गेंद्या

By Koradwahoo on from https://pramodkmane.blogspot.com

   मी लहान असताना आमच्या घरी एक बैलजोडी होती. गेंद्या व घरड्या. त्यातला गेंद्या हा घरच्या गाईचा खोंड होता. दरबारी नावाच्या गाईला झालेला हा खोंड. आईसारखाच बांडा होता. गोल टोकदार शिंगं. नंदीबैल वाटावा असा हा बैल. हा खोंड लहान असतानापासूनच त्याला आजोबांनी म्हणजेच आप्पांनी लळा लावला. पुढे गेंद्या खूप प्रसिद्ध झाला.     लहानपणी गुरांच्या वाड्यात गेंद्या आईला पिताना आप्पांनी ' हं, चल आता पुरं कर.' म्हटलं की; गेंद्या तोंडातलं थान सोडून वाड्याकड निघायचा. एरवी थान सोडेल ते वासरू कसलं? ओढून काढलं तरी आचळाखालून निघत नाहीत. शेताकडून येताना पुढं गेंद्याची माय. मागे गेंद्या. त्यामागे आप्पा. वाटेत कुणाला आप्पा बोलत थांबले की  गेंद्याही आप्पाचं बोलणं होईपर्यंत थांबायचा.        थोरले काका आजीला चोरून हरभऱ्याची दाळ टोपीत आणून गेंद्याला चारायचे. वडील त्याला हरभऱ्याचा ढाळा चारायचे.  आजी भरडा, पेंड चारायची. साऱ्या घराचेच गेंद्याला लाड होते.    पुढे आप्पांनी त्याला विहिरीत उडी मारायला शिकवले. पाठीवर हात थोपटून ' हं, मार हुडी.' म्हटल्याबरोबर गेंद्या थोडं मागं सरकून सुसाट धावत येऊन कठोकाठ विहिरीत उडी मारायचा. पोहत एक फेरी पूर्ण करूनच बाहेर यायचा. एकदा शेतात साळ खुरपणाऱ्या बायांनी विषय काढला, 'तुमचा गेंद्या हिरीत हुडी मारतोय मन ! खराय का?' आप्पांनी बांधावर चरणाऱ्या गेंद्याला हाक मारली. आप्पा म्हणाले, ' ही बाया तुला पवायला येतनी मनलालत्या. चल मार बर हुडी ' असं म्हटल्याबरोबर गेंद्यानं धावत जाऊन उडी मारली. बाया कौतुकानं चेकाळू लागल्या. बाहेर येऊन गेंद्या पुन्हा चरू लागला. आप्पांना अजून हुक्की आली. ते गेंद्याला म्हणाले, 'बाया तुला भेलं म्हनलालत्या. आरे मर्दासरका मर्द तू. यी. मारून दाव आजू एक हुडी.' गेंद्यानं कान टवकारले. तोंडातलं धाट टाकून सुसाट विहिरीकडं धावत आला आणि उडी मारली. एक फेरी घालून बाहेर आला. सगळ्या बाया अवाक.     गेंद्या स्वतःच शिंगांनी जू खांद्यावर घ्यायचा. मग उचललेल्या जुवाखाली घरड्या मान घालायचा. आप्पांनी त्याला कधीच हातांनी जुंपले नाही. आमची दोन शेतं होती. दूरदूरवर. मळा आणि माळ. गेंद्या-घरड्या मळ्यात असायचे. आजोबा गावातून माळाकडे जायचे. मळ्यातून वडील बैलांना सोडून द्यायचे. दोन्ही बैल सोबत माणूस नसताना सरळ माळाला जाऊन आंब्याखाली उभारायचे. मग आप्पा येऊन पाळी मारून बैल मोकळे सोडून सांजच्यापारी घरी. दोन्ही बैल सरळ मळ्यात येऊन वडलांजवळ. माळाकडून मळ्याकडे बैल निघाले की; वाटेने जाणारे शेतकरी म्हणायचे, 'निघाले बघा नंदी !'       एकदा आत्त्याच्या गावी(मंगरूळ) पोळ्याच्या आदल्या दिवशी (खंडमळण्या) वडील नदीवर गेंद्या-घरड्याला धूत होते. घरड्याला धूताना त्यांनी ' हं, कर पाय वरी.'  म्हल्याबरोबर घरड्यानं पाय वर उचलला. तो पाय धुवून 'आता ही पाय कर वरी' म्हटल्यावर त्यानं दुसरा पाय वर केला. त्या गावचे लोक आपापले बैल धुवायचे सोडून ही गंमत आश्चर्याने बघू लागले. घरड्याला आप्पांनीच हे शिकवलं होतं.    एकदा नांगरताना घरड्याच्या खुरात तुराटीची कोयली घुसली. बैल लंगडू लागला. घरड्याला पाय वर करायला सांगितल्यावर त्याने पाय वर केला. घरड्याचा पाय मांडीवर घेऊन वडलांनी ते धस्कट मोठ्या सायासांनी काढलं. वेदना होत असूनही घरड्यानं लाथ झाडली नाही. त्याचं सारं अंग थरथरत होतं. तोंड वासलं होतं. पायाला रक्ताची धार लागलेली. वडलांचं धोतर लालबुंद. घरड्यानं सोसलं पण मालकाला त्रास दिला नाही.     गेंद्या रात्री रानातून बरेचदा दावं तोडून सुटायचा. रात्रभर कुठं चरून यायचा, की काय करायचा देव जाणे! पहाटे आपल्याच जागेवर घरड्याशेजारी उभा असलेला दिसायचा. कधीच कुण्या शेतकऱ्याची 'आमचं पीक खाल्लं' म्हणून तक्रार आली नाही. रात्री गेंद्या सुटलेलं लक्षात आलं तरी वडील-चुलते त्याला शोधत नसत. त्यांना वाटायचं ' कुटं जातोय? पाट्टं यील की आपल्या जाग्याला.'         गेंद्या म्हातारा झाला तरी त्याला आप्पांनी विकला नाही. एके दिवशी म्हातारा गेंद्या चरता चरता मागचे पाय निसटून तोल जाऊन आमच्या त्याच विहिरीत पडला. सात पुरूष खोल विहिरीत एकदीड पुरूषच पानी होतं. आपटल्याने जबरदस्त मार लागला. सगळ्यांनी त्याला बाहेर काढलं. चारपाच दिवसानंतर गेंद्यानं डोळे मिटले. आप्पा, वडील, चुलते धाय मोकलून रडले. सारं घर...सारा शिवार रडला. गेंद्याला शेतातच पुरलं.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!