गंगा जमुना ...

गंगा जमुना ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

जमुनाबाई एकदम फाटक्या तोंडाची, "बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी... अरे, इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम... वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. .. तू बारा गावचे पाणी पिला असशील, मी बारा गावची लोकं पचवलीत." असं सांगताना ती छातीवर त्वेषाने तळहाताने ठोकत असते अन तिच्या चेह-यावर अनामिक अभिमान असतो. या अभिमानाची वर्गवारी मला अजूनही करता आली नाही. हातातल्या पंख्याने ओल्या झालेल्या गळ्यावर हवा घेत ती आधी पचकन थुंकते, पुढे बोलते,     "इथे कुठली गीता अन कुठला भगवान ?" एकही थेंब इकडे तिकडे न उडवता पिचकारीने बरोबर कोनाडयातील कळकट लाल्बुंद बादलीचा वेध घेतलेला. मी तिच्या खोलीत टांगलेल्या, हारांनी वाकलेल्या देवदेवतांच्या डझनावारी फोटोकडे पाहतो. 'हे खोटे आहेत आणि यांना हार घालणारेही खोटे, हे सर्व फोटो लडकी लोगचे आहे, माझा एक पण फोटो नाही त्यात.. ' "मग तू कुणाच्या पाया पडतेस ?" माझा प्रश्नांकित आत्मा शांत बसत नाही. "मी आईन्यात बघते, स्वतःला नमस्कार करते. हातपाय मारले नसते तर मी केंव्हाच मरून गेली   असती ना" "हे काय आयुष्य आहे का ? हे ही एक मरणच आहे की ?"माझा सवाल. जमुनाबाईच्या गालावर जीवघेणी खळी पडते, मग ती मोठ्याने हसते. ओलेते लाल्बुंद पाकोळी ओठ हलकेच पुसत पुसत, नाजूक फुलांची नक्षीकाम असलेला रुमाल गळयावरून फिरवत माझ्यावर नजर रोखत बोलते, 'सुना है द्रौपदीला जुगारमधी लावला होता, त्याच्याच नव-याने ! एक सोडून पाचजण होते म्हणे !.... उसका पिरीयड का दिन था शायद, तरीही तिचे केस धरून ओढत नेले ! तिच्या साडीला हात घातला होता ," मी तिचं वाक्य अर्ध्यातच तोडतो, "अगं देवानेच तर तिची अब्रू वाचवली ना !" "औरतला डावावर लावले तेंव्हा कुठे गेला होता रे तुझा हा भगवान ?" जमुनाबाईचा घाम आता बरयापैकी कमी झालेला असतो आणि तिच्या प्रश्नांनी मला घाम फुटू लागलेला असतो. 'सीतामैय्यालाही आखिर जमीनमधी जावं लागलं ना रे, आणि एक सांग बरं, मरद का बरं हिजाब घालत नाही रे, अरे, मजहब कोणता पण असू दे बाईलाच भोगावं लागतं ... " "माझ्या दुनियेत एक मरद दाखव जो भोगतोय आणि बाई त्याला चुसते आहे ! अरे ही दुनियाच मुळात आजारांची, कर्जांची, आशेची, निराशेची,  पुऱ्या न होणाऱ्या कसमांची, भिकेची, लसभरी जखमेची, तुटलेल्या स्वप्नांची, फाटक्या कपडयांची, किंकाळयांची, कन्ह्ण्याची, कुथण्याची, फसवण्याची, फसवून घेण्याची, चोरीची, बदमाशीची, अय्याशीची, पिळवणूकीची, चुरगळलेल्या गजरयांची, शोषणाची, जबरदस्तीची, रग जिरवण्याची, जुलूमाची, जिंदगीभर रडण्याची, बदनामीची, नामुष्कीची, लपून छपून जगण्याची फार जालीम दुनिया इथली ! पण तुझ्या दुनियेपेक्षा नक्कीच जास्ती माणुसकीची आहे, आपले भोग आपल्या देहाने  जगणारी दुनिया आहे ही... " मी आता पुरता निरुत्तर झालेला असतो. मग ती हलकेच पुढे सरसावते, कपाळावर येणारे घुंगराळे केस कानामागे खोचते, पदर नीट नेटका करते, सावध होत मला विचारते, "अब आखरी सवाल !" मी नकळत मान हलवतो, "तूझी शेती बाडी आहे, तू जमीनला आई मानतोस ना ?' यावर मी होयच उत्तरणार हे तिला पुरते ठाऊक असते, "तुझ्याकडे जमीनीचा उतारा असेलच की ?" 'आहे' म्हणेपर्यंत तिने पुढचा प्रश्न टाकलेलाच, "त्या उता-यावर तुझे नाव जमिनीचा मालक म्हणून नाहीये मालूम है ना, उस्पे क्या लिखा है ?" "थांब मीच सांगते", माझ्या भांबावलेल्या चेहऱ्याकडे बघत ती उत्तरते. त्यावर लिहिलेलं आहे, "भोगवटादार !" "अरे ज्याला तुम्ही आई म्हणता, तिचाच तुम्ही भोग घेता आणि तुझे सरकार कागजच्या टुकडयावर तसे धडधडीत लिहून देते, आणि तुम्ही तो कागज घेऊन घरात जपून ठेवता ! अरे, ज्या मिट्टीमध्ये जन्मता, जगता त्या मिट्टीबद्दल तुम्ही असे विचार करता. तर परक्या बाईबद्दल काय विचार करणार ?" जमुनाबाईचे लॉजिक ऐकून माझ्या पायाखालची माती सरकलेली असते. माझा पांढरा चेहरा बघत ती विचारते, 'तू कशाला रे दुनियेची फिकीर करतोस ?' चाफेकळी नाकाला तर्जनीने खाजवत पाठीमागच्या तक्क्याला आरामात रेलून बसत ती बोलते, "माझ्याकडे बघ, मला कशाची फिकीर नाही, शंभर जणाजवळ झोपूनही मी स्वतःला पाकसाफ समजते... मै दिल की बहुत साफ हुं, तेरे गंगा की तरह !! इथे हजार लोक येऊन जातात, त्यांची घाण माझ्या अंगावर चढते पण माझे काळीज साफ आहे... " प्रसन्न चेह-याने मी तिचे मऊ हात हाती घेतो, तिच्या हाताच्या रेषात सगळ्या धर्मग्रंथांची लिपी कोरलेली.. पायात चप्पल सरकवून मी बाहेर निघतो, माझ्याकडे भरल्या डोळ्याने बघत तिच्या मधाळ आवाजात ती सांगते,      "नवीन खबर आली की तुला नक्की कळवेन... तोवर अलविदा ... "  नव्या संदर्भाचा शोध लावत अंधाराने बरबटलेले जिने उतरून मी मार्गी लागतो. जमुनाबाईचं नाव जमुना असलं तरी ती गंगेसारखीच पवित्र आहे हा समज तेंव्हाच अधिकच दृढ होत जातो ... - समीर गायकवाड.  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!