दयावं तर चांगल्या मनानं.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

काय लोक असतात ग एकेक, एवढी साडी दिली तर चक्क परत देऊन टाकली माझ्या जावेने, म्हणे मी अशातली वापरत नाही. तिचं बघून नणंदेने पण परत केली. मी नव्हतं केलं कधी असं, आवडलं नाही तरी ठेवून घेतलं, अभिज्ञाची सासू तिला सांगत होती. पण अभिज्ञाला त्यावर नेमकं काय बोलावं हेच सुचत नव्हतं. ती नवखीच सून होती. जेमतेम सहा- सात महिने झाले होते तिला घरात येऊन. ती आली, त्यानंतर दोन महिन्यातच नवीन मोठी जागा घेतली, त्याची वास्तूशांत ठरली. अगदी मोजकीच लोकं बोलवायची होती. जवळचे नातेवाईक फक्त. सासूबाईंच्या जाऊबाई, नणंदबाई, आणि बहीण यांच्याकडचे आणि अभिज्ञाचा परिवार, एवढीच मंडळी होती.तिच्या सासूबाईंनी स्वतःच जाऊन साड्या आणल्या होत्या त्यांच्या नेहमीच्या दुकानातून. आणल्यावर अभिज्ञाला दाखवल्या, आणि म्हणाल्या, बघ दोन हजारात चार मिळाल्या. चोवीसशे झाले होते, मी दोन हजार टेकवून आले. साड्या पाचशेच्या होत्या, पण सासूबाईंनी असा विचार करून आणलेल्या की पाहणाऱ्याला वाटेल केवढ्याच्या आहेत नी काय? थोडक्यात सगळा झगरी मगरीवाला आयटम होता.अभिज्ञाला तेव्हाच वाटलेलं, पाचशेच्याच आणायच्या होत्या तर जरा डिसेन्सी तरी बघायची. आणि घर घेतलंय करोडोचं तर आपल्याच अगदी जवळच्या मोजक्याच नातेवाईकांना काही घेताना हात सैलावला असता तर चाललं नसतं का? तशी तर रोज फोनाफोनी चालते, येणं जाणं असतं बरेचदा, मग त्यांना काही छान नाही दयायला हवंच होतं. त्यातलीच एक साडी तिच्या आईला पण जाणार होती. अभिज्ञाला वाटलं, हे पाहून काय विचार करेल आई?सासूबाईंनी साड्या दाखवल्यावर, नवीन म्हणून तिने काही अभिप्राय न देता मान डोलावली होती फक्त. आपल्या नवऱ्याला मात्र खटकलेलं सांगितलं होतं. आता त्याच साड्या परत आल्यावर सासूबाईंची तणतण काही थांबायचं नावच घेत नव्हती.तेवढयात अभिज्ञाचा फोन वाजला, म्हणून ती आत गेली. उचलला तर सासूबाईंच्या जाऊबाईच होत्या. त्या अभिज्ञाला म्हणाल्या, मुद्दामच तुला केला फोन. तुझ्या सासूला केला तरी आता ती घेणार नाही. जास्तच बडबड करतीये का ग? साड्या पाठवल्याचं आम्हाला पण वाईट वाटतय ग. पण तिलाही कळलं पाहिजे ना, कोणाला काय द्यावं नी कसं द्यावं? तुमच्या लग्नात पण असच केलेलं हिनं. तुझा नवरा एकुलता एक पोरगा, एवढं थाटात लग्न केलं, आणि घरच्यांना आहेर तर अगदीच लाजिरवाणा दिला ग!! देऊच नये ना काही, आम्हाला काय मिळत नाही की काय? त्यावेळेसच परत करणार होतो आम्ही सगळं. पण सोडून दिलं. आता वास्तुशांतीलाही तेच. आमच्या नणंदबाईंना पण राग आला होता खूप. म्हणूनच आम्ही दोघींनी ठरवलं, आता बास झालं. हिची खोड मोडलीच