसावी याचे उत्तर येथे आपसूक मिळते. कदाचित यामुळेच दिल्लीचे केंद्रीय सत्तानेतृत्व विरुद्ध महाराष्ट्र ही मांडणी अधिक उठावदार आणि टोकदार झाली. दिल्लीच्या गादीवरचा वारस आपल्या मर्जीने बसवण्यापर्यंतची मजल मारणाऱ्या मराठ्यांना नंतर उतरती कळा लागली.या काळानंतर आजतागायत मराठी माणूस त्या व्यक्तीच्या शोधात आहे जो दिल्लीच्या सत्ताकेंद्री प्रमुख म्हणून विराजमान होईल. अजूनही ही कल्पना मराठयांना नव्हे तर महाराष्ट्राला भुरळ पाडते. आजही महाराष्ट्राच्या राजकारणात कुणीही दिल्लीविरुद्धच्या राजकारणाची नेटकी मांडणी केली की इथला सह्याद्री त्याच्या पाठीशी उभा राहतो, गोदावरी कृष्णेचा ऊर भरून येतो, पश्चिमघाटापासून ते नागपूरच्या पठारापर्यंतची भूमी रोमांचित होऊन जाते आणि लाखोंच्या मुठी वळून धमन्यातलं रक्त सळसळू लागतं. ही मांडणी प्रत्येक राजकारण्याला यशस्वी रित्या जमेल असे नाही आणि याचं कार्ड नेमक्या वेळी खेळता आलं तरच त्याला अर्थ प्राप्त होतो अन्यथा ती गाजराची पुंगी ठरते जी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली जाते.महाराष्ट्राच्या मातीतच ही ओढ आहे, सह्याद्रीने हिमालयाला अनेकदा साथ दिली आहे हे इतिहासास मान्य करावेच लागते परंतु आजवर असा एकही दाखला मिळत नाही की हिमालयाने सह्याद्रीच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्याला आलिंगन दिलं आहे. कदाचित हे स्वप्न हाच सह्याद्रीचा बाणा झाला आहे जो इथल्या प्रत्येक माणसाच्या कण्यात पाझरला आहे. हे कणे जोवर ताठ आहेत तोवर हे दिल्लीपुढे झुकणार नाहीत आणि एक ना एक दिवस ते दिल्लीवर राज्य करतील, देशाच्या केंद्रस्थानी असतील. अलीकडच्या काळात शरद पवारांना ही मेख जितकी चांगली उमगली तितकी अन्य कोणत्याही राजकीय नेत्याला उमगली नसावी. म्हणूनच इथल्या सह्याद्री बाण्याला धगधगतं ठेवण्याकडे सर्वांचा कल असतो, हा सह्यकडा हीच आपली ओळख झालीय.इथल्या हिरव्यापिवळ्या माळावरून हिरवीपिवळी शाल घ्यायची की नाही, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यायची की नाही, वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावेत की नको, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत की नकोत, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी की नको, भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यायची की आणखी काही घ्यायचं याचे धडे हा सह्याद्रीचा बाणा शिकवतो. विंदा करंदीकर सांगतात तसं आपण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यायचेत आणि त्यासाठी का होईना हा सह्याद्रीचा बाणा आपण जपला पाहिजे, वाढवला पाहिजे !- समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!