तुरतुरं........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

ऊईss ऊईss आत्ता माझ्या पायावरून काहीतरी चट्दिशी गेलं ग......कोण जाणार मम्मी? भास झाला असेल तुला काहीतरी.....छे, भास कसला? एकदम पिटुकलं काहीतरी होतं, मी पाहिलं ना. उंदराएवढं मोठं नव्हतं, गोमेएवढं छोटं नव्हतं, सापाएवढं लाबडंही नव्हतं, झुरळाएवढं आखुडही नव्हतं, पण काहीतरी पायावरून भर्रकन गेलं खरं..…..ते तेवढंच दिसलं मला त्या दिवशी. पण डोक्यात सतत ते कोण असेल हा भुंगा मात्र भुणभुणू लागला. रात्री झोपण्याअगोदर पुन्हा मुलीला विचारलंच मी, कोण असेल ग ते?तर माझ्यावर चिडूनच ती म्हणाली, ते कोणी का असेना, मला डोळा लागलेला मम्मी. का हलवलास मला? झोपू दे ना ग आता..... मुलगा मोठ्या प्रयासाने झोपला होता, त्याने इंटरेस्ट घेऊन उत्तर दिलं ही असतं, पण पुढचे चार तास मला जागं ठेवलं असतं, म्हणून माझी ठुसठुसणारी सल मी त्याला बोचू दिली नाही.नवरा जागाच वाटला, त्याला विचारायचं म्हटलं तर मूळापासूनच सगळं सांगावं लागणार होतं. त्याला म्हटलं, जरा बोलायचं होतं महत्वाचं. तो एकदम सिरीयस झाला आणि म्हणाला बोल.मला गिऱ्हाईक मिळालं म्हणून हुरूप चढला, बारीक आवाजात त्याला म्हटलं, अरे मी ना हॉल मधून बेडरूमध्ये जात होते, तेव्हा त्या मधल्या पॅसेजमधून ना, माझ्या पायावरून चुटदिशी काहीतरी पळालं रे......डोळ्याची पापणी लवते न लवते तोच गायपही झालं. मी घाबरून केवढी किंचाळले माहितीये?कोण होतं ते कळलच नाही मला, सांग ना कोण असेल रे?नवऱ्याला मॅटरचं आकलन होईपर्यंत अर्ध मिनिटं गेलं, ते झाल्यावर मात्र तो वेळेकाळेचं भान न राखता केकाटून म्हणाला, हे महत्त्वाचं होतं? मला वाटलं तुला मुलांबद्दल काही सांगायचंय, नाहीतर मला अकलेचा डोस पाजायचा असेल, नाही तर ह्याची त्याची गाऱ्हाणी गायची असतील. झोप मुकाट्याने म्हणे पायावरून कोण गेलं? पण मला झोप येत नाहीये, काळजीने. विविध सूक्ष्म जीवजंतू डोळ्यासमोर विनाकारण वळवळत बसलेत रे. दिसलं असतं ना तर काय प्रॉब्लेम नव्हता. पण उगीच लटकत ठेवलंय ना त्या पायावरून जाणाऱ्यांनं.गुडनाईट मी झोपतोय, असं म्हणत नवऱ्याने माझ्यापासून तोंड फिरवलं.फारशी काही चांगली झोप लागली नाही मला त्या रात्री....... (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); उठले तेव्हाही घरातल्या कानाकोपऱ्यावरून बारिक नजर फिरवली मी. काहीच सुगावा लागला नाही.चहाचं आधण ठेवलं, दुधाची पिशवी फोडायला त्याला कात्री लावली, तोच माझ्या पायावरून पुन्हा कोणीतरी पळालं, पण या वेळी मात्र माझ्या नजरेनं त्याला अचूक हेरलं.अन् मी झपकन दोन्ही पाय हलवून ओरडले, बाईs बाईss बाईsssत्या नादात ती दुधाची पिशवी माझ्या हातून निसटली, सुरsर्कन दुधाची पिचकारी माझ्या तोंडावर, कट्ट्यावर , जमिनीवर सगळीकडे उडाली, मोठ्ठा व्याप झाला. पण मला त्या धावऱ्याचा शोध लागल्याच्या आनंदापुढे व्यापाचं फारसं काही वाटलं नाही.