गहिवर..
By SameerBapu on मन मोकळे from https://sameerbapu.blogspot.com
लक्ष्मणआबाला जाऊन आठवडा कधी लोटलेला कळलाही नाही. ऐंशी पार झाल्यानंतरही कंबरेत जोर असलेला आबा अंगानं दांडगा दुंडगा होता. त्याच्यामागची मोप माणसं काठ्या टेकतच मसणात गेली पण हा आपला ताठच होता. अखेरपर्यंत त्याची बत्तीशी बऱ्यापैकी शाबूत होती, नजर देखील मारकुट्या बैलागत घनघोर होती. पल्लेदार मिशांना पीळ देत फिरणारा आबा आपण भलं नि आपलं काम भलं या विचाराचा होता. गावकी, भावकी कशातच तो मध्ये पडत नसायचा. शेजारपाजाऱ्याशी मोजकं बोलून रामपारीच रानाच्या वाटंला लागायचा. राबराबून त्याच्या हाताला घट्टे पडलेले आणि दारं धरून धरून पायातल्या भेगांत मातीनं घर केलेलं ! मोकार काम करून थकल्यावर लिंबाखाली बसून ढसाढसा पाणी पिताना त्याच्या नरड्याचा लोलक गटागटा हलायचा.घडीभर बूड टेकून झाल्यावर सदऱ्याचं हातुपं दुमडून डोईवर मुंडासं बांधून पुन्हा कामाला लागायचा. दिवसभर काम करून बी आबा दमायचा नाही. चरायला गेलेली गुरं गोठ्यात परतली की त्यांच्या भवताली रुंजी घालायचा. सांच्याला म्हशीच्या पायाशी खेटून बसून मांडीत चरवी धरून धारा काढून झाल्यावर, ताजं धारोष्ण दुध पिताना मिशांना दुध लागायचं तेंव्हा आबा दिलखुलास हसायचा. धोतराच्या सोग्यानं मिशा पुसायचा. बैलांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायचा, वशिंड कुरवाळायचा, गळ्यातल्या मऊ पन्हाळीला हळुवार खाजवायचा. शेरडं, कोंबड्या त्याच्या पायात लुडबुड करायच्या मग तो त्यांच्यावर लटकेच रागवायचा. आबाला कामाचा इतका सोस होता की रानात काम नसलं तर काम उकरून काढायचा. छत शाकारायचा, भिताडाला शाडूचा पोतेरा द्यायचा, खिसणी हातात घेऊन बैलाला खसखसून अंघोळ घालायचा, विहिरीच्या कड्याकपाऱ्यात उगवलेली रानटी झुडपं उपटून काढायचा, पिकातलं तण काढायचा, कडब्याची गंज मोकळी करून पुन्हा नीटनेटकी करून रचायचा, अवजारं साफसूफ करून जाग्यावर ठेवून द्यायचा. काहीच काम नसलं की पिकलेल्या धान्याच्या राशी पोत्यातून मोकळ्या करायचा, त्याची स्वच्छता करून पुन्हा पोत्यात भरायचा !आबा रिकामा बसलेला कधी कुणी पहिला नव्हता. आबाला कशाचा नाद नव्हता, कशाची आवड नव्ह्ती, रोज उठून आबानं नवी कापडं ल्येलीत असं कधी पाहण्यात आलं नव्हतं. आबानं त्याच्या आयुष्यात सिनेमा नाटक बघितलं नव्हतं. कधी कुठल्या गावाला हौसमौज म्हणून फिरायला गेला नव्हता, सोयऱ्या धायऱ्यात कधी कुणाची मौत झाली कुणाची सोयरीक जुळली, कुठल्या कार्यक्रमाचं आवातण आलं की तो मोठ्या मुश्किलीनं एसटीची वाट धरायचा. एखादा अपवाद वगळता तो एका दिवसात माघारी यायचा. त्यानं जिल्ह्याच्या बाहेर प्रवास देखील केलेला नव्हता कारण सगळा गोतावळा जिल्ह्याच्या परिघातच सामावला होता. खाण्यापिण्याचे चोचले त्याच्या जिभेला ठाऊक नव्हते ताटात पडेल ते खायचं आणि अंग मोडूस्तोवर काम करून भुईला पाठ टेकताच निद्रेच्या अधीन व्हायचं