टेकडी

By ramataram on from https://vechitchaalalo.blogspot.com

(’चक्रव्यूह’ - रंगनाथ पठारे)रस्त्यावरचा उजेड संपला आणि निखळ पायवाट अधिक स्पष्ट दिसू लागली. आजूबाजूला झाडांचे कसलेही चिन्ह दिसत नव्हते. गवताचा विशिष्ट ताजा वास तेवढा येत होता. अनेक रानफुलांच्या सुगंधाचे व काहीसे मातीच्या ओलसर गंधाचे मिश्रण त्यात होते. सक्सेना झपाझप पावले टाकत चालला ह्ता. त्यामुळे गोपीचंदची थोडीशी तारांबळ उडत होती. सक्सेना अधीर झाल्यासारखा- बर्‍याच दिवसांनी एखाद्या लहानपणीच्या मित्राला भेटायला चालल्यासारखा - चालला होता. गोपीचंद अधूनमधून थांबे आणि छाती भरभरून हवा आत घेई. मग घाईघाईने पावले पुढे टाकू लागे,वर जाता जाता पाचाची पंधरा मिनिटे सहज होऊन गेलेली होती. वारा अधिक जोरकस झाला होता. वर एके ठिकाणी थोडीशी सपाट जागा होती आणि एक झाड होते. झाडाच्या पायथ्याशी चार सहा मोठमोठाले दगड होते.सक्सेना काही वेळ नुसताच वार्‍यात उभा राहिला. नंतर तो दगडावर जाऊन बसला. त्याने खिशातून सिगरेटचे पाकीट काढले. गोपीचंद वार्‍यावर उभा राहून दूरवर बघत होता. लांबलांबच्या लुकलुकत्या दिव्यांखेरीज तिथे काहीच दिसत नव्हते. ह्या टेकडीवर सक्सेना कशासाठी आला आहे, हे त्याला समजत नव्हते."पहले तो मै हमेशा यहां आया करता था." सक्सेना म्हणाला."कशाला? असं काय विशेष आहे इथे?" गोपीचंद पटकन म्हणाला आणि गप्प झाला."पता नही क्यूं, बचपन से मुझे इस जगह्से लगाव सा हो गया है. अब अंधेरा है..." सक्सेना म्हणाला, "मी शाळेत होतो, तेव्हा कधीतरी मला या जागेचा पत्ता लागला. त्यावेळी या बाजूला वस्ती नव्हती. रात्री सर्वदूर अंधार असे. चांदण्या रात्री तर हा परिसर विलक्षण गूढ, सुंदर वाटत असे. या टेकडीवरचं हे एकाकी झाड गेल्या कित्येक वर्षांपासून एवढंच उंच आहे. वर्षानुवर्षे हे दगड इथं पडलेले आहेत. शाळकरी वयात ठरवून असं आपण काहीच करत नसतो. पण माझ्या अलिकडं लक्षात आलं की काहीतरी शाश्वत, न बदलणारं असं काहीतरी मूल्य ही टेकडी माझ्या मनात उभं करीत असेल. या जगात हमखास नित्य आहे असा ज्याच्याविषयी आपल्याला विश्वास वाटतो किंवा वाटू शकेल असं काहीतरी माझ्या मनाला इथं सापडत असेल. आयुष्यात आपण अनेकदा अनेक ठिकाणी ठेचाळतो. अनेकदा आपल्याला इतक्या गोष्टी दिसतात, अनुभवाला येतात, की त्यामुळे मनाशी बाळगलेल्या अनेक मूल्यांविषयी, त्यांच्या स्थानांविषयी संभ्रम निर्माण होतात. अनेकदा सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडून जातो. मन उध्वस्त होऊन जातं. कसलंच काही सुचत नाही. अशा वेळी इथं आलो की मला नवं बळ येतं. नवा विश्वास मिळतो...:सक्सेना थोडा भावविव्हल होऊन बोलत होता. टेकडीवरच्या अंधारात त्याचे शब्द दुरून येणार्‍या अनाकलनीय नादासारखे वाटत होते.गोपीचंदने त्याला तसे सांगितले."... जब मैं एक तरहकी थकान महसूस करता हूं..." सक्सेना म्हणाला, " आपले सेन्सेस, आपलं शरीर, आपली सगळी इंद्रिये विलक्षण शिणलेली आहेत, सगळ्यांमध्ये मरगळ आहे आणि कोणत्याही प्रकारच्या बदलात वेदनेच्या कण्हण्याखेरीज काही नसतं, अशा वेळा आपल्या आयुष्यात पुष्कळदा येतात. कशावरही विश्वास ठेवावासा वाटत नाही, कुठंही मनाला आधार सापडत नाही तेव्हा आपण कोणत्यातरी नित्य असलेल्या, शाश्वत असलेल्या प्रतिकाजवळ येतो...""अरे पण मग ही मूर्तिपूजाच नाही का? मूर्तिपूजेत तरी दुसरं काय असतं?" गोपीचंद म्हणाला."अगर ऐसाही है तो..." सक्सेना म्हणाला. "मूर्तिपूजेच्या मागे अशा प्रकारची दृष्टी असेल तर काही मर्यादांपर्यंत ती योग्यच म्हटली पाहिजे. विज्ञानाच्या अभ्यासात आपण जितके खोलवर शिरत जातो, तितका अनोळखी प्रदेश दिसू लागतो. आणि संगती शोधण्यासाठीच्या ज्या शिड्या, खांब असं साहित्य घेऊन गेलेलो असतो ते कुचकामी वाटू लागतं मग पुन्हा नवे खांब, नव्या शिड्या असं सगळं उभारावं लागतं. आणि बराच प्रवास केलाय अशा खुषीत आपण असताना पुन्हा आपल्या लक्षात येतं की तसं काहीच झालेलं नाही, आपण खूप थोडं चाललोय. आणि अनोळखी प्रदेशाची व्याप्ती मात्र कितीतरी पटीने वाढलीय...""