चुकलेल्या वाटा...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

एक दशक होतं जेंव्हा डान्स बारमुळे अख्ख्या महाराष्ट्राची तरुण पिढी भयंकराच्या वाटेवर उभी होती. प्रारंभीच्या काळात हे खूळ फक्त महानगरात होतं, त्या नंतर मोठया शहरात ते फ़ैलावलं. यातून मिळणारा अमाप पैसा अनेकांना खुणावू लागला आणि राज्यातील जवळपास सर्व मुख्य शहरात याने पाय रोवले. पाहता पाहता तालुक्यांची ठिकाणे देखील व्यापली गेली आणि शहरांच्या बाहेर असणारे हमरस्ते डान्सबारसाठी कुख्यात झाले. खेड्यापाड्यातली तरुण मुले देखील याच्या नादी लागली. पुणे मुंबई सारख्या अक्राळ विक्राळ शहरातील काही गटांचे उत्पन्न ही तसे अफाट तगडे होते की ज्यांना कितीही दौलतजादा केली तरी फरक पडत नव्हता. मात्र खेड्यापाड्यातली तरणीताठी पोरे किडुक मिडूक विकून वस्तू गहाण टाकून पैसा उडवू लागली, घरे उध्वस्त होऊ लागली तेंव्हा माध्यमे सावध झाली. खेड्यातून सुरु झालेला आक्रोश शहरांच्या कानी पोहोचला आणि तिथून देखील विरोधाचा सूर येऊ लागला. सरकारने मग डान्स बारच्या मोकाट सुटलेल्या वारूला वेसण घातलं. पुढे न्यायालयीन लढाया झाल्या, नव्याने परवानग्या दिल्या गेल्या पण जुन्या डान्सबारची रौनक आणि स्वैर मोकळीकीची त्यात चांगलीच उणीव होती. तरीही आज देखील विविध शहरात छुप्या पद्धतीने वा स्वरूप बदलून डान्सबारची छमछम सुरु असतेच. कधी धाडी पडतात, मुलींना अटक केली जाते तर कधी मुली आणि त्यांची मालक मालकीण फरार होतात, काही वेळा ग्राहकांनाही अटक होते. हे आता अंगवळणी पडले आहे.पण मागे वळून पाहताना एका दुःखद करूण कथांची आर्त हाक कानी येते. यात मदतीसाठीच्या हाकांचे प्रतिध्वनी आहेत, होरपळून निघालेल्या जीवांचे सुस्कारे आहेत, चडफडाट झालेल्या व्यक्तींचे शिव्याशाप आहेत आणि आयुष्याचा बाजार झालेल्या स्त्रियांचे वेदनादंश आहेत, या स्त्रियांच्या कुटुंबियांचे मनस्वी दर्दभरे हुंकार आहेत. हा कोलाहल नाहीये, ही कुजबुजही नाहीये. ही एक चुटपुट आहे जी नियतीच्या पोलादी भिंतीत कैद झालीय. काळाच्या ओघात आपणही तिला विसरून गेलो आहोत. मात्र चुकून कधी या भिंतीला कान लावले तर असंख्य इंगळ्या अंतःकरणाला डसाव्यात इतकी तीव्रता त्यात आहे. या दंशाची ही दास्तान दर आठवड्याला तुमच्या भेटीस येत राहील. यातली सर्व माणसं, स्थळं, घटना, संदर्भ गतकालीन आहेत. त्यांचे वर्णन काहीसे अतिरंजित वाटेल पण ते वास्तवाची वाट सोडणारे नाही. सर्व घटकांना आपलं खाजगी जीवन जपण्याचा अधिकार असतो तो या घटकासही आहे, ज्यांचं शोषण झालं आणि ज्यांनी शोषण केलं त्यांना ही हा अधिकार आहे, ज्यांच्या आयुष्याची धूळधाण उडाली त्यांच्या आयुष्याच्या चिंधड्या सार्वजनिक करून कुणाएकाला दुखावण्याचा वा कमी लेखण्याचा अधिकार कुणासही नाही. त्यामुळे लेखमालेतील काही पात्रांची, स्थळांची नावे बदलली आहेत.ही लेखमालिका केवळ डान्सबार आणि त्या अनुषंगातल्या घटना, व्यक्ती, स्थळे यांच्यापुरती मर्यादित नसून नाचगाण्याची कला जगापुढे मांडून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या तमाम घटकांशी निगडित आहे, याचा परिघ व्यापक आहे, तो पहिल्या नाचगाण्यापासून तमाशापर्यंत, कोठयावरच्या बारीपासून ते बैठकीच्या लावणीपर्यंत, गर्भश्रीमंतांच्या बागानवाडीतील नर्तिकांच्या दमणकथांपासून ते पाकीटमारी करून सडकछाप ऑर्केस्ट्रावर पैसे उडवणाऱ्या माणसांच्या विविधांगी वर्गापर्यंत आणि राजेशाही महालात सादर झालेल्या शाही नृत्यापासून ते आताच्या डान्सबारपर्यंतच्या सगळ्या बिंदूंशी याचं नातं आहे. काहींना वाटेल की ज्या घटकामुळे समाजाचा ऱ्हास झाला वा सामाजिक मूल्ये ढासळली त्यांचे हे उदात्तीकरण तर नाही ना ! तसं काही नाही, हे अरण्यरुदनही नाही. आपल्याच समाजाचा घटक असलेल्या एका उपेक्षित आणि शोषित घटकाची ही दर्दभरी दास्तान आहे, यांच्यापायी उध्वस्त झालेल्या जीवांची ही विराणी आहे. इतक्या वर्षांपासून आपल्या भवताली हे घडत होते पण याच्या पडद्यामागे काय घडत होते याचा हा शोध आहे. मानवी स्वभावाचा एक पैलू जीवनानंद घेण्याचा आहे, याचे मापदंड इतके आखीव रेखीव आहेत की यात किंचितही बदल झाला तरी त्याचे नाव बदलून अय्याशी, शौक, रसिक, नाद अशी बिरुदे लावली जातात. यात फरक नक्कीच आहे खेरीज वृत्तीही भिन्न आहे. आनंदातून विकृतीकडे होत जाणारा प्रवास मानवी सभ्यतेच्या नव्या व्याख्या शिकवत नसला तरी चुकलेल्या वाटांच्या स्मरणखुणा नक्कीच दाखवतो...- समीर गायकवाड#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!