तुकाबा

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

मागच्या महिन्यात एका लग्नाला गेलेलो. मुहूर्त टळून गेला तरी गडबड नाही कि गोंधळ नाही आणि नवरा नवरीचा सुद्धा पत्ता नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अचानक एका मयतालाच जावं लागलं. तिथेही तसच. परगावचे सगळे नातेवाईक जमले. त्यांचा आरडा ओरडा सुरु होऊन विझला. बुड टेकून बसलेली माणसं हळू हळू पांगू लागली. शेवटी मडं ताटून जायची वेळ झाली तरी कशाचाच पत्ता नाही. आणि अशातच झर्रकन माझ्या डोळ्यापुढं आमच्या गावचा तुकाआबा उमटला. पंचायतीच्या दप्तरानुसार त्याचं नाव तुकाराम. पण गावगाड्याच्या रितीप्रमाणे ते बनलं तुकाआबा. आणि त्याच्याही पुढ कालमानानं ते झालं तुकाबा. कित्येक पिढ्यांच्या मंडवळ्या जशा या तुकाबानं बांधल्या तशा त्या पिढ्यांतल्या मध्येच सोडून गेलेल्या लोकांच्या तिरड्या आणि चिता सुद्धा त्यांनच रचल्या. गावगाड्यातल्या जुन्या झाडांसारखाच कितीतरी गोष्टींचा साक्षीदार तुकाबा.तुकाबा गावाच्या सुखात हजर व्हायचा तसा दुःखातही हजर असायचा. जशी एखाद्याच्या लग्नात त्याची गडबड, धांदल चाले तशी स्मशानात चिता रचनाही ती चाले. गावात माणूस मेलं कि तुकाबा कुठेही असो. धावत पळत हजर होणारच. मयताचे नातेवाईक जमेपर्यंत तुकाबा काही जेष्ठ लोकांना हाताशी घेऊन पुढच्या तयारीस लागे. वाण्याच्या दुकानातून उधारीवर सुतळ्या, गुलाल, पांढरा कपडा, खोबरे असं मयताला लागणारं समान तो उधारीवर आणून तिरडी बांधायच्या कामाला स्वतःला जुंपून घ्यायाचा. गावात कोणत्याही घरात मेलेला माणूस किती मण जळणात जळेल आणि चिता रचताना तळात, मध्यभागी आणि वरती किती मोठे लाकडाचे ओंडके घालावे लागतील यात त्याचा हातखंडा होता. त्याने रचलेली चिता मयताच्या बाजूला कधीच ढासळणार नाही. एकसारखी सलग जळत जाणार. तुकाबा म्हणायचा, शेवटचं जळताना तरी माणूस आरामात जळवा. चितेला अग्नी दिल्यानंतर त्या घरातल्या पुढच्या सगळ्या उत्तरकार्य, चौदाव्या पर्यंतच्या विधीत तो सहभागी असणारच. तुकाबाची स्वतःची लाकडी वखार होती. वखार म्हणजे घरामागच्या परड्यात चार दोन तोडलेल्या झाडांचे कापलेले वाळके लाकडी ओंडके. पूर्वी गावात माणूस मेलं कि जळणाची शोधाशोध सुरु व्हायची. पावसाळ्यात तर हमखास हाल. मग तुकाबाच त्याच्या ओढ्याकडेची चार दोन वठलेली झाडे कापून विकू लागला. पण त्यानं या धंद्यात कधी कोणाचा एक रुपयाही ज्यादा घेतलेला नाही. उलट कित्येक गरीबा घरच्या चिता त्यानं फुकटात वखारीची लाकडं नेऊन जाळल्या आहेत. तुकाबा तत्वाशी प्रामाणिक गडी. म्हणायचा, "मरताना अंगावरची कापडं सुद्धा हितच ठिवून जायचं हाय! पण माणसाच्या जातीला पैशाची लई हाव!" तुकाबाशिवाय गावातल्या पोरां-पोरींची लग्ने ठरलेची ऐकिवात नाहीत. लग्न ठरवायला मध्यस्थी म्हणून तुकाबा बैठकीला असणारच. पोरां-पोरींची पसंती झाली कि पुढचे सगळे सोपस्कर तुकाबावर ढकलून लोकं निवांत राहत. देण्या घेण्याचं कसलंही कांडे तो पाडणारच. एखाद्या गरिबाघरची पोरगी मानपानाशिवाय चांगल्या पोराच्या गळ्यात तोघालणारच. वरून म्हणणार, “अशा गुणाची पोरगी दहा गावात हुडकून मिळणार नाय! पोराचं नशीब चांगलं दिसतया म्हणूनच हि तुमची पदरात पडतीया!” सगळ्यांच्या लग्नात