तो ही स्वप्नं बघतोय.........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

ए चल तू साधा शिपाई, तू कोण मला अडवणारा......साहेबापेक्षा शिपायचाच थाट!! जाऊ देतो की नाही मला आत........साधारण साठीचे गृहस्थ बँकेचं काचेचं दार ढकलून आत यायचा प्रयत्न करत मोठमोठ्याने ओरडत होते.तसं त्या शिपायाने पुन्हा त्यांना अडवलं आणि म्हणाला, काका आतमध्ये अगोदरच माणसं आहेत, त्यांचं होऊ दे. जागा होऊ दे जरा, मग सोडतो तुम्हाला आत. तुमच्या सुरक्षेसाठीच सांगतोय ना मी? मला ओरडतात हो मोठे साहेब जास्त माणसं आत पाठवली की!!जरा माझा पण विचार करा की, आतूनही शिव्या खायच्या, बाहेरूनही शिव्या खायच्या.प्रत्येकाने जाता येता आम्हालाच डाफरायचं. शिपाई आहे पण माणूसही आहे हो मी. आम्हालाही वाईट वाटतं.तो साठीचा गृहस्थ थोडा नरमला आणि म्हणाला, वैताग आला तुमच्या रांगेत उभं राहून. पंधरा मिनिटं झाली आता.काका, रांग तुमच्या सोईसाठीच आहे ना? झपाझपा पेशंट वाढतायत माहिती आहे ना? मग?थोडा धीर धरा की ओ...... पंधरा मिनिटं रांगेत उभं आहात तर तुमची चिडचिड होतीये, मी सुद्धा सकाळपासुन उभाच आहे. आतल्या बाहेरच्या दोन्ही माणसांना झेलतोय. तुमच्यासारखे रोज दहा बारा जणं येऊन वाट्टेल तसं बोलतात. आत बोलायची कुणाची हिम्मत नसते, आम्ही काय शिपाई ना, कोणीही येऊन चार शिव्या ऐकवून त्यांचं फ्रस्ट्रेशन काढून जातं. तेवढ्यात आतली माणसं कमी झाली म्हणून त्याने बाहेरच्या चार जणांना आत सोडलं. त्याबरोबर त्या गृहस्थाचा नंबरही लागला त्यात.आत जाऊनही पुन्हा त्या गृहस्थाचं काही तरी बिनसलंच. पुन्हा ते सगळ्या सिस्टीमच्या नावाने ठणाणा करायला लागले. हेडऑफिसला कम्प्लेंटच केली पाहिजे एकेकाची, म्हणून ओरडायला लागले. पुन्हा तो शिपाई आला, आणि काका शांत व्हा. काय झालं, करत त्यांना एका बाजूला बसवलं. तो गृहस्थ म्हणाला, दोन महिन्यांपूर्वी हा फॉर्म भरून दिलेला, आता परत मागतायत. तेच करत बसायचं का सारखं आम्ही. धड बोलायलाही वेळ नाही कुणाला.शिपायाने त्यांना पाणी दिलं आणि म्हणाला, एकाशी किती वेळ बोलतील हो. बाहेर लाईन बघा केवढी आहे. थोडं समजून घ्या काका. लोड आहे खूप प्रत्येकावर, वरून डोक्यावर टेन्शन. झाला असेल गहाळ, किंवा दुसरा कोणी भरून घेतला असेल त्यावेळी, गडबड झाली असेल, माफ करा. यावेळी नाही तसं होणार, तुम्ही बसा इथं फॉर्म द्या भरून मी पोचवतो, साहेबांकडे. जरा शांत व्हा. आतल्या माणसांना पण सुचेना झालंय काही. बाहेर कोरोना आहे, तरी इथली गर्दी बघताय ना तुम्ही?साठीचा माणूस शांत झाला, त्याने फॉर्म भरून दिला. पण जाताना त्या शिपायाचं कौतुक करायला मात्र विसरला नाही. असा कायम राहशील तर मोठा होशील, शिपाई बनून राहू नको जन्मभर, अनुभवाचे बोल देऊन गेला त्याला. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); खरंतर त्या शिपायाचं संदीपचं हे काम नव्हतं. पण तिथल्या सिक्युरिटी गार्डला ही माणसं सांभाळणं त्यांना थोपवून धरणं काही जमत नव्हतं. म्हणून त्याच्या जोडीला बोलबच्चन असणाऱ्या संदीपला नेमलं होतं.