तेवढ्यात नवरा उठून बाहेर आला. त्याला म्हटलं, अरे उंदिराचं पिटुकलं घुसलय घरात आपल्या. पण काल मला तो उंदीर वाटला नाही रे. काही वजनच नव्हतं त्याचं, फार हलका लागला पायालानवरा म्हणाला कळलं ना आता तुला कोण होत ते, झाली ना शांती?मी उसळून म्हणाले, आता तू पकडून पहिले बाहेर काढा त्याला.ऑफिसला जाऊ की त्याला बाहेर काढू?बघतो रात्री आल्यावर.......अरे रात्री आल्यावर काय? आम्ही दिवसभर त्या पिटुकल्याबरोबर राहायचं का? मला तर बघूनच शिरशिरी येते अंगावर!!मग काय आता मी तुझ्या त्या पिटुकल्याला पकडण्यासाठी ऑफिसला रजा घेऊन घरी बसू का?मी म्हणते हरकत काय आहे? घालवला एक दिवस बायकोसाठी तर? सांगून सांगून उंदरालाच पळवून लावायला सांगतेय ना? राक्षसाला तर नाही ना!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  तू आणि तुझा उंदीर बसा घालत गोंधळ, असं म्हणून नवरा आवरायला निघून गेला.या नवऱ्यांना घरातला कारभार इकडचा तिकडं झाला तरी ऑफिसला जायचं काय पडलं असतं कोण जाणे.......मी बराचवेळ तोंड वाकडंच ठेवलं, चहाचा कप संभाळून त्याच्यासमोर आपटला, एकही शब्द त्याच्याशी बोलले नाही, नेहमीप्रमाणे गोड हसून बायही केलं नाही, तरीही, तरीही तो गेलाsच.मला आणि माझ्या पोरांना उंदराबरोबर एकटं टाकून गेला........थोड्यावेळानं मुलं उठली, तसं मी म्हटलं, काल पायावरून गेलं ते उदरांचं पिल्लूच होतं. मुलगा ओरडला, मम्मी म्हणजे उंदीर आहे आपल्या घरी?मी 'हो' म्हटलं तसं तो म्हणाला पहिले बाहेर काढ त्याला, नाहीतर मी नाही उतरणार बेडवरून......ए मला नाही येत बाहेर काढायला, मी पण तुझ्यासारखी घाबरटच आहे. मग ताईला सांग, असं तो म्हणताच त्याची ताई तर, ई sss करून लांबच पळाली.संपूर्ण दिवसभर ते उंदीराचं कार्टं आमच्यासमोरून स्वैपाकघरातून, हॉलमध्ये, हॉलमधून बेडरूममध्ये, बेडरूममधून कपाटाच्या मागे, विविध ठिकाणी वाट्टेल तसं उंडरत होतं. ते आम्हाला बघून पळतय आणि आम्ही त्याला बघून पळतोय, हेच चाललेलं नुसतं. नवरा येईपर्यंत जीवात जीव नव्हता माझ्या, अशी उंदिरड्याची धास्ती घेऊन दबून राहणं तेवढं प्रशस्त वाटत नव्हतं मनाला. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  संध्याकाळी नवरा आला, मनातल्या उंदराला जरा बाजूला सरकवून त्याला भरपेट नाष्टा पाणी दिलं, त्यानंही ताव मारून खाल्लं. आणि तो सुस्त होऊन लवंडायच्या बेतात असतानाच त्याला पकडून म्हटलं, चल बाहेर काढ आता त्या उंदरालानवरा झटकन म्हणाला, गप आता आलो मी. आल्या आल्या कुठे त्या उंदराच्या पाठी लागू?सकाळी नाही आत्ता नाही मग कधी? जा तुला काही पडलच नाही माझं, असं म्हणताच तो म्हणाला, उद्या रविवार आहे, काढतो त्याला निकालात.अय्या उद्या रविवार आहे? मी टाळी वाजवून दोन पायावर टुणकन उडी मारली. हे तर मी त्या पिटुकल्याच्या नादात विसरलेच होते.