चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे

चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

उच्च शिवालयाकडे जाणारी वाट एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलती व्हायला लागली होती. उत्तर शिवालयांकडे जाणारा मार्ग समोरच दिसत होता. हर हर महादेव म्हणून मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. वाट तशी खड्या चढणीची होती. काही अंतर चढून जाताच ती वाट डोंगरांच्या मधल्या घळईत शिरली. इथे वेगळाच प्रसन्न गारवा जाणवत होता. पहाडाच्या भिंतींवर काही अर्धवट कोरलेली शिल्पे दिसत होती. मधेच एखादे पिंपळाचे रोप त्या पहाडाच्या अन्तःपुरातल्या पाण्याच्या आधारावर वाढलेले दिसत होते. त्याची अस्ताव्यस्त पसरलेली मुळे त्या पहाडाला एखाद्या जटाधारी मुनीचे रूप देत होती. त्या घळईतून बाहेर पडलो आणि डाव्या हाताला निम्न शिवालय दिसले. पहाडावरच्या पठारावर ते सुबक शिवालय फारच खुलून दिसत होते. त्या पठारावरून एका बाजूला अगस्त्य तीर्थ तर दुसरीकडे बदामी शहर असे विहंगम दृश्य दिसत होते. मंदिर तसे लहानसेच होते. मात्र त्यावरचे कोरीवकाम तत्कालीन स्थापत्यविशारदांच्या कौशल्याची दाद देत होते. मंदिराच्या मागच्या अंगाने वर पाहिले असता पाठीमागचा पहाड आणि त्यावरचे उच्च शिवालय नजरेच्या एका टप्प्यात दिसत होते. तांबूस रंगाचा ओबडधोबड पहाड ते अद्भुतरम्य शिवमंदिर आपल्या छातीवर अभिमानाने मिरवत होता. काही क्षणांसाठी आयन रँडच्या कादंबरीतला हॉवर्ड रॉर्क आठवला. रॉर्क एक निष्णात स्थापत्यविशारद एका विलक्षण दृष्टीकोनातून स्थापत्यकलेची जोपासना करतो. तो म्हणतो, एखाद्या भूभागात कशा प्रकारची वास्तू बांधायची याची प्रेरणा तिथला निसर्गच देत असतो. स्थापत्यविशारदाची भूमिका एवढीच की त्याने त्या मूळ प्रेरणेशी प्रामाणिक राहून वास्तू बांधावी. ती प्रेरणा अचूक ओळखणे हेच त्या विशारदाचे कौशल्य. बदामीतल्या स्थापत्यविशारदांना ती प्रेरणा हुबेहूब समजली होती. इथला दगड अन् दगड जणू त्यांना सांगत होता, माझ्यापासून शिल्पे घडवा, कळस बांधा, अलंकृत खांब उभारा! एका दृष्टीकोनातून दिसणारी शिवालये काहीशा गूढ प्रेरणेने मी त्या उच्च शिवालयाकडे निघालो. आता चढण फारशी तीव्र नव्हती. निम्न शिवालयापेक्षा काहीसे मोठे असे ते शिवालय एखाद्या ध्यानमग्न ऋषीस्तव त्या पहाडावर विराजले होते. जणू काही साऱ्या संसाराची तिथून स्थितप्रज्ञतेने पाहणी करत असावे. तिथून निम्न शिवालय करंगळीएवढे भासत होते. त्याखालचे बदामी शहर म्हणजे जणू अस्ताव्यस्त पसरलेला पाचोळा. मंदिरावरच्या कोरीव मूर्ती पुढे सरकणारा काळ एखादा सिनेमा पहावा तशा स्तब्धतेने पाहत होत्या. काळाची असंख्य कडू-गोड आवर्तनं पाहून त्यांनाही विरक्ती आली असेल एव्हाना. मंदिराच्या गाभाऱ्यात शिरलो तर एक अनामिक गारवा जाणवू लागला. बाहेरचं कडक उन त्या पाषाणमंदिराच्या भिंतींनी जणू पिऊन