चालुक्यनगरी बदामी - भाग ५ - भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला

चालुक्यनगरी बदामी - भाग ५ - भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पट्टदकल आणि ऐहोळेची सहल तशी अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. ऐहोळेमधली शेकडो मंदिरे जेवढी पहाल तेवढी कमीच. शिवाय एका मागून एक मंदिरे बघून दृष्टी बधीर झाल्यासारखी वाटू लागली होती. त्यामुळे जेवण झाल्यानंतर मी थेट बदामीकडे परतायचा निर्णय घेतला. शहरात पोहोचलो तर जेमतेम चार वाजले होते. सूर्यास्त व्हायला अजून २ तास बाकी होते. तसाही अगस्त्य तीर्थाच्या पलीकडचा भूतनाथ मंदिर समूह बघायचा राहिला होता. तो पाहू आणि सूर्यास्ताच्या वेळी थोडीफार फोटोग्राफी करू असा विचार करून मी बाईकचालकाला अगस्त्य तीर्थाजवळ सोडायला सांगितलं. चालकाचे पैसे चुकते केले आणि मी भूतनाथ मंदिरांकडे जायला निघालो. तीर्थाच्या परिसरात संपूर्ण शुकशुकाट होता. शुक्रवारचा कामाचा दिवस असल्याने आसपासच्या उठवळ पर्यटकांची गर्दी दिसत नव्हती. एखादे पर्यटन स्थळ असावे तर ते असे! मी मोठ्या खुशीत कॅमेरा काढून भूतनाथ मंदिराचे फोटो काढू लागलो. तीर्थाच्या पार्श्वभूमीवर दिसणारी ती सुबक मंदिरे आणि मागचा रक्तवर्णी डोंगरकडा हे बदामीचे अगदी टिपिकल चित्र. गुगलवर बदामी टाकले असता पहिला समोर येतो तो याच मंदिराचा याच जागेहून काढलेला फोटो. गुरु चित्रपटातला लग्नाचा प्रसंग इथेच चित्रित झाला होता. त्या दृश्याची प्रत्यक्षातली अनुभूती कित्येक पटींनी अधिक सुंदर होती. तिथे मनसोक्त फोटो काढून मी अखेरीस मंदिरात शिरलो.  भूतनाथ मंदिरे आणि अगस्त्य तीर्थ मंदिरातला सुबक नंदी या समुहात दोन मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरे आद्य दक्षिण भारतीय शैलीत बांधलेली. त्यातल्या पहिल्या मोठ्या मंदिराचा मंडप काहीसा तीर्थाच्या आत शिरलेला आहे. शिखराच्या आसपासचे बांधकाम काहीसे अपूर्णावस्थेत आहे. ही मंदिरे दोन टप्प्यांत बांधली गेली. अंतर्गत भागावर आद्य चालुक्य शैली तर बाह्य भागावर कल्याणी चालुक्य शैलीचा प्रभाव आढळतो. दोन्ही मंदिरे शिवाची आहेत. मोठ्या मंदिराच्या मंडपात एक सुबक नंदी विराजमान झालेला दिसतो. उत्तरेकडच्या शिवालयांच्या तुलनेत ही मंदिरे बऱ्या अवस्थेत दिसत होती. कलत्या उन्हाच्या प्रकाशात मंदिराचे खांब तळपत होते. त्यांतून झिरपत येणारे उन्हाचे कवडसे मंडपात छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ खेळत होते. मंदिराच्या मंडपातून समोरचे तीर्थ आणि आजूबाजूचा रम्य परिसर फारच विलोभनीय दिसत होता. इतक्यात समोरच्या बाजूने एक तरुण विद्यार्थ्यांचा ग्रुप येताना दिसला. आता इथेही कालच्यासारखा कलकलाट सुरु होणार कि काय या विचाराने मी धास्तावलो. पण पाहतो तर काय, ते सारे तरुण समोरच्या तीर्थात उतरणाऱ्या पायऱ्यांवर विसावले आणि चित्रकलेच्या सामानाची जुळवाजुळव करू लागले. एखाद्या फाईन आर्ट्स किंवा तत्सम अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असावेत. कलेच्या माध्यमातून या रम्य परिसराला अभिवादन करणारे तरुण पाहून फार बरं वाटलं. इथून निघताना त्यांच्या चित्रांवर एक नजर टाकायची असं ठरवून मी मंदिरांच्या