मग मी मन विशाल करून नवऱ्याला एका रात्रीची मुभा दिली. तरीही उद्या मला काहीही कारण नकोय असंही डोळे वटारून सांगणं मला गरजेचं वाटलं.त्या रात्री ते उंदिरडं आमच्याबरोबरच झोपलं. आम्ही बेडवर अन् ते बेडखाली.मला सारखं वाटत होतं, रात्रीत पांघरुणात शिरलं तर? पोराला चावलं बिवलं तर? काळजीने झोप लागता लागता राहिलीच. पण त्या उंदिरड्याची एवढी मजाल झाली नाही, सकाळी आम्ही सगळे सुस्थितीत होतो.मी नवऱ्याला बजावलं, आज तुला त्या उंदराला बाहेर काढायचंच आहे. मला कारणं नकोयत.नवऱ्याने येस बॉस म्हणत मान हलवली.मला बरं वाटलं.जेवणखाण झाल्यावर नवऱ्याने उंदराची मोहिम हातात घेतली. पोरीला जोडीला घेतलं, पोराला जोर चढला, त्याला नको म्हणूनही तो सहभागी झालाच. नवऱ्याने प्रत्येकाच्या हातात काठ्या दिल्या, पहिली दहा मिनिटं ते पिटुकलं कुठे आहे ते शोधण्यातच गेली. मग मुलाला ते स्वैपाकघरातून बेडरूममध्ये पळताना दिसलं. सगळे काठ्या घेऊन त्याला हुसकवायला तयार झाले. त्याने कपाटाखालची जागा घेतली, नवऱ्याने काठीने  कपाटाखाली दणकवलं, तसं ते चुटुकन बेडखाली शिरलं,पोरीने बेडखाली एका साईडने काठी घातली, नवऱ्याने दुसऱ्या साईडने घातली, पोरगं घाबरून बेडवर चढून माझ्यासारखं त्यांना फुकटचं प्रोत्साहन देऊ लागलं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  परत उंदिरडं बाहेर आलं, अन् एवढी नाकाबंदी असूनही ते बेडरूम बाहेर पडलच.आमच्या माणसांची चपळाई त्याच्यापुढं सुमार दर्जाची ठरली होती.ते तुरतुरं बाहेरच्या हॉलमध्ये नक्की कुठं जाऊन विसावलं ते कुणाला कळलंच नाही. आमच्या माणसांनी पंधरा मिनिटं सगळीकडे काठ्या ठोकल्या, दहा मिनिटं ती दबा धरून बसली, पण ते उंदिरडं कुठून बाहेर आलंच नाही.आमची माणसं दमली, थकली आणि त्यांनी आपली हार मान झुकवून कबूल केली.मी म्हटलं मग आता कधीsss?तर नवरा दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, आता पुढच्या रविवारी.......त्यानंतर असे अनेक रविवार नवऱ्याने आणि मुलीने इटुकल्याला हुसकावून लावण्यात खर्ची पाडले, पण अजून काही त्यांना यशसिद्धी प्राप्त झाली नाहीये.पहिला महिना तर असाच गेला, दुसराही भरत आला आता, उंदिरडं घरात आमच्या नाकावर टिच्चून इकडनं तिकडं सारख पळत असतं, दिवसातून चार वेळा माझ्याच पायाच्या इथं कडमडत असतं, मी अजूनही किंचाळून उड्या मारतेच. अंगावर त्याच्या स्पर्शाने शिरशिरी येतेच.जिथून कुठून आत शिरलं असेल, तिथून बाहेर जायला काय होतय त्याला?एवढं सेटल होण्यासारखं आमच्या घरात त्याला काय मिळालं देवच जाणे......बरं स्वतः सेटल होऊन आम्हाला मात्र आमच्याच  घरात अनसेटल करून टाकलं, त्याचं काय?त्या तुरतुऱ्याला येत असेल हो मजा माणसांंबरोबर राहायला, पण आम्हाला किती ऑकवर्ड वाटतं, ते कुणी, कसं आणि नेमक्या कुठल्या भाषेत त्याला सांगावं बरं?      ©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!