टाकलं होतं. तिथली गूढ शांतता कमालीची प्रसन्न वाटत होती. मंदिर म्हणजे देवाशी संवाद साधण्याची जागा. पण त्यासाठी आधी स्वतःशी निःसंदिग्ध संवाद हवा. तो साधण्यासाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती करणे हा मंदिराचा मूळ उद्देश. एखाद्या नास्तिकाला जरी त्या शिवालयात नेलं तरी तो अंतर्मुख होईल असे वातावरण त्या शिवालयात अनुभवास येत होते. तिथे थोडा वेळ घालवून मी मंदिराच्या बाहेर पडलो. शिवालये असलेल्या या पहाडावर काही बुरुज आणि तटबंदी आहे. तिथे काही वेळ छायाचित्रण करून मी खाली उतरलो. समोरच्या गुंफा खुणावत होत्या.शिवालयाच्या बाजूने दिसणारे विहंगम दृश्य अगस्त्य तीर्थाच्या काठाकाठाने चालत मी पलीकडच्या बाजूला पोहोचलो. गुंफांकडे जाणारा रस्ता समोर दिसत होता. साधारण पावणेपाच वाजले होते. सहा वाजता गुंफा बंद होणार होत्या. तासाभरात सगळं बघून होईल की नाही याच्या विचारात मी होतो. पण उद्याचा दिवस पट्टदकल आणि ऐहोळे यांसाठी ठरवलेला असल्याने इथे पुन्हा यायला मिळेल की नाही याची खात्री वाटत नव्हती. शेवटी जेवढं होईल तेवढं बघू असा विचार करून मी तिकीट काढलं आणि पायऱ्या चढू लागलो. तो सगळा परिसर गर्दीने फुलून गेला होता. सव्वीस जानेवारीची सुट्टी असल्याने जवळपासचे लोक मोठ्या प्रमाणावर तिथे आले होते. कोण्या एका शाळेची सहलही आली होती. त्या शंभर-एक पोरांचा कलकलाट सगळीकडे भरून राहिला होता. त्या गुंफांमध्ये लपंडाव खेळणाऱ्या पोरांना त्यांचे शिक्षक मोठमोठ्याने हाका मारून बसकडे पिटाळत होते. एकूणच माझा इकडे येण्याचा दिवस चुकला होता. पण आता काही इलाज नव्हता. त्या सगळ्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करून मी वर चढू लागलो. सुरुवात शेवटच्या गुंफेपासून करावी आणि एक-एक गुंफा बघत खाली यावे असा विचार करून मी थेट शेवटच्या गुंफेपाशी गेलो. इथे एकूण चार गुंफा आहेत. त्यांपैकी पहिली शंकराला, दुसरी व तिसरी विष्णूला, तर चौथी जैन तीर्थंकरांना समर्पित आहे. गुंफा मंदिर क्रमांक चार बाहुबली चौथ्या गुंफेबाहेरच्या प्रांगणात जरा शांतता होती. अगस्त्य तीर्थ आणि पलीकडचे भूतनाथ मंदिर इथून फारच विलोभनीय दिसत होते. मी गुंफेत शिरलो. अखंड पहाडातून कोरून बनवलेली ती गुंफा तशी प्रशस्त होती. आतल्या खांबांवर, छतावर, सगळीकडे नाजूक कोरीवकाम केलेले होते. मंडपातून आत शिरताच डाव्या बाजूला नजरेस पडली तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांची मूर्ती. मूर्तीच्या डोक्यावर पंचमुखी आदिशेष दिसत होता. त्याच्याच समोरच्या बाजूला निर्वाणावस्था प्राप्त झालेला बाहुबली दिसत होता. गुंफेच्या गर्भगृहात चोविसावे तीर्थंकर वर्धमान महावीर ध्यानमग्न अवस्थेत दिसत होते. गुंफेतल्या भिंतींवर इतर तीर्थंकरांच्या आकृती दिसत होत्या. या गुंफेत जैन धर्मीय कदाचित निवास करत असावेत. एकंदरीतच गुंफेची रचना एखाद्या मंदिराच्या