गोष्ट चिमणीची

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

हातात गरमागरम वाफाळता चहाचा कप घेऊन गॅलरीत उभे राहावे आणि आसपासचे निसर्गसौन्दर्य अनुभवत घोट घोट त्याचा आस्वाद घ्यावा, हा माझा रोजचा दिनक्रम. आजही मी तसाच उभा होतो आसपासची मौज पाहत.नुकताच पाऊस ओसरत चालल्याने हवेत आता हिवाळ्याचा गारठा चांगलाच जाणवू लागला होता. दूरवर पसरलेले डोंगर पावसाळ्यात हिरवेगार झाले होते, त्यावर कोरलेली नाजूक जरींची नक्षी अजूनही ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत होती. माथ्यावर सूर्योदयानंतरचा रंगसोहळा दूरवर पसरला होता. अशी ही दूरपर्यंत फेकली गेलेली माझी नजर अचानक अडखळली आणि ती वेधली गेली एका सौम्य किलबिलीकडे! आसपासच्या इमारतींच्या जाळ्यातच असलेल्या शेजारच्या एका झाडावर एक चिमणी आपले घरटे विणण्यात गुंतली होती. आसपासच्या परिसरातून मिळेल तितक्या काड्या आणि कापूस आणून तिचा हा उपक्रम सुरु होता. कितीतरी वर्षांनंतर असे दृश्य माझ्या दृष्टीस पडले, त्यामुळे मीही अतिशय कुतूहलाने तिच्याकडे पाहत राहिलो. किती एकाग्रतेने तो लहानसा जीव त्याचे घरकुल उभारण्यात तल्लीन झाला होता ! चहाचाप्रत्येक अंश संपून रिकामा झालेला कप आणि घड्याळाकडे लक्ष गेले.अचानक भानावर आलो आणि मी घाईघाईत आतजाण्यासाठी मागे फिरलो.आणि अचानक तो चिवचिवाट वेगाने माझ्या दिशेने ऐकू येऊ लागला तसा तिथेच थबकलो आणि मागे वळून पाहतो तर काय , ती चिमणी आमच्या गॅलेरीतल्या रेलिंगवर बसून मला साद घालत होती " काय राव , निघालात इतक्यात ? अरे हो , घाई असेल ना तुम्हाला ? कुठेतरी जायचे असेल वा काही नव्या कामात गुंतायचं असेल , हो ना ?"मी क्षणभर चकित झालो. पण पुढे काही बोलणार इतक्यात तिने तिची तक्रार पुढे लांबवली."  हल्ली पाहते आहे मी, तुम्ही सर्वच कायम धावत असता. इथून तिथे ,या कामातून त्या कामामध्ये... सारखी पळापळ. प्रत्येकजण एका विचित्र घाईत ! 'एक घास चिऊचा' म्हणत लहानपणी आम्हाला शोधणारे तुम्ही आज मात्र या बालपणीच्या सोबत्यांना पार विसरलात की हो ! ही तक्रार नाही पण आज बऱ्याच काळानंतर तुमच्यासारखा कोणीतरी आमच्यासाठी दोन क्षण खर्ची करणारा दिसला आणि जरा हायसे वाटले… म्हणून दोन शब्द बोलून मन हलके करून घ्यावेसे वाटले ,बस्सइतकेच.  पण खरंच ,जरा लक्ष देऊन आसपास नीट पाहिले तर तुम्हालाही जाणवेल कि काही दशकांतच किती बदलले आहे ना या शहरांचे चित्र ? पूर्वी पण तर शहरे होतीच की. पण पूर्वीं तुमचा दिवस सुरु व्हायचा आम्हां पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि संपायचा आमच्या गोष्टीने. आणि आत्ता ? ... नुसता गाड्यांचा तो जीव नकोसा करणारा गोंगाट आणिमाणसांचा भांबावून टाकणारा कलकलाट! जिथेतिथे नुसत्या उंचच उंच गगनचुंबी इमारती ! आज सिमेंटच्या वास्तूंचे प्रस्थ तर इतके वाढले आहे ना कि त्यासाठी काही वर्षांपासून सुरु असलेली वृक्षतोड उघड्या डोळ्यांनी पाहायचे दुर्भाग्य आपल्या सर्वांच्याच नशिबी आले आणि त्यातच आम्ही आमचे घरकुल हरवून बसलो. आज हिरवेगार बाग-बगिचे सोडाच पण बसायला, राहायला एकसाधं हिरवं म्हणता येईल असं फुलाफळांनी समृद्ध झाड नाही! प्लास्टिक,रसायने,कृत्रिम वस्तू या सर्वांचा किती तो पसारा!आणि मग ताजा चारा-पाणी सर्वच मार्ग बंद म्हणून कित्येकदा त्या कचऱ्यातच आम्ही आमचा चारा शोधतो आणि तोच आमची भूक शमवतो.प्रदूषण ही तर एक आणखी वेगळी समस्याच आहे.हवा प्रदूषण,पाणी प्रदूषण आणि या सर्वात आमचा जीव मात्र होरपळून जातो. आम्ही या उंच इमारतींच्या जंगलात मग कुठेतरी आसरा शोधायला जातो पण तिथून सुद्धा बहुतेकदा आमची हकालपट्टीच होते. तेव्हा प्रश्न उभा राहतो , आता आम्ही जायचे तरी कुठे ?