असा त्याचा शिरस्ता होता. घरातून बाहेर पडलेला आबा पारापाशी गप्पा मारत उभा असल्याचं कधी पाहण्यात नव्हतं, कधी कुणाच्या भांडणात मध्ये पडून त्यानं मध्यस्थी केली नव्हती की कुणाला दोन टोले लगावले नव्हते, कुणाला शिव्या हासडल्या नव्हत्या. जिभेचा कासरा त्यानं कायम आवळून ठेवलेला होता. गावात कुणाच्या लग्नात झालेल्या मोकार चेष्टामस्करीवर दात विचकणं त्याला जमलं नव्हतं. किर्तन, काकडा, पारायण, प्रवचन यातदेखील त्याचं मन फारसं रमलं नव्हतं. लोकांनी ताल धरला, टाळयांचा ठेका धरला तरी हा आपला गुडघे मुडपून त्यात हात गुंतवून बसून राही. कुणाच्या मौतीत धाय मोकलून रडायचा मानभावीपणाही त्याला जमला नव्हता.आबाची दुनियाच न्यारी होती, त्यात तो होता, त्याची बायको मथुरा होती, जानकी सावित्री पार्वती या मुली होत्या आणि एकुलता एक पोरगा असलेला सदाशिव होता. पोरींची लग्नं होऊन त्यांना आता नातवंडे झाली होती. त्यांचं येणं जाणं झालं की आबा हरखून जायचा. सदाशिवचं लग्न होऊन त्यालाही तीन मुली आणि एक पोरगाच झालेला. आबा काही साधू संत नव्हता, तो एक सामान्य माणूस होता. आपल्या नातींपेक्षा काकणभर ज्यादा जीव नातवावर होता. संदीपान हा त्यांचा नातू. तीन नातींच्या पाठीवर अंमळ उशिराने झालेला संदीपान म्हणजे आबाचा जीव की प्राण होता. त्या चिमुकल्यासाठीही आईबापापेक्षा आज्जाच सगळं काही होता. पितळी घंगाळातुन हरहर गंगे बुडुशा असं म्हणत म्हणत गरम गरम पाण्यानं तो नातवाला सकाळीच अंघोळ घाली, त्याचं आवरून सावरून झालं की कडेवर घेऊन देवळात जाई. त्याला कडेवर घेतलं की मथुराबाई ओरडे, "आजूक कितीं दी काखंत घेऊन फिरणार हायीसा ? वीणा गळ्यात अडकवासा म्हटलं की हिव भरतं जणू, खांदं भरत्येत जणू. आणि आता वावभर लांब झाल्येला नातू गळ्यात गुतवताना रुतत न्हाई जणू !" तिनं असं म्हणताच आबाला आणखी हुरूप येई. संदीपानचा गालगुच्चा घेत तो खळखळून हसे, कराकरा वाजणारी पायताणं पायात सरकावत उंबरा ओलांडून तो बाहेर पडे देखील. गोपीचंदन अष्टगंध भाळी ल्येवून थाटात बाहेर पडणाऱ्या आज्जा आणि नातवाच्या जोडीवर मथुरा बेहद्द खुश असायची. नीरस, एकसुरी आयुष्य जगत आपल्याच वर्तुळात रममाण झालेला आबा नातवामुळे जगण्याच्या नव्या परिमाणात दिसत होता. त्याला स्वतःला यात काही नवल वाटत नसायचं, पण गाव हरखून गेलेलं. नातवाच्या सयीनं पिकलं पान नव्यानं तरारलं बुवा ! असं लोक म्हणत. नातवाला कडेवर घेऊन मंदिरात जाणाऱ्या आबाला कुणी रामराम घातला की तो समोरच्याला थांबवे, संदीपानला सांगे की, "आपल्या नव्या आज्ज्याला रामराम घाला हो देवा !" आज्ज्यानं लाडात येऊन असं म्हटलं की ते गोड पोरगं त्याचे इवलेसे हात जोडून 'लामलाम' चे बोबडे बोल बोले. मग आबाला उधाण येई, तो त्याचे गालगुच्चे घेण्याच्या बहाण्याने आपली मिशी त्याच्या गालावर घुमवे, आज्ज्याच्या मिशांनी गुदगुल्या होताच नातवास बहार येई, तो खुदुखुदू हसू लागे. "पोर लई गोड