सकाळपासून तुकाबा दारात हजर होणार. त्याला आमंत्रणाची गरजच नसायची. जणू त्याच्या घरचीच लग्ने सगळी. लोटांगणापासून ते हळदी, देवाक, तांदूळ पडेपर्यंत तुकाबाची धांदल साऱ्या मंडपभर चाले. पण सर्व विधी वेळेत पार पडणारच. अक्षता पडतानाही शेवटची मंगल अष्ट्का तुकाबाचीच असणार. त्यानं मंगल अष्ट्का म्हंटल्या शिवाय लग्न पार पडल्यासारखं वाटायचंच नाही. त्याच्या आवाजाला एक विशिष्ट लय होती. ताल होता. तो आवाज गावाच्या परिचयाचा होता. आणि गाव त्या आवाजाच्या. धोंडी नायकाच्या पोरीचं लग्न जुळत आलेलं. पण तिकडची मंडळी दोन तोळ्यावरच अडून बसलेली. पोरीच्या बापाची ऐपतच नव्हती दागिने घालण्याची. मुलाकडची मंडळी बाकी सगळा खर्च घालायला तयार होती. फक्त पोरीच्या अंगावर दोन तोळे डाग घालण्याची त्यांची अट होती. चांगलं स्थळ हातचं जाऊ नये म्हणून तुकाबानं बैठकीत हरतऱ्हेचे प्रयत्न केले. अनेक डाव खेळले. ठेवणीतले बाण काढले. पण उपयोग काहीच झाला नाही. शेवटी पाहुणे उठून निघाले. उंबऱ्याबाहेर पडले तसा तुकाबा गरजला, "घातलं डाग आमी पोरीला! शबूद हाय माजा! तारीक ठरवा लग्नाची! देवाने गाठी बांधल्यात पोरांच्या! आपण कोण त्यास्नी नडणारं!” काळजीने भेदरलेल्या पोरीच्या बापाच्या कानात तुकाबानं काहीतरी सांगितलं. महिन्याभरात लग्न पार पडलं. पुढं दोन तीन वर्षे सरली. धोंडी नायकाच्या घरात जन्मलेला नातू घरभर रांगू फिरू लागला. त्या साली नायकाची सुगी चांगली झालेली. घरात धान्याची थापी चढलेली. आणि एका सकाळी तुकाबा धोंडी नायकाच्या घरी आला. त्याच्या कानात पुन्हा काहीतरी पुटपुटला. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळच्या एस.टी ने तालुक्याच्या पोतदार सोनारकडं घेऊन गेला. ज्या आकाराचं जसं खोटं दागिने त्याने याच सोनाराकडून बनवून घेतलं होतं अगदी तेच दागिने त्याने यावेळी बनवून घेतले. पण यावेळी बनवलेले दागिने सोन्याचे होते. ते फक्त घरी जाऊन मुलीच्या अंगावर बदलायचे होते. पण इतक्या वर्षात या कानाची खबर त्या कानाला जाऊ दिली नव्हती तुकाबाने. पण शब्दाचा पक्का होता तुकाबा. तोंडातुन बाहेर फेकलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणारच. मग थोडा उशीर का होईना. उन्हा तान्हाचा तुकाबा शेतात राबताना हमखास दिसायचा. त्याची म्हातारी त्याला फडक्यात भाकरी बांधून मळ्याची वाट कमी करताना दिसायची. शेतात काम नसलं कि तुकाबा भर उन्हाचा एखाद्या जुन्या बाभळीवर चढे. बाभळीवरून घमेलेभर तरी डिंक गोळा करे. त्या डिंकाचा एक जीव करून त्याचे लाडू म्हातारीला बनवायला तुकाबा लावायचा. तुकाबानं नुसत्या गावच्या पोरींची लग्नेच जुळविली नाहीत. तर एखाद्या गरिबा घरची लेक बाळंतपणाला आलेली तुकाबाला कळालं तर पिशवीत चार दोन डिंकाचे लाडू घेऊन त्या दारात तुकाबा हजर होऊन म्हणणार, हे घ्या डीकाचं लाडू हायीत लेकीला चारा! ह्येनं कंबार बी घट्ट यिल पोरीची अन दुधाला बी फरक पडतुया!” दसऱ्या पासून गावात हरिणाम सप्ताह चाले. त्या सात दिवसात तुकाबाचा मुक्काम देवळातच. कपाळावर गंध,बुक्का आणि हातात वीणा घेऊन तारा छेडणारा व भक्तीत तल्लीन झालेला इतका शांत, अबोल तुकाबा गावाला या दिवसात पहायला मिळे. जणू पंढरीचा पांडुरंगच देवळात उभा. सप्ताहाचे शेवटचे कीर्तन