चालुक्यनगरी बदामी - भाग ४ - मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा - ऐहोळे

चालुक्यनगरी बदामी - भाग ४ - मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा - ऐहोळे

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पट्टदकलमधल्या एकाहून एक सुबक मंदिरांची सफर पूर्ण करून मी आता ऐहोळेच्या दिशेने निघालो होतो. हे अंतर फारसे नव्हते. मात्र रस्त्याचे काम चालू असल्याने वेगावर मर्यादा येत होती. आपल्या देशात काही ना काही कारणांनी रस्ते “काम चालू आहे” या स्थितीतच असतात. कर्नाटकातला हा ग्रामीण प्रदेश त्याला काही अपवाद नव्हता. अर्धवट बांधून झालेल्या रस्त्यावरून वाट काढत आमची बाईक ऐहोळे गावात शिरली. हे तर अगदीच खेडेगाव वाटत होते. रस्त्यावर धुणी धुणाऱ्या आणि भांडी घासणाऱ्या बायका, त्यातून इतस्ततः वाहणारे पाणी, त्यातच गुरांचे शेण आणि धूळ मिसळून झालेला चिखल, अस्ताव्यस्त पसरलेला कचरा आणि त्यात उंडारणारी डुकरे असे गलिच्छ स्वरूप त्या गावाचे होते. आपण नक्की योग्य ठिकाणी आलो आहोत की नाही याची शंका मला वाटू लागली. इतक्यात त्या बजबजपुरीत मधेच उगवलेला एक मंदिराचा कळस दिसला. थोडं पुढे गेलो तर आणखी काही भग्नावशेष दिसले. त्या मंदिरांतल्या पायऱ्या आणि सभामंडप म्हणजे गावातल्या लोकांसाठी चकाट्या पिटण्याची जागा बनले होते. कोरीव स्तंभांच्या दरम्यान लहान मुले लपंडाव खेळत होती. ते सगळे दृश्य पाहून मी हादरलोच. हीच का ऐहोळे मधली प्रसिद्ध मंदिरे अशी विचारणा मी माझ्या बाईक चालकाला केली. त्यावर तो हसून म्हणाला, नाही नाही, मुख्य मंदिरे अजून पुढे आहेत. ते ऐकून मनाला थोडा दिलासा मिळाला. पण तरीही दुरवस्था झालेल्या त्या मंदिरांसाठी मनोमन फार वाईट वाटत होते. गावाच्या थोडं पुढे जाताच एक मोठे वळण लागले. त्यापुढेच पुरातत्व खात्याने संरक्षित केलेला प्रशस्त भाग नजरेस पडला. पट्टदकलपेक्षा इथला परिसर बराच मोठा होता. किंबहुना अनेक मंदिरांचे लहान-मोठे समूह वेगवेगळे संरक्षित केलेले होते. त्यातल्या मुख्य समूहापाशी बाईकचालकाने मला सोडले. तिकीट काढून मी आत शिरलो.        ऐहोळे येथील मुख्य मंदिरसमूह ऐहोळे ही चालुक्य राजांची पूर्वाश्रमीची राजधानी. या जागेस “मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा” असे संबोधले जाते. चालुक्यकालीन कारागिरांनी आजूबाजूच्या प्रदेशातले तत्कालीन स्थापत्यघटक एकत्र आणून एक नवी शैली विकसित केली. याच शैलीचे थोडे विकसित स्वरूप बदामी मध्ये, तर आणखी पुढचे स्वरूप पट्टदकलमध्ये बघायला मिळते. बेलूर आणि हळेबीड इथली मंदिरे म्हणजे या शैलीचा कळसाध्याय! सामान्य भाषेत सांगायचे झाले तर ऐहोळे म्हणजे या स्थापत्यशैलीची प्राथमिक शाळा, बदामी म्हणजे माध्यमिक शाळा, तर पट्टदकल महाविद्यालय होय! ऐहोळे या नावाच्या व्युत्पत्तीची कथाही मोठी रंजक आहे. एकवीस वेळा पृथ्वीप्रदक्षिणा करून क्षत्रियांचा नायनाट केल्यानंतर परशुराम आपला रक्ताने माखलेला परशु घेऊन मलप्रभा नदीच्या काठी आला. नदीच्या पाण्यात परशु धुताच पाणी लाल झाले. लाल पाणी बघताच गावातली एक स्त्री ओरडली “अई होळी! अई होळी!” त्यावरूनच गावाचे नाव पडले ऐहोळे. या गावाची अय्यावोळे किंवा आर्यपुरा अशी नावेही प्रचलित आहेत.