जपणूक......!!
By SnehalAkhila on मन मोकळे from https://hallaagullaa.blogspot.com
माझ्या मुलांनी खूप काही केलं माझ्यासाठी, खरंच देव अशी मुलं सर्वांना देवो!!, नुकत्याच आजारपणातून उठलेल्या शोभनाताई भेटायला आलेल्या आपल्या मैत्रिणीला अलकाताईंना सांगत होत्या.तशा अलकाताई म्हणाल्या, तू काही कमी केलंस का त्यांच्यासाठी? स्वतःचं मन मारून फक्त त्यांच्या भविष्याचा विचार करून सगळ्या प्रलोभनांपासून दूर राहिलीस. केवढी होती तुझी पोरं, मोठा पाच वर्षांचा अन् धाकटा दोन वर्षांचा फक्त. किती होतं तुझं वय त्यावेळी, जेमतेम अठ्ठावीस. नवरा पसार झाला, कुठल्या बाईच्या नादी लागून. मेलात की जिवंत आहात तुम्ही सगळे हे बघायला परत पण आला नाही कधी. नोकरी होती म्हणून तरले ग, शोभना ताई सुस्कारा सोडत म्हणाल्या.हो होती ना!! पण तिथेही मानसिक छळ काय कमी झाला का तुझा? दिसायला देखणी होतीस. त्यात नवरा पळालाय म्हटल्यावर काय सर्वांंना त्यांचीच मालमत्ता असल्यासारखी वाटत होतीस. तू नाकासमोर चालणारी होतीस, तरी तुझ्या ऑफिसमधल्या बायकांना वाटायचं तू स्वतःहून भुलवतेस पुरुषांना. कसं सहन केलंस बाई सगळं, देव जाणे!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); अगं वादळ होतं ते, किती टिकणार होतं? दमले सगळे नंतर स्वतःहूनच, आपण तोंड उघडलं की आणखी दहा अर्थ लावत बसणार, म्हणून गप्प राहूनच सगळ्यांना गप्प केलं. आता तीच लोकं भेटली की आम्ही आमच्या मुलींना तुमचं उदाहरण देतो सांगतात, शोभनाताईंच्या डोळ्यात बोलतानाही चमक आली.माझ्या भावाशी पण लग्न नाही केलंस तू शोभने? तो स्वीकारत होता ना तुला मुलांसकट, देऊन बघायचास ना चान्स नशिबाला? रागच आलेला मला तर त्यावेळी तुझा, अलकाताईंनी मनाला टोचलेलं बोलून दाखवलंच. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); शोभनाताईंनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, तरी मैत्री तोडली नाहीस तू माझ्याशी. तुझ्यापाशी मन मोकळं करायचे म्हणून डोक्याला ताप नाही वाटला कसला. पण मी तुला सांगितलेलं ना ग, मन उडालेलं माझं. विश्वास तुटला होता ग. किती जीवापाड प्रेम करायचे मी माझ्या नवऱ्यावर. आणि तो ही तसंच दाखवत होता. पण दिसतं ते सगळं खरं नसतं, हे जेव्हा कळलं तेव्हा इच्छा मेली माझी सगळ्यावरची.पोरं होती, तू होतीस म्हणून तरले मी, नाहीतर माहीत नाही काय झालं असतं? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); हो पण आयुष्य एकटीने काढणं सोप्प नसतं एवढं. तुला नाही वाटलं कुठल्या क्षणी जोडीदार असावा आपल्यालाही? वाटलं असणार नक्कीच, पण तू दाबून टाकलस ते. मुलांच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला अडकवून घेतलंस, मुलांसाठी आई बरोबर वडीलही बनायचा प्रयत्न केलास. तुझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी नाही वाटलं का तुला, यांना वडिलांचं प्रेम मिळावं, अलकाताईंना आपल्या मैत्रिणीचं एकटेपण अजूनही खटकत होतं.अगं खरा बाप गेला वाऱ्यावर टाकून, दुसरा बाप जीव लावेलच कशावरून? त्या कल्पनाचं बघितलस ना काय झालं? नवरा गेल्यावर दुसरं लग्न केलं, तो पहिले तर म्हणाला पोरीला संभाळतो, बापाचं प्रेम देतो, अन् नंतर तिच्यावर हात टाकायला लागला. किती भेदरलरली असायची पोरगी ती. कुणाचं काही खरं नाही ग. आपण अशिक्षित लोकांना नावं ठेवतो. शिकल्या सवरलेल्या माणसांचं काळंबेरं मात्र झाकलं जातं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); मला अजूनही वाटत नाही, मी काही चुकीचं केलं.माझी पोरं चांगली शिकली, चांगला संसार करतायत मला मिळालं सगळं. अगं आजारी होते तर सूनांसकट सगळे दिमतीला हजर होते. एक कोणीतरी सतत जवळ असायचंच माझ्या. खरंतर त्यांच्या प्रेमामुळेच उठले मी जीवघेण्या आजारातून. सारखे सांगत होते मला, आई लवकर बरी हो. आम्हाला तू हवीयेस, काय पाहिजे दुसरं माणसाला, बोलता बोलता डोळे भरून आलेच शोभनाताईचे."जाण ठेवली पोरांनी तुझ्या, तू त्यांच्यासाठी काय काय केलंस, काय काय सोडलस, सगळं लक्षात ठेवलं पोरांनी......" (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); "हो ना, मुख्य म्हणजे मी एकदाही न ऐकवून दाखवता. देवाने इथे साथ दिली मला, कृतज्ञ आहे मी फार त्याची......''त्या दोघींच बोलणं चालू होतं, तेवढ्यातच शोभनाताईंची मोठी सून दोघींसाठी गरमागरम चहा आणि नाष्टा घेऊन आली, आणि तिने औषधांचीही आठवण करून दिली. तिला जवळ बसायला सांगून शोभनाताई म्हणाल्या, बघ ग अलके, संपूर्ण एक महिना धाकटीने आणि दुसरा महिना या मोठीने रजा काढून माझी तब्बेत राखली. मुलांनी तर काढल्या होत्याच ग रजा पण खास कौतुक या सुनांचं!! यांनी जगण्याचं बळ दिलं मला......मी गेल्यावर दृष्ट काढायला सांग बाई स्वतःची. सगळ्यांनाच नाही मिळत असं. आम्ही नवरा बायको चार दिवसांनी चाललो कायमसाठी गावाला. अडचण झालीये आमची इथं.आमचंच घर आम्हाला परकं झालं आता.......म्हणून म्हणते, ती दृष्ट तेवढी आठवणीने काढून घे, अलकाताई एवढं बोलून झट्कन निघून गेल्या.त्या जाताच शोभनाताईंनी आपल्या सुनेकडे बघितलं, तिने त्यांचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट दाबून धरला. अन् शोभनाताईंपर्यंत शब्दाविना सारंकाही पोचलं.........©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});