बुवा" असं म्हणत समोरचा मार्गस्थ झाला की आबाची छाती फुलून येई. नातू बोबडं बोलतो म्हणून अलीकडे आबादेखील बोबडं बोलू लागला होता. त्याच्यासाठी घोडा होऊन गुडघ्यावर रांगू लागला होता. नातवाने धोतर ओलं केल्यावर फिदीफिदी हसत चक्क विनोद करू लागला होता. त्याची बालभारतीची पुस्तकं वाचण्याचं निमित्त करून तोही अक्षरे गिरवू लागला होता. अक्षरशत्रू असलेल्या आबाला त्याच्या वडीलांनी कधी शाळेत घातलेलं नव्हतं. लोकांची मोलमजदुरी करून कष्टाने स्वतःचं शेतशिवार उभं करणाऱ्या आबाने घरादारासाठी खस्ता खाल्ल्या होत्या. त्याला मिसरूड फुटलेलं नव्हतं, तळपायातला ओलावा ओसरला नव्हता तेंव्हा त्यानं नांगराची पाळी धरलेली, मातीच्या ढेकळात आणि शेणामुतात त्यानं आपलं बालपण सडवलं होतं, एका अर्थाने तो आपल्या बापाचा भाऊ झाला होता. इतकी त्यानं मेहनत केली होती. आपल्यातला माणूस मारताना त्यानं स्वतःला पोलादी चौकटीत चिणून घेतलं होतं.पण नातू आला आणि त्याचं विश्वच बदलून गेलं. त्याच्या हरवलेल्या बालपणातल्या चीजा तो आता शोधत होता. चालताना इकडं तिकडं बघत होता, भवतालच्या जगाचा कानोसा घेत होता. कष्ट करून पिकवलेल्या जुंधळ्याच्या राशीवर नातवाला लोळवताना त्या सोनेरी दाण्यांचा गंध त्याला नव्याने उमगत होता, तो परिमळ त्याला चराचराच्या नव्या व्याख्या शिकवत होता. बांधावर बसून नातवाच्या मऊरेशमी जावळावरून हात फिरवताना आपल्या हाताचे घट्टे त्याला त्याच्या संघर्षाची नवी जाणीव करून देत होते. नातवाला घेऊन शेतावर आलं की आबाला वेगळाच हुरूप येई. संदीपानला म्हशीच्या पाठीवर बसवलं की "क्येसं टोचत्येत" म्हणून तो विव्हळायचा मग लगेच आबा आपल्या मिशा म्हशीच्या पाठीवर घासायचा आणि म्हणायचा, "आता पुनिंदा बसून बगा वो राजे, क्येसं टोचत्येत का बगा !" त्यानं मान हलवताच आबा त्याला उचलून खांद्यावर बसवे. खांद्यावर सवारी घेऊन संपूर्ण शिवारात फेरी होई. आमराईत जाताच बारकाल्या झाडावर सूरपारंब्याचे लुटुपुटुचे डाव रंगताना आबा खोटं खोटं पडायचा, निपचित व्हायचा. शांत पडलेल्या आज्ज्याला पाहून रडवेला झालेला संदीपान त्याच्या छातीवर डोकं टेकवून रडायचा, गाल ओढायचा, 'उठा की आबा' म्हणत काकुळतीला यायचा. मग हळूच एक डोळा उघडत "भ्व्वा" आवाज करत नातवाला मिठीत घ्यायचा. दोघं मातीत लोळायचे. विहिरीला लागून असलेल्या केळीच्या बागेत चोरपोलीस खेळून दमायचे. दिवस मावळला की दमलेल्या उन्हाच्या किरणांवर स्वार होऊन घरी परतायचे.शाळा सुरु झाल्यापासून संदीपानचं रोजचं शेतात येणं कमी झालं होतं. नित्यनेमाने शेतात येणारा आबा संदीपान संगे आला नसला की त्यांच्या रोजच्या खेळण्याबागडण्याच्या जागी जाऊन बसायचा आणि एकट्यानंच गालात हसायचा. आपल्या थकलेल्या धन्याला असं खुळ्यागत हसताना पाहून गडयांना बरं वाटायचं कारण त्याचा हा रंग त्यांनी याआधी कधी पाहिलाच नव्हता. आबाला उतारवयात मिळालेलं सुख नियतीला पाहवलं नसावं. दिवाळीच्या