ऐहोळेमध्ये एकूण १२५ च्या आसपास मंदिरे आहेत. काही ठिकाणी अजूनही उत्खनन चालू आहे. इतकी सगळी मंदिरे पहायला आणि त्यांची स्थापत्यवैशिष्ट्ये समजून घ्यायला ३ दिवसही कमीच आहेत. त्यामुळे मी केवळ महत्त्वाच्या ३-४ मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं. दुर्गा मंदिराची अर्धवर्तुळाकार रचना दुर्गा मंदिराचे कोरीव स्तंभ आत शिरल्या शिरल्या समोरच दृष्टीस पडलं दुर्गा मंदिर. मंदिराची अर्धवर्तुळाकार रचना लक्षवेधी वाटत होती. या मंदिराच्या नावात दुर्गा असली तरी हे मंदिर मात्र विष्णू किंवा शिवाचे आहे. जवळच असलेल्या दुर्ग नामक किल्ल्यामुळे या मंदिराला दुर्गा मंदिर म्हणतात. अर्थात, या कथेबाबतीत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. असो. मंदिराची रचना ही बौद्ध चैत्यगृहाचा आभास निर्माण करणारी आहे. मध्यवर्ती गर्भगृहाच्या बाजूने जाणारा प्रदक्षिणा मार्ग अर्धवर्तुळाकृती असून तो एकसारख्या स्तंभांनी सजवलेला आहे. मी पायऱ्या चढून मंदिराच्या आत शिरलो. तसे मंदिर लहानसेच वाटत होते. मात्र आतील स्तंभांवरचे व छतावरचे कोरीवकाम एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा आभास निर्माण करत होते. चौकोनी सभामंडपातून पलीकडचे अंधारलेले गर्भगृह दिसत होते. मुळात हे मंदिर कोणाचे होते याची काहीच कल्पना आज नाही. मात्र स्थापत्यशैलीच्या वैशिष्ट्यांमुळे हे मंदिर ऐहोळे मधले एक प्रमुख आकर्षण आहे. मी प्रदक्षिणा मार्गाकडे वळलो. स्तंभांच्या मधून झिरपणारा प्रकाश आतल्या शिल्पांवर एक वेगळेच तेज चढवत होता. प्रत्येक स्तंभावर एक शिल्प होते. तसेच गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवरदेखील काही शिल्पे होती. यांपैकी महिषासुरमर्दिनी आणि वराह-अवतार ही शिल्पे विशेष उल्लेखनीय. शिल्पातील स्त्री-पुरुषांच्या भावमुद्रा, त्यांचे अलंकार, शरीरसौष्ठव सारे काही बारीक तपशीलांसह पाषाणातून साकारले होते. प्रदक्षिणा मार्ग प्रदक्षिणा पूर्ण करून मी मंदिराच्या सभामंडपात थोडा वेळ विसावलो. मंदिराच्या निर्मितीच्या वेळी तिथे कसे वातावरण राहिले असेल याची कल्पना करू लागलो. छिन्नी-हातोडीच्या आघातातून प्रकट होत जाणारे शिल्प, मग एकावर एक रचले जाणारे पाषाणाचे एकक, आणि अखेरीस उभारला जाणारा कळस. किती वर्षे लागली असतील हे एक मंदिर बांधायला? ज्यांच्या हातून हे अजरामर शिल्प घडले ते कलाकार किती कृतार्थ झाले असतील! कसे असेल तेव्हाचे जनजीवन आणि काय राहिले असेल या कलाकारांचे समाजातील स्थान? कदाचित कोणत्याच ऐतिहासिक दस्तावेजांत या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. पाषाणात कोरले जातात ते दिग्विजय. सर्वसामान्य व्यक्तीच्या क्षुद्र आयुष्याची कशाला कोणी घेईल दखल? दुर्गा मंदिराकडून मी निघालो लाडखान मंदिराकडे. या समूहातले हे आद्य मंदिर. हे मंदिर साधारण पाचव्या शतकात बांधले गेले. कोणतेही कळस नसलेली एखाद्या घरासारखी दिसणारी या मंदिराची रचना अगदीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गर्भगृहाच्या वर दिसणारी एखाद्या मजल्यासारखी रचना कळस या रचनेची पूर्वावस्था दर्शवते. मुळात शिवाचे अधिष्ठान असलेले हे मंदिर मध्ययुगीन काळात लाडखान नामक इसमाने स्वतःचे घर बनवले होते. म्हणूनच त्याचे आज लाडखान मंदिर असे नाव प्रचलित आहे. या मंदिराचा सभामंडप तसा प्रशस्त होता. १२ स्तंभांवर सुरेख कोरीवकाम केलेले होते. त्यापुढे मुखमंडपात एक नंदी विराजमान झालेला दिसत होता. गर्भगृहातले शिवलिंग गूढ भासत होते. सुरुवातीला आयताकृती वाटणारी मंदिराची रचना गर्भगृहात मात्र चौरसाकृती झालेली दिसत होती. तिथे काही वेळ फोटोग्राफी करून मी बाहेर पडलो. त्या समूहातली इतर काही मंदिरे पाहून मी रावणफडी गुंफांच्या दिशेने निघालो. लाडखान मंदिर लाडखान मंदिरातील कोरीव स्तंभ अर्धनारीश्वर ऐहोळेमधील मुख्य मंदिरसमूहापासून या गुंफा जरा आडवाटेवर आहेत. मात्र बदामीमधील गुंफा मंदिरांसारख्या या गुंफादेखील भारतीय छेदाश्म स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानल्या जातात. यातील मुख्य गुंफेपाशी माझ्या बाईकचालकाने मला सोडले. इथे फारसे पर्यटक नव्हते. कलत्या उन्हात इथला शांत परिसर प्रसन्न वाटत होता. पायऱ्या चढून आत शिरलो. समोरच गर्भगृहात भलेमोठे शिवलिंग दिसले. बदामीमधल्या गुंफांपेक्षा ही गुंफा तशी लहान होती. शिवाय मंडपात इतर स्तंभही दिसत नव्हते. तितक्यात चालकाने माझे लक्ष चारही बाजूंच्या भिंतीवर साकारलेल्या शिल्पांकडे वेधले. तिथल्या अंधारात स्पष्ट काही दिसत नव्हते म्हणून मी विजेरी काढली आणि एक-एक शिल्प निरखू लागलो. डाव्या बाजूच्या भिंतीवर होते नटराजाचे महाकाय शिल्प. अठरा हातांचा नृत्यमग्न शंकर फारच सुबक घडवला होता. त्याच्या शेजारी गणपती आणि पार्वती दिसत होते. हे शिल्प बदामीमधल्या एका गुंफेशी साधर्म्य साधणारे होते. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूलाही देखणी शिल्पे होती. एका बाजूला हरी-हर अशी जोडी होती तर दुसरीकडे अर्धनारीश्वराचे शिल्प होते. एवढ्या अपुऱ्या प्रकाशात ही शिल्पे कशी काय घडवली असतील याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. तिथे थोडी फोटोग्राफी करून मी बाहेर पडलो. या समुहातली दुसरी गुंफा जैन तीर्थंकरांची होती. बदामीमधल्या चौथ्या गुंफेप्रमाणेच जैन तीर्थंकर व त्यांच्या जीवनातले प्रसंग तिथे घडवले होते. वैष्णव, शैव, आणि जैन विचारांचा वैशिष्ट्यपूर्ण संगम या मंदिरांमध्ये दिसून येतो. त्या काळात प्रचलित असलेला धर्मविचार आणि वेगवेगळ्या दैवतांप्रती असलेली समाजाची आदराची भावना धर्मनिरपेक्षतेच्या एका वेगळ्याच आयामाचे दर्शन घडवते. रावणफडी गुंफा नृत्यमग्न नटराजाचे महाकाय शिल्प  जैन गुंफांतील शिल्पे एव्हाना दुपारचे ३ वाजत आले होते. चांगलीच भूक लागली होती. सुदैवाने जवळच कर्नाटक टुरिझमचे हॉटेल होते. तिथे भरपेट जेवण केले आणि बदामीच्या दिशेने निघालो.                                                                                                                
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!