संपल्यावर खांद्यावर दिंडी आणि हातात भगवी पताका घेऊन तामजाईच्या माळावर फुललेल्या गर्दीतून निघालेला तुकाबा आणि भंडारा डोंगरावर विश्वाच्या शांतीसाठी गाथा लिहिणारा तुकाराम हि एकाच कुळातली माणसं असतील का? कुणास ठाऊक. आषाढात एका साली गावावर सलग आठ दहा दिवस फळी धरून पाऊस कोसळत होता. दिवस रात्र पाऊस चालूच. उघडायचं नावच घेईना. तशाच नदीला तुफान पूर चढला. आजूबाजूच्या गावांचा संपर्कच तुटलेला. ज्याचं हातावर पोट चाले त्यांचे हाल तर कुत्र्यागत चाललेले. अशातच मांगवाड्यानं वाळीत टाकलेल्या काशा मांगाचं चार वर्षाचं पोरगं पोटाकडनं टम्म फुगलं. दोन दिवस झाड्याला जाऊन जाऊन पोरग्यानं जाग्यावर अंग टाकलं. अन तापानं फणफणलं. ताप तर उतरायचच नाव घेईना. तुफान पाऊस गावावर कोसळत होता. अशातच पोरगं हलायचं बंद झालं अन बघता बघता गप्पगार पडलं. भावाला, पुतण्याला काशा मांगानं हाका दिल्या पण भाऊ बंद्कीच्या वादात अक्ख काशाचं घरच वाळीत टाकलेलं. काशाची बायको पोरगं मांडीवर घेऊन ओरडायला लागलेली. थोरली तीन पोरं भोवतीनं बघत बसलेली. अर्ध्या राती काशाचं पोर गेल्याची बातमी तुकाबाला समजली. तशा पावसात तुकाबा पोत्याची खोळ अंगावर टाकून आणि हातात कंदील धरून पायाखालचा चिखल तुडवीत मांगवाड्यात हजर. काशाच्या अर्ध्या घरात पाण्याची ओल पसरलेली. सारं घरच गळकं. शेजार पाजारचं माणूस कुणीच नाही. चांभारवाडा आणि महारवाड्यातली चार दोन माणसं पुढच्या लक्ष्मीच्या देवळात कंदील घेऊन थांबलेली. काशाच्या भावाचं दार तुकाबानं वाजवलं. पण कोणच आतून बाहेर येईना म्हंटल्यावर तुकाबानं, आरं पोरगं मेल्यावर तरी वैर सोडा कि आय घाल्यानो! अशा चार दोन शिव्या टाकल्यावर चार दोन लोकं आवाजानं बाहेर आली. रात चांगलीच चढली तरी पाऊस उघडायचं नावच घेईना. पोरगं ताटून निघालेलं. शेवटी तुकाबानं कुदळ, खोरे, पाट्या जमा केल्या. अंगावर पोत्याची खोळ टाकली. चार लोकास्नी सोबत घेऊन काशाचं ताठलेलं पोरगं चादरीत गुंडाळून कवळ्यात धरून उचललं अन नदीची वाट धरली. नदी खुळ्यागत काठाच्या बाहेर येऊन वाहत होती. पुराच्या पाण्याचा धडधड करणारा आवाज कानांना भेदत होता. मसणवटा पाण्यात बुडून गेला होता. खड्डा काढायला सुद्धा जागा सापडत नव्हती. आणि चिखलात खड्डा काढायला कुदळ घुसतहि नव्हती. तुकाबानं एक जागा हेरली. कुदळ, फावडे घेऊन खड्डा पाडायला सुरवात झाली पण गुडघाभर खड्डा झाला नाही तोपर्यंत खड्ड्यात पाण्याची चिपळी आली अन बघता बघता खड्डा पाण्यानं भरून गेला. पाऊसच चिक्कार. सारया धरतीलाच पाझर फुटलेला. रात्र पहाटेकडे कलली तरी खड्डा पडेना. सगळीकडे पाणीच पाणी. शेवटी झाडांच्या गचपांडीत एक वठलेलं करंजीचं जुनं झाड होतं. तुकाबानं ते पाडलं त्यात अर्धा खड्डा मिळाला. त्या जागी लगेच खोदकाम चालू केलं. कंबरे इतका खड्डा तयार झाला. खड्डा खोल गेला नाही तर लांडग्या कुत्र्यांची भीती. पण यावेळी खड्डात पाणी लागलं नाही. ताठलेलं आणि फुगलेलं पोरगं कवळ्यात घेत पाय दुमडून तुकाबानं खड्यात झोपवलं अन कंदिलाच्या उजेडात फुगलेल्या पोराच्या पोटावरून हात फिरवत तुकाबा काशाकडं न बघताच म्हणाला, “काश्याsss पोराला वाळक्या मक्याची कणसं खाया घातल्याली दिस्त्याती! त्येनच पोरगं प्वाट फुगून मेलं! लका जनावर व्हुतं का रं त्ये! गरिबी लई वाईट अस्तिया! आग लागली असल्या जगण्याला!" तुकाबा काश्याचा पोराला पुरून गावात आला तेव्हा पाऊस थांबला होता आणि नदीचा पूर हळूहळू ओसरत होता. पण काश्याच्या घरात दुख:चा महापूर काही केल्या ओसरायला तयार नव्हता. ...