आमच्यापैकी कित्येक जण इथून उडून मैलांचा प्रवास करत दूर देशी गेलेत पण नंतर समजले कि तिथेही त्यांची हीच दैना झाली. कारण आधुनिकतेकडे वळणारे मनुष्य आणि त्या सर्वांना सामावून घेणाऱ्या इमारतींनी तिथेही मोठ्या प्रमाणावर जन्म घेतला आहे. अशा उंच इमारतीतल्या फ्लॅटमध्ये आपल्या न जेवणाऱ्या नातवासाठी ' चिऊ ये ' अशी आळवणी करणारी आजीसुद्धा आजच्या बेबी सिटिंगच्या जमान्यात हिरवळ आणि आमच्यासारखीच दुर्मिळ होत चाललीय.आणि तसेही हल्लीच्या चिमुकल्यांना चिऊ-काऊ कुठे लागतो ? त्यांना तर आता डॉरेमॉंन किंवा छोटा भीम लागतो सोबतीला . आणि त्याहून अधिक प्रगती म्हणाल तर त्या बालवयात मोबाईलवरचे कल्पनाशक्ती हिरावून घेणारे आधुनिक गेम्स. अगदी तासनतास ही मुले त्या मोबाईलला चिकटलेले असतात जसे पूर्वी आमच्या वाटेकडे डोळे लावून तुम्ही बसायचे . पण आज आम्हांला प्रत्यक्षात अनुभवण्यापेक्षा ही मुले आम्हाला कार्टून रूपात पाहणे अधिक पसंत करतात ही खरंच चिंतेची बाब आहे. पण त्याकडे लक्ष द्यायला सध्या वेळ कुणाला आहे? प्रत्येकच जण या आधुनिक तंत्रज्ञानाच्या पाठी आणि यंत्रांमध्ये व्यस्त आहे. आज दाणे , वाटी , पाणी , वाट पाहणारी मुलं ,गोष्टींतून आम्हांला जिवंत करणारी आई , मुलाला घेऊन अंगणात पक्ष्यांसाठी दाण्यांचा सडा शिंपणारे बाबा ... यांपैकी काहीच उरले नाही. जणू हे सर्व कुठेतरी हरवले आहे. आणि त्या सर्वाला परत आणण्याकरता एक साधा प्रयत्नदेखील केलेला कुठे आढळत नाही  ही एक मोठी खंत वाटते आम्हाला आणिकदाचित तुम्हालाही. याचाच परिणाम म्हणून कि काय, आम्ही सुद्धा आता आकाशात विहरण्याऐवजी फक्त या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये पळू लागलो आहोत. कारण याच मोबाईलच्या अणुकिरणोत्सर्जीत अदृश्य तारांच्या महाजालात आमचे बरेच चिमणे जीव हरवून गेले आहेत. हळूहळू या तुमच्या सिमेंटच्या जंगलात आम्ही दुर्मिळ होऊन जाऊ... तेव्हा चिमणी हा पक्षी दिसेल तर तो फक्त चित्रातच... या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये पळताना "मला विचार करायला लावून कुंडीतल्या तुटक्या काड्या वेचून ती चिमणी भुर्रकन उडून गेली. मी मात्र त्याच मनःस्थितीत वर्तमानपत्राचे पुढचे पान सहज उघडले आणि याच विचारांना पुढे चालना देणारी ओळ डोळ्यांसमोर येऊन थांबली ,‘ माणसांची नाती सैल होत चालली ... तो एकमेकांपासून दुरावतो आहे ‘.  विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही! आपण जसे म्हणतो तसा खरेच माणूस या सर्व सुखसुविधांमुळे आनंदी होतो आहे ? आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुखी होतो आहे ? अगदी क्षणात एकमेकांशी संवाद घडवून आणणारा मोबाईल खरेच माणसामाणसांतील दुरावा दूर करतो आहे ? आज घरातल्या घरात राहणारे सुद्धा प्रत्यक्षपणे गप्पागोष्टी करताना दिसत नाहीत पण व्हॅट्सऍपवरच्या त्याच व्यक्तीच्या पोस्टला मात्र अगदी आवर्जून प्रतिसाद देतील... पण तेही अप्रत्यक्षपणे...व्हाट्सअँपच्याच माध्यमातून! खरेच तेव्हा ती चिमणी बोलून गेली ते अगदी खरे आहे. आजच्या यंत्रयुगात खूप काही आपल्या हातून हरवत चालले आहे आणि आपल्याला ते जाणवतही नाही आणि शोधून आणावेसे वाटतही नाही ही एक खूप मोठी खंत आहे. पण अजूनही वेळ गेला नाही. आज जाणीव झाली आहे तर उद्या शोधून गमावत चाललेली नाती मिळवताही येतील, गरज आहे ती यंत्रांच्या आणि मोबाईलच्या आहारी कितपत जाणे योग्य, हे समजून घेण्याची...निसर्गाला पुन्हा एकदा समजून घेण्याची...आणि त्यानुसार स्वतःत आणि इतरांतही बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असण्याची.  शब्दांकन - रुपाली ठोंबरे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!