सुटटीत केळीच्या बागेत चोरपोलिस खेळायचं की आंधळी कोशिंबीर खेळायची यावरून आज्ज्यात नातवात खोटा खोटा वाद झाला. नातू जिंकला त्यानं आज्ज्याच्या डोळ्याला रुमाल बांधला आणि एकदोनसाडेमाडेतीन म्हणत धूम ठोकली. काही क्षण थांबून आबानं डोळ्यावरचा रुमाल सरकवला, इकडं तिकडं पाहिलं तर संदीपान गायब ! पावलांचा आवाज न करता त्यानं खेळातला डाव सुरु ठेवला, पण बराच वेळ झाला तरी नातू दिसेना म्हटल्यावर त्यानं हाळया दिल्या, तरीही काहीच प्रतिसाद आला नाही. मग मात्र आबा घाबरला आणि ढांगा टाकत त्यानं संदीपानचा शोध सुरु केला. अवघ्या काही मिनिटातच त्याचा शोध संपला तेंव्हा तो धरणीला खिळून गेला. आबाला राज्य देऊन धावत आलेला संदीपान पाय घसरून विहिरीच्या कठड्यावरून आत फेकला जाताच कडेला असलेल्या गुळवेलींच्या मांसल मुळांच्या बेचक्यांत अडकल्यानं त्याच्या गळ्याला फास बसून विहिरीच्या कडेला लटकत होता ! त्या दिवसापासून आबाचं चैतन्य हरपलं. तो भ्रमिष्ट झाला नाही पण गोठून गेला. त्यानं स्वतःला कोंडून घेतलं. ज्या विहिरीत पोरगा फासावर गेला ती विहीर बुजवण्याचं सदाशिवनं ठरवलं. विहिरीच्या काठावर दगडमातीचा ढिगारे रचले गेले. विहीर बुजवायच्या गोष्टी कानी पडताच मनाशी निश्चय करून दिवस मावळायच्या बेतात असताना त्यानं देवळात जाऊन येतो म्हणून शेताचा रस्ता धरला. नजरा चुकवत शेत गाठलं आणि त्या दिवशीचा 'आंधळी कोशिंबीर'चा राहिलेला डाव पुरा केला. गळ्यात गुळ्वेलीची मुळं अडकावून, पाठीला भला मोठा दगड बांधत डोळयाला रुमाल बांधून त्यानं विहिरीत उडी घेतली. संदीपानच्या अकाली मृत्यूनंतर वस्तीवरचे गडी तेरावा होईपर्यंत सुट्टीवर गेले असल्यानं कुणाला काही पत्ताच लागला नाही. त्या रात्री विहिरीच्या पाण्यात आबा डोळे मिटून निपचित पडला तेंव्हा त्याचा ओलाचिंब झालेला नातू त्याच्या छातीवर डोकं टेकून रडू लागला, गाल ओढू लागला, 'उठा की आबा'चा धोशा सुरु केला, पण आबानं "भ्व्वा" केलं नाही. त्याला कडकडून मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून वाहणारं खारट पाणी विहिरीत एकजीव होताच पाण्याला गहिवरून आलं.- समीर गायकवाड अवांतर - लक्ष्मणआबाला गावातली म्हतारी जुनी खोंडं 'लक्षुमण' अशी हाका मारायची तेंव्हा मिशांआड लपलेल्या त्याच्या गोबऱ्या गालांवर हलकीशी खळी पडायची. बाकी नव्या पिढीतली मंडळी आबा म्हणायची. त्याच्या मितभाषी स्वभावामुळे सगळी टरकून असायची. जो माणूस कमी बोलतो वरवर शिष्ट वाटतो, कठोर वाटतो तो बहुतांशी अंतर्मुख असेल असं कधी वाटत नाही. पण ज्याचं आयुष्य हीच एक चौकट होऊन जाते तेंव्हा त्या चौकटीआडचं विश्व बंदीशाळेसारखंच होतं, पण त्यात देखील सुख मानता येतं. पण दुर्दैवाने त्या सुखालाही नख लागलं तर अखेरच्या दिवसात ही माणसं कोलमडून जातात. त्यांचा जगण्याचा आधार तुटतो, मातीच्या ओढीची नाळ सुकून जाते... आबा त्यातलाच एक होता !- समीर गायकवाड. दैनिक लोकसत्तामधील लेखाची लिंक