पाहिजे. आम्ही काय रस्त्यावर पडलेलो नाहीत. आमचं आमच्याकडे चिक्कार आहे. चार ते नातेवाईक जवळचे, चांगल्या प्रसंगात किंवा अडीअडचणीला उभे राहणारे, त्यांच्यासाठी मोठ्या मनाने काही बरंही सुटू नये का हातून?? प्रेमाने देता की आम्हाला काही कमी आहे असं वाटतंय म्हणून देता? ऐपत नसती तर अगदी साधही गोड मानून घेतलं असतं आम्ही. पाच खोल्यांच्या ब्लॉक घेता, आणि जावेला, नणंदेला, अगदी स्वतःच्या बहिणीलाही काही चांगलंचुंगलं दयायला मागपुढं बघता? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); अभिज्ञाने सारं ऐकून घेतलं. आपल्या सासूबाईंच्या वतीने माफी मागितली. पुढच्या वेळेस असं होणार नाही, मीच लक्ष घालेन याचीही खात्री दिली. सासूबाईंचा राग थोडे दिवसांनी शांत झाला. थोडा प्रयत्न केला होता अभिज्ञाने त्यांना समजवायचा, पण त्यांच्या साड्या छानच होत्या, असंच त्यांचं म्हणणं पडलं. मग अभिज्ञानेही आणखी समजावणं सोडून दिलं.काही दिवसांनी पुन्हा सगळं पूर्ववत सुरू झालं. झालं गेलं विसरून सगळे नेहमीसारखं वागाबोलायला लागले. अभिज्ञाकडेही गोड बातमी आली. पुढे आणखी काही महिन्यांनी तर घरात गोड छोकरीही आली. बारसं मोठ्या थाटात करायचं ठरलं. सासूबाईंची साड्या घेण्यासाठी धावपळ सुरू व्हायच्या आधीच अभिज्ञा त्यांना म्हणाली, यावेळी ना मलाच तुम्हा सगळ्यांना साड्या घ्यायच्यात. माझ्या बाळंतपणात तुम्ही सगळ्यांनी किती केलत माझं? आई, तुम्ही तर हट्टाने माझ्या आईकडे न पाठवता इथेच ठेऊन घेतलत. सगळं केलतही आईसारखं. शिवाय काकूंची, आत्याची, मावशींचीही किती मदत झाली. म्हणून माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना मी बारशाच्या साड्या घेणार आहे. माझीच एक मैत्रीण बिझनेस करते साडयांचा.खूप सुंदर कलेक्शन आहे तिच्याकडे. नाही बोलून माझं मन मोडू नका ना प्लिज. सासूबाईंना काही बोलायला झालंच नाही. अभिज्ञाने आपल्याच माणसांसाठी घ्यायचंय म्हणून अगदी मनापासून वेळ देऊन बघताक्षणीच कुणालाही पसंत पडतील अशा साड्या निवडल्या. बारश्याचा सोहळा छान झालाच, पण घरी जाऊन आहेर बघितल्यावर प्रत्येकीने मुद्दामच तिच्या सासूबाईंना फोन करून अभिज्ञाने घेतलेली साडी प्रचंड आवडल्याचं सांगितलं. जाऊबाई, नंणदबाई इतकंच काय तर अभिज्ञाच्या सासूबाईंची बहिणही अगदी भरभरून बोलत होती साडीविषयी. अभिज्ञाच्या सासूबाईंना आपोआपच समजला, मनापासून एखादी गोष्ट देणं, आणि द्यायचं म्हणून काहितरी देणं यातला फरक!! यापुढे कुठलही देणंघेणं अभिज्ञाच्या मर्जीनेच करायचं, हे त्यांनी आता मनोमन ठरवूनच टाकलं.........  ©️ स्नेहल अखिला अन्वित  फोटो साभार: गुगल  कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!