आसपासचा परिसर पहायला निघालो. अर्धवट बांधला गेलेला मंदिराचा कळस तिथला परिसर तसा लहानसाच होता. मंदिरामागच्या प्रचंड शिळेवर एक लहानसे मंदिर दिसत होते. पण तिथे जायचा मार्ग बंद होता. इतक्यात माझी नजर मागच्या डोंगरावर जाणाऱ्या वाटेवर पडली. त्या वाटेबद्दल सहजच तिथल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं. अगस्त्य तीर्थाच्या दक्षिणेकडच्या किल्ल्यावर ती वाट जात होती. डोंगरातली वाट बघून माझ्यातला ट्रेकर जागा झाला. वरून दिसू शकणारे तीर्थाचे आणि आसपासच्या परिसराचे दृश्य मी मनात रेखाटू लागलो. फार विचार न करता मी सरळ ती वाट चढू लागलो. वाटेतले दगड पांढऱ्या रंगात रंगवले होते. वाट चुकू नये म्हणून ही सोय असावी. त्यांचा माग ठेवत मी पुढे जाऊ लागलो. संध्याकाळचा प्रसन्न वारा सुटला होता. चढण फार तीव्र नव्हती. काही वेळातच ती वाट डोंगराच्या मागे पोहोचली. तीर्थाचा परिसर आता नजरेआड गेला होता. डोंगरामागचे खुरट्या झुडुपांचे रान निश्चल पहुडले होते. काही वेळापूर्वी वाहणारा वारा त्या डोंगराने अडवून धरला होता. इथून पुढे चढण थोडी तीव्र होती. पांढरे दगड नाहीसे झाले होते. पण लोकांनी फेकलेला कचरा अधेमध्ये दिसत होता. आसपासच्या लोकांचा हा अपेयपानाचा अड्डा असावा. गुटख्याची पाकिटे आणि बियरच्या बाटल्यांचे तुकडे माझ्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत होते. वीसेक मिनिटात वर पोहोचलो. डोंगराचा माथा तसा सपाट आणि खडकाळ होता. मधेच उगवलेली काटेरी झुडुपे शाळा सुटल्यावर मैदानात उगीच रेंगाळणाऱ्या पोरांसारखी भासत होती. एवढ्यात चार तरुणांचा एक ग्रुप उजवीकडच्या बाजूने येताना दिसला. मला एकट्याला पाहून त्यांना जरा आश्चर्यच वाटलं असावं. ते जिथून आले तिथे काय आहे असे मी विचारताच सगळे एकदम उत्साहात तिथल्या ‘व्यू’ विषयी सांगू लागले. त्यांनी केलेल्या वर्णनावरून मी मोठ्या उत्साहात तिथे जायला निघालो. डोंगरकड्यावरून दिसणारे विलोभनीय दृश्य डोंगरमाथ्याचा एक तुकडा बाहेरच्या बाजूला झुकला होता. त्या लहानशा सपाट जागेवर मी पोहोचलो आणि दरीतून वर झेपावणारा वारा एकदम अंगावर आला. थोडा दबकतच मी पुढे गेलो. रंगमंचावरचा पडदा हळूहळू उघडत जावा तसे समोरचे दृश्य एकेका पावलावर समोर उलगडू लागले. मातकट निळ्या अगस्त्य तीर्थाच्या पार्श्वभूमीवर उत्तरेकडच्या डोंगरावरची शिवालये मोठ्या दिमाखात उभी दिसत होती. तीर्थाच्या बाजूचा घाट, तो प्रचंड वटवृक्ष, आणि ते संग्रहालय इथून एखाद्या चित्रात असावे तसे दिसत हते. डोंगराच्या बरोबर खाली, उजव्या हाताला, भूतनाथ मंदिरे दिसत होती. ते सारेच दृश्य अक्षरशः स्वप्नवत वाटत होते. मी तिथेच मांडी घालून बसलो. त्या जागेवरून गावातल्या लोकांची लगबग पाहताना गंमत वाटत होती. तो जगन्नियंता असाच एखाद्या उंच आणि दूर जागेवरून आपले पामरांचे आयुष्य निरखत असेल का? म्हणूनच बहुतांश मंदिरे उंच जागी  बांधली जात असतील का? की माणसाने आपले स्वतःचे आयुष्य अशा त्रयस्थ नजरेने बघण्याची क्षमता साधावी व त्यातच खरा परमार्थ आहे असा प्रतीकात्मक अर्थ त्यामागे आहे? रम्य ठिकाणी विसावलो की मन कधी उत्तरे न मिळणाऱ्या प्रश्नांच्या आसपास घोंघावू लागते. त्यातून नवे प्रश्न निर्माण होतात आणि मग त्यांवर चिंतन करण्यासाठी नव्या रम्य जागांचा शोध सुरु होतो. यालाच कदाचित शहाणे होणे म्हणत असतील. ‘केल्याने देशाटन...’ चा कदाचित असाच काही अर्थ असावा. असो. कलत्या सूर्याच्या प्रकाशातले  भूतनाथ मंदिर कर्कश आवाज करत उडत जाणाऱ्या त्या टिटवीने माझा तंद्रीभंग केला. सूर्यास्त जवळ आला होता. अंधार  पडायच्या आत तिथून खाली पोहोचणे आवश्यक होते. मात्र समोरच दक्षिण किल्ला दिसत होता. इतके वरपर्यंत आलो आहोत तर तिथल्या बुरूजापर्यंत जाऊन येऊ असा विचार करून मी पुढे निघालो. दोन बुरुज आणि एक तोफ एवढे सोडून तिथे काहीच उरले नव्हते. किल्ल्यावरून एक वाट थेट खाली गुंफा मंदिरांच्या परिसरात उतरत होती. मात्र ती वाट लोखंडी ग्रीलने बंद केलेली होती. तिथल्या पायऱ्या अगदी मोडकळीला आलेल्या होत्या. कदाचित सुरक्षेसाठी म्हणून तो मार्ग बंद केला असेल. तोफ ठेवलेल्या बुरुजावरून बदामी शहर आणि अगस्त्य तीर्थाचा अप्रतिम देखावा दिसत होता. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून मी आल्या वाटेने खाली उतरलो. एव्हाना सूर्यबिंब लाल-केशरी झाले होते. त्याची सोनेरी प्रभा त्या साऱ्या परिसराला अजूनच मोहक रूप देत होती. भूतनाथ मंदिराच्या परिसरात बसलेल्या चित्रकारांची चित्रे आता पूर्ण होत आली होती. मी तिथे थोडा वेळ रेंगाळलो. वेगवेगळ्या कलादृष्टींतून साकारलेली एकाच भूदृश्याची ती वेगवेगळी चित्रे न्याहाळणे एक सुखद अनुभव होता. बुरुजावरून दिसणारे अप्रतिम दृश्य बदामीचे चित्र रेखाटण्यात गुंतलेले चित्रकार आणि त्यांचे सुंदर कलाविष्कार मी घाटावरून तसाच पुढे चालू लागलो. अगस्त्य तीर्थाला अर्धप्रदक्षिणा घालून मी गावाच्या दिशेने बाहेर पडलो. त्या बाजूला एक धक्कादायक दृश्य माझ्यापुढे उभे होते. गावातल्या बायका घरची धुणी-भांडी घेऊन तीर्थावर आल्या होत्या. त्यांची लहान पोरं तिथे डुबक्या मारत होती. मला पाहताच एक लहान पोरांचा जथ्था मागे लागला. त्यांना काहीतरी खायला किंवा पैसे हवे होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी पुढे चालू लागलो. थोड्याच अंतरावर दिसला गावातला उकिरडा! तिथे दुर्गंधी आणि डासांचे थैमान चालू होते. गुरे-डुकरे इतस्ततः फिरत होती. त्याच्याच शेजारी एका लहान मंदिरात आरती चालू होती. शुचिर्भूत होऊन देवाच्या आराधनेत मग्न झालेल्या गावकऱ्यांना त्या आजूबाजूच्या अस्वच्छतेचा जणू मागमूसही नव्हता! ते सारे दृश्य बघून मन विषण्ण झाले. कुठे ती चालुक्यकालीन मंदिरे आणि कुठे हे आजचे गाव! हा तोच समाज का? कुठे गेली ती सौंदर्यदृष्टी आणि माणसाच्या आयुष्याचा गहन अर्थ शोधणारी तत्त्वप्रणाली? जागतिक वारसास्थल असलेल्या तलावात धुणी-भांडी? आणि त्याच्या बाजूला उकिरडा? गरिबीचं जाउद्या पण किमान स्वच्छता तरी असावी? की लोकांची तेवढी लायकीच नाही?मी तडक त्या परिसरातून बाहेर पडलो. अस्वच्छता आणि गुलामगिरी यांच्यात बरेच साम्य आहे. जोपर्यंत घाणीत राहणाऱ्या माणसाला आपण घाणीत राहतोय हे पटणार नाही तोपर्यंत त्यात काहीच बदल घडणार नाही. इथल्या लोकांना लवकरच सद्बुद्धी दे अशी प्रार्थना त्या मंदिरातल्या देवाकडे करून मी हॉटेलवर परतलो. समाप्त 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!