आयुष्याच्या मावळतीला आता तुकाबा पोहचलाय. त्याच्या जीवनाचा सूर्य कधीही डोंगराआड लपू शकतो. त्याची लाकडाची वखार कधीच बंद पडलीय. गावातला माणूस मेला कि आता तालुक्याच्या टिंबर मार्केट मधून किलोवर मोजून लाकडे आणली जातात. नुसती ओलीगार लाकडं जळताना मसनवट्यात सगळीकडे धुराचा आगडोंब उसळतो. माणूस जळण्याआधीच लाकडाचे ओंडके आजू बाजूला ढासळून जातात. मात्र तुकाबाच्या बंद पडलेल्या वखारीच्या कोपऱ्यात चार-पाच मोठे बाभळीच्या लाकडाचे ओंडके अजून पडलेले आहेत. ते कुणासाठी ठेवले असतील? माहित नाही. ते कुणाच्या सांगण्यावरून ठेवले असतील? ते हि माहित नाही. तुकाबाचं गावातलं घर कधीच मातीत मिसळलय. लेकानं बांधलेल्या माळावरच्या वस्तीकडे आता त्याचा शेवटच्या टप्यावरचा मुक्काम असतो. कुणाचं लग्न ठरवायला तुकाबाचे पाय आता गावाकड येत नाहीत. एखाद्या मयताची चिता रचायला त्याचे हात आता मसनवट्याकडे वळत नाहीत. त्याच्या थरथरणाऱ्या हाताची बोटे दसऱ्याच्या हरिनाम सप्ताहात विणाच्या तारांना छेडतानाही दिसत नाहीत. नव्वदी पार केलेला तुकाबा भर उन्हाचा माळावरच्या पिपर्णीच्या झाडाखाली मोडक्या खाटेवर पडून असतो हताश. समोरच्या रस्त्यानं एखादी बैलगाडी निघाली कि त्या आवाजानं दचकून उठतो तुकाबा. पण नजरेला दिसतच नाही बैलगाडी. नुसतीच अंधाराची अंधूक वर्तुळं. अंधुकच दिसतं त्याला. फुटावरचाच माणूस ओळखतो तुकाबा. आवजानेच माणूस जाणतो तुकाबा. एकेकाळी ज्या डोळ्यात ओसंडून तेज फुलायचं. नुसत्या नजरेच्या खुणावर एका बैठकीतच तो गावची लग्ने जुळवून द्यायचा. त्या डोळ्यातलं तेज कधीच मावळून गेलंय. भिंगरी बांधल्यासारखे असलेले त्याचे चपळ पाय खाटेभोवतीच फिरत राहतात. आपल्याच विश्वात. आलच जवळ कोणी तर भर उन्हाचा धोतर नेसलेला उघडा तुकाबा उठून बसतो खाटेवर. समोरच्या रस्त्यावरून जाताना तुकाबाकडे नजर गेली की मन उदास उदास होऊन जातं. कुठेतरी खोलवर वाटून जातं, "तुकाबा सारख्याना आयुष्याच्या खाटेवरून उठवून या देशात चिरमु-या सारखे वाटले जाणारे खरे खुरे पद्मश्री, पद्मविभूषण देता येतील का? कधीही मोडून पडेल अशा जन्माच्या खाटेवर बसलेल्या तुकाबाला या टप्प्यावर आतून काय काय वाटत असेल? सगळेच काही आलबेल असेल तर अधे मध्ये कधीही दचकून उठून का बसत असेल तुकाबा? यमाचा रेडा तुकाबाच्या खाटेला डुसण्या मारत असेल कि मसनवट्यात स्वतःच्या हाताने जाळलेली गावगाड्यातली जुनी माणसं त्याला आता खुणावत असतील? आपण साऱ्या गावाची लग्ने जुळविली पण पस्तीशी गाठलेल्या आपल्या शेतकरी नातवांची लग्ने आपण जुळवू शकत नाही, या वेदनेची दुखरी सल त्याला आतून झोपू देत नसेल का? कि मध्येच साथ सोडून गेलेल्या म्हातारीची तिरडी आपल्या हाताने बांधावी लागली याचं दुःख त्याला झोपू देत नसेल? कळतच नाही काही. मिळतच नाही उत्तर. बधीर होऊन जातात पेशी. आपल्याच मेंदूच्या... ©ज्ञानदेव पोळ (प्रतिकात्मक फोटो)
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!