दांडकं आणि ट्युबलाईट!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

गेल्या ४-५ दिवसात ‘दांडकं’ आणि ‘ट्युबलाईट’ हे शब्द गाजत आहेत. दोन्ही शब्द तसे साधेच आहेत. पण संदर्भ बदलला की त्यांचे अर्थ बदलतात! भाषेची हीच तर गंमत आहे की शब्दांची फेक अशी करता येते की आपल्याला हवा तो अर्थ ऐकणा-याकडे पोहचवता येतो. अलंकारशास्त्रच मुळी ह्यातूनच अस्तित्वात आले.   शब्दांच्या वापराने गंमत कशी वाढते ह्यावरच अलंकारशास्त्र उभारलेले आहे. वायफळ गप्पातही शब्दांची रंगत वाढते आणि पाहता पाहता गंमतीचे रूपान्तर हाणामारीत झालेले पाहायला मिळते. मात्र, प्रत्यक्ष कायदेबाज लोकांच्या व्यवहारात किंवा राजकारणात शब्दांचे गंभीर परिणाम होतात. विशेषतः काहीएक अधिकार असलेल्या राजकारण्यांकडून जर ते उच्चारले गेले तर त्याचे किती गंभीर परिणाम होतात ह्याचे उदाहरण गेल्या आठवड्यात पाहायला मिळाले.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी बेरोजगाराची समस्या सोडवली नाही तर सहा महिन्यांत तरूणवर्ग त्यांना घराबाहेर फिरू देणार नाही. मोदींना तरूणवर्ग दांडक्याने मारतील’, असे उद्गार राहूल गांधी ह्यांनी  दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारसभेत भाषण करताना काढले होते. ह्या उद्गाराबद्दल त्यांचा निषेध करणारे निवेदन आरोग्यमंत्री हर्षवर्धन ह्यांनी लोकसभेत वाचून दाखवताच सभागृहात काँग्रेसचे खासदार भडकले. खासदार मणिकम् टागोरांनी तर थेट हर्षवर्धनांच्या दिशेने धाव घेतली. झाले! पाहता पाहता भाजपाचे खासदार आणि काँग्रेसचे खासदार ह्या दोघात जुंपली. नशीब, त्यांची मजल हाणामारीपर्यंत गेली नाही. सभागृहाचे कामकाज स्थगित अध्यक्ष बिर्ला ह्यांनी स्थगित केले नसते तर सभागहाच्या चकमकीला वेगळे वळण लागले असते.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी चांगले लांबलचक भाषण दिले. ३०-४० मिनीटांच्या त्यांच्या भाषणानंतर राहल गांधी उठून उभे राहिले. मोदंच्या काही विधानांना आक्षेप घेण्याचा राहूल गांधींचा पप्रयत्न होता. उपरोधिक बोलण्याची संधी मिळत असेल तर पंतप्रधान मोदी मुळीच सोडणार नाही. मोदींनी लगेच राहूल गांधींची फिरकी घेतली. मोदी म्हणाले, काही लोकांची ट्युबलाईट उशीरा पेटते! मोदींच्या ह्या विधानाने काँग्रेस खासदार खवळले! प्रतिक्रियांची ही साखळी सभागृहाबाहेरही लांबली. आम्हाला बोलू दिले जात नाही, अशी तक्रार राहूल गांधींनी केली. दांडके आणि ट्युबलाईट प्रकरणात प्रतिपक्षाची कशी जिरवली ह्याचाच आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी ह्या दोघांना झाला असावा. परंतु ह्याबद्द्ल सर्वसामान्य माणसांना काय वाटले असेल? कट्टा, चावडी, पिंपळपार, मंदिराचा ओटा ह्या जागाच देशभरातली खरीखुरी पार्लमेंट. ह्या पार्लमेंटमध्ये मुद्द्याने बोलणा-याची संभावना ‘मोठा आला आहे शहाणा’ अशीच केली जाते. दांडके आणि ट्युबलाईट ह्यावरून ह्या पार्लमेंटात नक्कीच चर्चा झाली असेल!चर्चेचा शेवटचा शेरा ( म्हंजे रूलिंग का म्हनत्यात ते हो! ) काय असावा? मोदीबी मानूस हाय? राहूलबी पोरगं नव्हं? भाषाज्ञानाचा विचार केला तर सध्याच्या राजकारण्यांना ‘ढ’ च म्हटले पाहिजे. शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा नसतो. लक्षणार्थावर अर्थ केंद्रित करायचे असते.  संभाषण आणि भाषण ही एक कला आहे. दुर्दैवाने सध्या देशाच्या राजकारणात वावरणा-या फारच कमी नेत्यांना ती अवगत आहे  हेच ह्या दोन शब्दांरून माजलेल्या वादंगावरून दिसून आले. म्युनिसिपालिटी आणि झेडपी उमेदवार अचानक लोकसभेत आणि विधानसभात निवडून आल्यानंतर दुसरे काय होणार? ही प्रचिती गेल्या १० वर्षांपासून सुज्ञ नागरिकांना अनेकदा आली. ह्याही वेळी ती पुन्हा एकदा आली इतकेच.रमेश झवरज्येष्ठ पत्रकार
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!