छे! छे! तू आता तत्त्वज्ञानात घुसायला लागला आहेस. आणि क्वांटम मेकॅनिक्स तू म्हणतोस तसल्या प्रश्नांना उत्तरं देतंच की!" गोपीचंद म्हणाला."नही यार! हाऊ कॅन दॅट बी? हाऊ कॅन यू क्लेम टू नो इट कंप्लीटली? हाऊ डु यू कनसिव्ह द अबसोल्यूट ट्रूथ?..." सक्सेना म्हणाला, "आज अनेक मंडळी असं म्हणतात की क्वांटम मेकॅनिक्स तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतं. वेदांतली सूक्तं आणि क्वांटम मेकॅनिक्समधली सूत्रं यांच्यातलं नातं शोधणारेही लोक आहेत. पण प्रश्न असा आहे की क्वांटम मेकॅनिक्स अथवा कोणतंही मेकॅनिक्स हे मूलत: काही सूत्रांनी बांधलेलं असतं. आणि ही सूत्रं माणसाने तयार केलेली असतात. त्यासाठी त्याने पुष्कळ परिश्राम केलेले असतात आणि समजू आपण की अलौकिक प्रतिभा वापरलेली असते. ही सगळी सूत्रं पायाभूत मानून एक संदर्भचौकट तयार होते आणि तिच्यातून भौतिक घटनांकडे पाहण्याचा एक डोळा उपलब्ध होतो. किंवा तो डोळा असतो असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षातल्या भौतिक घटना आपण समजतो तेवढ्या सूत्रांनी बांधलेल्या असतात का? की केवळ सर्वसाधारण सरासरी निष्पत्ती क्वांटम मेकॅनिक्स सांगते तशी येते म्हणून क्वांटम मेकॅनिक्स  खरं मानायचं? त्या सरासरी निष्पत्तीत घटनेच्या प्रत्येक धाग्याचा, त्याच्या हालचालीचा अर्थ स्पष्ट होतो का? त्याच्या भावना व्यक्त होतात का? त्या समजावून घेता येतात का? त्याच्यावर कुणी म्हणेल की इंडिव्हिज्युअलच्या भावनेचं आम्हाला काही घेणं नाही. एकूण सर्वसामान्य उत्तर काय आहे हे महत्त्वाचं. समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीनं ते कदाचित योग्य असेलही. पण वैज्ञानिक दृष्टीनं?..."हे सगळे फारच गंभीर आणि जड होत चालले होते. सक्सेनाचे हे स्वगत, ते व्यक्त करण्यासाठी त्याने निवडलेली जागा, वेळ, सारेच गोपीचंदला वेगळे वाटत होते. विशेषत: अत्यंत हळुवारपणे काही गोष्टी सक्सेना बोलत होता ते."थोडं फार समजलं मला तू म्हणतोस ते." गोपीचंद म्हणाला, "समज की, काठाकाठावरुन दिसलं मला ते. पण ह्या सगळ्याचा, तुझा नि ह्या टेकडीचा एकमेकांशी संबंध काय? आणि आजच तुला या शाश्वत मूल्ये वगैरेची आठवण देणारी ही टेकडी का आठवली? कसला ढळलेला आत्मविश्वास आणि झालेला गोंधळ? दिवसभर तर चांगला काम करीत होतात्स!"गोपीचंद थोड्या हलक्या, खेळकर शैलीत बोलून कदाचित स्वत:च्याच मनावरचा ताण कमी करीत होता."अगर ऐसा कुछ होता तो तेरेको क्यू न बोलता? इट इज समथिंग इंट्रेन्झिक, द वन वुईच कॅन नॉट बी पुट इन वर्डस. इट इज जस्त अ टिपीकल फीलींग..." सक्सेना म्हणाला, "निश्चित असं काही वाटलं नाही. इथं यावं हे मनात आलं मात्र खरं. मी आधी जे बोललो ते सगळं याची कारणं शोधायचा एक प्रयत्नही असेल. कारण वरवर तर याचं काहीच कारण मला दिसत नाही. मग डिप्रेस होण्याचं कारण काय? मी थकलो होतो हे खरं. पण श्रम झाले की थकवा येतोच..."गोपीचंदला वाटले, त्याला म्हणावे की अखेरीस तुझ्यासारख्या माणसालाही कशाचा तरी आधार घ्यावासा वाटतो. कुठेतरी येऊन विश्रब्धपणे बसावेसे वाटते. याला कसलीशी श्रद्धा, पूजा, भक्ती वगैरे म्हणता येणार नाही कदाचित, पण हे त्याच तर्‍हेचे काहीतरी नाही का? की तुला कुणी जवळचे - तुझ्या आतले, निकटचे वाटत नाही म्हणून तू या अचेतन टेकडीशी गप्पा मारायला येतोस? प्रत्येक बुद्धिवाद्याच्या मनात झगड्यातले विश्रांतिस्थळ म्हणून अशी टेकडी असते का?गोपीचंद हे काहीही बोलला नाही. तो अंधारात लुकलुकणारे दिवे बघत राहिला. उत्तरेस काळ्या अंधार्‍या डोंगरांच्या वरच्या कडा काहीशा स्पष्ट होत होत्या.-oOo-पुस्तक: चक्रव्यूह (कादंबरी)लेखक: रंगनाथ पठारेप्रकाशक: शब्दालय प्रकाशनआवृत्ती तिसरी (जानेवारी २०१४)पृ. १०६-१०९
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!