चूरा काचांचा...

चूरा काचांचा...

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

आज ऑफिसमध्ये येताना रस्त्याच्या एका कडेला पावलोपावली येत होता काचांचा चूरा... दिसत होते काही गाड्यांचे जाळल्यानंतरचे भग्न अवशेष...हे सारे पाहून मन अगदी विषण्ण झाले... अगदी एखाद्याने कसे पैसे जमवून एखादी आपली आवडती कार विकत घेतली असेल... तीतून तो अनेकदा आपल्या चिमुरडीसोबत तिच्या शाळेत गेला असेल , बायकोला फिरायला घेऊन गेला असेल , गावाहून आलेल्या आपल्या वृद्ध आईबाबांना घरी आणले असेल... अशा किती आठवणी होत्या त्या  गाडीमध्ये... कितीतरी वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेचे प्रतीक असेल ती गाडी... पण काल काही क्षणांतच जातीयतेच्या वादावादीत त्या सर्व आठवणींचा आणि स्वप्नांचा चुराडा झाला... इन्शुरन्सवाल्यांकडून खूप हेलपाटे मारल्यानंतर काही पैसे तर नक्कीच मिळतील पण सोबत त्या गोड आठवणींवर या भीषण घटनेचे पडसाद पुढे कित्येक वर्षे त्या मनांवर राहतील. रिक्षाच्या रोजच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या बिचाऱ्या जीवाला आता तुटलेल्या काचांच्या तुकड्यात कितीतरी दिवस रेंगाळत राहावे लागेल. फुटलेल्या काचेच्या खिडक्या आणि त्याखाली रस्त्यावर पडलेला तो चमकता चूरा खूप सारे निरुत्तरित प्रश्न विचारत होता.... मला फोडणाऱ्याने एकदा तरी ज्या कारची खिडकी ते फोडत आहेत , ज्यांच्यावर दगड फेकत आहेत त्याच्या रक्ताचा रंग पाहिला का ? जर जवळ जाऊन तो रंग पाहिला असता तर समजले असते कि आपण एकच आहोत... सर्वांचा जीव हा एकाच विश्वशक्तीचा भाग आहे, देश-वेष-भाषा जरी विभागले गेले असतील तरी सर्व एकाच मातीतून जन्मले आणि एकाच मातीत विलीन होतील... पण हे सर्व सांगणार कोणाला? ते फक्त फोडत गेले ... जाळत गेले. आणि या सर्वात नकळत जळत गेली ... माणुसकी. त्यात किती निष्पाप जीव होरपळले असतील त्याचा विचार त्या मनांत आलाच नसेल का? सुंदर भारताचे स्वप्न साकारण्यास समर्थ असणारे हात जेव्हा सरकारी गाड्या ,स्टेशन्स वर उठतात तेव्हा हा देश कितीही प्रयत्न करून का मागे राहतो या प्रश्नाला अचूक उत्तर मिळते आणि मग प्रत्येकजण नुसताच मुग्ध होऊन स्तब्ध होतो...कारण त्याच्या आणखी एका स्वप्नाचा चुरा त्या ठिकाणी झालेला असतो... स्वप्न सुंदर भारताचे ... स्वप्न विविधतेतून असलेल्या एकतेचे... आपल्या देशाचा इतिहास खूप सुंदर आणि प्रेरणादायी आहे त्यातून शिकून पुढे प्रगती करत आपल्या वीरांना खरी श्रद्धांजली द्यायला हवी पण इतिहासाच्या पानांवरती झालेल्या घटनांची मुळे आज पुन्हा अशाप्रकारे उन्मळून काढत नव्या जातीवादाला जन्म दिल्याने आजचा वर्तमानदेखील अशीच एखादी दुर्दैवी घटना बनून इतिहासात जमा होईल. उद्या पुन्हा त्या घटनांना उजाळा देऊन भविष्यात वातावरण मालिन करण्याचा प्रयत्न होईल. आणि या सर्वांत शिकार मात्र नेहमीच एक सामान्य नागरिक होत असतो. त्याच्या स्वप्नांचा चुराडा हा असा क्षणांत होत जातो आणि मग उरते ती फक्त एक चर्चा...  कोणी केले ? का केले ? काय चुकले ? कुणाची चूक ? कोण चांगले आणि कोण वाईट ? मी काय करू शकतो ? आपल्या हातात काहीच नाही ? सर्व ठीक कसे आणि कधी होईल?....... - रुपाली ठोंबरे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!