अंतर्गत रचनेसारखी होती. म्हणूनच या गुंफांना गुंफा मंदिरे म्हटले जात असावे. तिथून खाली उतरून मी तिसऱ्या गुंफेपाशी आलो. तिसरी गुंफा चौथ्या गुंफेपेक्षा जास्त मोठी होती. या गुंफेस महाविष्णू गुंफा म्हटले जाते. आत शिरल्या बरोबर अलंकृत खांब नजरेस पडले. समांतर उभ्या रेषांनी त्या खांबांना बहुमितीय आकार दिला होता. त्यांच्या वरच्या भागात देव-देवतांची शिल्पे कोरलेली होती. डाव्या हाताला महाविष्णूची विलोभनीय मूर्ती विराजमान झालेली दिसत होती. पंचमुखी आदिशेषाने याही मूर्तीच्या वर छत्र धरले होते. बाजूला गरुड आणि लक्ष्मी यांच्या आकृती दिसत होत्या. त्याच्याच समोरच्या बाजूला विजय नरसिंहाची मूर्ती आवेशात उभी होती. हिरण्यकपशूचा वाढ केल्यानंतरचा विजयी उन्माद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. याच गुंफेत प्रणयाराधानेत मग्न जोडप्यांच्या काही मूर्ती दिसत होत्या. त्यांचे पोशाख, अलंकार, भावमुद्रा सारे काही त्या लाल पाषाणातून हुबेहूब साकारले होते. वराह अवतार दुसऱ्या गुंफेत विष्णूचे काही अवतार आणि त्यांच्या संदर्भातल्या कथा साकारल्या होत्या. बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवणारा वामन हे त्यातले लक्षवेधी शिल्प होते. त्यासोबत वराह अवतारही साकारला होता. या गुंफेत मुख्य मूर्ती मात्र नव्हती. पहिल्या गुंफेपर्यंत पोहोचलो आणि सुरक्षारक्षकाने शिटी वाजवत सगळ्यांना बाहेर काढायला  सुरुवात केली. गुंफा बंद व्हायची वेळ झाली होती. जमेल तेवढे पाहून घेण्याच्या उद्देशाने मी आत शिरलो. ही गुंफा शंकराला समर्पित होती. सर्वात जुनी आणि सगळ्यात मोठी असलेली ही गुंफा गर्भगृह, सभा मंडप, आणि मुखमंडप अशा तीन भागांमध्ये विभागलेली होती. एका बाजूला तांडवनृत्य करणारा अठरा हातांचा शंकर पाषाणातून घडवलेला होता. त्याच्या मागील दोन हातांत एक नाग, तर इतर हातांत डमरू आणि इतर वाद्ये होती. त्याच्या शेजारी गणेश व इतर वादक दिसत होते. नृत्यमग्न शंकराची ती मूर्ती नटराज म्हणून ओळखली जाते. अत्यंत कौशल्याने घडवलेली ही मूर्ती भारतीय अश्म-छेद स्थापत्यकलेचा उत्तम नमुना समजली जाते. याच गुंफेत महिषासुरमर्दिनी, अर्धनारीश्वर, आणि गजवृषभ अशी इतर शिल्पेही होती. आता अंधार पडू लागला होता. आधीच अंधारलेल्या त्या गुंफामध्ये अजून गडद अंधार हळूहळू उतरत होता. त्यामुळे फोटो काढता येणे अशक्य झाले होते. बाहेरचा गलका वाढतच चालला होता. शेवटी मी गुंफांची भेट आवरती घेतली आणि खाली उतरलो. बदामीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या जागेला पूर्ण न्याय देऊ शकलो नाही याची काहीशी हुरहूर मनात दाटली होती. मात्र पाषाणात कोरलेल्या एवढ्या सुंदर मूर्ती पाहून नजर संपृक्त झाली होती. उद्या जमलं तर परत येईन असा विचार करून मी हॉटेलवर परतलो.वामनावतार  क्रमशः 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!