म्हणजे त्यानं आतलंही बघायचं आणि बाहेरचही, असं होतं थोडक्यात.बाहेरच्या लोकांना थोपवताना आतून कोणी गरम पाणी द्यायला हाक मारायचं. त्याची सिच्युएशन माहीत असताना सुद्धा. मधेच कोणी कुठलंतरी डॉक्युमेंट या केबीनमधून त्या केबीनमध्ये द्यायला सांगायचं. संदीपला तर वाटायचं असली नोकरी सोडून पळून जावं. पण ती होती म्हणून तर या दिवसातही रोजीरोटी मिळत होती. नाहीतर काय झालं असतं आपलं, हा विचार मनात आला की काटाच यायचा अंगावर त्याच्या. त्यामुळे तो अगदी प्रामाणिकपणे कोणी सांगेल ते सगळं करायचा.तसं त्याचं अगोदर जरा बरं होतं, पण या कोरोनामुळे आताशी डोक्याची झिगझिग जास्तच वाढली होती. बँकेतली डोकेदुखी कमी त्यात बायकोही दोन दोन तासाने फोन करून हॅन्डग्लोवज घातलेत ना? जास्त कुणाच्या जवळ नका जाऊ, गरम पाणी पिलं का, असे काय काय सल्ले द्यायला फोन करायची. शक्यतो तो तिच्यावर वैतागायचा नाही, कारण कोणी चिडलं वैतागलं की समोरच्याला काय वाटतं ते तो दिवसातून कमीत कमी दहा वेळा तरी अनुभवत असायचा. त्याला वाटायचं, आपली काळजी आहे म्हणूनच सांगतेय ना ती. तिचंही बरोबरच आहे. ती आठवण करून देते म्हणून डोक्यात तरी राहतं आपल्या, काळजी घ्यायचं. नाहीतर या सगळ्या माणसांना झेलण्याच्या नादात काय सुचतय आपल्याला? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); कुठल्याही प्रसंगात डोकं शांत ठेवायचं, समोरच्याच्या वागण्याचा विचार करायचा, हे त्याने  अंगात भिनवलंच होतं अगदी .संदीपवर शिपाई म्हणून उगाच चिडणारे जाताना बरेचदा त्याची पाठ थोपटून जायचेच. बँकेतील प्रत्येकजणही त्याचे गुण ओळखून होता, मात्र तोंडावर तसं सांगणारे एक दोनच होते. त्याचं उज्ज्वल भविष्य सगळ्यांनाच दिसत होतं. ते चमकणार होतं, कारण तो स्वतःकडून देता येईल तेवढं द्यायचा. हे माझं काम नाही, हे मला जमणार नाही, हे शब्दच त्याला माहित नव्हते. म्हणूनच बँकेतल्याच काही हितचिंतकांनी त्याला पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करायला प्रोत्साहन दिलं होतं. आणि हे त्याचं पदवीच शेवटचं वर्ष होतं. त्याचीही स्वप्न होतीच, त्यालाही पुढे जायचं होतं. हातात वयही होतं. काही चांगल्या लोकांची साथही होती, त्याने या सगळ्याचा फायदा घ्यायचं ठरवलेलंच!! म्हणूनच ते गृहस्थ जेव्हा बोलले, शिपाई बनून राहू नकोस, मोठा हो. तेव्हा त्यानेही उत्तर दिलं, काका, पुढची पाच वर्ष दिलीयेत मी स्वतःला. तुमचा आशीर्वाद असू दे मात्र. आता पदवीला आहे, मग पुढे HR मॅनेजमेंट मध्ये MBA करणार आहे. माझं सगळं प्लॅन आहे. शिपाई असलो म्हणून काय झालं, माझीही काही स्वप्नं आहेत!! ती पूर्ण करून शिपायाचा साहेब होऊन दाखवतो की नाही बघाच तुम्ही..........मागच्या आठवड्यात काही कामानिमित्त बँकेत जाणं भागच पडलं, तेव्हा मी असंच काहीसं बघितलं, म्हणून त्यावर लिहावं वाटलं.©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!